'सातपाटील कुलवृत्तांत': इतिहासासोबतच्या निरंतर वाटाघाटी

Primary tabs

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जनातलं, मनातलं
22 Nov 2020 - 9:30 am

(पूर्वप्रकाशन: शब्दालय 2020 दिवाळी अंक. मिपावर टाकताना काही मामुली फेरबदल केले आहेत)

मी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असतो. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असला तरी नवे लेखक, नवी पुस्तके याबद्दल अद्ययावत माहिती त्वरित मिळत नाही. आंतरजाल व समाजमाध्यमे यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुलभ झाली आहे असे म्हटले तरी प्रादेशिक भाषांतील पुस्तके ठेवणाऱ्या वाचनालयांचा भारतात अभावच आहे. (सर्व मराठी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणे शक्य नसते).

अशा परिस्थितीतही ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या महाकादंबरीचे नाव चांगलेच दुमदुमत असल्याची बातमी मजपर्यंत पोचली होती. इतिहासाधारित ललित लेखन हा विषय वाचक म्हणून माझ्या जिव्हाळ्याचा आहे. जालावरील काही परीक्षणे वाचून उत्सुकताही शिगेस पोचली होती. पठारेंचे 'नामुष्कीचे स्वगत' एकेकाळी फारच आवडलेले होते.

पण पुस्तकविक्री करणाऱ्या एकूणएक संस्थळांवरून 'सातपाटील' हातोहात खप होऊन गायब झालेले आढळले. मुंबई-पुण्याला जाऊन ते विकत घेता आले असते पण माझी तिकडे खेप होण्याची काही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे कुणाची तरी प्रत चोरायची असा बेत मी जवळजवळ निश्चित केला. (टीप: पुस्तकचोरीला मी चोरी मानत नाही. तेव्हा नसते नैतिक तिढे उपस्थित करू नयेत! माझी पुस्तके चोरणाऱ्यांनाही मी माफ करत असतो. चोराचे नाव उघडकीस आले तर फारतर त्याज -किंवा तिज- कडून ते पुस्तक परत घेऊन येतो.). अर्थात अमराठी भूमीत आणि तेही साहित्य-उदासीन अशा बहुभाषिक समाजात 'सातपाटील' बाळगून असलेला असामी कुठे सापडणार हा मुद्दा होताच. पण सुदैवाने तसा प्रसंग आला नाही. घरी जाण्याची संधी मिळाली. पुस्तक रीतसर मूल्य देऊन विकत घेता व वाचता आले.

'सातपाटील'ची 'तुंबाडचे खोत'शी तुलना करण्याचा प्रथमदर्शनी मोह होईल. पण तशी तुलना अगदीच अस्थानी आहे. दोघांच्या जातकुळीत खूपच फरक आहे. तुंबाड ही एका गडगंज, प्रतिष्ठित, उच्चवर्णीय घराण्याची कथा आहे तर सातपाटील हे कष्टकरी, शेती जोतणारे, मुलुखगिरी करणारे मराठा-कुणबी. दुसरे म्हणजे 'सातपाटील' ही दख्खनी मुलुखाच्या (महाराष्ट्र हे नाव पडण्याआधीपासूनच्या) इतिहासाशी घट्ट जोडलेली आहे. 'तुंबाड'च्या केंद्रस्थानी मात्र कोकणाच्या एका दूरच्या दुर्गम खेड्यातले, उर्वरित महाराष्ट्राशी नाममात्रच संबंध असलेले असे खोत घराणे आहे.

'सातपाटील' हा नेमाडेंच्या 'हिंदू- एक समृद्ध अडगळ'चा companion piece म्हणून वाचणे मात्र शक्य आहे. दोहोंच्या निवेदनशैलीत व रचनेत फरक असला तरी साम्यस्थळेही विपुल आहेत. इतिहासाचा अर्थ लावण्याचा दोन्हींचा प्रयत्नही परस्परपूरक व समांतर आहे.

'सातपाटील'ची रचना फारच वेधक आहे. दर पिढीतला एक पुरुष (पैकी एका पिढीत मात्र अपवादात्मक दोघेजण) असा एकेका प्रकरणाचा नायक कल्पून त्याच्या कथेद्वारे समाजाचे व्यापक चित्र उभे करणे ही कल्पना मला फारच आवडली. शेवटच्या प्रकरणात पठारे त्यातील नायकाबद्दल एक गुपित उघड करतात ज्याने कादंबरीचा पूर्ण पोत बदलतो आणि खुमारी अधिकच वाढते. अर्थात हे गुपित आपल्याला अगोदर ज्ञात नसल्यामुळे आधीच्या भागांत वर्णिलेल्या काही घटना व योगायोग फारच अतर्क्य भासतात हेही खरेच.

या कादंबरीचे बाह्यस्वरूप जरी यातील पात्रांच्या जीवनातील घडामोडी असे दिसत असले तरी मला वाटते की तिजमागचे व्यापक तत्व हे व्यक्ती व इतिहास यांच्यामध्ये सतत घडत असलेल्या वाटाघाटी असे आहे. इतिहास हा घडत असताना कधी व्यक्तीची पत्रास ठेवत नसतो. व्यक्तीलाही इतिहास आपला निवाडा कसा करील हे अवगत नसते. व्यक्तीचे मूल्यमापन केवळ परिप्रेक्ष्यातूनच होऊ शकते. पण तरीही आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या इतिहासाची अंधुकशी का होईना जाणीव आपल्याला असते. इतिहास म्हणजे केवळ शासक-शोषकवर्गाच्या जंगी लढाया व कारस्थानांची जंत्री आणि रयत ही केवळ सोसणारी, निष्क्रिय बघी, हा दृष्टिकोन अन्याय्य आहे. आपण कितीही नगण्य किंवा अजाण असलो तरी या घडत्या इतिहासात आपले एक स्थान मिळवण्याची आपली धडपड कळत-नकळत चालूच असते. किंबहुना सामान्य माणसाची ही अशी धडपड म्हणजेच खरा इतिहास म्हणावा की काय, असा एक विचारप्रवाह आहे. जनसामान्यांची ही अविरत धडपड हाच 'सातपाटील'चा गाभा आहे असे मी समजतो.

