शिवप्रतापाची झुंज ( भाग ५)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
23 Sep 2020 - 12:59 pm

या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता

शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

शिवप्रतापाची झुंज ( भाग ४)

टेहळणी बुरुजावर उभे राहून राजे उगवतीला महाबळेश्वराचा डोंगर निरखत होते. माथ्यावरुन झाडीत गडप होणारी खानाची फौज मुंग्यासारखी दिसत होती. अर्थात ही वाट्चाल त्यांची शेवटची आहे याची कोणाला कल्पना असणे शक्य नव्हते. राजे हसले,'गोपिनाथ पंतांनी बावनकशी कामगिरी केली आहे. आता महाबळेश्वर आणि प्रतापगडाच्या मध्ये वाडग्यासारख्या या कोयनेच्या खोर्‍यातून तो उन्मत्त खान आणि त्याची फौज माघारी जाणार नाही याची तजवीज केली पाहीजे. ज्या हातांनी आमच्या दैवतांना उपद्र्व दिला,आमचा मुलुख मारला ते हात यानंतर काहीही करु शकणार नाहीत याचा बंदोबस्त करायचा आहे.स्वराज्यावर चालून जाणे किती महागात पडते हे या पातशाही फौजांना समजायलाच हवे.'
राजे विचारात गढलेले असताना मागून हेजीब आला, "महाराज सरनौबत नेतोजी गडावर आलेत.ईकडेच येत आहेत".
'नेतोजी आले! काका वेळेवर आले. आता वेळ आहे ती व्युह रचण्याची.' राजे सदरेकडे निघाले.
सदरेवर बैठक बसली.समोर जावळीचा नकाशा अंथरुन व्युहरचना सुरु होती. मोरोपंत पिंगळे,शामराज व पद्मनाभी पारघाट रोखतील यासाठी त्यांच्याकडे दहा हजार मावळे बरोबर असतील, वायव्य मार्गावर स्वता नेतोजी पालकर व दोन हजार मावळे तर मुख्य घाटरस्त्यावर बाबाजी भोसले आपल्या तुकडीसह दक्ष असतील, बांदलांचा जमाव पार व जावळीचे रक्षण करण्यासाठी ठेवला जाईल,दगाफटका झाल्यास पार गावात खानाचे जे लष्कर मौजुद आहे त्याला प्रतापगड न चढू देण्याची जबाबदारी या फौजेकडे होती. तसेच ईशारा होताच त्यांनी खानाच्या फौजेवर हल्ला करायचा होता. राहिता रहीला ईशान्येकडचा भाग्,त्याबाजुला हैबतराव व बाळाजी शिळीमकर बोचेघोळीची वाट अडवून उभे राहणार होते.रडतोंडी घाटाची वाट खान उतरुन खाली आल्यावरच झाडांनी आणि दगडांनी बंद केली होती.आपण पुरते कोंडलो गेलो आहे हे खानाच्या गावीही नव्हते. गडावरचा बंदोबस्त हि चोख होता. गडाच्या पुढच्या बुरुजावर शंभर मावळे तर मागच्या बाजुच्या बुरुजावर पन्नास मावळे असणार होते. गडाच्या दरवाजाचा चोख बंदोबस्त ठेवून तिथे व सदरेसमोर तोफा तैनात केल्या गेल्या. भेटीच्या शामियान्याच्या मागे जे भुयार खणले त्यात संभाजी कावजी,हिरोजी फर्जंद्,सोना महाला,जीवा महाला हे लपून रहातील्,योग्य वेळी बाहेर येउन गनीमाचा खुर्दा करतील तर महादरवाज्याबाहेर झाडीत कान्होजी जेधे पाचशे मावळ्यांसह तयार असतील. अगदीच गरज पडली तर महाड कोटात त्रिंबक भास्कर पाच हजार फौजेसह सज्ज असतील आणि सांगावा येताच ते गड जवळ करतील.एकंदरीत खानाची पुरेपुर कोंडी होणार हे निश्चित झाले.आता गडावर भेटीत नेमके काय होणार हे प्रत्यक्ष काळही सांगु शकत नव्हता,पण भेटीनंतर खान जिवंत जावळीबाहेर जाणार नाही, हे नक्की झाले.
"काका, आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे,आपल्या फौजेत एखादा उंचीने आडमाप आणि आडव्या अंगाचा मावळा आहे का ?" राजांनी नेतोजींना विचारले.
