...ती बातमी वाचली आणि मला धक्का बसला.
कुणा शास्त्रज्ञानं उभी हयात घालवून तयार केलेल्या एका `मायक्रोक्लोन'चा फॉर्म्युला गायब झाला होता.
हा मायक्रोक्लोन हवेत विरघळून एखाद्याच्या श्वासावाटे शरीरात गेला, तर त्या मानवी शरीरातच दुसरा जीव तयार होणार होता...
सगळ्या जगाला धोक्याचा इशारा देणारी ती बातमी, माझ्या हातातल्या वर्तमानपत्राच्या डाव्या बाजूच्या पानावर, अगदी तळाला कुठल्यातरी कोपर्यात होती.
...ती वाचली, आणि माझा थरकाप झाला.
कोणता मायक्रोक्लोन असेल तो?...
त्याचा हवेत विरघळून माणसाच्या शरीरात प्रवेश करणारा हिस्सा जर माणसाच्या शरीरातच `घर' करणार असेल, तर असे किती जीव या मायक्रोक्लोनच्या हवेतल्या तरंगणार्या मायक्रोकणांच्या जाळ्यात सापडले असतील?...
समजा, त्या कणांनी माणसाच्या शरीरात प्रवेश करून नवा जीव माणसाच्या आत तयार झालाच, तर काय होईल?...
तो जीव काय करील?...
ज्या शरीरात तो तयार होईल, त्या शरीराचा ताबा घेण्याइतका तो शक्तिमान असेल?...
त्या मायक्रोक्लोनचे काय `गुण' असतील?
वेगवेगळ्या प्रश्नांनी घेरल्यामुळे मी आणखीनच चिंतातुर झालो.
अशीच बातमी जगाच्या मीडियाजालावर कुठे सापडते का ते शोधण्यासाठी मी `नेट' लावला...
सर्च इंजिनातून फिरताफिरता मला `क्लू' सापडला...
आणि मी `क्लिक' केलं...
आपण आपल्या घरे येणार्या वर्तमानपत्रात एका कोपर्यात वाचलेल्या त्या भयंकर बातमीनं, जगभर हलकल्लोळ माजवला होता, हे मला तेव्हा समजलं.
हा मायक्रोक्लोन हवेतून एखाद्याच्या शरीरात घुसला, तर तो मानवी देहाचा ताबा घेतो, आणि मग,...
तो माणूस `तो, त्याचा' राहात नाही...
असं काहीतरी त्या बातमीत होतं!
मग, हा बदललेला माणूस कसा असतो?
मी आणखी उत्सुकतेनं पुढे वाचू लागलो...
...आणि त्या दिवशी, चिंतूशी शेकहँड केल्यानंतर शरीरभर पसरलेलं, ते, लिबलिबीत, हिरवंकाळं, पुन्हा आतल्याआत घुसळतंय, असं मला व्हायला लागलं.
मी माऊस सोडून डोकं घट्ट पकडून बसलो...
नंतर हाताचं एक बोट नकळत नाकातही गेलं.
आणि, काळजीचं, चिंतेचं सावट माझ्या मनावर घट्ट दाटलं...
काय असेल हा मायक्रोक्लोनचा प्रकार?...
आपल्याला तर, सायन्सचं काडीचंही ज्ञान नाही...
मग आपण यात कशाला खोलात शिरतोय?
कुणी का असेना तो मायक्रोक्लोन, आपल्याला काय त्याचं?
... तरीही, माझे डोळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरून झरझर सरकत होते.
हा मायक्रोक्लोन कुठल्यातरी एक सूक्श्म जंतूचा असल्याचं पटकन कुठेतरी दिसलं, आणि माझी नजर तिथं खिळली...
... या जंतूच्या संसर्गानं, मन पोखरायला लागतं.
आपल्याशी काडीचंही देणंघेणं नसलेल्या विचारांचे जंतू डोक्यात पिंगा घालायला लागतात.
माझ्या मनात एकदम काहीतरी लक्कन चमकलं...
म्हणजे, हा `चिंतातुर जंतू'... मी मराठीत त्याचं नामकरणही करून टाकलम, आणि `युरेक्का'च्या थाटात पुन्हा स्क्रीनकडे बघितलं...
... पुढच्या ओळी, वेड्यावाकड्या होऊन माझ्या डोळ्यासमोर नाचतायत, असं मला वाटायला लागलं...
डोक्यात तेच नाव पिंगा घालायला लागलं.
चिंतातुर जंतू...
मी हादरलो होतो.
आता शरीरातलं ते हिरवंकाळं, लिबलिबीत जोरजोरात घुसळायला लागलं होतं...
चिंतातुर जंतू... चिंतू?...
मला एकदम चिंतूची आठवण झाली, आणि मी शहारलो...
