- डॉ. सुधीर रा. देवरे
आधी देव का आधी माणूस? आज आपण जे देव भजतो ते सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत का? (आहेत असं आपण समजतो. माणसाला बुध्दी आहे. म्हणून तो पूजा, पाठ, विधी, कर्मकांड वगैरे करतो. मुक्या प्राण्यांना बुध्दी नाही, म्हणून ते देवाला भजत नाहीत, असंही आपलं प्रामाणिक मत असू शकतं. ) प्राण्यांसाठी विशिष्ट एखादा देव असेल तर तो कोणता? प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात? पूजा कशी करतात? प्राण्यांच्या देवांची मंदिरं कुठं असतात? समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल? वाघांचा देव वाघासारखा असावा का? (वाघदेव, नागदेव आहेत पण ते माणसांचे देव आहेत.)पक्ष्यांचा देव पक्ष्यासारखा दिसेल का? किटकांचा देव किटकांसारखा घडवला जाईल का? अशी चिकित्सा कोणी करत नाही. तसं असेल तर माणसाचा देव हा सुध्दा मंदिरातील मूर्तीत माणसासारखा घडवला जाईल. आज परंपरेने तो माणसासारखाच घडवला जातो.
माणूस ज्या देवाची पूजा करतो. माणूस ज्या देवाची मंदिरं बांधतो. ज्या मूर्तींची पूजा करतो, ते बहुतकरून माणसासारखे दिसतात. माणसासारखे वागतात. माणसासारखे असतात.(बहुतकरून म्हणण्याचं कारण हनुमान, गणपती, दत्तात्रेय आणि नरसिंहासह दशावतारातले काही देव अपवादात्मक.) देव एकतर पूर्णपणे पुरूषासारखा असतो वा स्त्री सारखा. याचाच अर्थ मनुष्य हा आपल्या देवाला आपल्याच बाह्य आकारात- रूपात पाहतो.
माणसाचे सर्वच देव काल्पनिक नाहीत. ते जन्माला येतात. माणसासारखे लहानाचे मोठे होतात. पृथ्वीवर आपल्या लिला दाखवतात. आपल्या कृतीतून जगात देव म्हणून सिध्द होतात. म्हणूनच माणसाचा देव हा मंदिरांतून- मूर्तीतून माणसासारखा दिसतो, नव्हे जन्माला येऊन मानवांसाठी महान कार्य करणार्या विशिष्ट माणसाला देवाचा अवतार ठरवून त्याच्या देहावसानानंतर त्याला देव म्हणून मंदिरांतून मंडीत करतात.
देवाची मूर्ती घडवताना त्याला दोन डोळे, दोन कान, दोन हात (काहींना जास्त हात असतात हा अपवाद. देवाला इतके हात असल्यामुळे तो सर्वसाधारण माणसापेक्षा मोठी कामं करू शकतो हे रूपक.), दोन पाय, दोन कान,एक नाक,चेहरा वगैरे माणसातला शिल्पकार सगळं माणसासारखं घडवतो. याचं कारण माणसाला आपला देव आपल्या रुपात भावतो.
श्रीकृष्ण,राम माणूस म्हणून जन्माला आले (श्रध्दा)आणि ते देव होऊन गेले. येशू ख्रिस्त माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. गौतम बुध्द माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. महावीर माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. गुरू नानक माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. महमद पैगंबर माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. शंकर, विष्णु, ब्रम्हा, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती अशा सगळ्याच देवतांबद्दल आपली श्रध्दा आहे, की ते काल्पनिक नाहीत. काल्पनिक असते तर आपण त्यांच्या लिला इतक्या माणसाळलेल्या शब्दांत रंगवल्या नसत्या. पोथ्या- पुराणातून त्यांच्या माणूसपणाचे ठसठसशीत (केवळ) शाब्दिक पुरावे लेखकांनी दिले आहेत. (आता अनेक टीव्ही मालिकांतून देव दृक-श्राव्यतेमुळे अजून जास्त प्रमाणात माणसाळले. पूर्वी फक्त काही चित्रपटांतून देव बोलायचे- दिसायचे. आता टीव्हीतून रोज दिसतात- बोलतात.) सगळे देव माणसांसारखे सहजपणे मोकळेपणाने आपल्या आसपास वावरतात.
