आज सकाळी अक्षय अन सैफचं मैं खिलाडी तू अनारी गाणं सुरु होतं. काही आवाज, काही ओळखीचे वास डायरेक्ट भूतकाळात घेऊन जातात. तसं हे गाणं मला अंबापेठेत घेऊन गेलं.
अंबापेठ ! म्हणजे माझं आजोळ. अमरावतीच्या मध्यवर्ती भागात असलेली सगळ्यात जुनी वस्ती ! अंबापेठेचं आयुष्यातलं स्थान लिहिण्याजोगती प्रतिभा माझ्यात कधी येईल का ते माहिती नाही, पण आज त्यातल्या एका भागावर लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
अंबापेठेत पाहिलेल्या किंबहुना पाहायला मिळालेल्या सिनेमांची मोठी यादी तयार करता येईल. त्याकाळात आमिर, सलमान, शाहरुख ह्यांची चलती होती. तिघांचीही सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरु होती. अनिल कपूर, ऋषी कपूर ह्यांचा थोडाबहुत पडता काळ सुरु झाला होता तरीपण १९४२ ए लव्ह स्टोरी, बोल राधा बोल वगैरे सिनेमातून त्यांचं नाणं खणखणीत वाजत होतंच. आणि हे पाच-सहा लोकं सोडले तर इंडस्ट्रीत आदित्य पांचोली, राहुल रॉयपासून ते अक्षय कुमार, अजय देवगणपर्यंत असे बरेच लोकं होते ज्यांचे सिनेमे चालायचे किंवा पडायचे. पण ह्यांचा अमुक एक सिनेमा बघितला आणि आवडला असं चार चौघात सांगता येत नसे. ह्यांचे सिनेमे थेयटरमध्ये जाऊन बघण्याची आमच्यात पद्धतच नव्हती. थिएटरमध्ये हम है राही प्यार के, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे वगैरे बघायचे असतात. मोहरा, खिलाडी, दिलवाले कभी ना हारे हे सिनेमे बघायचेच नसतात अशी माझी एक समजूत होती. आता ह्याच्यामागे एक अर्थकारण सुद्धा होतं. आलेला प्रत्येक सिनेमा पोरांना दाखवणं हे कोणत्याच मध्यमवर्गीय पालकांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे सिनेमे दाखवायचे ते एकदम सो कॉल्ड प्रीमियम कॅटेगिरीतलेच असा विचार असायचा. मग बलवान, वक्त हमारा है, मैं खिलाडी तू अनाडी हे सिनेमे थोडे कनिष्ठ मध्यमवर्गीय प्रीमियम कॅटेगिरीत यायचे.
मग हे सिनेमे बघायला मिळाले कुठे? तर अंबापेठेत !!
आजोबांचा दिवस सकाळी रेडियोवर भीमण्णांच्या भूपाळीपासून सुरु व्हायचा. अन आम्ही चिल्लेपिल्ले त्यांचं पाणी वगैरे भरून झालं की उठायचो. मग नुसता गोंगाट ! दुपारी शांत झोपणं वगैरे प्रकार माहितीच नव्हते. मग आजोबा केबल टीव्हीवर आम्हाला एखादा सिनेमा लावून देऊन स्वतः वामकुक्षी करायचे.
तिथं बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे राहुल रॉयचा जुनून ! (कदाचित दुसरा असू शकेल पण आत्ता हाच आठवतोय)
तो राहुल रॉय पौर्णिमेच्या रात्री वाघ वगैरे बनतो अशी काहीतरी स्टोरी होती. आता एखाद्याला वाघ बनवायचं आहे तर राहुल रॉय ही काय चॉईस म्हणायची का? राष्ट्रीय प्राण्याला ट्रीट करण्याची ही काय पद्धत झाली ! पण ते वाघ वगैरे होण्याचं चित्रण जबरदस्त होतं बरं का. भीती वाटायची त्यावेळेला. पण मी एकटाच का घाबरू? म्हणून गणिताचा मास्तर पौर्णिमेला कोल्हा बनतो अशी एक अफवा मी शाळेत उठवली होती. (अफवांच्या विश्वात ही आजही अनबिटेबल आहे !)
