सत्यमेव जयते.

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
1 Nov 2020 - 9:22 am

सत्यमेव जयते.

प्राध्यापक जगदीश कदमांना एकदम दचकून जाग आली . कोणी तरी त्यांचे पाय हलवत होते ..
“ ओ ..साहेब .. जरा उठा ..आम्हाला जरा बसायला जागा द्या…”
एक क्षण भर त्यांना आपण कुठे आहोत हेच आठवेना ..मग हळू हळू त्यांच्या मेंदूवरचा झोपेचा पडदा अलगद सरकला ,आणि त्यांना आठवले कि आपण कोल्हापूरला जाणाऱ्या एक्सप्रेस मध्ये आहोत आणि कुणी तरी आपल्याला अगदी माजोर पणे उठवत आहे. त्यांनी नीट डोळे उघडून पाहिले . मग उशाशी असलेला चष्मा आपल्या डोळ्यांना लावला. त्यांना आता नीट दिसले तीन चार जण ते झोपले होते त्या बर्थ पाशी उभे होते. समोरच्या बर्थ वरील माणसाला तसेच उठवून तिथे तीन चार जण असेच बसले होते आणि ती बर्थ ज्याची होती तो सुद्धा एका कोपऱ्यात अंग चोरून बसला होता. त्यांच्या वरच्या आणि समोरच्या बाजूला वरच्या बर्थ वर दोन स्त्रिया झोपलेल्या होत्या ...त्यांना मात्र अजून तरी या लोकांनी उठवले नव्हते.
“ साहेब ..जरा उठून बसा ..म्हणजे आम्हाला बसता येईल ..” त्यांना त्यांचे पाय हलवून उठवणारा माणूस त्यांना पुन्हा म्हणाला . या माणसाला उठायला इतका उशीर झाल्यामुळे तो आधीच वैतागला होता. थोराड बांधा आणि मिचमिचे डोळे ...त्यांना खूपशी तांबडी झाक होती. दारू मुळे किवा कमी झोप झाल्यामुळे. अंगात निळा फुल शर्ट आणि कसल्यातरी अगम्य रंगाची विजार.
“ अहो ही २ टियर बोगी आहे. झोपण्यासाठीच आम्ही तिकीट काढले आहे. तुम्ही असे मधेच या बोगीत कसे आलात ? आणि आलात ते आलात आणि आमच्या आरक्षित जागेवरूनच आम्हालाच उठायला सांगताय ? “प्राध्यापक कदम म्हणाले.
त्या माणसाबरोबर असणारे ते तीन चार जण आता एकदम पुढे आले. त्यांना हे सगळे जणू काही दररोजचे होते.
“ ओ ..साहेब ..आम्हाला शहाणपणा शिकवू नका ...एक तासाची तर गोष्ट आहे ..आम्ही सांगलीला उतरून जाऊ ..मग झोपा कि तुम्ही ढाराढूर…” असे म्हणत तो खदखदून हसला . कदमांचे पाय धसमुसळेपणे सरकवून तो माणूस जवळ जवळ त्यांच्या पायावरच बसला . कदमांनी आपले पाय जरा मागे घेतले आणि ते उठून बसले ...ते बसताच बाकीचे दोघे तिघे त्यांच्या बर्थ वर बसले. कदमांनी खाली पसरलेल्या आणि काल रात्री रेल्वे च्या अटेंडंटने दिलेल्या बेडशीट आणि पाघरूणा वरच त्यांनी बसकण मारली होती.
कदम आता खिडकी जवळ अंग चोरून बसले होते. आपण हा अन्याय सहन करतोय याची त्यांना शरम वाटत होती.
“ आता कसे झाक झाले … अहो जरा समजुतीने घेतले कि तुमचीही सोय आणि आमची सुद्धा ...काय एक तासाभरात आम्ही सांगली ला उतरून जाऊ ..” त्यातील एक जण कदमांची समजूत काढत म्हणाला.
“ अहो पण तुम्ही आत आलात कसे ? तो तिकीट तपासनीस काय करतोय ? मी त्याला बोलवून आणतो आत्ता ..” असे म्हणत प्राध्यापक कदम उठले …
त्यांनी सगळा डबा हुडकून पहिला पण त्या तपासनीसाचा पत्ता नव्हता ..ते परत आपल्या जागी येऊन बसले खरे ...पण त्यांचा राग अजून शांत झाला नव्हता .
“ काही उपयोग नाही साहेब त्या तपासनीसाला हुडकून ...आमच्या कडून पैसे घेऊनच त्याने आम्हाला आत घेतले आहे. . आम्हाला हे दररोजच करावे लागते . .” त्या चौघा पैकी एक जण म्हणाला.
“ अहो साहेब ..जाऊ द्या ना ! एक तास तर आम्ही बसणार .. रात्र संपतच आली आहे. “ त्यातील एक जण जरा समजुतीच्या सुरात म्हणाला .
“ तुम्ही सगळे चांगले शिकलेले आणि चांगल्या घरातील दिसता … असे दुसऱ्याला त्रास देऊन ..तुम्हाला काय मिळते ? “ कदम जरा चिडलेल्या आवाजात म्हणाले.
“ अहो सगळी गाडी भरलेली असते ...आम्हाला दररोज कामा साठी सांगलीला जायला लागते ...आमच्या कडे पास आहे. आम्ही सुद्धा पैसे भरतो. इथे लोकांना उभे राहायला जागा नाही ..आणि तुम्ही झोपता? ..एका तासाचा तर प्रश्न आहे ...बसा गप गुमाने ...उगीच सकाळी सकाळी डोक्याला ताप देऊ नका …” तो आडदांड आणि लाल डोळ्याचा माणूस म्हणाला. तो बराच गरम डोक्याचा असावा. तो बहुदा या सगळ्यांचा म्होरक्या असावा . कदमांनी मनातल्या मनात त्या माणसाचे नाव चिडक्या असे ठेवले.
हे सगळे जवळ जवळ १० जण होते. उगीच यांच्या नादाला लागायला नको , असा एक विचार कदमांच्या मनात आला . मग त्यांना आपलीच लाज वाटली . आपण आपल्या विद्यार्थ्यांना किती वेळा सांगतो . अन्याय सहन करणे हे त्या अन्यायाला पाठींबा देण्यासारखे आहे. मग आपण काय करतो आहे. ?

मग त्यांना कुठे तरी वाचलेले आणि त्यांना खूप आवडलेले एक वाक्य आठवले ..
“ दुर्जनांची सगळी ताकद .. ते संख्येने कमी असून सुद्धा ...आपल्या विरुद्ध सज्जन काहीही करणार नाहीत ..ते शेपूट घालून गप्प बसतील या एकमेव विश्वासात असते.”
त्यांना परत नेहमी पडतो तो प्रश्न पडला दुर्जन जेव्हडे पटकन एकत्र येतात तेव्हडे सज्जन का येत नाहीत ?

