मी कालच हे पुस्तक वाचुन संपवले. याआधी मी सुहास शिरवळकर यांची दुनियादारी, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज व पडद्याआड ही पुस्तके वाचली आहेत. प्रामुख्याने कोर्ट रूम ड्रामा व रहस्यमयी कथा ह्या लेखनप्रकारात या लेखकाचा चांगलाच हातखंडा होता.
ह्या पुस्तकाबद्दल मला mx Player वरच्या "समांतर" नावाच्या सुहास शिरवळकरांच्याच पुस्तकापासुन प्रेरित होउन बनवलेल्या वेब सिरीज मुळे माहिती मिळाली.
समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण वाटते. या कथेचा नायक मुंबई मध्ये राहणारा एक तिशीतला मध्यमवर्गीय तरुण आहे. ज्याचे नाव आहे कुमार महाजन. त्याचे जीवन खूप संघर्षमयी आहे. तो एका छोट्याश्या कंपनी मध्ये काम करतो. घरी सोन्यासारखी बायको व मुलगा आहे पण त्यांना तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुख देण्यास असमर्थ आहे. एके दिवशी कुमार महाजन एका प्रसिद्ध स्वामींकडे भविष्य जाणून घ्यायाला जातो. (वास्तविक कुमार एक नास्तिक माणूस आहे पण त्याच्या एका शरद वाफगावकर नावाच्या मित्राच्या आग्रहाखातर तो स्वामींकडे जायला तयार होतो) स्वामी कुमारला सांगतात की त्याच्या हातावरच्या रेषा त्यांच्याकडे तीस वर्षांपूर्वी आलेल्या एका सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीच्या हाताच्या रेष्यांशी तंतोतंत जुळतायेत. पण ते त्याला भविष्य सांगायला नकार देतात जे त्यांनी सुदर्शन चक्रपाणीला सुध्दा सागितलेल नसतं. आणि इथूनच कहाणीला खरी सुरुवात होते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी घडायला सुरुवात होते. मध्यंतरी तो सुदर्शन चक्रपाणीचा शोध चालू करतो. शोध घेत असताना त्याला त्याच्या आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या समान गोष्टीबद्दल कळत. पुढे तो जेव्हा सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटतो तेव्हाही त्याला त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या व सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक समांतर गोष्टींचा उलगडा होतो. त्यानंतर कुमार ६० वर्षीय सुदर्शन चक्रपाणीच्या भुतकाळात घडून गेलेल्या घटना आपल्या भविष्यकाळात घडू नयेत म्हणून काळजी घ्यायला सुरुवात करतो. आता तो त्या गोष्टी टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावरच समजेल. पण मध्यंतरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते इथेच कथानकालापण कलाटणी मिळते. शेवटी ही कथा नायकाच्या भोवती फिरत राहते व त्याचा एक "अनपेक्षित" शेवट होतो.
कादंबरी वाचताना वाचकांना सुरवातीपासून शेवटपर्यंत कथेमध्ये गुंतवून ठेवण्यात वाचकाला प्रचंड यश मिळालंय. काही महत्वाच्या घटना कमी शब्दात पण रहस्यमयी रुपात सांगण्याची लेखकाची हातोटी प्रशंसनीय आहे. तुम्ही सर्वांनी ही १९६ पानांची कादंबरी वाचली नसल्यास एकदा नक्कीच वाचावी. धन्यवाद.
टिपः हा माझा मिसळपाव वर पहिलाच लेख आहे त्यामुळे काही चुकलं असल्यास सांभाळून घ्या व माझा हा लेख कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया स्वरूपात नक्की सांगा..
प्रतिक्रिया
7 Sep 2020 - 1:31 am | कानडाऊ योगेशु
किशोरवयात जेव्हा सुशिंचे गारूड होते तेव्हा ही कादंबरी वाचली होती व प्रचंड आवडली होती. पण नंतर शंना नवरेंच्या एका कथासंग्रहात ह्याच विषयावर असलेली एक कथा वाचली होती. तेव्हा गोंधळलो होतो. शंनांची ती कथा अजुन कुणी वाचली आहे का?
7 Sep 2020 - 8:35 am | ज्ञानोबाचे पैजार
सुशिंच्या अनेक भन्नाट कादंबर्यांपैकी एक. सहावी सातवीत असताना लायब्ररी मधून घेउन पहिल्यांदा वाचली होती. मग बरेच वेळा वाचली.
अत्रे सभागृचामधल्या एका प्रदर्शनात विकत घेतली. बरेच दिवस माझ्या संग्रहात होती. ती वेब सिरीज आली तेव्हा एक मित्र घेउन गेला ती अजून परत दिली नाही.
वेबसिरीज तितकीशी आवडली नाही. किंबहूना सगळे भाग पाहिलेच नाहीत.
पण कादंबरी मात्र नक्कीच वाचावी अशी आहे, एकदा हातात घेतली की खाली ठेवता येत नाही.
पैजारबुवा,
7 Sep 2020 - 8:40 am | प्रचेतस
सुशिंचे लेखन तसेच आहे, एकदा पुस्तक हाती घेतले की ठेवताच येत नाही, जबरदस्त.
7 Sep 2020 - 12:05 pm | शशिकांत ओक
याच कथानकाचा रंगमंचीय अवतार होता.
सांगायचे असे की ते नाटक नवी दिल्ली येथे साजरे होणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या नाट्य स्पर्धेत केले गेले होते.
यामधील मुख्य भूमिका, दिग्दर्शन त्यावेळेच्या स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक यांनी केले होते. महाराष्ट्र मंडळ जनकपुरी येथून ते स्पर्धेत सहभागी केले गेले होते. पारितोषिक वगैरे मिळाले नाही. पण एक मजेशीर गोष्ट होती त्याची नोंद बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या स्मरणिकेत केली गेली होती असे मला नंतर एकांकडून कळले तेंव्हा मजा वाटली!
7 Sep 2020 - 12:11 pm | चौथा कोनाडा
सुजित जाधव , मिपावर स्वागत !
लेख आणि लेखनशैली आवडली !
लिहित रहा, वाचकांना आनंद देत रहा !
7 Sep 2020 - 4:25 pm | सुजित जाधव
धन्यवाद...
7 Sep 2020 - 1:56 pm | कुमार१
मिपावर स्वागत !
छान परिचय
7 Sep 2020 - 4:27 pm | सुजित जाधव
धन्यवाद दादा
7 Sep 2020 - 2:51 pm | शा वि कु
वाचले नाही एकही पुस्तक सुशींचे.