... And a forward shortleg

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
16 Jul 2020 - 9:44 pm

आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे. हातात सोट्यासारखी बॅट घेतलेले तडाखेबंद फलंदाज खेळत असताना तिथे फील्डिंग करणं येड्यागबाळ्याचं कामच नाही! खरंतर इथे नॉर्मल माणसांचंच काम नाही - इथे गबाळा नसला तरी येडाच पाहिजे!

एक तर Forward Shortleg ला फील्डिंग करायला बॅट्समनपासून हातभर अंतरावर उभं राहावं लागतं. विकेटकीपर अगदी स्टंप्सच्या मागे उभा राहिला तरी बॉल अगदी बोलरच्या हातात असल्यापासून दिसत असतो. समोरून बॉल येत असल्यामुळे कीपरला त्या बॉलचा वेग, टप्पा, त्याची दिशा, स्विंग किंवा स्पिन ह्याचा अंदाज घेणं बर्‍यापैकी सोपं असतं. पण Forward Shortleg चा फील्डर बॅट्समन आणि बोलरच्या आणि पर्यायानी बॉलच्या दिशेच्या काटकोनात असतो. त्याला तिसर्‍या मितीचा (डेप्थचा) अंदाज नसल्याने बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर पडलाय की स्टंपात ह्याचा अंदाज येणं जवळ जवळ अशक्य असतं. त्यामुळे त्याला मिळणारा reaction time फार फार कमी असतो. पुन्हा बॉल त्याच्याकडे आलाच तर नक्की कुठल्या दिशेने आणि किती वेगाने ते ही सांगता येत नाही. बॅट-पॅड असेल तर बॅट्स्मनच्या पायाशी लोटांगण घालावं लागतं किंवा एखाद्याचा सणसणीत पुल किंवा स्वीप डोकं सुद्धा फोडू शकतो. रमण लांबासारख्या दर्जेदार खेळाडूला ह्या पोझिशनवर आपला जीव गमवावा लागला ह्यातूनच त्या जागी असलेल्या धोक्याची कल्पना येते.

SL1FSL2FSL3

अशी १७६० लफडी असताना बहुधा संघातल्या नवख्या बॅट्समनला बळीचा बकरा बनवलं जातं ह्यात आश्चर्य ते काय? एरवी कोण राजी-खुषीने आणि अक्कलहुशारीने त्या आगीत उडी मारेल? जीव धोक्यात घालून कॅच पकडायला थांबायची कामं करणार कोण?

पण फॉरवर्ड शॉर्टलेगला आपला ठसा उमटवणारे वीर-बहाद्दर देखील होतेच की. बॅट्समनची बॅट पुल किंवा स्वीपसाठी कितीही जोरात फिरली तरी डोळ्याची पापणी न मिटणारे, इतक्या धोकादायक पोझिशनला देखील थंड डोक्याने, शांत चित्ताने, पाय रोवून उभे राहाणारे धुरंधर निपजतातच की. इतर कुठल्याही पोझिशनला फिल्डिंग करण शिकता येतं, पण फॉरवर्ड शॉर्टलेगला स्वतःहोऊन फील्डिंग करणारा फील्डर जन्मावा लागतो.

इथे नियमितपणे फील्डिंग करणारा प्राणी साधा सरळ मनुष्यप्राणी असून चालत नाही. तो composite लागतो. चित्त्याची चपळता, बगळ्याची एकाग्रता, वाघाचा संयम, गरुडाची नजर, मांजरीचं संतुलन, वटवाघळाचे पंजे आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे - सिंहाचं काळीज. आणि त्यात जर माकडाची टवाळी असेल तर तो बोनस!

काही खेळियांनी ही फील्डिंग पोझिशन अजरामर केली. ह्या निडर क्षेत्ररक्षकांचा मेरुमणि म्हणजे एकनाथ धोंडू सोलकर. जुने जाणते क्लासिकलवाले जसे आपल्या गुरुजनांचं नाव घेताना कान चिमटीत पकडतात तसं अझरपासून रविंद्र जडेजापर्यंत लोकांनी सोलकरचं नाव घेताना आपले कान पकडले पाहिजेत. एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता. एकी नुसता निर्भय नव्हता तर अचाट anticipation आणि अफाट निरीक्षणशक्ती असलेला क्षेत्ररक्षक होता. असं म्हणातात की तो बॅट्समनच्या फूटवर्कवरून त्याच्या फटक्याचा अंदाज बांधायचा. त्याची नजर कायम बॉलवर असायची आणि म्हणूनच हेल्मेट किंवा कुठलीही संरक्षक साधनं न वापरण्याच्या काळात देखील त्याला एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वेळासुद्धा बॉल लागला नसेल.