तरी सुद्धा प्रोफेसर कदम गप्प बसले . विवेक बुद्धी म्हणा ,किवा सज्जन माणसाचा पुचाट पणा म्हणा ...पण ते गप्प बसले. मनातल्या मनात स्वतःचा धिक्कार करत बसले. थोडा वेळ मग शांततेत गेला. मग त्या आक्रमक कंपू च्या ( म्हणजे हे नाव मनातल्या मनात प्राध्यापक कदम यांनीच ठेवले होते. ) गप्पा आणि हास्यविनोद सुरु झाले. प्राध्यापक कदम आता डोळे मिटून परत झोपेची आराधना करू लागले. त्याच्या मनात आले ,आपल्या मुळे ह्या डब्यातील लोकांची अगोदरच झोप मोड झाली आहे आपण जरा शांत बसावे किवा अगदी हळू आवाजात बोलावे असे विचार त्या आक्रमक कंपू च्या मनात सुद्धा आले नसणार . प्राध्यापक कदम इतिहास शिकवत असत. त्यांच्या अगदी आवडीचा विषय. आपण ब्रिटिशांच्या कडून स्वातंत्र मिळवले ..लोकशाही इतकी वर्षे राबवतो आहोत ..पण लोकशाही आणि झुंडशाही यातील फरक आम्हाला केव्हा समजणार ? या आक्रमक कंपूचे शिक्षक कोण होते ? त्यांनी यांना काहीच शिकवले नाही ? का शिकवूनही यानी काहीच ग्रहण केले नाही ? असे काही तरी विचार प्राध्यापक कदम करत होते. त्यांच्या लक्षात हि आले कि आपण आपल्या रागाला कृती मध्ये बदलू शकत नाही पण नुसते षंडपणे विचारात बदलू शकतो . तेवढ्यात त्यांना एकदम ठसका लागला ...त्यांनी डोळे उघडून पहिले तर त्या आक्रमक कपू पैकी तीन चार जणांनी आता सिगारेट शिलगावली होती . त्याचा धूर सगळीकडे भरून राहिला होता. आता प्राध्यापक कदमांना शांत बसणे अशक्य झाले. सिगारेट ओढणे त्यांना अजिबात आवडत नसे. तो धूर ..तो तंबाखूचा वास सारे काही त्यांना तिरस्करणीय होते.
“ अहो ..तुम्ही सिगारेट काय ओढताय ? असे डब्यात सिगरेट ओढणे हे बेकायदेशीर आहे ..हे तुम्हाला माहित नाही का ?” ते त्या कंपूतील सिगरेट ओढणाऱ्या एकाला उद्देशून म्हणाले. त्या डब्यातील दुसऱ्या कुणीही याला विरोध केला नव्हता ..याचे त्यांना आश्चर्य वाटले.
“ ओ ..साहेब ..आम्हाला कायदा शिकवू नका ..इथे आम्ही करतो तो कायदा ...तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दुसरी कडे जाऊन बसा .. काय मगापासून कटकट लावलीय ? इथे बाकी कुणाला त्रास होत नाही ..होतोय का काका ? “ तो चिडक्याने आपले डोळे मोठे करून समोरच्या सीट वर बसलेल्या एका प्रवाश्याला प्रश्न केला …
त्या बिचाऱ्या काकांनी उगीचच मान हलवली. नरो वा कुन्जारोवा ...हो पण नाही आणि नाही सुद्धा नाही .
“ बघा या कुणाला त्रास होत नाही …” तो चिडक्या म्हणाला आणि एकदम मोठा विनोद केल्यासारखा तो जोरात हसला ..बाकीचा कंपू मग तसेच जोरात हसले.
“ अहो दुसरी कडे काय जाऊन बसा ? हा बर्थ मी राखीव केला आहे ..तुम्हीच येथे घुसलेले आहात ...तुम्हीच बाहेर जा ..तुम्हाला सिगरेट ओढायची असेल तर …” प्राध्यापक कदम आता जरा चिडले होते. या सिगारेट च्या धुराचा त्यांना जरा जास्तच त्रास होत असे ..वरच्या बर्थ वरील बायका सुद्धा आता आपला पदर तोंडावर घेऊन बसल्या होत्या. पण कोणीही या लोकांना विरोध करत नव्हते.
“ तुम्हाला सांगून समजत नाही का ? आम्ही सिगारेट ओढणार ...ए रम्या ..ते डब्याचे बाहेरचे दार जरा उघड रे ...धूर जरा बाहेर जाऊ दे ...या साहेबांनी फारच तमाशा लावलाय …” चिडक्या म्हणाला. तो जो कोणी रम्या होता त्याने एक दोन रांगा पलीकडे असलेले दार उघडले ...जोरदार वारा भसकन आत आला ...तसेच गाडीचा खड खड ...खड खड असा लयबद्ध आवाज.
“ आता खूष ? साहेब ...आता गप्प पडा आणि आम्हालाही शांत पणे सिगरेट ओढू द्या. “ एखाद्या शिवी सारखा “साहेब “ याचा उच्चार करत तो चिडक्या म्हणाला .
प्राध्यापक कदम आता उठले ..दोन बाकांच्या मध्ये ते उभे राहिले ..त्या कंपू कडे आणि त्यातल्या त्यात त्या चिडक्या कडे पहात ते म्हणाले …
“ मी या सगळ्याबद्दल तक्रार करणार आहे … तुमचा उद्दाम पण मी चालवून घेईन असे समजू नका ..ही सरकारी गाडी आहे ...कायदे कानून काही आहेत कि नाहीत ?.”
“ करा ...अगदी अवश्य तक्रार करा ...आमचे फोटो सुद्धा काढा ..मोबाईल आहे ना ? काढा आमचे फोटो ...ए रम्या ..आणि तुम्ही सगळे नीट लाईन मध्ये उभे रहा ...काढा आमचा फोटो ...चांगला आला पाहिजे बर का ? “ तो म्हणाला आणि तो आता उभा राहिला होता ..बाकीचे पण उभे राहिले होते.
“ ओ ,साहेब ..जाऊ दे ..उगीच यांच्या नादाला लागू नका ..” समोरच्या बाकावर अंग चोरून बसलेला एक प्रवासी म्हणाला .
“ अहो ..गप्प बसून कसे चालेल. आपली बाजू सत्याची आहे ..आपण सगळे घाबरून गप्प बसतो त्या मुळे यांचे फावते. आपण संघटीत झालो तर ..हे काही करू शकत नाहीत …” प्राध्यापक कदम आपला फोन खिशातून काढत म्हणाले …
“ बरोबर आहे त्यांचे. पण सत्य आता आमच्या बाजूचे हाये बरका ! बघा आम्ही धा ..आणि हे एकटेच …” त्या कंपूतील तो रम्या असे नाव असलेला जरा बेरकीपणे म्हणाला. प्राध्यापक कदम नी फोटो काढला आणि ते आपला फोन आपल्या खिशात ठेवणार ...तेव्हढ्यात तो चिडक्या पुढे झेपावला आणि त्यांच्या हातातून फोन त्याने हिसकावून घेतला आणि थोडा पुढे होत दारातून बाहेर भिरकावून दिला ...प्राध्यापक कदम एकदम स्तंभित झाले त्यांचा चेहरा बघून तो आक्रमक कंपू एकदम खदाखदा हसायला लागला …
“ आमचे फोटो काढतो ? आता गप्प बसा जागे वर ...नाही तर आत्ता फोन टाकला ..तसा तुला पण बाहेर टाकीन ..” चिडक्या आता खरेच खवळला होता. इतका वेळ साहेब साहेब म्हणणारा चिडक्या आता प्राध्यापक कदमांना अरे तुरे ..म्हणायला लागला होता.
प्राध्यापक कदम एक दोन क्षण गोंधळून गेले ..बाकीचे सगळे सगळे सुद्धा आता पुढे काय होणार या कडे उत्सुकतेने पहात होते.
प्राध्यापक कदम एकदम पुढे झाले आणि हात उंच करून त्यांनी संकटकाळी गाडी थांबवण्यासाठी असलेली चेन ओढली.
“ मी तुमच्या विरुद्ध तक्रार करणारच ...सत्याचा शेवटी विजय होतो हे तुम्हाला कळेल ..” प्राध्यापक कदम काय बोलत होते हे त्यांचे त्यांना सुद्धा समजत नव्हते. चेन ओढलेली पाहताच चिडक्या एकदम बेफान झाला. तो एकदम ओरडला.
“ xxxx … चेन ओढतो ..? तुला दाखवतोच माझा इंगा … धरा रे याला आणि द्या खाली टाकून …” असे म्हणत त्याने कदमांचे पाय धरले . दुसऱ्या दोघानी त्यांना त्यांच्या काखेत हात घालून उचलले आणि ते उघड्या दाराकडे निघाले. प्राध्यापक कदम आता जीवाच्या आकांताने हात पाय झटकू लागले आणि ओरडू लागले
“ वाचवा ..वाचवा …”
डब्यात एक भयाण शांतता पसरली . कोणी ही विरोध केला नाही .. डब्यातील काही लोक “ अरे सोडा त्याला ..सोडा “ असे ओरडू लागले पण चिडक्या आणि त्याच्या तीन चार साथीदारांनी प्राध्यापक कदमांना उचलून आता दारापर्यंत आणले होते आणि काही कळायच्या आत उघड्या दारातून त्यांना बाहेर भिरकावून दिले. नुकतेच तांबडे फुटत होते पण अंधार अजून पूर्णपणे सरला नव्हता.
प्राध्यापक कदमांना सगळ्यात पहिल्यांदा जाणवला तो अंगावर भसकन आलेला गार वारा आणि अजूनही भोवती दाटून असलेला अंधार .. एकदम त्यांच्या बायकोचा आणि गोड मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मग एकदम कशावर तरी त्यांचे डोके आपटले . त्यांना शेवटची जाणवली ती एक जीवघेणी कळ …आणि शेवटी पसरला .. एक गडद , न संपणारा आणि त्यांना गिळून टाकणारा अंधार.