"जी हायेत थोडे.पण सगळ्यात आडदांड म्हणाल तर भिमाजी काटे. मावळातल्या ह्यो गडी उंचीनं म्हणाल तर आपल्या कानापाशी त्याचं खांद येत्यात. दुप्पट हाडापेराचा ह्यो गडी खायला बसला कि वाढपी वाढून वाढून दमलं पाह्यजेत. त्याच खर नाव भिमाजी न्हायी, पर त्याचा हा आडमाप देह आणि खाणं बघुन त्याला भिमाजी नाव पाडल.त्याच नावाने त्याला आता समदी बोलवत्यात.पण राजं तुम्हाला त्या भिमाजीशी काय काम?" नेतोजींना हे राजांनी मधेच काय काढले आहे समजेना.
"फार महत्वाचे काम आहे.आजपासून हा भिमाजी फौजेत न रहाता ईथे गडावर राहील. काका, लक्षात घ्या खान आम्हाला ठार मारण्याच्या उद्देशाने आला आहे.तो कोणती चाल करेल हे सांगणे प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही शक्य नाही.तेव्हा आम्ही या भिमाजीला निरनिराळे डाव सांगून खान आम्हाला कसे मारायचा प्रयत्न करेल त्याप्रमाणे चाल करायला सांगू, त्यातून सुटाण्यासाठी काय डावपेच वापरावे लागतील याचा आम्हाला सराव करता येईल" राजांनी एकाग्र होउन नेतोजींना योजना सांगितली.
"आणखी एक थोडी वाळुची पोती गडावर ठेवा, त्याच्यावर तलवार चालवून आम्हाला काही सराव करायचा आहे"
नेतोजी काका थक्क होउन एकत होते.ते ईतकच म्हणाले, "जी, भिमाजीला आजच गडावर पाठवतो".
-------------------------------------------------------------------------------------------------------
पार गावाच्या हद्दीत खान आणि त्याची फौज पोहचली.खानाच्या मुक्कामाच्या जागी राहुट्या,मंडप, तंबु ईत्यादीची उत्तम व्यवस्था केली होती.त्याच बरोबर लष्करास लागणार्‍या साहित्याची व्यवस्था केली होती.राजांनी केलेली व्यवस्था पाहून खान बेहद खुष झाला.
ताबडतोब छावणी उभा करायला सुरवात झाली. खान त्याच्या राहुटीत विसावला. मुसेखान, रहिमखान्,अंबरखान,अंकुशखान आणि फत्तेखान त्याच्याबरोबर मसलत करत बसले होते.ईतक्यात गोपिनाथ पंत तिथे आले.
'आवो पंत, तशरीफ रखो. हम आपलाही ईंतजार कर रहे थे. सिवाने बोलावल्याप्रमाणे आम्ही जावळीत आलेलो आहोत.सिवाला म्हणावे आम्हाला ईथे येउन भेट. "खान कुर्‍यात म्हणाला.
"छे हुजुर, कस शक्य आहे ते ? अहो आधीच शिवाजी राजे आपल्याला घाबरले आहेत.ते तर गडाबाहेर पडायलाही तयार नसतात.आपण आता ईथे आलात तर गडावर जाउन त्यांचा पाहुणचार घ्या आणि त्यांना विश्वास द्या.आपण गडावर येणे केले तरच शिवाजी राजांना दिलासा मिळेल" पंत बेरकीपणाने म्हणाले.
"और कितना डरेगा ये सिवा ! हम ईसे सुरमा समझ रहे थे लेकीन ये तो बुझदिल निकला" खान कुत्सितपणाने हसत म्हणाला.
"ठिक है, कोई बात नही.हम सिवा का डर दुर करते है.जाओ बोलो उसे हम प्रतापगडपर आने के लिये तयार है" "जी खानसाहेब.आपण खुप रहेमदिल आहात.मी हि शिवाजी राजांना हेच सांगत होते कि खानसाहेब जरुर गडावर येतील आणि त्यांचे अपराध माफ करतील. हुजुर आपण माझ्या शब्दाचा मान राखलात हि माझ्यावर केलेली कृपाच आहे. आपण माझ्या विनंतीचा मान राखाल याची मला खात्री होतीच, मी राजांना तेच सांगितले.त्यामुळे राजांनी आपल्या मुलाखतीसाठी अलिशान शामियाना उभारला आहे.