दोन घडीचा डाव.....!!

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
6 Oct 2020 - 6:20 pm

*दोन घडीचा डाव...*

*"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!!
चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो. *आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो,* तर मग ते गणित चुकतं कुठे..? एखादं तान्ह बाळ पाहिलं की लक्षात येतं, ते क्षणात हसतं, क्षणात रडतं. असं म्हणतात की, देव त्याच्या बरोबर बोलत असतो, तेव्हा ते हसतं आणि गतजन्मातल्या आठवणींनी कासावीस होऊन मात्र कधीकधी रडतं. पण गंमत अशी आहे की त्याकाळात ते फक्त स्वतःलाच ओळखत असतं आणि परमेश्वरी स्पर्श सतत जवळ असल्याने, आत्मरूपात मग्न असतं. हळूहळू आपण त्याला, त्याची स्वतःची, या जगा पुरेशीच अशी नवीन ओळख देतो, आणि आणि त्या बाळाला मग अहंकाराची जाणीव होऊ लागते.. कालचक्र चालूच राहतं...
आपल्या आयुष्यात काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं देवतास्वरूप पाहिलं तर काळभैरव, महांकाळ यांचं स्मरण होतं. भाषेतील व्याकरण पाहिलं तर, भूत-भविष्य आणि वर्तमानकाळ डोळ्यापुढे येतात. तर एखाद्या दुःखद प्रसंगात, दुसऱ्या व्यक्तीचे सांत्वन करताना, या काळाला आपण चक्क "औषधच" बनवून टाकतो...
*"कुणाचे कोणावाचून अडे, सारखा काळ चालला पुढे..."* हा काळ गतिमान आहे, पण आपल्या मनाचा विचार केला तर, मनाला मात्र सारखं भूतकाळात रमायला आवडतं. तिथे ते नेहमीच अडकून पडतं. अनेक कडू-गोड स्मृतींचा खजिनाच तर असतं मन...!! काही आठवणींनी सुखावतं.. मोहरतं, पण बरेच वेळा एखाद्या प्रसंगाचा सल मनाच्या तळघरात दडून बसलेला असतो. काही विशिष्ट प्रसंगांमध्ये मात्र ही अश्वत्थाम्याची जखम परत भळभळून वाहू लागते.. कारण गत क्षणांचं "निर्माल्य" करण्याचं कसब, सगळ्यांमध्ये नसतं..!! मग विवेक बाजूला पडतो, आपली वैचारिक घसरगुंडी सुरू होते, जी आपलं वर्तमान आणि भविष्य या दोघांना दूषित करते किंवा बिघडवू शकते..!!
हे टाळायचं असेल तर मग उत्तम उपाय म्हणजे, *"वर्तमानात जगणं..."* पण वर्तमान काळ फक्त "निमिषभराचाच" तर असतो. कारण प्रत्येक निमिष हे, पुढच्या क्षणी भूतकाळात जमा होत असतं. व्यर्थ कर्म करण्यासाठी आपण अखंड अधीर असतो, आणि आणि नवीन कर्मांची गुंफण करत सतत क्रियमाण वाढवत राहतो..... *"क्षणात आहे क्षणात नाही, अभिमान केवढा.. अरे तू पाण्याचा बुडबुडा..!!"* असं माहित असताना देखील आपल्याला जाग येत नाही. आणि हातातल्या वाळूसारखं वर्तमानातलं आयुष्य निसटून जात रहातं. प्रारब्धात जेवढं घेऊन जन्माला आलो, त्यानुसार भविष्यातल्या गोष्टी निश्चितपणे घडणारच असतात. कारण आपलं भविष्य हे, वर्तमानाचा हात धरून अव्याहतपणे त्याच्याबरोबरच असतं. पण मग हा जन्म-मरणाचा गुंता सोडवायचा असेल तर एक गोष्ट निश्चितच करता येते. ती म्हणजे, *"मनाची एकाग्रता"..!!* परीक्षा देताना आपलं मन एकाग्र असतं. कारण दिलेल्या ठराविक आणि आपल्या दृष्टीने कमी असलेल्या या वेळात, महत्त्वाचं सारंकाही लिहून पूर्ण करायचं असतं. त्यावर आपलं भविष्य ठरणार आहे आणि आणि हा मार्ग चूकवून चालणारच नाही, याची अनुभवामुळे आपल्या मनात खात्री असते.. तेवढ्या काळात आपलं मन त्या एकाच विषयाशी एकाग्र असतं. तर अशी ही आपली *"अंगभूत एकाग्रता"*, आपण आपल्या जीवनात, नामाच्या अनुसंधानात ठेवली किंवा, जे कार्यक्षेत्र निवडलयं, त्यात सर्वस्व झोकून प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर, वर्तमान सार्थकी लागतोच लागतो....!!
पण *"यावत् जीवेत सुखं जीवेत। ऋणं कृत्वा घृतं पीबेत।।"* ह्या चार्वाक तत्त्वज्ञानाने भारलेले आपण, *"उपभोगाच्या शतकमलांची आभासी माला"* कंठात मिरवण्यातच शहाणपण समजत असतो. कर्मांच्या चिखलात बरबटलेल्या जीवनात, आत्मस्वरूपाच्या जाणीवेचे कमळ फुलवण्यापेक्षा, त्यात विहिरीतल्या बेडका प्रमाणे विहार करण्यातच आपण रंगून जातो..!! *"हे ही दिवस जातील"* या वाक्यातल्या आशावादावर, आयुष्य पुढे सरकत रहातं. काळाच्या ओघात स्वतःला बदलत असताना, आपण प्रवाहपतीत होणार नाही, ह्याची काळजी घ्यायचं राहूनच जातं आणि पन्नाशी उलटल्यावर, जेव्हा आपण जागे होतो, तेव्हा वेळ(काळ) थोडा राहिला असतो आणि काळ(मृत्यू ) जवळ येत असल्याची जाणीव तीव्र होत जाते.. भविष्यात अंधार आहे की काय, याची अनामिक भीती वाटू लागते...
अजूनही वेळ गेलेली नसते. कारण काही जण तोवर आयुष्यात स्थिरावलेले असतात. काहींना नाममार्गाची ओळख झालेली असते. काहींनी नित्य उपासना, सत्कर्म यांचं सुंदर बीज आता जीवनात पेरलेलं असतं. भक्तीचा मळा फुलवण्यात ते मग्न असतात... काहीजण, ज्ञान आणि कर्माच्या मार्गाचा योग्य वापर करून लौकिक आयुष्यात सुखी असतात.
तरीही *"परतीच्या प्रवासाचा क्षण"* येणारच असतो. काहीजणांना बॅग कशी भरायची हे उमगलेलं असतं. मग आपोआप जीवनातल्या काही गोष्टी सुटायला लागतात... मागे पडतात.. आसक्ती कमी होते.... बगळ्यांमधल्या एखाद्या *राजहंसाला* त्याची खरी ओळख पटते.. आत्म्याच्या अनंताच्या प्रवासाची, इथे खरी सुरुवात होते.... आणि हा आपला *मनुष्य जन्म* म्हणजे, आत्म्याच्या सापेक्षतेने पाहता, त्याच्या चिरकाल चालणाऱ्या प्रवासातला *"दोन घडीचा डाव* होता.… हे सत्य कळून चुकते.....!!!!