“ सत्याचा विजय असो….” तो चिडक्या,रम्या आणि त्याचे दोन तीन मित्र ओरडले आणि त्यांनी दरवाजा लाऊन घेतला. त्या दुर्दैवी डब्यात मग एक भयाण शांतता किती तरी वेळ रेंगाळत राहिली. त्या डब्यातील काहीही न करता शांत बसलेल्या लोकांना लोकशाहीचा अनुभव होता. नेहमी सत्याचाच विजय होतो ...पण कुणाची बाजू सत्याची आहे हे बहुमताने ठरते. आत्ता इथे दहा विरुद्ध शून्य मतांनी असे निसंदेह ठरले होते ..शंकेला वावच नव्हता. चिडक्या आणि त्याच्या मित्रांची बाजूच सत्याची होती. सत्याचा नेहमी सारखा विजय झाला होता. तो वेडा माणूस हकनाक आपल्या कर्माने बळी गेला होता. सत्याला केलेला विरोध केव्हाही खपवून घेतला जात नसतो . असा विरोध जागच्या जागीच उखडून टाकायचा असतो ..नाहीतर तो वाढत जातो.

गाडीचा वेग आता कमी होत होता. थोड्याच वेळात रेल्वेचे अधिकारी चेन कोणी खेचली हे पाहायला येणार होते.
“ माणूस खाली पडला म्हणून चेन ओढली ..असे सगळ्यांनी सांगायचे ...नाही तर माझ्याशी गाठ आहे …” चिडक्या सगळ्या प्रवाश्यांकडे रोखून बघत म्हणाला. त्याच्या सगळ्या मित्रानी त्याला होकार दिला . सगळे प्रवासी घाबरून गेले होते आणि कुणीही काहीही बोलायच्या मनःस्थितीत नव्हते. नाहीतरी अतीव भिती माणसाला बधीर, मुका आणि आंधळा करून टाकते.

त्या डब्यातील काही सुजाण प्रवाशांच्या मनात बाहेरचा सरता अंधार ,त्यांच्या नकळत उतरत होता. आता तो बरेच दिवस त्यांच्या बरोबर राहणार होता ...त्यांच्या षंडपणाचा पुरावा म्हणून. पण मग हळू हळू तो सुद्धा नाहीसा होणार होता .जगाचे रहाट गाडगे पुन्हा तसेच सुरु राहणार होते.

(टीप. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण हिंदुस्थानात असे कधी घडले नसेल किवा असे कधी घडणारच नाही याची खात्री मला तरी नाही. )
**************************************************************************************

जयंत नाईक .

कथालेख

प्रतिक्रिया

जी ए कुलकर्णी यांची ही एक कथा आहे, जरूर वाचा.

https://web.archive.org/web/20161110143318/http://gakulkarni.info/storie...

अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य उदासीन असते!

परिस्थिती अजून तशीच आहे.

ते मला गुरु स्थानी आहेत. माझ्या कथेची त्यांच्या कथेशी तुलना करणे योग्य नाही.

मराठी_माणूस's picture

1 Nov 2020 - 10:39 am | मराठी_माणूस

इथे इतर प्रवाशानी साथ न देणे ही समस्या अधोरेखीत आहे असे वाटते.
खालील वाक्य तेच दर्शवते

दुर्जन जेव्हडे पटकन एकत्र येतात तेव्हडे सज्जन का येत नाहीत ?

वॉल्टेर चा एक कोट
Every man is guilty of all the good he did not do

Jayant Naik's picture

2 Nov 2020 - 8:17 am | Jayant Naik

सज्जन लवकर एकत्र येत नाहीत हे सत्य आहे.

प्राची अश्विनी's picture

1 Nov 2020 - 10:55 am | प्राची अश्विनी

भयंकर आहे हे. असं घडलं असेलही..
गोष्ट आवडली हेवेसांनल.

नीलस्वप्निल's picture

1 Nov 2020 - 12:32 pm | नीलस्वप्निल

ह्या घटना नेहमी घडतात विशेशतः उपनगरी लोकल मधे... विरार...वसई ... परप्रान्तिय लोकान्कडुन...

Jayant Naik's picture

1 Nov 2020 - 3:05 pm | Jayant Naik

शोकांतिका हे आहे कि याला कोणीही विरोध करत नाही .

Jayant Naik's picture

2 Nov 2020 - 8:18 am | Jayant Naik

आपला प्रतिसाद मला नेहमीच महत्वाचा वाटत आला आहे.

