स्मरण रंजन

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
27 Oct 2020 - 10:47 am

"आवाज के दुनिया का दोस्त "

संगीत ,सर्व प्रकारचे संगीत,लोकप्रिय होण्यात ,त्याचा प्रसार ,प्रचार होण्यात रेडीओ चा फार मोलाचा वाटा ।
हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल किंवा घोडदौड तर
मुख्यत्वेया माध्यमाच्या पाठीवरूनच झाली ।
आपला शेजारी देश,सिलोन(श्रीलंका )रेडीओ वर
हिंदी सिनेगीतासाठी वेगळे केंद्रच
(श्रीलंकाब्रॉडकॉस्टिंग कंपनीचे )आहे ।
बहुतेक आपणा सगळ्यांचे आवडते स्टेशन।
तिथे ऐकलेल्या असंख्य गाण्यांनी वेड लावले ।

सर्व कार्यक्रमाचा सरताज म्हणजे "बिनाका गीतमाला""।
बुधवार केव्हा येतो ,रात्रीचे आठ केव्हा वाजतात अन ,
#भाईयो और बहनो 'अशी साद घालत
आवाज की दुनिया के दोस्तों को साद घालणारा एक सुपरिचित ,सुप्रसिद्ध आवाज केव्हा कानी पडतो,असंव्हायचं।
त्या एका तासात आठवड्यातली सोळा लोकप्रिय गाणी।त्यांची 'पायदाने'( लोकप्रियतेनुसार क्रम ).
मग सबसे उपरी पायदान का गीत ।
मानवंदना देण्यासाठी वाजणारा ब्युगुल।
सोळा आठवडे वाजणारे गाणे तात्पुरते सन्मानाने  निव्रत्त केले जायचे।त्याला सरताज मिळायचा।
त्या गाण्याचे पुनरागमन व्हायचे वर्षाच्या शेवटी ।
अंतीम कार्यक्रमात।वर्ष भरातील लोकप्रिय गाण्यांमधून सर्वोत्तम सोळा गाणी ।अन मग त्यातून  प्रथम क्रमाकाचे गाणे निवडले जाई।तो एक सोहळाच असायचा।
काही गाण्याच्या निवडी बाबत,क्रमाबद्दल श्रोत्यां मधे वाद व्हायचे ।नको ते गाणे पुढे आणले ,चांगले गाणे डावलले वगैरे।
काही मंडळी अगोदरच  वही पेन घेउनच बसायची ।
आकडेमोड करत  अंदाज बांधायची गाण्यांचे क्रमाविषयी।अदाज बरोबर आला तर आनंदी आनंद ।नाही तर निराशा।
भावनेच्या भरात काही निराशावीर पून्हा कार्यक्रम ऐकायचाच नाही असे ठरवायचे । पण तो निर्धार टिके
फक्त पुढच्या बुधवार पर्यंत।।

बुधवारी रात्रीचे मात्र आपोआप रेडिओ ची खुंटी पिळून  कान लाउन बसायचे।बिनाका गीतमाला सुरु व्हायची वाट पाहात। काही ही असो ,ती एक आनंद यात्राच होती ।
अन त्यात आपले वाटाड्या असायचे
   ।।द ग्रेटअमीन सायानी।।
त्यांचा स्मीतभरा, अकृत्रीम ,स्नेहाळ स्वर , कायमचा कानात साठलेला।आपला कुणीतरी वयाने  मोठा दोस्त सहज गप्पा मारतोय,मोठेपणाचा  कुठलाही आव न आणता, असेच वाटायचं।
गाण्यांविषयी ,संगीतकार ,गीतकार, गायक ,
कलाकार इ.विषयी नव नवी माहिती  कानी पडायची।
कधी त्यांच्या पैकी कुणाशी तरी संवादही  व्हायचा
त्यातूनही खूप काही कळायचे।
एका टुथपेस्टच्या जाहिराती साठीचाच कार्यक्रम होता ।पण ,तसे कधी वाटले नाही ।ते जाणवू दिले नाही ।
या सगळ्यातचे श्रेय निश्चित पणे अमीन सायानींचे।
इतर अनेक कार्यक्रम ,जाहिराती मधे ही त्यांचा आवाज
ऐकू यायचा।चित्रपटांचे  सोहळ्यातून निवेदक म्हणूनही।
पण अमीन सायानींची मुख्य ओळख म्हणजे बिनाका गीतमाला हीच होय।
अमीन सयानी यांचा आवाज ,त्याची जादू अजूनही स्मरणात। निवेदन क्षेत्रात त्यांनी बनवलेल्या वाटेवरुनच पुढे अनेकांनी  वाटचाल केली।त्यांची नक्कल करीतच अनेक निवेदक पूढे आले ।
पण अमीन सयानी ते अमीन सयानी च ।
  बिनाका गीतमालाशी श्रोता म्हणून जोडला गेलो ,शालेय जीवनात।साठ चे दशकाच्या उत्तरार्धात। पूढे अनेक वर्षे।
ऐशीच्या दशकाचे मध्यापर्यंत।त्या दरम्यान  अनेक बदल झाले।दूरचित्रवाणी माध्यमाचे आपल्या आयुष्यात आगमन झाले।विविध वाहिन्या आल्या ।नंतर त्या माध्यमाने सर्व अवकाशच काबीज केला।
गाण्यांचा दर्जा घसरला  ।
बिनाका गीतमाला कार्यक्रम केव्हातरी बंद झाला ।
मग काही वर्षांनी  रेडिओ विस्मृतीत गेला।
  पण अजूनही कधीतरी  रात्री ,मोकळ्या निवांतक्षणी,
रेडिओ ची खरखर,बिनाका ची सिग्नेचर ट्यून,अन पाठोपाठ
'भाईयो और बहनो 'अशी परिचित साद कानावर पडते असा भास होतो।स्मृती जाग्या होतात ।मन भूतकाळात जाते, पण
काही क्षणातच भानावर ही येते।
मग  स्वतः लाच एक प्रश्न,ज्याचे उत्तर कधीच मिळणार नसते ।
    हाये  रे वो दिन क्यूं ना  आये?
                      नीलकंठ देशमुख
                      ८७९३८३८०८०
      nilkanthvd1@gmail.com

मुक्तकलेख