आपण आपला एखादा सरदार पाठवून त्याची पहाणी करावी, काही अधिक उणे असल्यास सांगावे म्हणजे आपल्या खातिरदारीत काही कमी राहु नये अशी राजांची ईच्छा आहे. आणखी एक गुजारीश आहे खानसाहेब. आपल्याबरोबर महाराजांचे चुलते मंबाजी राजे आलेले आहेत.शिवाय विजापुरचे सगळे थोर सरदार मुसेखान्,याकुतखान्,अंबरखान, हसनखान आलेले आहेत.महाराजांना त्यांचा आदरसत्कार करायचा आहे.आपल्याला विनंती आहे कि आपण जे आपल्याबरोबर जडजवाहीर्,रत्ने विकणारे व्यापारी आणले आहेत त्यांना गडावर पाठवून द्यावे." खोटेच झुकत नाटकीपणाने पंत म्हणाले.पण त्यांना हवे तेच झाले होते हे त्या छावणीत अजून तरी कोणाच्या डोक्यात शिरले नव्हते.
"आपने ये क्या किया हुजुर ? सिवा को यहां नीचे छावणी मे बुलाने के बजाय आप किले पे जायेंगे ? मला हे ठिक वाटत नाही. मला पहिल्यापासून त्या सिवाचा संशय येतो आहे. एकतर आपल्या फौजेला असे अडचणीच्या जागी त्याने आणले.आपली थोडी फौज वाईला जनान्याच्या हिफाजतीसाठी ठेवावी लागली.म्हणजेच थोडी फौज कमी झाली. आता हुजुरांना तो किल्ल्यावर बोलावतो आहे म्हणजे पुन्हा सगळी फौज नेता येणार नाही. मुझे शक है इस मे सिवा की कोई चाल जरुर है.मेरा मानीये हुजुर आप सिवा को अपनी छावणीमे आने के लिये फर्माये. वहां किले पे जाना मुहासिब नही." अंबरखान तळमळीने म्हणाला.
"अब्बुजान ,मला अंबरखानाचे बोलणे पटते आहे.आपण सिवालाच खाली बोलावूया, किल्ल्यावर जाणे म्हणजे सिवाला काही चाल करायचा मौका देण्यासारखे आहे" फाझलखानाने अंबरखानाची री ओढली.
"आप लोग बुझदिल हो.मत भुलो हम सिवा को मारने यहा आये है.अगर मौत सामने आये तो भी हम उसे खदेडकर सिवा को खत्म करेंगे. हम किसी भी हाल मे सिवा से मिलना चाहते है. वो यहां नही आता तो हम किले पे जायेंगे" खान निश्चयाने म्हणाला.
नाईलाजाने आणि नाराज होउन बाकी सरदार मान हलवत खानाच्या राहुटीतून बाहेर निघून गेले.
---------------------------------------------------------------------
"ते जवाहिरे आणि रत्न विकणारे गडावर आले का ?" राजांनी मोरोपंताना विचारले
"होय राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याकडची उत्तमोत्तम रत्न आणि दागिने घेउन ठेवले आहेत. खानाची भेट झाली कि त्यांची सर्व रक्कम दिली जाईल असे सांगून त्यांना गडावरच ठेवले आहे".
"उत्तम ! खानाच्या तयारीची काही खबरबात ?"
"हो राजे, विश्वासरावांनी कळवले आहे, खानाचा विश्वासु आहे त्याचा रक्षक 'बडा सय्यद'.यालाच 'सय्यद बंडा' असे देखील म्हणतात.फार चपळ आणि धाडशी आहे हा सय्यद.पट्टा चालवंण्यात याचा हात कोणी धरु शकत नाही.बघता बघता वीजेच्या चपळाईने हा हालचाल करतो आणि मोहरा घेतो. नऊ हातांवरचे लक्ष मारून पुन्हा त्याच जागेवर येऊन दुसऱ्या वाराचा पवित्रा घ्यायचा. तेही डोळ्याचे पाते लावण्याचे आत असा सय्यद बंडाचा कसब. महाराज, भेटीच्या वेळी खान या बडा सय्यद्ला घेउन येणार्,आपल्याला याच्यापासून दक्ष रहायला पाहिजे. शिवाय खुद्द खान उंचापुरा आणि प्रचंड ताकदीचा आहे.त्याच्या शस्त्रसामर्थ्याबरोबर त्याला आपल्या बाहुबळाची घंमेडी आहे" पंतानी चिंता व्यक्त केली.