उपयोजक's picture

1 Nov 2020 - 10:58 am | उपयोजक

प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला. दुर्दैवाने बळी तो कान पिळी हेच सत्य आहे या देशात! :(

Jayant Naik's picture

1 Nov 2020 - 3:12 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. बळी तो कान पिळी हे पूर्वापारपासून आहे. मनुष्य जसजसा प्राणी या अस्तित्वा पासून उंच जातो तसा तसा तो माणूस या अस्तित्व कडे जातो . तो तसाच प्रवास हवा . अर्थात प्राणी सुद्धा भूक लागल्यावर किवा कोणी त्यांच्या हद्दीत आला किवा त्यांच्यावर हल्ला झाला तरच हल्ला करतात ..पण माणूस फक्त करमणूक म्हणून सुद्धा हल्ला करू शकतो. सध्या तरी मानव जात प्राणी या अस्तित्वाच्या सुद्धा खालच्या पातळीवर जात आहे. हेच सत्य आहे.

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2020 - 2:43 pm | संजय क्षीरसागर

शेवट (वास्तविक असला तरी) निराश करुन जातो.

मला वाटतं लेखकाला नैराश्यातून आशेचा किरण दिसायला हवा (नाही तरी कल्पनाच करायची ना ?)

मी असा शेवट केला असता.

डब्यात एक भयाण शांतता पसरली . कोणीही विरोध केला नाही .. डब्यातील काही लोक “ अरे सोडा त्याला ..सोडा “ असे ओरडू लागले पण चिडक्या आणि त्याच्या तीन चार साथीदारांनी प्राध्यापक कदमांना उचलून आता दारापर्यंत आणले होते .....

कुणाला काही कळायच्या आत वरच्या बर्थवरची एक स्त्री चिडक्याकडे झेपावली; अत्यंत चेवानं तीनं स्वतःचा गुडघा चिडक्याच्या दोन पायांमधे, नेमक्या जागी इतका खटकन मारला की तो कळवळून खालीच पडला. त्याला सावरायला रम्या आला तर दुसरीनं त्याचे खांदे पकडून एका झटक्यात त्याला अगदी तसाच इंगा दाखवला. या अनपेक्षित हल्यानं रमेश असा काही भेलकांडला की त्याचं डोकं बर्थवर आपटून तो असहाय्य वेदनेनं तो दोन बर्थच्यामधे कोसळला. कदम सरांना स्त्रीयांचं हे धाडस पाहून इतका आवेग चढला की त्यांनी सर्व शक्तीनिशी एक ठोसा त्यांना उचणार्‍याच्या नाकावर अशा वेगानं लगावला की त्याच्या नाकचं हाड तुटून भळभळा रक्त वाहायला लागलं. बाकीचे नुसते आवाक होऊन पाहात राहिले कारण त्यांना स्त्रीयांवर हातही टाकता येईना.

इतक्यात गाडी थांबली चेकर आला. चिडक्याला लोळवणारी इतकी पेटली होती की ती चेकरला म्हणाली आता तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. तीनं सरळ १०७२ ला फोन लावला आणि घटनेचं गांभीर्य सांगून ताबडतोप मदत मागवली. दुसरीनं दाराजवळ उभ्या असलेल्या एका साथिदाराला खांदे धरुन गरकन दाराच्या दिशेनं वळवला आणि त्याच्या पार्श्वभागावर गुढग्याचा जोरदार प्रहार करत त्याला दाराबाहेर ढकलून दिला. तो सरळ दारातून खाली फेकला गेला. मग दारात शांतपणे उभी राहून त्याचा डब्यात पडलेला फोन उचलत ती म्हणाली, या भल्या माणसाचा फोन जिथे असेल तिथून घेऊन ये, त्याशिवाय गाडी इथून हालणार नाही.

सत्यमेव जयते !

Jayant Naik's picture

1 Nov 2020 - 3:16 pm | Jayant Naik

मला सुद्धा असा शेवट आवडला असता पण वास्तव असे नाही . तुम्ही वास्तवाची कल्पना करता का कल्पनेतील वास्तव आहे असा आभास निर्माण करता ?

कथा आवडली. सत्यमेव जयते म्हणजे जो जिंकतो, त्याची बाजू सत्याची ठरवली जाते. महाभारत, रामायण वगैरे सारखं. जो जीता, वही सिकंदर.

वरच्या बर्थवरची एक स्त्री चिडक्याकडे झेपावली; अत्यंत चेवानं तीनं स्वतःचा गुडघा चिडक्याच्या दोन पायांमधे, नेमक्या जागी इतका खटकन मारला की तो कळवळून खालीच पडला. त्याला सावरायला रम्या आला तर दुसरीनं त्याचे खांदे पकडून एका झटक्यात त्याला अगदी तसाच इंगा दाखवला.

... हे असं घडून यायला मोदींऐवजी तो पप्पू निवडून यायला हवा होता. त्यानं अर्णव गोस्वामीच्या इंटरव्ह्यूमधे सांगितलंच होतं, की मी आलो की पयल्यांदा समस्त स्त्रीजातीचं एम्पॉवरमेंट करवणार म्हणून.

प्रसाद गोडबोले's picture

1 Nov 2020 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले

अप्रथिम कथा !

सत्यमेव जयते सारख्या ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ संकल्पनांतुन जाग येणे तसेही अवघड असते !

आपल्याकडे लहानपणापासुनच मुलांना माकियाव्हॅलीचे द प्रिन्स आणि सन्त्झु चे द आर्ट ऑफ वॉर शिकवायला हवे . सन झु काय म्हणतो - “If you know the enemy and know yourself, you need not fear the result of a hundred battles. If you know yourself but not the enemy, for every victory gained you will also suffer a defeat. If you know neither the enemy nor yourself, you will succumb in every battle.”― Sun Tzu, The Art of War

प्राध्यापकांना स्वत्:च्या ताकतीचा अंदाज नव्हता अन समोरच्याच्या ताकतीचाही ! सो ते मरणे हे स्वाभाविकच होते !
ते मेले नसते, अन सत्याग्रह केला म्हणुन त्या ३ ४ जणांच्या घोळक्याने त्यांची माफी मागुन त्यांना झोपायला जागा दिली असती तर कथा " जप हो श्याम " अर्थात श्यामळु साने टाईप झाली असती ! !

माकियाव्हॅली काय म्हणतो - "सत्यमेव जयते" वगैरे टाईप सगळे ल्ल्ल्लूऊऊऊऊ व्हर्च्युज अर्थात सद्गुण हे लोकांना दाखवण्यापुरते जरुर ठेवावेत पण one should not be overly committed to live by them.
काय सत्य काय असत्य, काय न्य्यय्य काय अन्याय्य ही जाण असणे आवश्यक आहे पण त्याहीपेक्षा काय हितकर आणि काय अहितकर ही समज असणे जास्त आवश्यक आहे, हा स्मार्टनेस सत्यापेक्षा कैकपटीने मोठ्ठा आहे !!

स्मार्टमेव जयते !

असो!

पुलेशु.

Jayant Naik's picture

2 Nov 2020 - 8:22 am | Jayant Naik

आपण म्हणता ते १०० % सत्य आहे.

