सीमोल्लंघन..!!
नुकताच एम.बी.बी.एस. चा रिझल्ट लागला होता, आणि शशी खूप आनंदात होती... पण ह्या इंटर्नशिपच्या काळात प्रयत्न केले तर, लग्न लवकर ठरेल. या आई-बाबांच्या निश्चयापुढे ती हतबल ठरली. वर्षभरातच तिचं दिवाकर बरोबर लग्न झालं आणि मध्यमवर्गीय मातापित्यांनी कृतार्थ होऊन सुखाचा श्वास घेतला...
शशी आणि दिवाकर एकुलते एक असल्याने, तिला कुटुंब पद्धतीत फार बदल जाणवला नाहीच. तिघांचं छोटेखानी, पण उच्च मध्यमवर्गीय कुटुंब.. दिनकर थोडा अबोल होता आणि नावाप्रमाणे वैशाखाच्या सूर्यासारखा थोडा तापट होता. एक दिवस तो म्हणाला, "पुढच्या महिन्यात आपण जपानला जातोय, तीन वर्षांसाठी..!" हा शशीचा पायगुण.. म्हणून सासुबाई सुखावल्या होत्या. पण शशी थोडी हिरमुसली होती. कारण असा मोठा निर्णय घेताना, दिवाकर आधी चकार शब्दाने तिच्याशी बोलला नव्हता...
ही दोघं परदेशी असताना सासरे गेले. आणि जेव्हा सासूबाईंना मधुमेहाच्या वाढत्या त्रासामुळे, एकटं राहणं जड जाऊ लागलं.. तेव्हा अडीच वर्षातच ती दोघं मायदेशी परतली. न्युमोनियाचं निमित्त होऊन आई गेल्या. शशी घरात एकटी राहिली. स्वतःचं काही सुरु करू, असा विचार तिनं करण्याआधी, दिवाकरने ही जागा विकून नवीन फ्लॅट मध्ये जायचा विचार सांगितला. ऑफिस जवळ पडेल हे कारण होतं. पण मग नवीन कर्ज, हप्ते यात शशीने दवाखान्याची सुरुवात करणं राहून गेलं. कारण दिवाकरची "ती" प्राथमिकता कधीच नव्हती. हे गेल्या चार वर्षात ती समजून चुकली होती. आईपाशी हा विषय काढला, की तिचं वेगळंच असायचं... 'आधी मूल होऊ दे.. मग होईल सगळं नीट..' असं म्हणायची. या विषयात मात्र ती दोघं अयशस्वी ठरली होती...
सूरश्री सोसायटीत येऊन आता सव्वा वर्ष झालं होतं. पण शशी फार मिसळत नसे. अगदी सोसायटीच्या गणपतीच्या आरतीलाही, तिनं जाऊ नये, असा दिवाकरचा सूर असे. एककल्ली, तापट, अबोल स्वभावाबरोबर, तो संशयी आहे.. याची जाणीव शशीला कधीकधी अस्वस्थ करायची. आपलेच दात अन् आपलेच ओठ.....असं असूनही ,ती मात्र सर्वांशी जुजबी ओळख ठेवून होती. शशी शांत, समंजस, पण एकाकी आहे.. ही गोष्ट सर्व शेजारी जाणून होते....
आज सकाळी सातच्या सुमाराला शशी एकटीच गॅलरीत चहाचा मनसोक्त आस्वाद घेत निवांत होती. कारण दिवाकर काल सातारला गेला होता. अन् आज संध्याकाळ शिवाय येणारही नव्हता. तेवढ्यात तिला शेजारच्या गॅलरीत पाठक काका दिसले. ती हसून बोलणारच होती, इतक्यात काकाच खाली कोसळले. तिला पटकन् आठवलं, माधवला.. त्यांच्या मुलाला, तिनं काकू गेल्यावर सांगितलं होतं, की दोन दारांना स्वतंत्र लॅच लावून घे.. आणि त्याच्या डुप्लिकेट चाव्या, समोर कोणाकडे तरी देऊन जा.. धावतच शशी बाहेर आली. तिनं मजल्यावरच्या सर्वांच्या घरची दारं ठोठावली. गडबडीने सगळे बाहेर आल्यावर, तिनं थोडक्यात प्रसंग सांगितला. समोरच्या दीपकला, पाठक काकांचं घर उघडायला सांगितलं. सान्यांच्या अनुराधेला माधवचा नंबर देऊन फोन लाव म्हणाली. साने काकूंना लिफ्ट बोलावण्यास सूचना दिली... आणि सावंतांच्या मुलाला वरती शहांकडे पिटाळलं.. अन् पुढे जरबेच्या आवाजात म्हणाली.. त्यांना म्हणावं, "असाल तसे दोन मिनिटात खाली या, आणि गाडी काढून तयार रहा.".. तेवढ्यात एकीकडे फोनवर माधवशी, काकांच्या तब्येतीचं बोलून घेतलंन्... त्याला धीरही दिला. एव्हाना गोंधळ ऐकून खालच्या मजल्यावरचे गुप्ते-जोशीही वर आले होते. "माझ्या घरच्या खुर्चीत काकांना बसवा.. आणि लगेच लिफ्टने खाली न्या..." त्यांच्यावरही ती गरजली..तिला असं वागताना बघून सगळे जण स्तंभितच झाले..!! टिप्या, अरे असशील तसा ताबडतोब हॉस्पिटलला ये.. मी आमच्या काकांना घेऊन येते. तिनं घराजवळच्या नामांकित 'टिपरे हॉस्पिटलमध्ये' काकांना न्यायचं निश्चित केलेलं सूरश्रीकरांना समजलं... पुढे ती डॉक्टरांशी वैद्यकीय भाषेत बोलली.. आणि अनुराधेनं अवाक् होऊन विचारलं.... काकू, तू डॉक्टर आहेस....? हो..!! घरात जाऊन तिने किल्ल्या आणल्या. क्षणभरच तिला दिवाकर आठवला.. पण निग्रहाने सानेकाकूंच्याकडे किल्ल्या देत ती म्हणाली.. "माझा नवरात्राचा नंदादीप तेवढा बघा हं.. मी येते..!!"