"खर आहे पंत तुम्ही म्हणता ते. खानाच्या ताकदीचा आम्हाला आधीच आदमास होता,म्हणून आम्ही संभाजी कावजीला घेणार आहोत.खानावर लक्ष देणे हि त्याची जबाबदारी असेल.राहिता राहिला बडा सय्यद. त्याची तोड देखील आपल्याकडे आहे. पंत तुम्हाला कोंढवलीची ती जत्रा आठवते.तिथे पट्टा चालवण्याचे कौशल्य बघून आम्ही जीवा महालेला तोडा दिला आणि आपल्या फौजेत भरती करुन घेतले.तो जीवा महाले नक्कीच बडा सय्यदला मात देईल".
"हो महाराज. हि तोड उत्तम आहे"पंतानी समाधानाने मान हलवली. "महाराज गडावर खानाचे वकील कृष्णाजी भास्कर आलेत.भेटीचा दिवस आणि अटी ठरवायच्या आहेत"
"ठिक ! त्यांना सदरेवर बसवा आम्ही येतोच."
राजे सदरेवर येताच सारे उठून उभे राहीले.सदर बसताच कृष्णाजी भास्कर पुढे झाले, "महाराज्,ठरल्याप्रमाणे खानसाहेब जावळीत आलेले आहेत.आता शक्य तितक्या लवकर हि भेट व्हावी अशी खानसाहेबांची ईच्छा आहे.भेटीच्या शर्ति ठरवायलाच मी आज गडावर आलेलो आहे".
"नक्कीच पंत, बसा.खानसाहेबांची भेट घ्यायला आम्ही देखील आतुर झालेलो आहोत. भेटीसाठी उभा केलेला शामियाना खानसाहेबांच्या माणसांना पसंद पडला असा त्यांनी निरोप दिला आहे. उद्या चंपाशष्टी आहे, खंडोबाचे नवरात्र सुरु होते आहे.आजुबाजुला गावात उत्सव असेल.दुसर्‍या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुध्द सप्तमीला रामप्रहरी आमची आणि खानसाहेबांची भेट होइल. दोघांचे दहा अंगरक्षक सोबत असतील आणि ते बाणाच्या टप्प्यावर उभे रहातील.शामियानात आम्ही,खानसाहेब हे सशस्त्र असू आणि आत आमच्याशिवाय दोन्,तीन सेवक असतील. अर्थातच यात दोघांचे वकील असतील.मान्य आहे ?"
"जी राजे.ह्या अटी मी खानसाहेबांच्या कानावर घालतो आणि आपल्याला कळवतो." कृष्णाजी सदरेबाहेर पडले. बघता बघता हा जीवघेणा प्रसंग ईतक्या जवळ उभा ठाकलेला पाहून राजांच्या सोबत्यांच्या जीवात कालवाकालव होत होती.राजांच्या चेहर्‍यावर मात्र भितीचा लवलेश नव्हता.स्थिर नजरेने ते सदरेकडे पहात होते.
----------------------------------------------------------------
"मंजुर है! सब शर्ते मंजुर्र है.अब तो पहाडी चुहा सिवा हमसे मिलने बाहर आयेगा ना ?" खान गुर्मीच्या स्वरात म्हणाला. कृष्णाजी पंतांनी आणलेली मसलत खानाने चुटकीसरशी मान्य केली.
त्याने फाझलला जवळ बोलावले आणि अब्दुल सय्यद्,बडा सय्यद, रहिमखान्,पहिलवानखान्,शंकराजी आणि पिलाजी मोहीते यांना तयार रहाण्यास सांगितले.
"हुजुर्,आपल्यासोबत शामियान्यात कोणाला ठेवणार आहात ?" अंकुशखानाने विचारले.
"उसकी फिक्र नही.बडा सय्यद अकेला काफी है.सय्यद पट्टा फिरवु लागला की बडे बडे सुरमा लढवय्ये मैदान सोडून पळतात.वो अकेलाही हमारे साथ होता है तो हमे सुकून महेसुस होता है" खानाचा आत्मविश्वास आता गगनाला स्पर्श करत होता.त्याला या भेटीची घाई झाली होती.कधी एकदा या सिवाला संपवतो, जावळी ताब्यात घेतो आणि विजापुरला परततो असे त्याला झाले होते.सिवाला मारल्यावर दरबारात त्याचे वजन प्रचंड वाढणार होते, मग वजिरी लांब नव्हती. खानाच्या डोळ्यासमोर स्वप्न तरळत होती.
---------------------------------------------------------------------
