लबरे़ज...
आज अचानक एक खजिना हातात लागला कोणाच्यातरी कृपेनं आणि मायेनं!निमित्त होतं आर डी बर्मन ह्यांच्यावर असलेला quintessential sunshine इतकं समर्पक नाव असलेला हा कार्यक्रम! एकदम आवडून गेला.सध्याची परिस्थिती आणि पंचमदा अशी आगळी सांगड घालून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्यातल्या अतुलनीय संगीतकाराचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतात आणि त्यातून खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे असं वाटतं.अनेक गुणी लोकांनी त्यांच्याबद्दल उत्तमोत्तम किस्से सांगितले आहेत त्यांच्या गाण्यातल्या संगीताच्या,अनवट सुरावटीच्या जागा आणि त्याला सप्रमाण म्हणून पंचमदांच्या गाण्याची जोड असणारे हे छोटे छोटे भाग!हया कार्यक्रमात पहिल्या भागात गुलजारजी त्यांच्या परम मित्राबद्दल इतक्या "भावभीनी"शब्दात आणि स्वरात बोलले आहेत की आपल्याला गहिवर येतो.
ह्या छोट्याश्या मुलाखतीत काय नाहीये!दोन अतिशय गुणी,पण बाह्य व्यक्तित्व संपूर्ण वेगळ्या असणाऱ्या दोन वेगळ्या व्यक्तींच्या दोस्तीची कहाणी होती ही.त्यात तो मित्र अकाली गेल्याची खंत जरुर होती पण त्याचबरोबर त्या क्षणांना आयुष्यभर सोबत ठेवायची नियत होती आणि हे सगळं बोलताना त्यांनी एक उर्दू शब्द वापरला "लबरे़ज" !तो उर्दू~ फारसी शब्द इतका आवडला की लगेच त्याचा शोध घेतला आणि अर्थ कळला की अगदी काठोकाठ म्हणजे ओतप्रोत!अहाहा काय सुंदर शब्द आहे.आणि त्याबरोबर येणारी भावना तर अगदी जवळची वाटणारी! आणि एक नवीन शब्द मनात आयुष्यभरासाठी आपला म्हणून, इतका प्रसन्नपणे दाखल झाला.
काही क्षण आपल्या आयुष्यात इतके भरभरुन येतात त्या क्षणांचं इतकं देखणं विशेषण, फार आवडलं.मुळात कुठल्याही स्वरूपातलं, गाणं ज्याला आवडतं त्याला हे अगदी सहजी कळेल.पंचमदांची गाणी ज्यांना आवडतात आणि ज्यांना त्यांची कलंदर वृत्ती आणि संगीत भावतं त्यांना नक्कीच लक्षात येईल गुलजारांना काय म्हणायचं आहे.त्यांच्या त्या अतरंगी, आवेगपूर्ण,ज्ञानी आणि प्रयोगशील अशा ,अतिशय सृजनात्मक काम केलेल्या मित्राबरोबरच्या क्षणांना ते लबरेज म्हणतात म्हणजे high moments.हे मला विलक्षण सुखावून गेलं.ही high moments कुठल्याही नशेविना आहेत.पंचमदांची गाणी आपण वारंवार ऐकली आहेत,त्यांच्याभोवतीचं एक अप्रतिम वलय अनेक वेळा अनेक लोकांनी समोर आणलं आहे पण तरीही ही छोटीशी मुलाखत फार आवडली. गुलजारजींचा मधाळ आवाज आणि त्याला जोड एका असीम कलावंताच्या साहचर्याची. खूप वेगळ्या उंचीवर घेऊन गेली ती मुलाखत!आणि एका गोष्टीचा शोध लागला की आपल्याही आयुष्यात असे क्षण आणि अशी माणसं येत असतात पण त्यांची नोंद आपण ठेवत नाही.
