स्मृतीची पाने चाळताना: एक

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
21 Jun 2020 - 11:12 am

शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं. खरंतर आपल्याला अहिराणीत शिकवलं पाहिजे असं याचं म्हणणं. हिंदी याला समजायला जवळची असली, तरी यार इसमे कुछ दम नही. हे याने परस्परच ठरवून टाकलेलं. अहिराणीविषयी याला नितांत प्रेम असलं, तरी याची अहिराणी बहुदा मराठी, हिंदी, उर्दूमिश्रित. सारीच राष्ट्रीय एकात्मता. या भाषांना त्याने एकाच पात्रातून वाहत ठेवले. भूगोलातल्या डोंगर, दऱ्या, नद्या याला आपल्या गावातल्या परिसरापेक्षा कधीच सुंदर दिसल्या नाहीत. इतिहासातल्या लढायात याचा पक्ष नेहमीच छत्रपतींच्या बाजूने राहिला. शिवाजी महाराज याच्यासाठी सुपर, ग्रेट वगैरे होते. त्याच्यासाठी जीव की प्राण. ‘यार ये दुश्मन लोक हमारे यहां आये। आये तो आये, हमे परेशान करते रहे, अच्छा हुवा इनका राज डूब गया।’ हा याच्या इतिहासाचा अस्मिता जागर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच खरा इतिहास. बाकी सगळा मिळमिळीत, हा याच्या इतिहासाच्या अध्ययनातून मिळवलेल्या ज्ञानाचा शेवट. गांधीजींनी इंग्रजांना हाकलले म्हणतांना जणूकाही हाच त्यांना हाकलायला गेला होता, या आवेशात कथन करीत राहायचा. म्हणूनच की काय इंग्रजांचाच नाही, तर इंग्रजीचाही याला प्रचंड तिटकारा. गणित-भूमिती याचे सगळ्यात मोठे आणि बलवान शत्रू, म्हणून त्यांच्याशी त्याने कशी संघर्ष केला नाही. हे विषय शोधणारे रिकामटेकडे असावेत, असे याला प्रामाणिकपणे वाटत असे.

शाळा नावाच्या विश्वापासून जरा अलिप्त राहणारा. बऱ्याचदा मधल्यासुटीनंतर हा वर्गात दिसण्याऐवजी घराकडे जाणाऱ्या परतीच्या रस्त्यावर हमखास दिसायचा. तासावर वर्गात येणारे शिक्षक याला शोधून प्रश्न विचारणार, हे ठरलेलं. हिंदीचा तास वर्गात सुरु होता. शिक्षकांनी प्रश्न विचारला, “अरमान, बोलो क्या है इस सवाल का जवाब?” आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून स्वतःला लपवत सुरक्षित होऊ पाहणारा अरमान प्रत्येकवेळी कसनुसं करीत उभा राहायचा. हा उभा राहिला तरी वर्गात खसखस पिकायची. आज आपली यातून सुटका नाहीच म्हणून आलेल्या प्रसंगाला सामोरे जात चेहऱ्यावर उसनं अवसान आणीत वेंधळेपणाने गडबडीत बोलून गेला “लाजवाब है सर!” अख्खा वर्ग हास्याच्या लाटेवर स्वार होऊन तरंगत राहिला बराचवेळ. शिक्षकही आपलं हसू लपवू शकले नाहीत. अर्थात, शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांना त्याच्या वागण्या-बोलण्याविषयी माहिती होती. त्याच्या नितळ, निर्व्याज स्वभावाविषयी मनातून आस्थाच होती. अरमानचं उत्तरासाठी बोलणं वर्गातील सगळा ताण संपवण्याचं रामबाण औषध होतं. त्याच्यासोबत शिकणाऱ्या कोणालाही हे नाकारता येणार नाही, एवढं मात्र खरंय.

माणूस परिस्थितीचा निर्माता असतो की, परिस्थिती माणसाला घडवते, सांगणे अवघड आहे. काही असले तरी परिस्थितीने पुढ्यात आणून पेरलेल्या प्रसंगांना तोंड देत साऱ्यांनाच सामोरे जावे लागते, एवढं मात्र नक्की. पण कधीकधी परिस्थितीचे पाश असे काही आवळले जातात की, माणूस बाहुले बनून नाचत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. जीवनसंगरात टिकून राहण्यासाठी केलेले सगळे सायास, प्रयास अपयशाचे धनी ठरतात. संघर्ष करूनही हाती शून्यच उरते. परिस्थितीने आखून दिलेल्या वर्तुळाच्या परिघात सीमित झालेली माणसे गरगरत राहतात दिशाहीन पाचोळ्यासारखी. जगण्याच्या सगळ्याच दिशा अंधारतात, तेव्हा धुक्यात हरवलेल्या प्रतिमा आपलाच चेहरा शोधीत राहतात वेड्यासारख्या.