ES1ES2ES3ES4

१९७१ मध्ये अ‍ॅलन नॉटने त्याला बाद करताना एकीने घेतलेल्या कॅचवर खुष होऊन त्याला आपली बॅट भेट दिल्याचीही कथा आहे आणि एकदा बॅट्समनने मारलेला पुल सोलकरच्या डोक्याला लागून मिडऑफला उभ्या असलेल्या प्रसन्नाने झेलल्याचीही. बॅट्समन पुल किंवा स्वीप करताना देखील एकी आपले पंजे चेहर्‍यासमोर ठेऊन चेहरा वाचवायचा पण बॉलवरची नजर कधी काढायचा नाही. आणि म्हणूनच चंद्रा - बेदी - प्रसन्ना - वेंकटराघवन च्या चौकडीच्या यशात एकनाथ सोलकरचाही मोठा वाटा होता. केवळ २७ टेस्ट्समध्ये घेतलेले ५३ झेल हे प्रमाण अजूनपर्यंत कोणी नॉन - विकेटकीपर गाठू शकलेला नाही. त्याला शेक्सपिअर ऑफ शॉर्ट-लेग किंवा बीथोवेन ऑफ बॅट-पॅड्स म्हणायचे ते उगाच नाही!

पुढे हेल्मेट्स आली, शिन-गार्डस, चेस्ट-गार्ड्स आली आणि फील्डर्सना त्या जागी फील्डिंग करण्यासाठी हिंमत यायला लागली. पण तरीही कारकीर्दीच्या शिखरावर फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहणारे लोक विरळाच. ब्रायन क्लोज, टोनी लॉक, डेव्हिड बून, विंडीजचा गस लोगी, राहुल द्रविड, किंवा आताचे कुसल मेंडिस आणि चेतेश्वर ह्यांनी फॉरवर्ड शॉर्टलेगला कितीतरी अप्रतीम कॅचेस घेतलेले आहेत.

C1C2C3

क्रिकेट हा नुसता मैदानी खेळ नाही. बोलरनी बॉल टाकला - बॅट्समननी मारला - बॅट्समन चुकला आणि आऊट झाला इतका सरळ हिशोब इथे नाही. एका वेळी शरीर, बुद्धी आणि मन ह्या तिन्हीचा कस बघणारा हा खेळ आहे. कसोटी क्रिकेटमधे तर मैदानावर बुद्धिबळाचा डावही मांडलेला असतो आणि इंटरव्ह्यूची खुर्ची सुद्धा! बोलर सतत प्रश्न विचारत असतो आणि त्यात फॉरवर्ड शॉर्टलेगला तगडा फील्डर असेल तर कसलेल्या बॅटसमनलादेखील घाम फुटतो. तिथे उभा असलेला खंदा फील्डर नुसत्या त्याच्या अस्तित्वानी बॅट्समनवर प्रचंड दबाव टाकू शकतो हाच त्या जागेचा महिमा!

बॅट्समनला बाद करायला जाळं लावणारा बोलर असेल - पण त्या जाळ्यात बॅट्समनला ओढणारा अस्सल शिकारी असतो फॉरवर्ड शॉर्टलेग! बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!

जे. पी. मॉर्गन

क्रीडाप्रकटनसद्भावनासमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

17 Jul 2020 - 12:02 am | विजुभाऊ

मॉझ्र्गन साहेब. लेख नेहमीसारखाच झक्क झालाय . पण फारच थोडक्यात आटोपलाय.

सोत्रि's picture

17 Jul 2020 - 6:36 am | सोत्रि

एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता.

बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!

हे असले स्क्वेअर कट्स जेप्याचा फॅन असण्याची कारणं आहेत!!

- (जेप्याचा पन्खा) सोकजी

ऋतुराज चित्रे's picture

17 Jul 2020 - 9:08 am | ऋतुराज चित्रे

छान लेख.
फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर उभा असल्यास फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करायलाही भीती वाटायची. सिली पॉईंटला अबिद अली आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर फलंदाजाला जखडून टाकायचे.
वेस्ट इंडिजविरुद्ध १९७५ च्या मुंबई कसोटीत सोलकरने त्याच्या कसोटी कारकिर्तीतील एकमेव शतक झळकावले होते, ती खेळी तेव्हा दूरदर्शनवर बघितली होती.