उपयोजक's picture

2 Nov 2020 - 1:00 pm | उपयोजक

शाम भागवत म्हणतात तसे या गुंडांच्या टोळीला प्रा.कदमांनी विरोध न करता शुभ चिंतले असते तर?

कानडाऊ योगेशु's picture

2 Nov 2020 - 1:16 pm | कानडाऊ योगेशु

बरोबर बोललात उपयोजक साहेब.
बर्याच वेळेला थोडे तारतम्य दाखवले तर विपरित होणारी परिस्थिती बदलु शकते.
माझ्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. मुंबईत कामाला असताना खचाखच भरलेल्या लोकलच्या डब्यात शिरलो व भेलकांडत दोन बाकाच्या मध्ये घुसलो तेव्हा डोळ्यात सुरमा घातलेला पान खाऊन तोंड लाल झालेल्या एका दाढीदारी इसमाच्या पायावर पाय पडला व मुंबईच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने मला हटकुन ये क्या है दिखता नही क्या वगैरे बोलायला चालु केले.मी प्रथम त्याच्या पाया पडलो (माझा पाय लागला म्हणुन) व नंतर माफी मागितली. तो इतका वरमला कि जेव्हा त्या बाकावर सीट उपलब्ध झाली तेव्हा त्यांनी मला आओ बैठो म्हणुन जागा करुन दिली.

प्रा.कदमांनी विरोध न करता शुभ चिंतले असते तर?

अहिंसा हा आपद्धर्म आहे ! प्राध्यापकांच्या हातात गपगुमान शांत रहाण्याशिबाय दुसरे काय होते ?

कदम सर मुळातच अध्यात्मिक असावेत असे वाटत नाही, असते तर त्यांनी येवढ्या छोट्याश्यागोष्टीवरुन भांडण केलेच नसते . पण तरीही शुभ चिंतन करणे हे स्वतःच्या मनाला समजवण्यासाठी उत्तम ! कदम सर मला भेटले असते तर त्यांना मी आपला बामणी उपदेश केला असता अन मुक्ताबांइचे ताटीचे अभंग वाचावेत असे सांगितले असते - रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥ ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी
शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥
ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥
ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥
वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला
ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अर्थात हे सारं कदमांना पटणे अवघड आहे म्हणुनच कदम सरांनी खरेच सं झु वाचायला हवा .

संझु काय म्हणतो =

8. It is the rule in war, if our forces are ten to the enemy’s one, to surround him; if five to one, to attack him; if twice as numerous, to divide our army into two.
9. If equally matched, we can offer battle; if slightly inferior in numbers, we can avoid the enemy; if quite unequal in every way, we can flee from him.

किति सोप्पं आणि लॉजिकल आहे हे , Never start a battle that you can not win. And if you are a really good professor you can do more damage to not only them but their entire community just by siting in your arm chair. Wait for the opportune moment कारण Quick victory is better than delayed victory but when you are not confident , then, delayed victory is far better than a quick harakiri !!

उपयोजक's picture

2 Nov 2020 - 6:55 pm | उपयोजक

Never start a battle that you can not win. ..............is far better than a quick harakiri !!

पर्फेक्ट!

Jayant Naik's picture

3 Nov 2020 - 11:24 am | Jayant Naik

एक गोष्ट आठवते. खरी खोटी माहीत नाही. एका वर्गामध्ये गुरुजी एकनाथ महाराजांची गोष्ट सांगत असतात. त्यांच्यावर ते स्नान करून येत असताना एक यवन थुंकतो. ते परत जातात आणि स्नान करून येतात. तो परत थुंकतो .असेच बरेच वेळा झाल्यावर तो यवन शेवटी त्यांना शरण येतो. हे सगळे बरेच जण पहात असतात पण कोणीही काहीही त्या यवना विरुद्ध बोलत नाही. हि गोष्ट सांगितल्यावर गुरुजी या गोष्टी तून तुम्ही काय शिकलात असे विचारतात. अनेक विद्यार्थी सांगतात , सोशिकपणा .. निर्लेप वृत्ती वगैरे शिकलो. एक विद्यार्थी मात्र म्हणतो . मला असे यातून दिसते कि आपल्या संत आणि सज्जन माणसावर एक यवन थुंकत होता आणि बाकीचा सगळा समाज हे षंड पणे पहात होता. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे. आपला हिंदू समाज इतिहासातून काही शिकणार आहे कि नाही ? हा खरा प्रश्न आहे. तो विद्यार्थी म्हणजे स्वातंत्र्य वीर सावरकर. संझू म्हणतो त्या प्रमाणे तुम्ही पळून जा ..पण परत योग्य वेळे येताच हल्ला करता का ? का तसेच ..हे असेच चालायचे . मला काय त्याचे ? .म्हणून गप्प बसता हा खरा प्रश्न आहे.

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 8:25 am | उपयोजक

नेपोलियन बोनापार्ट शाळेत असताना त्याचे शिक्षक येशुबद्दल सांगत होते. "प्रभू येशु सर्वशक्तिमान आहे.त्याला भजा.मगच तुम्ही यशस्वी व्हाल!"

नेपोलियन: "येशु इतकाच ताकदवान होता तर मग त्याला क्रुसावर चढवताना त्याने काहीच विरोध कसा काय केला नाही? चुपचाप सहन का केलं?"

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Nov 2020 - 2:50 pm | अनिरुद्ध.वैद्य

सध्याच्या घडीला, सत्यमेव जयते वगैरे काही कामाचे नाही. आपण बरे, आपले काम बरे.

दादा कोंडके's picture

1 Nov 2020 - 3:45 pm | दादा कोंडके

पण नुसत्या दोन-चार गुंडांनी एका सज्जन प्राध्यापकाचा खून केला असं वाटत नाही.

“ अहो सगळी गाडी भरलेली असते ...आम्हाला दररोज कामा साठी सांगलीला जायला लागते ...आमच्या कडे पास आहे. आम्ही सुद्धा पैसे भरतो. इथे लोकांना उभे राहायला जागा नाही ..आणि तुम्ही झोपता? ..एका तासाचा तर प्रश्न आहे

यात 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गाचा संघर्ष दिसतो. रोज धावणार्‍या गाडीत श्रिमंत लोकांना पाय पसरून झोपायला मिळत असेल आणि बाकिच्यांना बसायलाही मिळत नसेल तर हा सामजिक प्रश्न आहे. प्राध्यापक निश्चितच रेल्वेमध्ये प्रकटले नसणार. त्यांना रोजचे भिकारी, पदपथावर राहणारे, म्हातारे हमाल, सिग्नवरचे छक्के-भिक मागणारी लगान मुलं हे दिसत असणारच. याआधी असंख्य प्रसंगांना सामोरं गेलेले असणार. आणि एका गाडीत झोपायला मिळालं नाही म्हणून अचानकच स्वार्थी विवेक जागा होणं म्हणजे त्यांचा कोतेपणा आहे. ही डिझर्व्ड इट.

