आज काय घडले...
पौष शु. २
श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म !
चौदाव्या शतकांत पौष शु. २ या दिवशी दत्त सांप्रदायांतील प्रसिद्ध पुरुष
श्रीनृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला.
शिव आणि विष्णु यांची उपासना एकरूपाने करणाऱ्या दत्त सांप्रदायाने महाराष्ट्रांत संस्कृती प्रसाराचे कार्य चांगलेच केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नंतर नृसिंहसरस्वतींचा अवतार झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरास अंबिका नांवाच्या स्त्रीस आशीर्वाद दिला होता की, " पुढील जन्मी तुला अलौकिक पुत्र होईल." ही अंबिकादेवी मरणोत्तर व-हाडांत कारंजगांवी जन्मास आली. 'जन्म झाला पुढे तियेसी । करंजनगर उत्तरदेशी । वाजसनेय शाखेसी । विप्रकुळी जन्मली.' या जन्मी तिचें नांव अंबाभवानी असे होते. माधव नांवाच्या धर्मनिष्ठ ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला आणि यांच्या पोर्टी नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. यांचे चरित्र पहिल्यापासूनच अलौकिक अशा चमत्कारांनी भरून राहिले आहे. असे सांगतात की, “जन्मतांच तो बालक । ॐकार शब्द म्हणतसे ऐक." ज्योतिषांनी याचे भविष्य असें वर्तविले की, 'न होती तयासी गृहिणीसुत । पूज्य होईल त्रिभुवनांत.' ॐ या अक्षराखेरीज दुसरा कोणताहि उच्चार हे बालक करीत नसल्यामुळे सर्वांना चिंता लागून राहिली. परंतु मुंज झाल्यानंतर आईने पहिली भिक्षा घातली तेव्हा यांनी 'अग्निमिळे पुरोहित', 'इषेत्वा', 'अग्नि आयाहि' इत्यादि वेदांतील चार मंत्र म्हणून दाखविले. त्यानंतर यांनी आईच्या आग्रहासाठी घरच्या घरीच वेदपठण केले. दुसरी भावंडे झाल्यावर हे तीर्थयात्रेस निघाले. काशी येथे नृसिंहसरस्वतींनी खडतर असें तपोनुष्ठान केले. त्याच ठिकाणी कृष्णसरस्वती नावाचे एक तपोनिष्ठ व अति वृद्ध संन्यासी होते. त्यांच्यापासून यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. नृसिंहसरस्वतीचे संपूर्ण चरित्र गुरुचरित्रांत वर्णिले आहे. हे साक्षात् दत्तांचा अवतार असल्यामुळे यांच्या जीवितांत अनेक अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टींचा संग्रह झाला आहे. हे नृसिंहसरस्वती शके १३८० मध्ये समाधिस्थ झाले.
शिशिर ऋतु माघ मासी । असितपक्ष प्रतिपदेसी।
शुक्रवारी पुण्य दिवशीं । श्रीगुरु बैसले निजानंदी॥