रामजी पांगेरा झाडीत बसून कंटाळला होता म्हणून सहज वरची दिशा पकडुन गडाकडे चालला होता, ईतक्यात झाडी आडून सपकन तलवार बाहेर आली आणि समोर सुभेदार तानाजी मालुसरे बाहेर आले.
"अरे रामजी तु ? मला वाटलं येखादा गनीमाचा सरदार झाडीतन वर आला कि काय ?"
"सुभेदार या जावळीची झाडीच ईतकी गर्द हाय कि फार जवळ आल्याबिगर आपलं,परका समजत न्हायी. दोन दिस झाले बसून कंटाळलो म्हणून जरा बाहेर पडलो तर तु समोर !" रामजी हसत उत्तरला.
"म्या बी कटाळलोय.पर काय करनार ? गडावरुन ईशारतीची तोफ होत न्हायी तोपर्यंत हालचाल करायची न्हायी असा राजांचा हुकुम हाय" तानाजीने तलवार म्यान केली.
"सुभेदार हि बादशाही भुतावळ समोर बघीतली तरी डोळ आग ओकायला लागत्यात.हात नुस्त शिवशिवत्यात.पण राजाचा हुकुम म्हणून गप्प बसायच.याच पातशाही फौजांनी आमच्या तुळजाआईची मुर्ती फोडली,पंढरपुरच्या इठोबाच्या देवळाला तोषिश दिली, शंभु महादेवाला तरास दिला.आता तावडीत घावल्यात.एकाला या रानाच्या बाहेर जाउ देणार न्हायी" रामजी तगमगीने म्हणाला.
"खर हाय तुझ!पण ह्यो डावपेच हाय.हिथ घाई करुन चालत न्हायी.येक डाव ईशारत झाली म्हणजे मग उसंत न्हायी मिळायची.जा नेमून दिलेल्या जागेवर डोळ्यात तेल घालून त्या पातशाही फौजांवर नजर ठेव्,आरं आज चंपाशष्टी! तुला म्हायीतच हाय कि ती कथा. आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. आता राजं उद्याला आणखी एका दैत्याचा वध करणार हायीत.फकस्त आजची रात्र.उद्या राजे आणि त्यो खान यांची गडावर भेट होणारच हाय. येकदा त्या खानाला मारला कि इशारतीच्या तीन तोफा होतील,शिंग वाजायला लागतील, मग या समद्या गर्द रानात दडलेली आपली फौज बाह्येर पडल आणि मग आपल्या या शिवशिवणार्‍या हातांनी खानाचा हिशेब चुकता करायचा.जो शरण यील त्याला अभय द्यायचे पण जो शस्त्र उगारलं त्याला जीत्ता न्हायी सोडायचा.महाराजांचा सांगावाच हाय तसा". तानाजी मिश्यावर पिळ देत म्हणाला.
-------------------------------------------------------------------------------
प्रतापगडावर रात्र उतरली होती.पण आज झोप कोणाला येणार होती ? अफझलखानाशी भेट होणार, होणार म्हणत असलेला क्षण काही घटीकांवर येउन ठेपला होता. प्रतापगडावर चिंतेचे सावट साचले होते.मात्र या घटनेकडे अनेकांचे डोळे लागले होते.राजगडावरुन आउसाहेब नैऋत्येकडे प्रतापगडावर नजर रोखून आईभवानीकडे प्रार्थना करत होता.राणीवश्यातील वातावरण विलक्षण तणावपुर्ण होते,सोयराबाई,पुतळाबाई,सकवारबाई खोटेखोटेच एकमेकीना धीर देत होत्या.आपण आपलीच समजूत काढतो आहोत हे समजत होते,पण दुसरा काही ईलाज नव्हता.बेंगळुरात शहाजी महाराजांनाही काळजीने झोप नव्हती.एक मुलगा याच खानाने कपटाने मारला होता आता तो दुसर्‍याचा काळ बनून पुन्हा आला होता.नित्यकर्म सुरु होती,पण लक्ष कोणाचेच नव्हते.
विजापुर दरबार मात्र खुषी साजरा करायच्या तयारीत होता.खान मोहीमेवर गेला आहे ना? मग तो त्या सिवाला मारुनच येणार हा आत्मविश्वास सगळ्यांना होता, राजापुर्,मुंबई,सुरतेचे ईंग्रज काय होते म्हणून तयार बसले होते,तीच गत पोर्तुगीजांची आणि आणखी एक करडे डोळे दख्खनच्या दिशेने रोखले गेले होते, आलमगीर औरंगजेबाचे.त्याचे तर या दोघांशीही शत्रुत्व होते. दोघे ही मेले तर या सगळ्या शत्रुंना आनंदाचे भरतेच आले असते. पण नक्की काय होणार होते ?