पूर्वी होऊन गेलेल्या या थोर आणि महामानवांना आपण त्यांचा आदर्श घेण्यासाठी वाड्.मयातून चिरंजीव करुन ठेवलं आहे. म्हणजेच माणसाने देवत्वाला जन्म दिला. अशी ही मानवाची मानवाला देव करण्याची थोर परंपरा फक्त मानवात आहे. प्राण्यांमध्ये नाही. तीच पूर्वपरंपरा आजही आपण कायम ठेऊन अनेक महात्म्यांना देवपण देत त्यांना अजरामर करत आहोत. म्हणून या मानव नावाच्या चालत्या बोलत्या आणि वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या माणसाला वंदन करायला हवं. ही देवपण देण्याची दृष्टी मात्र डोळस असावी, सगुण असावी. (फक्त येता जाता मंदिरात जाण्याइतकी ढोबळ नसावी.) ‘घेता घेता एक दिवस’ आपल्याला देवाचं कर्म घेता आलं पाहिजे.
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 3-6-2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
1 Sep 2020 - 4:31 pm | सोत्रि
म्हणजे काय?
एकंदरीत लेखात काय म्हणयचे आहे ते काहीच समजलं नाही.
- (माणूस) सोकाजी
2 Sep 2020 - 11:27 am | डॉ. सुधीर राजार...
मला मांडता आलं नसेल कदाचित. धन्यवाद
1 Sep 2020 - 5:09 pm | शा वि कु
वॉटरशिप डाऊन नावाचं कादंबरी आहे, साश्यांची. त्यात साश्यांच्या देवाच्या गोष्टी आहेत. मस्त आहे. अर्थात ही कल्पना.
2 Sep 2020 - 11:29 am | डॉ. सुधीर राजार...
नवीन माहिती धन्यवाद
1 Sep 2020 - 7:44 pm | Rajesh188
पृथ्वी आणि पृथ्वी वर असलेल्या जीवसृष्टी मध्ये एक प्रकारचं परफेक्ट पना आहे.
प्रतेक साजिवाची,वनस्पती ची इथे काही तरी ठराविक भूमिका आहे हे निसर्ग चक्र चालवण्यासाठी.
ह्याचेच आश्चर्य माणसाला अनंत वर्षा पासून आहे.
किती ही शोध घेतले तरी प्रश्न काही संपत नाहीत.
कोणी तरी जुळवून आणल्या सारख्या सर्व घटना इथे घडत असतात.
आणि हेच माणसाला संभ्रमात टाकत आहे.
2 Sep 2020 - 11:28 am | डॉ. सुधीर राजार...
सहमत आहे. धन्यवाद
2 Sep 2020 - 11:29 am | डॉ. सुधीर राजार...
ब्लॉगची बदललेली लिंक: http://sudhirdeore29.blogspot.com/
2 Sep 2020 - 11:54 am | आनन्दा
बाकी सगळं ठीक आहे..
पण हे सगळे सगुण देव आहेत.
अन्य धर्माना सगुण भक्ती मान्य नाही, त्यांचे देव कुठून आले असावेत?
4 Sep 2020 - 12:18 pm | डॉ. सुधीर राजार...
हा सुध्दा एक प्रश्न आहे. धन्यवाद.
4 Sep 2020 - 2:21 pm | डॉ. सुधीर राजार...
काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत ब्लॉगवर टिप्पण्या प्रकाशित होत नव्हत्या. कोणी खूप वेळ देऊन लिहिलेली टिप्पणी नाहीशी होत असे. आता मात्र टिप्पण्या प्रकाशित होऊ लागल्या. वाचकांच्या माहितीसाठी. धन्यवाद.
ब्लॉगची बदललेली लिंक: http://sudhirdeore29.blogspot.com/