प्रियांसी
गोंधळलीस ना?
मी तुला हे विशेष नाव दिलंय. शुअर तुला आवडेल.
मॉडर्न वाटतं ना? आणि तितकंच प्रेमळ. प्रियांसी असं नाव नसतंच मुळी म्हणूनच ठेवलं तुझं नाव. कारण तुझ्यासारखी आणखी कोणी नको. म्हणजे तुलना करून मला जी आवडते तिच्याबद्दलच्या आदर मला कमी नाही करायचाय. म्हणून आजपासून तू प्रियांसी.
तू मला म्हंटलेलं idiot पण कित्ती गोड वाटतं.
आय डोन्ट माईंड तू मला इडियट म्हणत जा. आवडेल!!
इडियट ची प्रियांसी :)
अगं मी त्या SAP coding च्या टूर वर होतो. अमित सरांनी अचानक सांगितलं. म्हणून तुला उत्तर द्यायला वेळ लागला. तुझी ही हस्तलिखिताची कल्पना फार आवडली. शाळा सोडल्यानंतर मराठी लिहिणं थांबलच होतं. मराठी वाचन होतं पण लिहिणं होतच नाही हल्ली. म्हणजे हे कशा सारखं आहे माहिते? खूप काही बोलायचं आहे पण वेळच नाही. :). डान्स करायचाय पण ठेकेवालं गाणंच लागत नाही :) प्रेम व्यक्त करायचंय पण हिम्मत नाही :) आता थोडी थोडी जमा केली म्हणा!!
कॉफीसाठी मुद्दामहून हो म्हणायची गरज आहे? एवढी formality ?
काल काम करताना कुठल्यातरी संदर्भाने तुझी आठवण झाली. मोहरून गेलो बघ. वाटलं क्षणात तुझ्या समोर उभं राहावं. आणि निशब्द तुझ्याशी बोलत राहावं. स्तब्ध, शांत, अचल. भोवतालचं सारं विश्व गोठून जावं. सगळे आवाज बंद व्हावेत. हलका मंद वारा वहावा, मंद प्रकाश ज्यात फक्त तुझी आकृती आणि तुझा चेहरा दिसावा. अद्भुत वाटलं सारं. अस्वस्थ झालो. सॅप कोडींग ने भानावर आणलं :) का असतात ह्या रुक्ष जगण्याच्या रचना?
असो सोमवारी ऑफिसला भेटू. कधी नव्हे तो सोमवार आवडायला लागलाय आजकाल. रविवार अगदीच नालायक वाटतो हल्ली.
तुझा...