*जयगंधा..*
२०-९-२०२०

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

6 Oct 2020 - 6:42 pm | मराठी कथालेखक

* *
* * * *
*...* * *

कर्मांच्या चिखलात बरबटलेल्या जीवनात, आत्मस्वरूपाच्या जाणीवेचे कमळ ...हे सुंदर.. सर्वच आवडलं!!

एक चांगला लेख केवळ व्हाॅट्सॲप कापीपेस्टमुळे वाचनिय न होता वाया गेलाय.

बरेच वेळा एखाद्या प्रसंगाचा सल मनाच्या तळघरात दडून बसलेला असतो. काही विशिष्ट प्रसंगांमध्ये मात्र ही अश्वत्थाम्याची जखम परत भळभळून वाहू लागते.. कारण गत क्षणांचं "निर्माल्य" करण्याचं कसब, सगळ्यांमध्ये नसतं..!! मग विवेक बाजूला पडतो, आपली वैचारिक घसरगुंडी सुरू होते, जी आपलं वर्तमान आणि भविष्य या दोघांना दूषित करते किंवा बिघडवू शकते..!!
मस्त!

- (आत्म्याच्या सापेक्षतेने पाहण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

पुढच्या वेळेस, लेखामध्ये.. चांदण्यांचा खच पडणार नाही.. याची दक्षता घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न निश्चितच करेन..!!
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद..!

गोंधळी's picture

7 Oct 2020 - 10:09 am | गोंधळी

👍 *मनुष्य जन्म* म्हणजे, आत्म्याच्या सापेक्षतेने पाहता, त्याच्या चिरकाल चालणाऱ्या प्रवासातला *"दोन घडीचा डाव* होता.… हे सत्य कळून चुकते.....!!!!

अनन्त्_यात्री's picture

7 Oct 2020 - 10:37 am | अनन्त्_यात्री

*दोन *घडीच्या *डावात*

पुढच्या वेळेस, लेखामध्ये.. चांदण्यांचा खच पडणार नाही.. याची दक्षता घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न निश्चितच करेन..!!
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद..!

महासंग्राम's picture

7 Oct 2020 - 11:53 am | महासंग्राम

लेख वाचतांना आशाताईंचं

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात

सारखं आठवत होते

Jayagandha Bhatkhande's picture

7 Oct 2020 - 5:14 pm | Jayagandha Bhat...

क्षमस्व..!!