काहीही झाले तरी झुंडशाही समोर संज्जनांचा बळी हे होता कामा नये. ते लोकशाहीचे उद्दिष्ट असायला हवे. १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराध शिक्षेला पात्र होऊ नये. असे आपली न्याय व्यवस्था सांगते. आजच्या घडीला ते किती हि हास्यास्पद वाटले तरी ते उदिष्ट म्हणून योग्यच आहे. एखादी गोष्ट रोज घडते म्हणजे ती योग्य नव्हे. समोरच्या बंगल्यात फक्त दोघे राहतात ..आणि आमच्या १०० स्क़ फ. मध्ये आम्ही १० जण राहतो म्हणून आम्ही त्या बंगल्यात जाऊन राहणार हे जितके अयोग्य आहे तितकेच आरक्षित डब्यात शिरणे आहे.

१. याचा सो कॉल्ड अध्यात्मिक अर्थ (जो जनमानसात रुजला आहे) तो असा की सदगुण दुर्गुणावर कायम विजय मिळवतो. हे सत्य न समजलेल्यांचं आकलन आहे. सत्य ही निर्वस्तू आहे तिला कोणत्याही गुणाशी काहीही देणं-घेणं नाही. सत्य कायम निर्गुण आहे त्यामुळे कोण जिंकला आणि कोण हारला याच्याशी सत्याचा कणमात्र संबंध नाही.

२. पब्लिकची एकमेव इच्छा अशी असते की सदगुणाचा दुर्गुणावर (अंतीमतः का होईना) विजय व्हावा (उदा. रामायण किंवा कोणताही हिट सिनेमा). पण व्यावहारात मात्र नेमकी विपरित परिस्थिती दिसते. परिणामी लोकात दोन तट पडले आहेत. एका गटाला असं वाटतं की सत्यमेव जयते हा बोगस प्रकार आहे आणि दुसरा गट असं मानतो की एक दिवस अच्छे दिन येणारच !

३. ज्याला सत्य उमगलंय त्याला या जयघोषातली व्यर्थता दिसते. सत्य सदाविजयीच आहे कारण ते कोणत्यही द्वंद्वाचा भागच नाही.

सदगुणाच्या बाबतीत अशी व्यक्ती जागरुक असते. जर दुर्गुणी ताप देऊ लागला तर (अंतीम वेळेची वाट न पाहता), स्वतःच्या अक्कल हुशारीनं ती त्याचा वेळच्यावेळी, योग्य बंदोबस्त करते.

प्रसाद गोडबोले's picture

1 Nov 2020 - 4:58 pm | प्रसाद गोडबोले

सत्य सदाविजयीच आहे कारण ते कोणत्यही द्वंद्वाचा भागच नाही.

म्हणजे नक्की कसे ? सत्याला (मुद्दामुन खिजवण्यासाठी ) विरोधी प्रतिसाद दिला तर आपण सदा विजयीच आहोत हे सिध्द करण्यासाठी सत्य प्रतिसादातुन वादावादी करत बसेल की आपण कोणत्याही द्व्दंद्वाचा भाग नाही हे लक्षात आल्याने दुर्लक्ष करत शांत बसेल ?

बाकी मिसळपाव वर एकच सदाविजयी सत्य आहे हे बहुतांश लोकांना माहीत आहे . जय गुर्देव =))))

उन्मेष दिक्षीत's picture

1 Nov 2020 - 11:05 pm | उन्मेष दिक्षीत

म्हटलंय; पुर्णत्व (सत्य) ही कुणाची खासगी मालमत्ता नाही , मग ती फक्त त्यांची कशी असेल? ( पाहा निर्वस्तू , वस्तुच नाही ! )
सत्य सदाविजयी आहे म्हणजे कुणीही असे म्हटले किंवा नाही तरीही ! अर्थात, समजलेला प्रत्येकजण असे आत्मविश्वासाने म्हणेलच असे नाही हे समजतंय का? सत्याचा 'निर्वैयक्तीक' हा मला सदा-उपयोगी आलेला निर्गुण (ब्युटी) आहे.

"पब्लिकची एकमेव इच्छा अशी असते की सदगुणाचा दुर्गुणावर (अंतीमतः का होईना) विजय व्हावा (उदा. रामायण किंवा कोणताही हिट सिनेमा). पण व्यावहारात मात्र नेमकी विपरित परिस्थिती दिसते. परिणामी लोकात दोन तट पडले आहेत. एका गटाला असं वाटतं की सत्यमेव जयते हा बोगस प्रकार आहे आणि दुसरा गट असं मानतो की एक दिवस अच्छे दिन येणारच !"
माझे तर असे मत आहे कि या सगळ्याचे मूळ .. श्रीकृष्ण याने दिलेल्या आश्वासनात आहे. मी दुष्टांचा नाश करायला येईन ..म्हणजे आम्हाला काही करायला नको. तो येईल आणि दुष्टांचा नाश करीन. हेच मग तू म्हणतोस तसे हिंदी सिनेमात हिरो येईल ...तुझ्या सुचवलेल्या या कथेच्या शेवटा मध्ये एक रण रागिणी येईल ...इथपर्यंत पोचते.. या कथेत अगदी ५,६ जणांनी जरी विरोध केला असता तरी असा शेवट झाला नसता.

आनन्दा's picture

2 Nov 2020 - 11:07 am | आनन्दा

शंभर टक्के सहमत आहे..

मला वाटलं होतं की तुम्ही ही कथा आता हॉरर जॉनर मध्ये घेऊन जाल, मो मेलेलं म्हातारा रोज सकाळी त्या आरक्षित डब्यात येऊन एका सीट वरती झोपून राहील वगैरे..

मजा आली असती तसे काहीतरी वाचायला, आणि तो तुमचा expertise पण आहे!!

आनन्दा's picture

2 Nov 2020 - 11:07 am | आनन्दा

पार्ट 2 आणू शकता!!

पार्ट २ आणायचा प्रयत्न करतो.

बेंगलोरहुन निघणार्या उद्यान एक्स्प्रेस मध्ये सोलापूरला जाताना हा अनुभव नेहेमी येतो. सकाळी ७-८ च्या दरम्यान गाडी गुलबर्गाला येते आणि गुलबर्गा सोलापूर दरम्यान च्या गावाला दैनिक ये जा करणारी जनता स्लीपर क्लास मध्ये चढते. बर्याच वेळेला रिझर्वड बर्थ असणार्याची झोप झालेली असते व कुणी शौचकुपात गेलेला असतो. तो परत येऊन पाहतो तो एरवी त्याच्यासाठीच असणार्या बर्थवर चारपाच जण/जणी दाटीवाटीने बसलेले असतात. ज्याचे बर्थ असते त्यालाच विनंती करुन अ‍ॅडजस्ट व्हावे लागते. ज्यांना हा प्रकार माहीती असतो ते ह्या स्टेशनदरम्यान कधी बर्थ सोडत नाहीत. बर्याच वेळेला ह्या जनतेला अ‍ॅडजस्ट केले जाते.किंबहुना करावेच लागते. टी.सी ही ह्यांना सामील असतो.
इथेही जे चार-पाच जणांचे टोळके चढले आहे ते अश्याच जनतेपैकी असावे. प्राध्यापकांनी टोकाची भूमिका घेतली असे वाटते.
बेंगलोर सोलापूर प्रवासात मी ही प्रथम चिडलो होतो. माझ्या सीटवर ज्यांनी कब्जा केला त्यात एक बुरखेधारी स्त्रीपण होती.(सोबत दाढीधारी पण होते.) पण पूर्ण डब्यातच हा प्रकार होता. पुढच्या प्रवासाच्या वेळी ३ टायर ए.सी मधुन गेलो. तिथे असा प्रकार दिसला नाही.