आपलं आयुष्य हे सामान्य माणसाचं असल्यानं अशा कोणाचा सहवास लाभला नाहीये हे खरं.पण म्हणून लबरे़जचा अनुभव घेतला नाहीये असं म्हणणं हे चुकीचं ठरेल.खूप सृजन अनुभव देणारं कोणी असेल असं नाही तरीही अशा काठोकाठ भरलेल्या क्षणांचा अनुभव आपल्याला नक्की आला असेलच असं मनानी घेतलं आणि शोध सुरु झाला. पाहता पाहता डोळ्यासमोर असे क्षण यायला लागले.खूप वर्षांपूर्वी एका गावाहून पुण्याला येताना एका सोमवारी अगदी पहाटे निघालो,आम्ही दोघंच होतो,घाट उतरायला सुरुवात केली आणि सूर्य उगवायची वेळ होती आणि रेडियोवर एक शिवसुप्रभातम स्तोत्र लागलं होतं,ते मी आधी कधीही ऐकलं नव्हतं,ते स्तोत्र संपेपर्यंत आम्ही एकमेकांशी अक्षरही बोललो नाही आणि सकाळची वेळ,गार शुचिर्भूत वातावरण आणि स्वर्गीय स्वरांचा खेळ ,जणू काहीतरी पवित्र आपल्याबरोबर प्रवास करत होतं! ते काही क्षण आम्ही अक्षरशः उत्कट अनुभवातून गेलो.आमची दोघांची आणि तिसऱ्या कोणाची तरी तार जुळली होती त्या क्षणांमध्ये!काहीतरी स्वर्गीय अनुभूती होती ती. आजवर त्या क्षणांमधून उतराई झालेलो नाहीये किंबहुना होण्याची इच्छा नाहीये.तसंच एकदा गगनबावड्याला कामानिमित्त गेलो,तिथं पावसानं नेहमीप्रमाणे धोपटलं, एकाएकी मनातून भीति वाटायला लागली,यातून घरी सुखरुप पोहोचू की नाही अशी भीति वाटत असतानाच एकदम चित्र बदललं आणि तो बदल इतका डोळ्यासमोर झाला की फ्रेम करुन मनात बसला.निसर्गाचं रौद्र आणि शांतवणारं रुप एकाच फ्रेममध्ये! श्रीवर्धनच्या समुद्रात भाची,तिचा नवरा आणि पुतण्या ह्यांच्या आग्रहानं जरा खोल पाण्यात गेले ,सगळे बरोबर होते आणि तो खोल पाण्यातला पण आश्वस्त अनुभव काही विलक्षण होता. मी कधी घेतला नव्हता असा , शांताबाई शेळके ह्यांच्या शब्दात पाण्याचा "नितळ झुळावा" प्रत्यक्ष अनुभवला.पुढे कितीतरी दिवस डोळे मिटले तरी ते लबरे़ज क्षण सोबत येत राहिले.
हे तर निसर्गाचं झालं पण काही माणसं आपल्या आयुष्यात परमेश्वर अशी धाडतो की एरवी त्यांचं आपल्या आयुष्यातलं प्रयोजन काय असा प्रश्न पडावा.माझी काही मित्र मैत्रिणी आणि सुहृद अशीच परमेश्वरी इच्छेनं माझ्या आयुष्यात आलेली आहेत, एरवी साम्य म्हणाल तर काही नाही पण जे धागे जुळले ते घट्ट विणले गेले.अशा सख्य असणाऱ्या माणसांबरोबर हसताना अचानक होणारा कातर सूर हे लबरे़ज ची निशाणी आहे.कधी कोणाशी तासंतास केलेली बातचीत,ऐकलेली एखादी मैफल,झपाटून वाचलेलं पुस्तक,एखाद्या संध्याकाळी संधीप्रकाशाचा खेळ बघताना येणारा शांततेचा अनुभव. आपल्याला श्रीमंत आणि समृद्ध करत जाणारे सगळे लबरे़ज क्षण!आनंदात डुंबत असतानाही आणि कधी अतीव दुःखाचा क्षणही ओतप्रोत असतो,त्या क्षणी आपण अगदी एकटेही असू शकतो पण तो क्षण काहीतरी सांगून जातो.. कधी कोणाच्या साथीनं हे काठोकाठ भरलेले क्षण आपण जगतो आणि कधी एकटे भोगतो.
