का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही
त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
22 Nov 2008 - 2:50 pm | निखिलराव
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
वा वा वा वा...
22 Nov 2008 - 4:31 pm | दत्ता काळे
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
. . . फार आवडलं
22 Nov 2008 - 5:37 pm | विसोबा खेचर
वा! गझल छान आहे हो..
तात्या.
22 Nov 2008 - 6:05 pm | विसुनाना
सर्व शेरांतल्या कल्पना आवडल्या. एकूण गझल आवडली.
गझल अजून गोळीबंद करता आली असती असे वाटले.
नाही/ नाहीत हा भेद सूक्ष्म आहे.
अनेकवचनी कर्त्याला 'नाही' ऐवजी 'नाहीत' असे वापरावे लागेल असे वाटते. जाणकारांनी मत द्यावे.
उदा.
का घाव तू दिलेले भरले कधीच नाहीत?
किंवा
का घाव तू दिलेला भरला कधीच नाही
अशा रितीने.
चु.भू.द्या.घ्या.
22 Nov 2008 - 6:35 pm | शितल
जयवी ताई,
सुंदर ग़झल केली आहे.
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
हे खासच .
:)
22 Nov 2008 - 10:58 pm | प्राजु
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
हे शेर तर अत्युच्च.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Nov 2008 - 12:33 pm | जयवी
निखिलभाऊ, बाळकराम, तात्या, शितल, प्राजु...... तहे दिल से शुक्रिया :)
विसुनाना..... नाही आणि नाहीत मधला फरक जाणवतोय. तुमच्या या टीप्स नक्की लक्षात ठेवेन. असंच मार्गदर्शन असावं शिष्याला :)
24 Nov 2008 - 10:50 am | विसुनाना
हे काय? छे! छे! गुरु-शिष्य वगैरे नाही हो. केवळ एक समकालीन वाचक म्हणून काय वाटले ते लिहिले.
आगंतुकपणाबद्दल माफी असावी.
24 Nov 2008 - 1:03 pm | जयवी
विसुनाना..... आगंतुकपणा..... कमाल आहे तुमची. अहो अशा सूचनांमुळेच तर शिकायला मिळतं.
24 Nov 2008 - 4:54 am | सुवर्णमयी
क्या बात है!
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
हा विशेष आवडला.
24 Nov 2008 - 6:33 am | मनीषा
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही ...सुंदर!!!
24 Nov 2008 - 7:36 am | मदनबाण
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
व्वा..जबरदस्त..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
24 Nov 2008 - 1:04 pm | जयवी
सुवर्णमयी, मनीषा, मदनबाण..... तुमच्या अभिप्रायामुळे हुरुप वाढला :)
24 Nov 2008 - 8:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
ओहो, क्या बात है !!!