प्रतापगडावर महाराजांच्या महालात गुप्त मसलतीसाठी सगळे जण जमा झाले होते. कान्होजी जेधे,माणकोजी दहातोंडे,नेतोजी पालकर्,मोरोपंत पिंगळे,बर्हिजी नाईक सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते.
"राजे, नेमकी योजना काय आहे ?" मोरोपंतांनी चर्चेला तोंड फोडले.
"बर्हिजी,नजरबाजांनी आणलेल्या खबरीप्रमाणे खान आमचा घात करणार हे नक्की आहे.आम्ही त्याच दृष्टीने तयारी केली आहे. भिमाजीला वेगवेगळे डावपेच करायला लावून आम्ही सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या आहेत. भेट निशस्त्र व्हावी असे ठरले असले तरी खान एखादे शस्त्र लपवून आणेल अशी शक्यता आहे.पण त्यापेक्षा त्याला खात्री आणि घमेंडी आहे ती त्याच्या ताकदीची. त्याला तोंड देणे महत्वाचे आहे. त्यासाठी अंगरख्यात बिचवा असेलच. शिवाय अंगरख्याखाली चिलखताची योजना केली आहे"
"राजे डोक्याला शिरस्राण घालून जा" माणकोजींनी अनुभवातून सुचना केली.
"अगदी योग्य सल्ला दिलात काका, खानाचा कोणताच नेम नाही.आम्ही हि सुचना ध्यानी ठेवू"
"राजे वाघनखे धारण करुन भेटीला गेलात तर ?" मोरोपंतानी कल्पना मांडली
"सुचना चांगली आहे पंत.अश्या घात होउ शकणार्‍या भेटीत वाघनख वापरली जातात्,पण वाघनख इथे दिसण्याची शक्यता आहे,तेव्हा प्रसंग पडल्यास पाहु"
"महाराज, भेटीसाठी हि रामपाराची येळ निवडायचे कारण काय?" कान्होजींनी मनातील शंका बोलून दाखवली.
"त्याचे असे आहे काका, खानाचा मुक्कम बरेच दिवस वाईला होता,जवळपास पाच मास! तर गेले काही दिवस ईथे प्रतापगडाच्या पायथ्याशी पार गावात.या सगळ्या काळात त्याच्या फौजांनी युध्द फारसे केले नाही,सगळा वेळ आरामात घालवलेला आहे.फौजेला असा आराम मिळाला कि शिथीलपणा येतो. आज आम्ही गडाखाली आचारी पाठवून खानाच्या फौजेला गोडाधोडाचे जेवण घालण्याचे योजले आहे.असे सामिष आणि जड जेवण झाले कि फौज सुस्तावते आणि प्रतिकार मंदावतो.खानाच्या भेटीनंतर जो समरप्रसंग होईल त्यावेळी हि फौज फार प्रतिकार करु शकणार नाही.बघालच तुम्ही" राजांच्या मुखावर स्मित होते.
राजांनी आणखी काही बारिक सारिक सुचना दिल्या आणि शेवटी निर्वाणीचे बोलणे केले,"आम्ही उद्या खानाला भेटणार म्हणजेच मृत्युच्या दाढेत जाणार आहोत. आपल्या सर्वांच्या मनात काय चालले आहे ते मी जाणतो.पण कोणीही चिंता करु नये. आई भवानीने आम्हास दर्शन दिले आहे, आई म्हणाली, 'मुला चिंता करु नको.या समयी मी तुझ्या पाठीशी उभी आहे. खानास मोह घालून मी तुझ्या सन्मुख आणले आहे. तरी तु निर्भय चित्ते अवसान करुन त्याचा वध करावा,त्याचे शिर कापून माझ्या पुढे ठेव.त्याच्या रुधिराचा टिळा ललाटी लाउन, त्याचा बळी देउन मला संतुष्ट कर.'आई भवानी आम्हास यश देईलच आणि तीच्या कृपेने आम्ही खानाचे पारिपत्य करु.पण हा युध्दप्रसंग आहे,तेव्हा जीवाचे बरेवाईट झाले तर शंभुबाळास सांभाळून जिजाउ मातोश्रींच्या सल्ल्याने स्वराज्य वाढवावे. ".
कातर स्वरातील हे बोलणे एकून बैठक सुन्न झाली.