महासंग्राम's picture

17 Jul 2020 - 2:16 pm | महासंग्राम

एकदम वंटास लेख बोले तो एकदम कडक

कपिलमुनी's picture

17 Jul 2020 - 2:22 pm | कपिलमुनी

लेख आवडला

तुषार काळभोर's picture

18 Jul 2020 - 8:12 am | तुषार काळभोर

फॉरवर्ड शॉर्टलेग ही तशी नॉन-ग्लॅमरस जागा. तिथे कोणी स्टार उभा राहत नाही. शक्यतो पदार्पण करणार्‍यांसाठी राखीव. त्यातही भारताकडून बर्‍याचदा ओपनरला तिथं उभं राहिलेलं पाहिलंय.
(कदाचित २००० च्या दशकात सेहवाग-द्रविड-तेंडूलकर-गांगुली-लक्ष्मण या जागा फिक्स असल्याने फक्त दुसरा ओपनर बदलत राहायचा आणि तो या जागेवर यायचा.)
त्यामुळे तिथं एस. रमेश, आकाश चोप्रा, कैफ, गंभीर, शिखर धवन, सध्या पुजारा, राहूल, यांना पाहिलेलं आहे. अगदी क्वचित गांगुली, युवराज यांना पाहिलंय. द्रविडने नेहमीप्रमाणे जेव्हा कुणी नसेल तेव्हा 'कमी तिथे आम्ही' या त्याच्या धर्माला जागून तिथे क्षेत्ररक्षण केलंय.

पण कुणी का असेना, तिथं कॅच सुटल्यावर शिव्या नाही देता येत. पण जर कॅच पकडला तर तो अफलातूनच असतो.

गामा पैलवान's picture

18 Jul 2020 - 2:05 pm | गामा पैलवान

जे.पी.मॉर्गन,

लेख झकास जमलाय. या जागेविषयी अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे असं दिसतंय. त्यामुळेच की काय लेख लहानखुरा वाटतो.

या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतांना जलद आणि मंद गोलंदाजांच्या समोर वेगळ्या प्रकारचे डावपेच अंमलात आणावे लागंत असावेत. यावर विवेचन अपेक्षित होतं. जमल्यास नक्की लिहा. :-)

आ.न.,
-गा.पै.

अवांतर : आम्ही टवाळखोर लोकांनी आमच्या लहानपणी फॉरवर्ड शॉर्ट लेग याची संज्ञोत्पत्ती शोधली होती. इथे क्षेत्ररक्षण करतांना आपला पुढचा छोटा पाय सतत सांभाळावा लागतो. म्हणून याला इंग्रजीत फॉरवर्ड शॉर्ट लेग म्हणतात. खरंतर ही मराठी संज्ञा आहे.

सामान्यनागरिक's picture

18 Jul 2020 - 2:54 pm | सामान्यनागरिक

आम्ही शाळेत असतांना मॅण्ड्रेक, वेताळ यांबरोबरच एकनाथ सोलकर हा पण आमचा हिरो होता. त्याच्या बद्दल अनेक कथा प्रचलित होत्या. त्या वेळी दुरदर्शन नस्ल्याने त्या खऱ्या मानण्याशिवाय इलाज नव्हता. त्याने एक झेल पाठीवर झोपुन दोन पायांमधे पकडल्याची कथा फ़ारच लोकप्रिय होती. आणी तो बॅट्समन ने मारलेला डायरेक्ट फ़टका होता.

टोनी ग्रेग याच्या बद्दल बर्‍याच दंतकथा आहेत. तो म्हणे फॉर्वर्ड शॉर्टलेग ला किंवा स्लीप मधे उभा राहून सतत बडबड करत असायचा.
बॅट्समन ला उचकवणे हा हेतू तो बरेचदा साध्य करायचा

बेकार तरुण's picture

19 Jul 2020 - 6:04 pm | बेकार तरुण

छान लेख..
एकनाथ सोलकर यांना .../\...

जगप्रवासी's picture

21 Jul 2020 - 12:37 pm | जगप्रवासी

पण तुमच्या लेखणीच्या मानाने खूपच छोटा झालाय. तुमचा लेख म्हणजे मस्त चहाचे झुरके घेत चवीचवीने कांदाभजी खाण्याचा प्रकार.

फॉरवर्ड शॉर्ट लेगचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोहम्मद कैफने केलेला रन आऊट -

https://www.youtube.com/watch?v=8KUCzjMBVTA

तुषार काळभोर's picture

21 Jul 2020 - 3:58 pm | तुषार काळभोर

कैफ ने भारताला स्वतःचा Jonty Rhodes दिला.
2002-03 मध्ये कैफ आणि युवराज ने फिल्डींग ला ग्लॅमर मिळवून दिलं.