अवांतर : वर्षातील एका विवक्षित तारखेच्या आगेमागे कुटंबवत्सल मंडळी सहकुटूंब मुंबईला जाणे टाळतात.

Jayant Naik's picture

2 Nov 2020 - 10:41 am | Jayant Naik

या कथेच्या निमित्ताने मला अनेकांनी असे प्रकार सांगितले आहेत. त्या मुळे हि कथा मी जरी काल्पनिक आहे असे म्हणतो आहे तरी तेव्हडी काल्पनिक नाही.

मुंबई अहमदाबाद दरम्यान अनेक रेल्वे गाड्यात ही सर्रास स्थिती आहे. यात अविश्वसनीय असे काहीच नाही. सत्यमेव जयते ही पळवाट आहे हे सत्य प्रत्यक्ष प्रसंग आला की कळते.

होय. सत्याच्या खूप जवळ जाणारी हि कथा आहे ....

विजुभाऊ's picture

2 Nov 2020 - 12:24 pm | विजुभाऊ

उत्तर भारतात फिरोजपुर च्या आसपास हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.
त्यावेळेस मी डब्यातला एक प्रवासी होतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2020 - 12:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

या वरुन आठवले,

पुण्यावरुन रुद्रपुरला जायचे होते. म्हणून दिल्ली पर्यंत विमानाने गेलो आणि तिकडून रेल्वेचे आरक्षण होते. ऐत्यावेळी आरक्षण केल्यामूळे सेकंड सिटींगचे तिकीट मिळाले होते.

विमानाला उशीर झाला होता त्यामूळे अगदी धावत पळत गाडी गाठावी लागली. इतकी की मी डब्यात शिरलो आणि गाडी सुटली.

डबा गदगदून भरला होता. कशीबशी माणसे बाजूला करत सीट गाठली आणि चौघांमधे पाचवा घुसून बसलो.

थोड्यावेळाने लघूशंका करण्या करता म्हणून लोकांना तुडवत निघालो तेव्हा मधेच एकाने हटकले मी म्हणालो बाबा जाउदे अर्जंट कॉल आहे त्यावर तो म्हणाला "बरदाश्त नही कर सकते क्या" मी म्हणालो "नाही ना बाबा म्हणून तर चाललो आहे" तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला "जाओ"

शौचालया जवळ पोचल्यावर पहातो तर काय त्या खोलीत आठ दहा जणांचे टोळके मस्त फळ्या टाकून त्यावर गप्पा मारत बसले होते. मी दुसर्‍या दरवाजात डोकावलो तिकडेही तेच, मग तिसर्‍या मग चौथ्या... अजून दरवाजे बघण्याची माझ्यात ताकद नव्हती. मी निमूट परत फिरलो. परतताना त्याने परत हटकलेच म्हणाला "क्या हुवा?" मी म्हणालो "बरदाश्त कर लुंगा"

रुद्रपुरला उतरल्यावर पहिला धावत सुटलो आणि योग्य ठिकाण शोधून मोकळा झालो. त्या दिवशी साधारण सकाळी आठ वाजता पुणे विमानतळावर मोकळा झालो होतो त्या नंतर रात्री ११ वाजता रुद्रपुर रेल्वेस्थानकावर मोकळे होण्याचा परमोच्च आनंद मला लुटता आला.

पैजारबुवा,

Jayant Naik's picture

2 Nov 2020 - 2:06 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि अनुभव शेयर केल्याबद्दल आभार.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2020 - 1:05 pm | चौथा कोनाडा

बाप रे .... सर्रक्क्न काटा आला शेवट वाचताना .....
असल्या घटना पाहून सामन्यांचा मेंदू कधी तरी डोंबिवली फास्ट होत असतो

Jayant Naik's picture

2 Nov 2020 - 2:07 pm | Jayant Naik

अनेक अनेक आभार

उपयोजक's picture

2 Nov 2020 - 1:08 pm | उपयोजक

https://youtu.be/_eIHTEg59yw

1:46:46 ते 1:50:11 पर्यंत पहावा.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2020 - 4:56 pm | चौथा कोनाडा

+१
बरोबर.
खरं सत्य कोणतं हे ठरवणं अवघड आहे !

Jayant Naik's picture

3 Nov 2020 - 11:56 am | Jayant Naik

सत्य काय हेच जर बहुमतांनी ठरत असेल तर मग आनंदच आहे.

गोष्ट सत्याच्या बरीच जवळ जाणारी आहे. अशी माणसं बघून चुपचाप जाऊन चेन ओढून यायची ना. कशाला भांडायचं. टी सी आला कि बाजूला घेऊन सांगायचा प्रयत्न केला असता, तर कदाचित त्यांना जावं लागलं असतं. (ते हिंदी सिनेमात दाखवतात तसं "हा बघ पुरावा आता चालले मी पोलिसात " असं व्हिलन च्या समोर म्हणायची नक्की काय गरज असते ) आणि यांचा गप्पा मारता मारता नाव गाव विचारून विडिओ घेऊन घरी पाठवून दिला असता, तर उलटी धमकी तरी देता अली असती, कि तुमचा विडिओ माझ्या घरच्यांकडे आहे आणि तुमची नावं पण आहेत, आणि कुठलेतरी पोलीस कमिशन माझे मामा आहेत.

माझ्या बरोबर एक प्रकार झाला होता (वरच्या गोष्टी एवढा वाईट नाही). माझ्या कडचे पैसे संपले होते, म्हणून मी ATM मधून काढले, सगळ्या १०० च्या नोटा. ते घेऊन रिक्षा केली बस स्टॉप पर्यंत जाण्यासाठी. बस स्टॉप वर बस थांबली होती, निघायच्या तयारीत होती. रिक्षा चे ४० रुपये झाले. रिक्षावाल्याला विचारला १०० सुट्टे आहेत का? हो म्हणाला, १०० दिले, त्याने मला १० परत दिले. म्हटलं उरलेले ५०? म्हणाला कुठले ५०? तुम्ही ५० दिले. मला कळलं कि हा फसवतोय, माझी बस सुटली असती तर परत तासभर थांबव लागलं असतं.

म्हंटल दादा तुम्ही मला फसवताय, माझ्या वडलांनी मला सांगितलंय कि आपल्या घरात कोणाला पण पैशाला फसवलं तर त्या माणसाचे त्याच्या तिप्पट पैसे आजारपणावर खर्च होतात. आणि मी हे खरं होताना अनेक वेळा बघितलंय. तुमच्या भल्यासाठी सांगते कि माझ्या नावाने ते पैसे कुठेतरी दान करा, नाही केलंत तर तुम्हालाच त्रास होईल खूप. आणि हे पण लक्षात ठेवा, आई - वडिलांची पापं-पुण्य मुलांना लागतात. चांगलं किंवा वाईट काम आपल्या मुलांकडे कुठल्या न कुठल्या स्वरूपात नक्की परत येतं.