( क्रमशः )

इतिहासमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Sep 2020 - 3:56 pm | तुषार काळभोर

जय भवानी, जय शिवाजी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2020 - 4:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

आता पुढचा भाग लवकर टाका
राजांनी खानाच्या भेटीसाठी केलेल्या तयारीचा बारीक सारीक तपशिल आवडला, भिमाजी बद्दल माहित नव्हते,
तानाजी मालुसरे यांचा प्रसंग कदाचित काल्पनिक असेल पण फारच मस्त रंगवला आहे.
आता पुढच्या भागात खानाचा कोथळा कसा बाहेर येतो ते वाचण्यास उत्सुक आहे
तेव्हा पुढच्या आठवड्याची वाट न पहाता त्वरेने पुढचा भाग प्रकाशित करावा ही नम्र विनंती
पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

23 Sep 2020 - 6:14 pm | दुर्गविहारी

प्रतिसादा बध्द्ल धन्यवाद.
भिमाजी हे काल्पनिक पात्र आहे. ते मी कथेत का घेतले आहे याचे कारण स्पष्ट करतो.अन्यथा आणखी नवीनच काहीतरी दंतकथा निर्माण व्हायची. ;-)
स्वत महाराज असोत किंवा त्यांचे सरदार,मावळे तसेच शत्रुपक्षाचे कोणी त्यांना युध्द सराव हि मह्त्वाची गोष्ट होती.त्याखेरीज रणांगणात चपळता आणि शत्रुवर नेमका वार कारिगर होणे शक्य नसायचे.आणि थोडी चुक म्हणजे म्हणजे मृत्युला आमंत्रण ! तेव्हा जसे आपण खेळाडू नियमित सराव करताना बघतो तसे हे सर्व योध्दे युध्दाचा सराव नियमित करायचे.
अफझलखान भेटीचा प्रसंग हि युध्दनितीचा विचार केला तर दुर्मिळ घटना होती.रोज कोणी तुम्हाला येउन भेटून मारण्याची योजना करत असणार नाही.त्यामुळे अश्या प्रसंगात नेमके काय होइल आणि त्या भेटीतील सर्व शक्यता तपासून त्याला कसे उत्तर द्यायचे याचा सराव स्वत महाराजांना करायचे कारण नव्हते.मुख्य म्हणजे तोपर्यंत त्यांच्यावर असा प्रसंग आलेला नव्हता.एकदा अफझलखान त्यांना ठार मारायला आलेला आहे हे स्पष्ट झाल्यावर तो दगा करण्यासाठी काय काय करु शकेल याच्या सर्व शक्यता महाराजांना तपासणे आवश्यक होते. यासाठी कदाचित अफझलखानाच्या उंचीचा एखादा मावळा घेउन त्याच्याबरोबर भेटीची रंगीत तालिम करुन त्यांनी दगा होण्याच्या सर्व शक्यतात कसे वागायचे याचे नियोजन केलेले असणार असा माझा अंदाज आहे.म्हणूनच मी ते भिमाजीचे काल्पनिक पात्र कथेत समाविष्ट केलेले आहे.
बाकी पुढचा आणि अंतिम भाग शनिवारी पोस्ट करतो.

कानडाऊ योगेशु's picture

23 Sep 2020 - 5:47 pm | कानडाऊ योगेशु

शामियानात आम्ही,खानसाहेब हे सशस्त्र असू

नि:शस्त्र असायला हवे का इथे?
पुढचा भाग वाचण्यासाठी अधीर झालो आहे.