पण हे "त्याचं" प्रयोजन असणार की असे काही क्षण किंवा माणसं आपल्या वाट्याला यावं की त्यावरून जीव ओवाळता येईल. असे क्षण धरुन ठेवता येत नाहीत, पण असे क्षण आणि त्या क्षणांची साक्षी असलेल्या व्यक्ती यांची मनात एक अमीट तसबीर तयार होते जी कधीतरी तुमच्यासमोर येते एक प्रसन्न हसू चेहऱ्यावर येतं किंवा एक आश्वस्त भावना येते.आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी हाती लागते. लबरे़ज क्षण आपल्याही आयुष्यात आहेत ह्याचा मला झाला तसा साक्षात्कार होतो आणि ह्या शब्दाच्या आणि त्यामागच्या असलेल्या ओतप्रोत, काठोकाठ भरलेल्या भावनेत आपल्याला आनंदी किंवा सुरक्षित वाटायला लागतं. पुढच्याही आयुष्यात असे क्षण येतील कदाचित,पण गुलजारजींच्यामुळे त्याच्याकडे मी अधिक डोळसपणे बघू शकेन आणि त्या परमशक्तीचा वरदहस्त मला जास्त चांगला जाणवू शकेल.आपोआप पदरात दान पडतं तसा हा इंद्रधनुष्य दाखवणारा शब्द माझ्या पदरात पडला आहे,मी त्याचा आणि त्याच्या अर्थाचा खूप आनंद घेणार आहे.
तुमचे आहेत का लबरे़ज लम्हें?
ज्येष्ठागौरी
प्रतिक्रिया
12 Sep 2020 - 10:32 pm | विजुभाऊ
आहा हा.
गगनबावड्याच्या घाटात एकदा संध्याकाळी उतरत असताना अचानक पायर्या पायर्या रचाव्यात तसे संह्याद्रीच्या राम्गा दिसल्या.
अक्षरश: अवाक झालो.
गाडी थांबवून अर्धा तास पहात राहिलो. त्या वेळेस आणि नंतरही बराच वेळ कोणीच बोलत नव्हते
13 Sep 2020 - 9:41 am | ज्येष्ठागौरी
धन्यवाद! असंच एकदम स्तब्ध व्हायला होतं
13 Sep 2020 - 10:06 am | चांदणे संदीप
असे काही शब्द मला खुणावत असतात. पण कविता काही एका शब्दावरून सुचत नसते. मग कधी योगायोगाने तो शब्द एखाद्या कवितेत बसत असला की अशी नशा येते की त्या नशेतून मला बाहेर यावसं वाटत नाही. असाच हा 'लबरेज' शब्द. बरेच दिवस खुणावत होता पण माझ्या कवितेला काही तो भेटत नव्हता. एक दिवस मग एका कवितेने त्याला हात धरून आणले आणि एका ओळीत बसवले. तोही पठ्ठ्या अगदी खूप जुन्या ओळखीतला असल्यासारखा बसलाच.
संपूर्ण कविता नाही पण एक लहानसा भाग देतो त्या कवितेचा. कदाचित तुमच्या लेखातल्यासारखा तो दिसत नसेल पण आहे चपखल. कदाचित तुम्हाला आवडेलही.
आशिक तो हूं मगर,
हूं इन्सानही
फितरत से लबरेज हूं
कोई नुक्स ना कहीं
निकल जाए, डरता हूं
अपनी तसवीर ना तोडो
रहने दो,
मेरे तसव्वुर मे जिस तरह हो
उसी तरह रहो
सं - दी - प
13 Sep 2020 - 2:10 pm | ज्येष्ठागौरी
वा क्या बात!