कोणे एके काळी ...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
19 Sep 2020 - 9:42 am

कोणे एके काळी जेव्हा लोक एकमेकांंना सहज भेटत असत, कारणाशिवाय..
तेव्हा मॉलच्या पाय-यांवर भेटलास. इकडचं तिकडचं बोललास.
मी हसत होते वेड्यासारखी. आणि तू अचानक हातात हात घेतलास.
त्या स्पर्शात प्रेम होतं, विश्वास होता, ऊब होती..

कोणे एके काळी जेव्हा लोक चेहरा लपवत नसंत.
ओठांच्या कोपऱ्यात तर कधी खळखळून हसत असत.
तेव्हा तू तेव्हा तू माझ्या ऑफीसवर आलास.
अचानक मला जवळ ओढलंस, मध्ये टेबल असूनही..
त्या स्पर्शात प्रश्न होता, आणि उत्तर मिळाल्याचा आनंददेखील होता, ओढ होती...

कोणे एके काळी जेव्हा लोक एकमेकांच्या गाडीत न घाबरता बसत,
तेव्हा एकदा एकत्र आलो होतो तुझ्या गाडीने.
तेव्हा तुझ्या छातीवर विसावले होते.
त्या स्पर्शात अधीरता होती, खट्याळपणा होता, तृप्ती सुद्धा होती..

कोणे एके काळी जेव्हा खुशाल कुणीही कधीही रेस्टॉरंट मध्ये जात
तेव्हा तू मला प्रचंड गर्दी असलेल्या कॅफे मध्ये नेलस.
आपण समोरासमोर बसलो आणि बाजूला ही गर्दी!
तेव्हा प्लेट सरकवताना झालेला निसटता स्पर्श..
त्यात समंजसपणा होता, स्विकार होता, खात्री होती..

कोणे एके काळी जेव्हा लोक जिममध्ये जात,
तेव्हा प्रमोशनची बातमी पहिली तुला सांगायची म्हणून प्रचंड ट्रॅफिकमधून तुझ्या जिमखाली आलेली मी,
घामेजलेल्या तुला जेव्हा मी घट्ट मिठी मारली, बिलगले,
त्यात माया होती, आपुलकी होती, शाबासकी होती..

असे अनेक बोलके स्पर्श...
त्या सगळ्या सगळ्या स्पर्शांना पारखी झालेय रे मी...

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Sep 2020 - 11:26 am | प्रचेतस

खूप सुरेख

चलत मुसाफिर's picture

19 Sep 2020 - 11:36 am | चलत मुसाफिर

गेले ते दिन गेले. पण फिरून येतील अशी आशा नक्कीच आहे. :-)

रातराणी's picture

19 Sep 2020 - 12:06 pm | रातराणी

कोणे एके काळी जेव्हा लोक सहज एकमेकांना 'पुडी आहे का?' विचारत,
कोणे एके काळी जेव्हा आपला डबा दुसऱ्याला देऊन लोक बिनधास्त कँटीनमधला वडापाव हाणत,
कोणे एके काळी जेव्हा लोक तपकीर ओढून कोण किती शिंकतोच्या पैजा लावत,
कोणे एके काळी जेव्हा फॅशन म्हणून पुण्यातल्या मुली स्कार्फ बांधून फिरत
वगैरे वगैरे =))

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2020 - 1:56 pm | टवाळ कार्टा

ते पण भारी आणि हे पण भारी

प्राची अश्विनी's picture

21 Sep 2020 - 10:14 am | प्राची अश्विनी

येऊ द्या अजून वगैरे वगैरे..

एस's picture

19 Sep 2020 - 1:27 pm | एस

वा! एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून प्रेमाविषयी केलेलं लिखाण आवडलं. म्हणून तुमच्या कविता आवडतात. माझ्या द बेटर हाफला अजून समजून घेता येतं. लिहीत रहा. सध्या कोरोना झाल्यामुळे विलगीकरणात आहे. त्यामुळे ही स्पर्शाची ओढ अधिकच स्पर्शून गेली हृदयाला.

बाकी नेहमीप्रमाणे पैजारबुवांच्या इडंबनाच्या प्रतीक्षेत.

प्राची अश्विनी's picture

21 Sep 2020 - 10:15 am | प्राची अश्विनी

:).
मी पण प्रतिक्षेत

प्राची अश्विनी's picture

21 Sep 2020 - 10:15 am | प्राची अश्विनी

सर्वांना धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2020 - 10:29 am | ज्ञानोबाचे पैजार

हे दिवसही लवकरच जातील,

रच्याकने :- धाग्यावर माझी आठवण काढल्या बद्दल एस भाऊंचे आभार. अर्धी दाढी रातराणी तैनी करुनच ठेवली आहे. उरलेल्या करता वस्तर्‍याला धार लावायला घेतो.

पैजारबुवा,