आज काय घडले ... मार्गशीर्ष व. २

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
3 Jan 2021 - 11:37 am

आज काय घडले ...
मार्गशीर्ष व. २
सिंधुदुर्गाची उभारणी!
शके १५८६ च्या मार्गशीर्ष व. २ या दिवशी छत्रपति शिवाजी राजे यांनी सिंधुदुर्ग बांधण्यास सुरुवात केली.
शिवशाहीपासूनच मराठ्यांचे आरमाराकडे विशेष लक्ष होते. 'घरांत जैसा उंदीर तैसा आमचे राज्यास सिद्दी' असे शिवाजी राजे नेहमी म्हणत. आणि जंजिऱ्याच्या सिद्दीमुळेच मराठ्यांचे आरमार वाढीस लागले. सरहद्दीचा बंदोबस्त ठेवणे हे राज्यसंरक्षणाचे मुख्य काम असल्यामुळे कारवारपासून सुरतपर्यंत पश्चिम किनाऱ्यावर आपणास कोणी शत्रु नसावा अशी शिवाजी महाराजांची व्यवस्था होती. समुद्रावर जहाजे ठेवून आपली सत्ता अबाधित ठेवण्याची मनीषा त्यांची होती. " शिवाजी राजे स्वतः खलाशी नव्हते म्हणून बरे, नाही तर त्यांनी जमिनीचा पृष्ठभाग साफ करून टाकला तसा समुद्राचाहि टाकला असता.' असे इंग्रज म्हणत. सन १६६४ पासून शिवाजी राजांचे आरमार विशेषकरून वाढले. 'जंजिरा पाण्यांत किल्ला, जेर न होय, असाध्य तो आपणांस यावा, समुद्रात सत्ता करावी, म्हणून बहुत चित्तांत हेतु धरून, जहाजे नवीन तयार महाराजांनी करविली.' दहापांच लक्ष रुपये खर्च केला, समुद्रात सत्ता बसविली, बेटे चांगली पाहून किल्ले बांधले. त्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास शिवाजीराजे स्वतः खपत होते. सन १६६४ हे वर्ष शिवरायांच्या वाढत्या पराक्रमाचे निदर्शक आहे. सुरतेहून अमूप लूट आणली होती. कुडाळ प्रांत हस्तगत केला होता, वेंगुर्ल्याचा बंदोबस्त करून गोवेकरांस गप्प बसविले होते. मुधोळचे संस्थान ताब्यात घेतले आणि मार्गशीर्ष व. २ या दिवशी सिंधुदुर्ग बांधण्यास सुरुवात करून तेथील बंदरांत मोठ्या गलबतांचे लढाऊ आरमार त्याने बनविलें. "उत्तरेस जंजिरा व दक्षिणेस गोवा या दोन तटबंदीच्या नाविक स्थलांमुळे राज्यास बळकटी कशी येते हे शिवरायांच्या ध्यानी चांगलेच होते. जंजिऱ्याच्या जोरावर व्यापार वाढतो, त्यासाठी लढाऊ व व्यापारी आरमार पाहिजे हे जाणून मार्गशीर्ष व. २ रोजी महाराजांनी खुद्द आपल्या हस्ते किल्ला बांधण्यास मुहूर्त करून चिरा भूमीमध्ये बसविला."
-२५ नोव्हेंबर १६६४

इतिहासप्रकटन