मी डोळे मिटून घेतले.
आता आपली यतून सुटका नाही...
मी भानावर आलो, तेव्हा खूप दमल्यासारखं वाटत होतं...
पण ते हिरवंकाळं, लिबलिबीत, घुसळायचं थांबलं होतं.
म्हणजे, माझा पुन्हा चिंतू होऊन गेला होता...
... त्या दिवशी बागेत, चिंतूनं शेकहँड केला, तेव्हा ते हिरवंकाळं शरीरात गेल्यासारखं मला वाटलं होतं.
तो `चिंतूसंसर्ग' असला पाहिजे...
...चिंतातुर जंतूंचा संसर्ग!
मी काँप्युटर बंद केला.
त्याच दिवशी संध्याकाळी मी पुन्हा बागेत गेलो.
बर्याच दिवसांनंतर... चिंतूला शोधायला...
वेड्यासारखा कोपराकोपरा भटकलो... पण तो कुठेच दिसत नव्हता.
दमून मी एका सिंगल बाकड्यावर बसलो...
आसपासची गर्दी आपल्या गतीनं ट्रॅकवर चकरा मारत होती.
माझं तिकडे लक्ष नव्हतं.
केसात बोट घालून मी नाकाच्या शेंड्याकडे टक लावली होती...
तेव्हढ्यात, समोरच्या बाकड्यावर बसलेला माणूस माझ्याकडे बघून हसतोय, असं मला वाटलं.
मी त्याच्याकडे बघितलं, त्याचं हसणं थांबलं होतं.
थंडपणानं मी उठलो, आणि त्याच्यासमोर उभा राहून शेकहॅंडसाठी हात पुढे केला...
त्यानंही काही न बोलता हात पुढे केला.
मला आतल्याआत काहीतरी घुसळल्यासारखं झालं, आणि मी त्याचा हात सोडला...
तोही उठला, आणि निमूटपणे बागेबाहेर पडला...
मी त्या सिंगल बाकड्यावर बसून त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात होतो.
काय होणार आता त्याचं? मला काळजी वाटू लागली.
कोण असेल तो बिचारा?... कशाला केला आपण त्याला शेकहँड?... आता त्याचाही चिंतू होणार?...
चितातूर जंतू त्याच्याही शरीरात घुसळणार?...
मी जाम भेदरलो होतो.
काळजीनं, चिंतेनं माझं मन पोखरून चाललं होतं...
मी गदागदा मान हलवली, आणि उठलो...
घरी आलो.
दुसर्या दिवशी पुन्हा बागेत जायचं ठरवलं.
ठरल्याप्रमाणं दुसर्या दिवशी संध्याकाळी बागेत गेलो.
कालचा तो माणूस आधीच त्या सिंगल बाकड्यावर येऊन बसला होता.
..हातात एक वर्तमानपत्र होतं.
कुठल्यातरी एका बातमीवर त्याची नजर खिळली होती.
मी समोर येताच, त्यानं माझ्याकडे बघितलं...
पुन्हा आतल्याआत `ते' घुसळलं...
`कसं होणार या देशाचं?'... एका बातमीवर बोट ठेवत चिंतातुर स्वरात तो बोलला, आणि मी मान हलवून काळजीत बुडालो...
समोरच्या बाकड्यावर एकजण आमच्याकडे बघून चेष्टेनं हसत होता...
सिंगल बाकड्यावर बसलेल्या त्यानं हातातलं वर्तमानपत्र माझ्या हातात दिलं, आणि तो उठला...
शांतपणे चालत त्या माणसासमोर उभा राहिला.
त्या माणसाचं हसणं थांबलं होतं.
मी वर्तमानपत्र वाचत होतो...
खरंच, कसं होणार देशाचं?... मी काळजीत पडलो.
सहज वर बघितलं.
समोरच्या बाकड्यावर बसलेल्याशी `तो' शेकहॅंड' करत होता...
मी हसलो.
काय होणार आता त्याचं.
एक नवा जंतुसंसर्ग... चिंतूच्या जंतूंचं हे मायक्रोक्लोन आणखी किती जणांना ग्रासणार?...
मी चिंतातुर झालो होतो...
htpp://zulelal.blogspot.com
प्रतिक्रिया
23 Nov 2008 - 10:04 am | प्राजु
थोडूशी गूढ कथा वाटली सुरूवातीला. पण नंतर मजा आली.
एका वेगळ्याच प्रकारची आहे ही कथा. बाय द वे.. बाकी सगळ्यांनी म्हणजे 'चिंतू' ने ग्रासलेल्यांनी अशाच कथा लिहिल्या का? ;) ह. घ्या.
कथा आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Nov 2008 - 10:09 am | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जबरा !
ह्या आम्ही टक्कुर्यातील किडे म्हणतो... ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