मला माझे ५० रुपये परत मिळणार नाही हे मला दिसत होतं, पण स्वतःला फसवलं गेलं याचा त्रास होतो नक्कीच. एवढी बडबड केल्यामुळे मला फसवलं गेल्याचा त्रास कमी झाला, आणि कदाचित त्याच्या डोक्याला माझ्य बडबडीमळे थोडी का होईना कटकट झाली असेल असं वाटलं. अगदी हत्ती सारखी धडक मारता नाही अली तरी मुंगी सारखं चावून घेतलं.

Jayant Naik's picture

3 Nov 2020 - 11:29 am | Jayant Naik

आपल्या अनुभव कथना बद्दल आभार.

कथा आवडली नाही. हे असं घडतच बऱ्याच वेळा. Positive end असायला हवा होता. कुणीतरी हिरो येईल वाचवायला अशी नाही तर काहीतरी युक्ती किंवा प्रॅक्टिकल ॲप्रोच ने. कारण अशी घटना आपल्याबरोबर पण घडू शकते. प्राध्यापकांनी सुरुवातीच्या चिडचिडी नंतर थोडं डोकं लावून शांत बसायला हवे होते. तेव्हा शांत राहून नंतर कंप्लेंट करता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. ट्विटर, ऑनलाईन complaint.

सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आहे मार्कस यांची. It's a learning lesson for everyone.

या कथेचा शेवट मला सुद्धा काही फारसा आवडला आहे असा प्रकार नाही. पण ९० % वेळा हे असेच होणार असते.

आमच्याकडे सगळेच बोलुन हैराण करतील. त्यांना गप्प करण्यापेक्षा गुंड दरवाज्यात जाउन बसेल.

माझा मध्यप्रदेश मधला रेल्वेप्रवासाचा अनुभव आठवला.
मध्यप्रदेशात काही मित्रांबरोबर प्रवास करताना रेल्वेमध्ये आमच्या ३ आसनांवर तीन लोक झोपलेले होते. त्यांना उठवायला गेल्यावर आमच्यावरच गुरकावले. तेव्हा समजले की ते स्वतःच पोलिस होते. थोडा वाद घातल्यावर त्यांनी सांगितले की खालच्या सीटवर सगळ्यांनी बसुन घ्या. ५ तासांनी त्यांचे स्टेशन येईल तेव्हा बाकीची ३ आसने मीळतील.

डब्यात प्रचंड गर्दी. पण नशीबाने टी सी बाजुच्याच डब्यात भेटला. आमचे तीकीट व आयकार्ड चेक केले. लगेच आमच्याबरोबर येउन त्या पोलिसांना ज्या अस्खलीत शिव्या द्यायला लागला की एका मिनिटात तीघेही उठुन नीघुन गेले. झालेल्या त्रासापद्दल टीसीने माफीही मागीतली, जे अगदीच अनपेक्षीत होते.

आता ते आयकार्ड नाही, व टीसी मदत करेल याची फारशी गॅरेंटी नाही. म्हणुन नॉन एसी डब्यातुन प्रवास करायची फारशी हिंमतच होत नाही.

आभारी आहे.

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 10:59 am | उपयोजक

पचायला जड जातंय. :)

टिसीने अस्खलित शिव्या दिल्या नि पोलिसांनी 'ऐकून घेतल्या?"

"पुलिस से ना दोस्ती अच्छी ना दुष्मनी"
- सिंघम

#मोलाचा संदेश

नेत्रेश's picture

4 Nov 2020 - 1:16 pm | नेत्रेश

सर्व पोलिस विनातीकीट होते, कायद्याचे उल्लंघन करुन तीकीट असलेल्या प्रवाशांच्या सीटस बळकाउन झोपले होते. आणी हे बहुतेक त्यांचे नेहमीचेच होते.

गोंधळी's picture

3 Nov 2020 - 4:15 pm | गोंधळी

हा अनुभव आह्माला ही आला आहे. स्वराज एक्सप्रेस ने जाताना मध्यप्रदेश मध्ये ४ ते ५ जणांचा ग्रुप जागेवरुन अरेरावी करत होता. त्यांना हटकले असता ते रेल्वेचे खेळाडु असुन त्याच्याकडे पास अस्ल्याच सांगु लागले. संध्याकाळी ५/६ ची वेळ होती व कोणीही वाद घालायच्या मुड मध्ये नव्हते त्यामुळे दिले बसायला.

अशा घटना/बात्म्या वाचल्या आहेत.
Press Trust of India/NDTV Updated: May 18, 2013 11:29 pm IST
Man thrown out of speeding train
Greater Noida: A clash over seat took an uglier turn when a young man was thrown out of a speeding EMU train near Maripat station, leaving him critically wounded.

Satish (28), a resident of Aligarh and working in a Delhi company, was going from the national capital to Aligarh by the train when some passengers boarded from Ghaziabad station.

A clash broke out over seat between Satish and the passengers.

When the train neared Maripat station, some passengers threw him out of the train.

तुषार काळभोर's picture

3 Nov 2020 - 5:53 pm | तुषार काळभोर

(टीप. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण हिंदुस्थानात असे कधी घडले नसेल किवा असे कधी घडणारच नाही याची खात्री मला तरी नाही. )
हेच तर दुर्दैव आहे!

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 8:31 am | उपयोजक

म्हणून एक विचारतो आहे.

इथे बर्‍याच जणांच्या मते सदर कथेत घडले तसे भारतात घडणे सहज शक्य आहे.
प्रगत देशांमधे म्हणजे युएस,युके,जर्मनी,फ्रान्स,अॉस्ट्रेलिया,जपान या देशांमधे रेल्वेत अशी दादागिरी होते का? कोणीही कोणत्याही डब्यात शिरणे, धावत्या रेल्वेत लुटणे , मारामारी , तिकीट तपासनीस बेजबाबदार असणे वगैरे? तिथे असे काही गैरप्रकार होत नाहीत का?

कानडाऊ योगेशु's picture

4 Nov 2020 - 12:25 pm | कानडाऊ योगेशु

स्वातंत्र्यपूर्व काळात दोन धटींगणांनी एका भारतीयाला ट्रेनमधुन बाहेर काढले होते.पुढचा इतिहास तर सर्वश्रुतच आहे.

तुमच्या लेखातील हा विचार एकदम करेक्ट आहे - "त्यांना परत नेहमी पडतो तो प्रश्न पडला दुर्जन जेव्हडे पटकन एकत्र येतात तेव्हडे सज्जन का येत नाहीत ?" योग्य असो की नसो, वस्तुस्थिती अशीच आहे.
गोष्टीचा अखेर सुद्धा अनपेक्षित आणि मनाला चटका लावणारा आहे. त्याच्यावर जो अत्याचार झाला त्या बद्दल वाईट वाटतेच पण त्याहीपेक्षा त्याच्या मदतीला कोणीही येत नाही ही ज्यास्त दुःखाची गोष्ट आहे.