हरेक पिढीच्या प्राक्तनात लिहिलेल्या या खटपटीचेच एक स्वरूप म्हणजे इतिहासाला विशिष्ट रंग देणे. हे प्रत्येकजण आपापल्या पातळीवर करत असतो, कारण इतिहासाने आपल्याला पराजित, भेकड किंवा नियतीशरण म्हणून स्मरणात ठेवलेले कुणालाच नको असते. 'सातपाटील' हे असे 'नको असलेले' इतिहास अतिशय संवेदनाशीलपणे व दीर्घदृष्टीने हाताळते, तेही बरोबर-चूक असा निवाडा अजिबात न करता. आजच्या काळात एकूणच सामाजिक- ऐतिहासिक भावना अती हळव्या झालेल्या असताना 'सातपाटील'चा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

पौर्वात्य पुरुषसत्ताक इतिहास हा पुरुषांनी लिहिलेला असल्यामुळे अवाजवी प्रमाणात पुरुषकेंद्री असतो. स्त्रियांचे मनोविश्व त्यात दिसत तर नाहीच, पण मोजके अपवाद वगळता स्त्रिया एकूणच इतिहासाच्या परिघावरच घुटमळताना दिसतात. युद्धे पुरुष लढतात व त्याचे भयाण परिणाम मात्र स्त्रिया सोसतात. इतकेच नाही तर ते तसे सोसतानाही पुरुषाची कीर्ती अबाधित राहीत असे आपले वर्तन व प्रतिमा जपणे त्यांच्या नशिबी येते. 'सातपाटील' मात्र स्त्रीपात्रांना स्वायत्त निर्णयाधिकार व मनोव्यापारांची सजग जाणीव देते. पुरुषांनी युद्ध करताना जर स्त्रियांना विचारले नसेल, तर युद्धाचा निकाल लागल्यावर स्त्रियांनी काय करावे हे ठरवणारा पुरुष कोण, असा मूक प्रश्नच जणू 'सातपाटील'मधील स्त्रिया विचारताना भासतात (युद्ध हा शब्द व्यापक, प्रतीकात्मक अर्थाने घ्यावा). यातील जवळजवळ प्रत्येक स्त्री ही निर्भयपणे जीवनाला सामोरी जाऊन जे बरेवाईट विधिलिखित असेल ते उंच मानेने स्वीकारते, आपले निर्णय आपण घेते. कोणत्याही स्त्रीपात्राचे वर्णन अबला किंवा गरीब बिचारी असे करता येत नाही. विशेष म्हणजे हे सर्व लिहिताना पठारे कोणताही अभिनिवेश किंवा आव दर्शवत नाहीत. यातील पुरुषपात्रे त्या त्या काळाला अनुसरून थोडीफार श्रेष्ठतावादी आहेत हे खरे (अशा व्यक्तीही एका अर्थाने पुरुषसत्तेच्या बळीच) , पण तरीही 'शंभुराव' हा मला तुलनेने अधिक संवेदनाशील व न्यायबुद्धी असा वाटला.

शेवटचा मुद्दा या पुस्तकातील जातिसंस्थेच्या चित्रणाशी निगडित आहे. (इथे माझ्या मताशी अनेकजण सहमत होणार नाहीत याची मला कल्पना आहे). जातिसंस्थेची उतरंड शोषणाधारित आहे हे सत्यच आहे. पण 'सातपाटील' वाचल्यावर वाटते की डाव्या विचारसरणीतला शोषक/शोषित हा अपरिवर्तनीय भेद जातिसंस्थेला लागू होत नाही. त्यामुळे 'निरंतर वर्गयुद्ध' हा सिद्धांतही गैरलागू ठरतो. फारतर असे म्हणता येईल की परस्परशोषण हा मानवी समाजाचा स्थायीभाव आहे, या वस्तुस्थितीचा जातिसंस्था स्वीकार करते आणि या शोषणाचे सर्वसंमत व्यवस्थापन कसे करता येईल याकडे पाहते (इथे जातिसंस्थेचे समर्थन करण्याचा हेतू नाही). हा विचार भलताच क्रांतिकारी आहे आणि पठारेंची लेखनपरंपरा पाहता तो अधिकच तसा वाटतो. अर्थात मी स्वतः आधीपासूनच उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्यामुळे मजप्रत हा मुद्दा प्रकर्षाने पोचला हे मान्य करतो.

सारांशाने सांगायचे, तर ही महाकादंबरी महाप्रचंड आवडली. पुन्हा एकदा मी ती जरूर वाचणार आहे.

इतिहासवाङ्मयप्रतिक्रियासमीक्षा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

23 Nov 2020 - 5:22 pm | प्राची अश्विनी

परीक्षण आवडलं. बघुया पुस्तक कधी वाचायला मिळतंय.

चलत मुसाफिर's picture

23 Nov 2020 - 9:51 pm | चलत मुसाफिर

धन्यवाद. पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.