मग सैफचा पहिला सिनेमा 'आशिक आवारा' बघितल्याचं आठवतंय. शर्मिला टागोर अन नवाब पतौडींचा हा मुलगा. रूप तेरा मस्ताना-प्यार मेरा दिवाना हे शर्मिलाजींचं गाजलेलं गाणं ! आणि नवाब पतौडींचा एक डोळा कृत्रिम होता असं म्हणतात. त्यावरून सैफचा एक डोळा बकरीचा आहे अशी एक अफवा उठली होती.(आईशप्पथ ! ही अफवा माझी नाही.) आणि यावरूनच सैफला हिणवायला, रूप तुला नसताना-बकरीचा डोळा असताना-शान कशाला मारतो रे गाढवा! असं एक गाणं म्हटल्या जायचं. (ही रचनासुद्धा माझी नाही). पण काही असो, सैफ मला तेंव्हापासूनच आवडायचा. आशिक आवरा, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, तू चोर मैं सिपाही असे त्याचे बरेच सिनेमे मी अंबापेठेत बघितले.
अक्षयने अंडरटेकरला उचललेलं याची देही याची डोळा त्या छोट्या पडद्यावरच बघितलं. जादूगर, इन्सानियत हे शूटिंग झाल्यावर परत अमिताभनेही कधी बघितले नसतील असे सिनेमे अंबापेठेत बघताना खूप मजा यायची.
गोविंदाचा आँखे सुद्धा तिथंच बघितलाय. संजय दत्तचे इनाम दस हजार, सडक, गुमराह,साजन, सुनील शेट्टीचे बलवान, गोपी किशन, टक्कर, अक्षयचे सपूत, खिलाडी सिरीजचे जवळपास सगळेच सिनेमे जर अंबापेठ नसतं तर कदाचित कधीच बघितले नसते. तिथं सिनेमे बघण्याचा एक तोटासुद्धा होता. आजोबांना मारधाड फारशी आवडत नव्हती. त्यामुळे आजोबा जागे व्हायच्या आधी सिनेमा संपलेला बरा असायचा. नाहीतर शेवटची फायटिंग सुरु झाली की आजोबा टीव्ही बंद करायचे. बऱ्याच सिनेमांचा शेवट बघायचा राहिला तो राहिलाच. सिनेमात थोडे इंटेन्स प्रसंग सुरु झाले की बरोब्बर तेंव्हाच आजोबांना कशीकाय जाग यायची हे एक कोडंच आहे. उठल्या उठल्या पहिले टीव्ही बंद !
अंबापेठेचा फायदा आमच्या आई बाबांनाही भरपूर झालाय.अंबापेठेच्या घराजवळच एक थिएटर होतं. त्यामुळे हक्काची पार्किंगची जागा उपलब्ध होती. पण आई बाबा तिथं स्कुटरसोबतच लेकरांनाही पार्क करून जायचे. माझ्यासाठी सिनेमा की आज्जी ह्यातली नैसर्गिक चॉईस आज्जीच असायची. आणि 'एका तिकिटाचे पैसे' हे अर्थकारणसुद्धा होतंच. आणि त्याहीपेक्षा सिनेमा बघताना एका लेकराची कटकट नसणं हे जास्त सुखावह होतं.
अंबापेठेत एका खोलीत लहान मामा राहायचा.तिथल्या लाकडी खिडकीत काचेच्या फ्रेम बसवल्या होत्या. त्यातील एका खिडकीमध्ये शशी कपूरच्या "सवाल" सिनेमाचं पोस्टर चिपकवलं होतं. तासोनतास आम्ही त्या पोस्टरकडे बघत राहायचो. उगाचच! तिथं त्या पोस्टरचं काय प्रयोजन होतं हा एक सवालच आहे.
असो.
अंबापेठ अजूनही आहे. पण ते घर पाडून आता नवीन घर उभारलंय. मोठा टीव्हीसुद्धा आहे.
आता आजोबा नाहीत...आजी खूप थकलीये..
