आठवणी..

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
8 Aug 2020 - 8:00 pm

उगवत्या आणी मावळत्या सुर्याच्या वेळा वेगवेगळ्या भाव भावनांचे प्रतिनिधित्व करतात हे समजायचं ते वय नव्हतं.

सकाळी उत्साहात उठून शाळेच्या गडबडीत असलेला मी जेंव्हा घरासमोरच्या अंगणात आजोबांच्या देवपुजेसाठी फुलं तोडायला जायचो ,झाडांच्या गर्दितुन पुर्वेकडे उगवलेल्या सुर्याची किरणं पाणी तापवायच्या बंबातुन निघालेला धुर कापत अंगणात यायची.त्या किरणांच्या फांद्यांमधुन डोकावणार्या सरळ रेषा अस्ताव्यस्त पसरलेल्या धुराला एका मर्यादेत आखताहेत असं वाटायचं.

तो धुराचा आणी किरणांचा खेळ बघत घाईघाईने फुलं गोळा करुन देउन मी घरामागच्या भिंतीवरुन उडी मारत शाळेत जात असे. बारा वाजता शाळा सुटली की जेवण करुन शिकवणी आणी नंतर हुंदडणे हाच एक दिनक्रम असायचा.

खेळण्या भटकण्यात दिवस छान जात असे.पण संध्याकाळी मावळतीच्या वेळेस का कुणास ठाउक उगाचच उदास वाटु लागे.वर्हंड्यातुन डोंगरा आड जाताना दिसणारा तांबडा भडक सुर्यगोल , गदगदुन येणारी कातर वेळ, अस्वस्थता सगळंच विचीत्र.

आजी ,काका विचारत असंत 'काय होतय ? ' .पण काही सांगायला गेलो तर ओठ थरथरु लागत ,रडु येइल या भितीने मी आवंढा गिळत गप्प रहात असे.तसं कारण त्यांनाही माहित होतं .त्या वयात आईची आठवण येणे हे खुप नॕचरल फिलींग होतं.दिवसभराच्या गडबडीत लक्षात न येणारी ती भावना नेमकी मावळत्या सुर्याची साक्षच का गृहित धरते हे कोडं अजुनही सुटलेलं नाही.बहुतेक म्हणुनच त्यावेळेला कातरवेळ असं नाव असावं .

लिहितानाही कातर झालोय

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

रातराणी's picture

9 Aug 2020 - 1:57 am | रातराणी

:(

सत्य धर्म's picture

10 Aug 2020 - 2:08 pm | सत्य धर्म

छान

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त लिहिलंय !
मी देखील अशी कातरवेळ बालपणी कित्येकदा अनुभवलीय !
या लेखामुळे त्याचा पुनःप्रत्यय आला.
कृत्रीम प्रकाशाचा सुळसुळाट तेव्हा झाला नव्हता, परिसरात वृक्ष देखील बरेच असायचे,
परतीच्या पक्षांच्या किलबिलाटात अंधुरकी दिशा एक अनामिक भीती निर्माण करायची मनात !
आता शहरात संध्याकाळ कधी झाली तेच कळत नाही. कातरवेळेचा अनुभव क्वचित येतो !
कधी सुर्य उगवतो आणि कधी मावळतो याचे भानच नाही राहिलेले !

लेखन आवडले ! आणखी असे लेखन वाचायला आवडेल !

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2020 - 9:39 pm | कानडाऊ योगेशु

भावनिक करणारं लिखाण आहे पण फारच त्रोटक लिहिले आहे. आजी/आजोबा/काका ह्यांचे उल्लेख आले आहेत आणि आईची आठवण येते असा उल्लेख आहे. संदर्भ कसा लावायचा? तुम्हीच स्पष्टीकरण दिले तर उलगडा होईल.

प्रमोद पानसे's picture

13 Aug 2020 - 3:09 pm | प्रमोद पानसे

कोल्ड्रींक टाकून व्हिस्कीची चव जाते.......