घरटं
त्या दिवशी खिडकीतुन बाहेर सहज लक्ष गेलं तेव्हा जाणवलं...समोरच्या झाडावर फांद्यांच्या बेचक्यात घरटं दिसतय कोणाचंतरी..मोठ्या खोल बशीसारखं होतं ते वाळलेल्या काड्या- कुड्यांचं. दिवसभरात मुद्दाम अधुनमधून बघितल्यावर एक-दोनदा कावळा (किंवा कावळी) त्या घरट्यावर बसलेला दिसला. म्हणजे या वेळी कावळ्याने बांधलं वाटतं घरटं..चिमण्यांची असतातच घरटी, एक-दोनदा बुलबुल आणि सूर्यपक्ष्याचं पण घरटं होतं या झाडावर. चला म्हणजे आता एक छान चाळा मिळाला . अधुनमधून निरिक्षण करण्यात छान वेळ जाईल. उन्हाच्या शांत दुपारी हा निरीक्षणाचा छंद खुप आनंद देतो मनाला.
एकीकडे घरात रोहनची व्हीसा, परीक्षा, तिकीट हि सगळी त्याची पुढील शिक्षणासाठीची अमेरिकेत जाण्याची तयारी चालू होती. यात झाडावरच्या हालचालींकडे कधीकधी दुर्लक्ष होत होतं.
एके दिवशी कावळा जोडीची खुप धावपळ जाणवली..बघीतल्यावर लक्षात आलं..इवलीशी पिलं चोची वासुन चारा-पाणी मागताना नाजुक आवाज करतायत.. कावळ्याची असली तरी ती पीलं गोजीरवाणीच वाटली मला. चोची मोठ्या होत्या आणि मानेजवळ गुलाबीसर कातडी दिसत होती. आई-बाबांची त्यांना भरवण्याची धांदल आणि सतत एकाने घरट्याजवळ राहुन पिलांचं रक्षण करणं आणि दुस-याने चोचीत भरुन चारा आणणं या क्रिया बघताना भान विसरायला होत होतं..निसर्गतः पक्षी आई-बाबांना पण किती जबाबदारी समजत होती.
रोज त्यांची पिलांना खाणं पुरवण्यासाठी किती वेळा घरट्यातून आत-बाहेर धावपळ चालु होती, ती दिसत होती. थोड्याच दिवसात पीलं हळुहळु मोठी झालेली जाणवत होतं. कधीकधी इतर कावळे घरट्याजवळ येऊन बसले की आई-बाबा कावळ्यांची जोरजोरात आरडाओरड सुरु व्हायची...इतर कावळ्यांना हाकलल्यावरच ती दोघं शांत व्हायची. तीन चोची वासलेल्या दिसत होत्या..बघताना जाणवलं त्यांच्यातलं एक पीलू खुपच अॅक्टीव्ह वाटत होतं..एक साधारण आणि एक अगदिच अशक्त. ते जास्तवेळ झोपूनच राहायचं. हळूहळू त्यांना घरटं अपुरं पडायला लागलं. घरट्यात उभं राहून पंखांची उघडझाप करायला शिकली पिलं. आई-बाबा आले की खाणं मिळवण्यासाठी धडपड करायची. मजेत निरीक्षण चालु होतं आमचं.
रोहनचं अमेरिकेत जाणं आठ दिवसांवर आलं होतं..आमचीही खुप धांदल चालु होती त्याच्याबरोबर द्यायचं सामान इ. तरी बरं माझा मामेभाऊ तिकडे होता त्याच्याच कडे तो राहणार म्हणुन जास्त काळजी नव्हती.
एकदा सकाळी चहा घेतानाच जोरातच आवाज येऊ लागले.. जरा कर्कश्शच...म्हणून बघितलं तर एक पिलू बहुधा मेलं असावं. दोघांचीच हालचाल जाणवत होती.
कावळे चोच मारुन त्याला उठवायचा प्रयत्न करत होते. पण ते गेलच होतं वाटतं बिचारं खुपच अशक्त होतं. वाईट वाटलं खुप पण मला उत्सुकता होती त्या पील्लाचं ते काय करतील. पण नंतर कामाच्या धावपळीत समजू शकलं नाही.
काही दिवसांनी मला एकच पिलु दिसलं घरट्याच्या कडेवर उड्या मारत होतं. बघितलं तर दुसरं पिल्लु वरच्या फांदीवर थोड्या थोड्या वेळाने इकडून समोरच्या जरा जवळच्याच फांदीवर पंख उघडून उड्या मारत होतं. खालचं पिलू सारखं वर बघत होतं जणू म्हणत असेल "दादा, मला पण ने ना वरती." नंतर घरट्यातलं पिलू पण फांदीवर चालत गेलं. रात्री दोन्ही पिलं फांदीवरच होती. फांदी घट्ट धरून. दुस-या पीलाने पण पंख उघडून उडी मारण्याची प्रॅक्टीस केली नी लगेच उडून दुस-या फांदीवर बसलं. दोन-चार दिवसातच पिलं सराईतपणे उडताना दिसली. आम्हाला फार गंमत वाटली.
त्या दिवशी रोहनला Air port वर सोडून आलो. तो पर्यंत धरलेला धीर त्याचं विमान आकाशात झेपावताच संपून गेला आणि गदगदून रडू आलं. घरी आलो अगदी रिकामं वाटत होतं घर. ही दोन वर्ष पटकन संपावीत असं वाटतय.
चार -पाच दिवसांनी लक्ष गेलं. झाडावर सामसूम झाली होती. सकाळची कोवळी कावकाव बंद झाली. घरटं रिकामं झालं होतं.. आम्ही पण उदास झालो. गेल्या दिड-दोन महिन्यातआमचंही पिलांशी नातं जुळलं होतं..आता आई-बाबांची लगबग,धांदल सगळं संपलं होतं. दिवसभरात कधीतरी झाडावरुन बुलबुलचा मधूर आवाज यायचा. इतरहि पक्षांचे पण कावळ्याचं घरटं मात्र रीकामंच होतं.
मला खिडकीबाहेर झाडाकडे बघताना पण गलबलून यायचं..तरी बरं चिमण्या, कावळे, कबुतरं, बुलबुल,दयाळ सगळ्यांचा वावर असायचा झाडावर.
मनात विचार यायचा त्या पक्षी आई-बाबांना काय वाटत असेल पिलं घरटं सोडून जाताना.
त्यांना ते रिकामं घरटं बघून काय वाटत असेल ?
आपण माणसं..आपली पिलं सतत आपल्याजवळंच असावीत असं आपल्याला वाटतं. त्यांनी घरटं सोडून, आपली ऊब सोडून कुठेही/कधीही जाऊच नये असं वाटतं.
त्यांनी पण खुप उंच भरारी घ्यावी पण फिरुन परत यावं असं वाटतं. कधीकधी ते येतातही.
पण पक्षी परत त्या जन्मस्थळाच्या घरट्यात परत येतात ? बहुधा नाहीच.
आजकाल तर माणसांची घरटी पण रिकामीच राहायला लागली आहेत. पिलं परदेशात जातात आणि तिकडेच रमतात .
कित्येक घरटी आणि आई-बाबा वाट बघत आहेत त्यांच्या परत येण्याची "या चिमण्यांनो परत फिरा रे..." म्हणत...!!
-वृंदा मोघे
12/4/17