शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली.
जनार्दनस्वामी मूळचे चाळीसगांवचे देशपांडे. यांचा जन्म फाल्गून व. ६ शके १४२६ मध्ये झाला. पूर्वायुष्यांत हे यवनांच्या सेवेत होते. हे देवगिरी ऊर्फ दौलताबाद येथील मुख्य अधिकारी व यवन पातशहाचे विश्वासू मुत्सद्दी झाले. जनार्दनस्वामी मोठे शूर, करारी स्वभावाचे, टापटिपीचे व तेजस्वी पुरुष होते. महाराष्ट्रांत यावनी धर्माचा जोर सर्वत्र असतांहि यांच्या स्वधर्मनिष्ठेची दुंदुभि चोहोकडे दुमदुमून राहिली होती. हे दत्ताचे सगुणोपासक होते. पहाटे उठल्यापासून तो मध्याह्नकालपर्यंत स्नानसंध्या, समाधि व दत्तसेवा यांत ते निमग्न असत. दुपारच्या वेळी कचेरीतील काम झाले म्हणजे मग रात्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे निरूपण करीत. यांच्यासाठी पातशाही हुकुमावरून देवगडावर दर गुरुवारी कचेऱ्यांना सुट्टी होती. दत्ताच्या सगुण साक्षात्कारामुळे स्वामीच्या ठिकाणी समता, शांति व अनासक्ति नांदत होती. भक्तिज्ञानवैराग्याचा हा पुतळा हिंदु-मुसलमानांना सारखाच प्रिय वाटे. नित्य भजनपूजन व आत्मचर्चा यांच्या दिव्य परिमळाने 'देवगड' पुण्यवान् झाला होता. 'श्रीमद्देवगिरी जनार्दनपुरी वैकुंठलोकापरी' असे वर्णन एका कवीने केलें आहे. याच जनार्दस्वामींनी शेजारच्या पैठण क्षेत्री वास करणाऱ्या बालभागवतास-एकनाथास-आपल्याकडे आकर्षून घेतले. आणि त्यांना आपल्या कृपेनें जगदुद्धार करण्यास समर्थ केले. जनार्दनस्वामी हे दत्ताचे परमभक्त होते. त्यांची श्रद्धा पाहून दत्ताने त्यांना साक्षात् दर्शन दिले होते. स्वतः दत्तांनी जनार्दन स्वामीवर अनुग्रह केला; या प्रसंगाचे वर्णन एकनाथमहाराज करतात :
"गुरु प्राप्तिलागी सर्वथा । थोर जनार्दनासी चिंता।
विसरला तिन्ही अवस्था । सदगुरु चिंतिता चिंतनी ॥
देवो भावाचा भोक्ता । दृढ़ जाणोनि अवस्था ।
येणें जालें श्रीदत्ता । तेणे हातु मायां ठेविला ।।
-२९ नोव्हेंबर १५७५