आज काय घडले... पौष शु. ३ “मोगलांस कृपावंत झाले!"

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 8:11 am

raghoba dada
शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला.
पानपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड संहार झाला आणि कलिपुरुष राघोबादादा कचखाऊ निघाले. ही संधि निजामाने चांगलीच साधली. त्याने कारवाया सुरू करून मराठ्यांचे मुलूख घेण्यास आरंभ केला. 'अविंधानें लबाडी केली. त्याचे पारिपत्य शीघ्रच घडेल' या विश्वासावर निजामास तोंड देण्याची तयारी मराठ्यांनी जोराची केली. उदगीरच्या लढाईत गेलेला प्रांत परत मिळविण्यासाठी निजामाची धडपड होती. पानपतावर मुख्य फौजा बुडाल्या, व नानासाहेब दिवंगत झाले यामुळे निजामास पुरतेच फावले. माधवराव पेशवे व रघुनाथराव दादा दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले. गोपाळराव पटवर्धन, बाबूजी नाईक, विसाजी कृष्ण, शहाजी भोसले, विठ्ठल शिवदेव, नारो शंकर, दमाजी गायकवाड, शिंदे, प्रतिनिधि, इत्यादि सर्व सरदार जमा होऊन सत्तर हजार फौज एकत्र झाली. नागपूरकर जानोजी भोसलेहि सामील झाले. युद्धाची झोंबी सुरू झाली. “मोगल अगदीं हैराण व गार झाला. त्यास असा मार कधी झाला नाही. त्यांचे घोडे, माणूस आठशेपर्यंत ठार, खेरीज जखमी हजार दोन हजार, आमच्या फौजा भारी झाल्या आहेत. श्रीमंतांचे प्रारब्ध उत्तम आहे." अशी स्थिति असली तरी सुद्धां मोगलांच्या प्रलयामुळे जनता त्रस्त झाली. मराठ्यांना अंतिम यशाची खात्री नव्हती. कारण दादासाहेबांचे अवशीस बोलणे एक, आणि पहांटेस एक असे आहे. कोणाचे मनांत युद्ध करावेसे नाही. सर्वांचे एकचित्त असल्यास पारिपत्य करणे अगाध नाही. परंतु बहुनायकी.... उभयतां श्रीमंतांचे चित्त शुद्ध नाही. दरबार नासले आहे. मोंगलाने मातबर झुंजे केली. दौलताबाद, नगर, हिवरें, श्रीगोंदें व भुलेश्वर या ठिकाणी चांगली युद्धे झाली...." अशा प्रकारे विजयाची खात्री असताहि विचित्र योगेंकरून दादासाहेबांनी निजामशी तह करून हातचे यश दवडले. “ दादासाहेब भोळा सदाशिव, मोगलांस कृपावंत झाले-"
-२९ डिसेंबर १७६१

इतिहासप्रकटन