दुर्गविहारी's picture

23 Sep 2020 - 6:15 pm | दुर्गविहारी

बरोबर! हि चुक राहुन गेली आहे.निदर्शनास आणल्याबध्दल धन्यवाद .

शशिकांत ओक's picture

24 Sep 2020 - 4:25 pm | शशिकांत ओक

आम्ही,खानसाहेब हे सशस्त्र असू आणि आत आमच्याशिवाय दोन्,तीन सेवक असतील.

सशस्त्र असले पाहिजेत. कारण प्रोटोकॉल प्रमाणे नंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली शस्त्रे, नंतर आपल्या बाजूच्या सरदारांची ओळख करून देऊन मग त्या दोघांनी (महाराज आणि खान) आपापली शस्त्रे प्रत्यक्ष समोरासमोर काढून जवळच्या थाळीत ठेवून मग ते थाळ तैनातीच्या नोकरांकरवी बाहेर नेले जावेत असे करारानुसार ठरले असावे. जर समोरासमोर हातघाईचा प्रसंग घडला नसता तर आधी मान्य मसूद्याच्या करारावर स्वाक्षरी व शिक्कामोर्तब केले गेले असते. त्यातील कलमान्वये शिवाजी महाराज विजापूर दरबारात येऊन अदिलशाहशी पुणे व सुपे, कोकणचा काही भाग अशी सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे असे जाहीर केले गेले असते.
वडील शहाजीराजे यांनी त्या वेळी उपस्थित राहून त्यांची या सुभेदारीस मान्यता आहे असे दरबारात घोषित केले असते.
अशा घटनाक्रमात दोघेही निशस्त्र आहेत असे प्रत्यक्ष शस्त्रे खाली ठेवून देणे (लपवलेली शस्त्रे सोडून) हा विश्वास दर्शन करायला हवे म्हणून ती अट किंवा कलम असले पाहिजे.
थोड्या फार फरकाने नंतर आग्ऱ्याच्या महाराजांच्या भेटीत शंभूराजेंच्या नावे पंच हजारी मनसबदारी देण्याच्या घोषणे साठी जावे लागले होते.
म्हणून सुरवातीला शामियान्यात सशस्त्र असलेले जास्त सयुक्तिक वाटते.

नीलस्वप्निल's picture

23 Sep 2020 - 6:13 pm | नीलस्वप्निल

पटकन टाका पुढचा भाग.... अफुझ्ल्ल्याचा कोथळा कधी बाहेर पडतो... अस झालय :)

बोलघेवडा's picture

23 Sep 2020 - 9:45 pm | बोलघेवडा

जबरदस्त!!!

अर्धवटराव's picture

23 Sep 2020 - 11:09 pm | अर्धवटराव

स्थळांचं तपशील, वातावरण निर्मीती, संवाद.. सर्वच जबरी.

प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दोघांनिही सशस्त्र यावे अशीच योजना होती ना? महाराजांनी जर तलवारीने खान वध केला असेल तर ति तलवार महाराज भेटीच्या वेळी घेऊनच गेले असतील.

कानडाऊ योगेशु's picture

24 Sep 2020 - 9:37 pm | कानडाऊ योगेशु

खानाचा वध तलवारीने केला ह्याबद्दल सांशक आहे.वर ओक साहेबांनी म्हटल्याप्रमाणे लपवुन नेण्याजोग्या खंजीराने पोटात वार केले असावा तेही अगोदर वाघनखांनी पोट फाडल्यानंतर.

असं शिवभूषण निनाद बेडेकरांच्या एका व्याख्यानात ऐकल्याचं आठवतय.
असो. खानाचा कोथळा काढला हे महत्वाचं :)

सुखी's picture

23 Sep 2020 - 11:47 pm | सुखी

मस्त...

आता शनिवारपर्यंत वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडलाय

सत्य धर्म's picture

24 Sep 2020 - 10:50 am | सत्य धर्म

आता पुढच्या भागात खानाचा कोथळा कसा बाहेर येतो ते वाचण्यास उत्सुक आहे

बेकार तरुण's picture

24 Sep 2020 - 12:00 pm | बेकार तरुण

जबरदस्त लिखाण