अभियांत्रिकीचे दिवस- भाग १

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
26 Jun 2020 - 1:15 pm

इसवी सन: २००६-०७

आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल.
आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको.

तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं.
हे असं होतंच म्हणजे.
काही इलाज नव्हता त्याला.

कारण प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सामुदायिक थापेबाजीचा, किंवा तोंडात सामूहिक गुळणी धरून इज्जत काढून घ्यायचा एक  महोत्सव भरायचा, ज्याला ते लोक 'ओरल्स' म्हणायचे...

आणि ड्रॉईंग हॉलमध्ये उकाड्यात दहा-बारा दिवस चालणाऱ्या तीन तासांच्या 'काहीतरी लिहून काढायच्या प्रकिया', ज्याला ते लोक 'परीक्षा' म्हणायचे, हे सोडलं तर तुम्ही इतर कुठल्या कारणांसाठी कॉलेजात जावं, अशी काही पद्धत नव्हती तेंव्हा.

कारण तशी काही कुणाची अपेक्षाच नसायची.

तशा सगळीकडे चिरेबंद सिस्टीम सेट असायच्या  आधीपासूनच. 

उदारणार्थ कॉपरेटिव्ह मेस हा एक प्रकार.
तिथं जिल्ह्यानुसार ग्रुप असायचे आणि ते ग्रुप ह्या मेस चालवायचे.

फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेली आपापल्या जिल्ह्यातली बावरलेली पोरं शोधणं आणि त्यांना गंडवून ग्रुपमध्ये भरती करून घेणं, हे सेकंड-थर्ड इयरच्या सिनिअर्सचं काम. 

ग्रुपमुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल आणि ह्या थोर थोर सिनिअर्सच्या मार्गदर्शनाखाली आपले भविष्य उजळून निघेल, अशा भ्रमात असलेल्या ह्या कोवळ्या पोरांचा भ्रमनिरास व्हायला फारसा वेळ लागायचा नाही. 

काही ग्रुप्समध्ये सिनिअर्सना 'सर' म्हणण्याची सिस्टिम होती तर काहींमध्ये उगाच डुप्लीकेट कौटुंबिक फील यावा म्हणून 'भैय्या' वगैरे म्हणावे लागायचे. 

ह्या ज्युनिअर्सच्या सेवाशर्तींचा काही भाग असायचा. उदाहरणार्थ .. 

१. हे सर किंवा भैय्या वगैरे मेसमध्ये जेवायला बसलेले असताना त्यांचे हरप्रकारे मनोरंजन करणे 

२. जेवताना कुणी सिनिअर आला तर सगळ्या ज्युनिअर्सनी एकाच वेळी ताडकन उठून उभं राहून त्याला सलामी देणे

३. त्यांची सबमिशन्स पूर्ण करून देऊन त्यांच्याप्रती नसलेला आदर व्यक्त करणे

४. मेससाठी मंडईतून भाज्या वगैरे आणायची हमाली कामं करताना नेमकं कुणी ओळखीच्या पोरीनं पाहून, फिदीफिदी हसत गेल्यामुळे, लाजल्यासारखं होऊ नये, ह्याची काळजी घेणे

५. आणि अधून मधून आदेश आल्यावर त्यांच्या हॉस्टेल ब्लॉकमध्ये जाऊन 'इंट्रो'च्या नावाखाली त्या आंबटशौकीन किंवा ठर्की सिनिअर्सचे उर्वरीत मनोरंजन करणे, ज्याला 'अश्लील' असा एक सुंदर शब्द होता. पण असो.

ह्यासारख्या काही दृश्य-अदृश्य सेवाशर्तींचा भंग केल्यास 'ग्रुपधून काढून टाकायची' क्रूर धमकी मिळायची.

अर्थात ह्या धमकीमध्ये मूळातच काही दम नाही, हे त्या वेळी समजलेलं नसायचं.
म्हणून ह्या धमक्यांना घाबरायची ज्युनिअर्समध्ये पद्धत असायची.

तशीच लोकल आणि नॉन लोकल अशी एक स्पष्ट विभागणी असायची. 

आणि 'नॉन-लोकल पोरांनी लोकल पोरांना घाबरायचं' अशी एक पद्धत त्याच शहरातल्या काही तंतोतंत हुशार लोकांनी तिथे आधीच सेट करून ठेवली होती.   

पण तो आणखी एक विषय..

विनोदशिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

सुखी's picture

19 Aug 2021 - 7:33 am | सुखी

हेहे मस्त

गुल्लू दादा's picture

19 Aug 2021 - 11:04 am | गुल्लू दादा

वाचतोय.

चौथा कोनाडा's picture

19 Aug 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ....
मालिका वाचायला धम्माल येणार याची चुणुक दिसतेय !
लिहित रहा, वाचत आहे !