ओळख हरवलेले चेहरे नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने चालत राहतात स्वतःचा शोध घेत, सारं काही सोबत असूनही हाती काहीच नसलेल्या रित्या ओंजळी घेऊन. अंधारल्या वाटेवर चालताना अंतर्यामी कोंडलेली स्वप्ने कधीतरी उजळून येण्याची प्रतीक्षा करीत पळत राहतात, भग्न क्षितिजाकडे दिसणाऱ्या चिमूटभर प्रकाशाच्या ओढीने. जगण्यात सामावलेली पराधीनता नियतीच्या संकेतांना साकळून आयुष्याच्या झोळीत येऊन पडते. कधीतरी अवचित एखाददुसरा आनंदाचा कवडसा दूरच्या क्षितिजावर लुकलुकताना दिसतो. मनात आशेचे फुलपाखरू भिरभिरायला लागते. पंखांमधली सारी ताकद एकवटून उजेडाच्या खुणावणाऱ्या बिंदूकडे झेपावते, काहीतरी हाती लागल्याच्या आनंदात. पण तोही भासच. मृगजळाचे प्राक्तन गोंदून आलेला धूसर क्षण वंचना घेऊन आयुष्यात विसावतो. अनपेक्षित हाती लागलेले चारदोन चुकार कवडसे अस्वस्थ वर्तमान बनून भविष्याच्या शोधात दिशाहीन वणवण करीत राहतात. ललाटी लेखांकित केलेलं प्राक्तन घेऊन माणसे सभोवताली आखून दिलेल्या शून्याभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. शेवटी हाती उरते शून्य. हे शून्यही शून्यात विलीन होते आणि मागे उरतात या शून्य प्रवासाच्या काही स्मृती, त्याही प्रश्नांचे भलेमोठे चिन्ह घेऊन.

शून्यापासून सुरु होऊन शून्यावर संपणारा प्रवास काहींच्या जगण्याची बदलता न येणारी प्राक्तनरेखा बनतो. नशिबाने ओढलेली ही लकीर आयुष्यावर मिटता न येणारे ओरखडे काढीत राहते. परिस्थितीनिर्मित शून्य सोबत घेऊन जगणारी माणसं धडपडत राहतात सुखाच्या शोधात. अपयशाच्या भळभळणाऱ्या जखमा उरी घेऊन परिस्थितीच्या आवर्तात हरवलेलं असंच एक नाव स्मृतिकोशात कायमचं कोरलं गेलं आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी असणाऱ्या अभिलेखात ‘अरमानशा सुलेमानशा फकीर’ या नावाची वर्णमालेतील काही अक्षरांनी केलेली नोंद हीच त्याची पूर्ण ओळख, बाकी आयुष्यात सगळीकडून अपूर्णताच. वास्तव कधीकधी कल्पितापेक्षाही अधिक भयावह असते. त्याच्या भयावहतेची कल्पना नसते, म्हणूनच अज्ञानात आनंद शोधण्याशिवाय माणूस फार काही करू शकत नाही. वास्तवाच्या वाटेवर चालताना परिस्थितीचे निखारे पदरी बांधून चालणे काहींचं अटळ प्राक्तन ठरतं. अरमान निखाऱ्यांनी फुललेल्या वाटेवरून धावत राहिला अखेरपर्यंत अन् दैव त्याला खेळवत राहिलं. आज तो देहाने धरतीवर नाही, पण अनेकांच्या आठवणीतून असा अधून मधून तुकड्या तुकड्याने डोकावतो अन् जाणीव करून देतो स्मृतींच्या कोशात अजूनही अधिवास करून असल्याची...

चंद्रकांत चव्हाण
••

साहित्यिकव्यक्तिचित्रणलेखअनुभव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

21 Jun 2020 - 1:21 pm | गणेशा

छान लिहिले आहे...
शाळेचे मस्त लिहिले आहे.. आवडले...

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2020 - 1:34 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर व्यक्तिचित्र ! लेखन आवडले ! अरमानने ठसा उमवटवला.
शेवटचे तीन परिच्छेद जास्तच तात्विक झाल्यासारखे वाटले अन अरमानचे व्यक्तिचित्र पुसट होत गेले !

रातराणी's picture

23 Jun 2020 - 9:56 pm | रातराणी

अरमानच्या आयुष्यातील काही प्रसंग या तात्त्विक परिच्छेदाला जोडून आले असते तर व्यक्तिचित्र अजून प्रभावी झाले असते.