डॉ.समीर टिपरे.. शशीचा वर्गमित्र..!! इतके वर्ष संपर्क नसूनही, तिच्या एका फोन सरशी, पेशंट पोहोचण्याआधी हजर होता. सर्वांच्या एकत्रित आणि त्वरित केलेल्या प्रयत्नांमुळे, पाठक काकांची ट्रीटमेंट अवघ्या पस्तीस मिनिटात सुरू झाली. अजून आठ वाजायचे होते...
दीड तासातच गुप्तेकाका, सर्वांसाठी उपमा घेऊन हॉस्पिटलमध्ये हजर झाले. "खाऊन मगच सर्वांनी घरी जायचंय.." असं हसून म्हणाले.. थोडं खाऊन झाल्यावर, डॉक्टरांना भेटून येते, असं सांगून ती समीरच्या केबिनमध्ये गेली. आता तिथे सरिताही आली होती. समीरची आतेबहीण आणि सुविद्य पत्नी..!! तिला आठवलं, तेव्हा त्यांचा प्रेमविवाह जरा जास्तच गाजला होता. पुरुषोत्तम साठीच्या नाटकाच्या तालमी असल्या, की आवर्जून ही समीरला भेटायला यायची.. तिथेच ती शशीचीही मैत्रीण झाली. काय करतेस सध्या...? या सरितेच्या प्रश्नावर, शशी गप्प राहिली. सरिता बरोबर गप्पा रंगल्या असतानाच, ती शशीला म्हणाली.. अगं, जवळच तर राहतेस.. अन् फ्री आहेस.. तर दोन चार तास रोज इथे येत जा ना.. समीरलाही नक्की मदत होईल तुझी..!! बघ.. ठरव.. पण मला तुझ्याकडून होकारच हवाय...! "मला निघायला हवं." इति शशी..
मग ती शहा काकांबरोबर साडेदहाला घरी परतली. तोच रखमा, जोशी काकूंचा निरोप सांगत आली.. दुपारी त्यांनी शशीला जेवायला बोलावलं होतं. आंघोळ, पूजा आटोपून ती जोशींच्या घरी जेऊन आली. संध्याकाळी चार वाजता माधवही आला.. खरंतर काकांना समीरच्या हाती सोपवल्यानं ती निश्चिंत होती.. "सर्वांना चहासाठी गुप्ते वहिनींकडे पाचला बोलावलं आहे.." असं वॉचमनकाका सांगून गेले. आणि जवळ जवळ सर्व सोसायटी मेंबर एकत्र असतानाच, दिवाकर आला. घराला कुलूप बघायची त्याची कदाचित पहिलीच वेळ होती. पण गोंगाट ऐकून तोही पहिल्या मजल्यावर आलाच. एकक्षण शशी थबकली.. पण शहा काकांनी सर्व सविस्तर सांगून, दिवाकरलाही चहा घ्यायला लावला. वर रात्रीच्या जेवणाचं आमंत्रणही दिलं. तिनं सर्वांचे मनापासून आभार मानले. पाठक काकांसाठी तू एवढी धावपळ का केलीस..? असं विचारल्यावर, "ते डायबेटीक आहेत आणि अकरा वर्षांपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याचं तिला माहित होतं.. एवढंच शशीनं सांगितलं.
रात्री देवी जवळच्या नंदादीपाची वात सारखी करून निजताना, आजचा सर्व दिवस, एखाद्या चित्रपटासारखा तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला... पण नंतर झोप मात्र शांत लागली. सकाळी तिनं सराईतपणे सर्व लवकर आवरलं. आज आठवी माळ...! सगळे सूरश्रीकर आता, ह्या देवीच्या माळेतल्या फुलांसारखे एकत्र गुंफले गेलेत..! असं तिला मनोमन वाटून गेलं. "हा प्रेमाचा नंदादीप, सगळ्यांच्या अंतरी असाच तेवू दे...." तिनं देवीला विनवलं...! "काकांना भेटून येते." ती दिवाकरला आत्मविश्वासाने म्हणाली. त्याच्या उत्तराची वाट न पाहता, बाहेर येऊन रिक्षात बसताना... मनाशीच हसली.. समीरच्या हॉस्पिटलमध्ये, इथून पुढे जमेल तसं जाण्याचा निर्णय मनात पक्का केला. दसरा परवा असला तरी, तिनं आजच "सीमोल्लंघन" केलं होतं......
जयगंधा..
२४-१०-२०२०.
प्रतिक्रिया
24 Oct 2020 - 4:12 pm | संजय क्षीरसागर
नाही तर शशीला "सीमोल्लंघन" म्हणजे एकावेळी दोन बोटीत पाय ठेवल्यासारखं झालं असतं !