पूर्वीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा मोठे होऊन उगाचच फार शहाणे झाल्यागत वागतोय..
चालायचंच... सिनेमातरी कुठं पहिलेसारखा राहिलाय !!
-- समाप्त
-चिनार
प्रतिक्रिया
11 Aug 2020 - 10:35 am | स्वलेकर
छान लिहिलय. रम्य त्या आठवणी
11 Aug 2020 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
सिनेमांच्या नावाची नुसती यादी बघुन सुद्धा गहिवरुन आले.
पैजारबुवा,
11 Aug 2020 - 1:41 pm | चांदणे संदीप
त्या काळाचा महिमाच अगाध होता.
साधारण त्याच सुमाराला आमच्याकडे टीव्ही आणि केबल कनेक्शनही आले होते. त्यावेळेला, माझा मामेभाऊ कामानिमीत्त आमच्याकडे दोनेक महिने राहण्यासाठी आला होता तेव्हा तो प्रत्येक पिक्चरला, हा बघितलाय, ह्याच्यात लै फायटिंग आहे, हा बोर आहे वगैरे सांगायचा. त्यावेळी आम्हाला त्याचा भरभरून आदर वाटायचा.
चिनारभौंच लेखन नेहमीप्रमाणेच वाचनीय.
सं - दी - प
11 Aug 2020 - 7:19 pm | चिनार
तुमच्यापासून काय लपलंय माऊली..
आयुष्यात अभ्यास केला तो हिकडंच..
बाकी तर अंधारच आहे!
11 Aug 2020 - 3:25 pm | सिरुसेरि
मस्त आठवणी . अजय देवगणचे हकीकत , ईतिहास , जान , जिगर , सुहाग , कच्चे धागे , चिरंजीवीचे प्रतिबंध , आज का गुंडाराज , फिरोज खानचे यल्गार , कुर्बानी हे पिच्चरही याच पठडीतले .
11 Aug 2020 - 3:41 pm | चलत मुसाफिर
मीही या सर्व सिनेमांच्या आठवणी जपून आहे. इतकेच की माझ्या आठवणी औरंगाबादच्या आहेत. कॉलेज बुडवून पाहिलेल्या सिनेमांच्या.
नाना पाटेकर- राजकुमारचा 'तिरंगा' येऊ घातला होता. त्याचा फसडेफसशो पहायचा बेत करून आम्ही शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कॉलेजला टांग मारून रॉक्सीला पोचलो. पहातो ते काय, त्या सिनेमाचा पहिला शोच मुळी तीन वाजता होता. आता आली का पंचाईत! पुन्हा वळून कॉलेजला जाणे जिवावर आले होते.
हार न मानता आम्ही आमचा मोर्चा जवळच असलेल्या सादिया थेटरकडे वळवला आणि बाराच्या खेळाची 'हिना'ची तिकिटे काढली. वास्तविक 'हिना' मी अगोदर (तोही सादियालाच!) पाहिलेला होता. पण कॉलेजला परतण्यापेक्षा सर्वांसोबत तो पुन्हा पहाणे बरे असे वाटले.
तीन तास 'हिना' सोसला. मी सोडाच, पहिल्यांदा पहाणारे दोस्तही पार पकले होते. शेवटी ऋषी कपूरने भारत-पाक सीमेवर उभे राहून आपले पल्लेदार भाषण सुरू करताच आम्ही 'हिना'ला फाट्यावर मारून सटकलो आणि 'तिरंगा'च्या सेन्सॉर सर्टफिकेटला बरोब्बर पोचलो (तिकिटे सकाळीच काढून ठेवली होती).
संध्याकाळी परतीचे पेडल मारताना वाटत होते की आमचे डोळे सलग सहा तास सिनेमे पाहून नक्कीच टरबुजाएवढे झाले असणार.
13 Aug 2020 - 11:37 am | मोहन
जुन्या आठवणी जाग्या केल्या चिनार तुम्ही. १ली ते ११वी पर्यंत माझे बालपण आणि किशोरावस्ता अंबापेठ , अमरावती या पत्त्यावर गेली.