सर्वसाधारण लोक सहसा कोर्ट-कचेर्री करायच्या फंदात फारसे पडत नाहित.
माझाहि स्वभाव मूलतः भांड्खोर नाहि अन कोर्ट-पोलिस यांच्या कहाण्या ऐकुन, मी स्वतः कधी या फंदात पडेन असे वाटले नव्हते, अन इतक्या छोट्या गोष्टिकरता तर खचितच नाहि ..
पण कधीतरी तुम्हालाच तुमच्या स्वतः विषयी नवीन कळते !
तर .. ही गोष्ट आहे अशाच एका खटल्याची.
मला अमेरिकेत येउन एखादेच वर्ष झाले असावे. रोज मुलाला शाळेत गाडीने पोचवून मग कामावर जाण्याचा माझा क्रम असे.
शाळा भरण्याच्या वेळी अशा गाडीने सोडणार्या अन पायी मुलांना सोडणार्या लोकांची, मुलांची भरपूर गर्दी असे.
त्या गर्दीला नियंत्रीत करण्यासाठी, रोज शाळेच्याच मुलांचे एक रहदारी नियन्त्रक पथक तेथे असे. ही मुले, साधारण चौथी/पाचवीतली असत.
रहदारी थांबवण्यासाठी एका पाईपवर "स्टॉप" असे लिहिलेले मोठे दिशादर्शक हातामधे घेउन हि छोटीशी मुले ते अवडंबर कशी-बशी सांभाळत आपले काम करत असत.
शाळेच्या आत जायच्या रस्त्यावर तीन बाजूनी रहदारी असल्याने, त्या मुलांचे तीन ग्रुप करुन प्रत्येक दिशेला थांबलेली असत. आपापसातले संयोजन करण्यासाठी ती मुले शिट्टिने एक-मेकाला संकेत देत असत.
एके दिवशी मी असाच सकाळी शाळेत जाताना अशा स्टॉप साईन पाशी एका बाल-नियंत्रकाने मला थांबवले. मी नेहमीप्रमाणे थांबलो.
साधारण २ मिनिटांनतर त्या बाल-नियंत्रकांचा एक-मेकात संकेत झाला अन माझ्याइथल्या मुलाने मला जाण्यासाठी दिशादर्शक दाखवला. मी निघालो अन तेवढ्यात बहुदा त्या मुलांमधे परत संकेत झाला अन त्या मुलाने पुन्हा एकदा "स्टॉप" साईन दाखवले परंतु मी पुढे गेल्यामुळे मला ते दिसले नाहि.
माझ्या दुर्दैवाने त्याच दिवशी एक पोलिस अधिकारी तिथे होती अन तिने जेव्हा पाहिले असावे तेव्हा मी तो "स्टॉप" साईनचा सिग्नल तोडुन जातो आहे असेच दिसले असावे.
पुढच्या पाच मिनिटात मी मुलाला सोडुन निघालो अन त्या पोलिस अधिकार्याने मला थांबवले.
मग नेहमीचे लायसन्स, इन्सुरन्स वगै. पाहण्याचे सोपस्कार पूर्ण झाले अन तिने माझ्या हाती तिकिट टिकवले !
मी नियम पाळून गाडि चालवत होतो .. वगै. हे सर्व सांगून काही फायदा नव्हता.
नंतर थोड्याच दिवसात घरी ऑफिशिअल पत्र आले ज्यात नक्कि काय नियम मोडला आहे अन त्याची श्रेणी काय आहे ही सर्व माहिती होती.
जर तुम्हाला हा आरोप मान्य नसेल तर काय करता येईल याबद्दलहि माहिती होती.
आता माझ्यापुढे २-३ पर्याय होते, दंड भरा - पत्राने अपील करा - कुणा वकिलाला अपील करायला सांगा तुमच्या वतीने किंवा तुम्हि स्वतः कोर्टात आपली बाजू माण्डा.
एकतर सर्वात पहिले जो काय दंड आहे तो भरुन टाकयचाच होता. जरी तुम्हि यावर अपील केले तरी आधी दंड भरावाच लागतो.
दंड भरल्यावर बाकी काहिच केले नाहि तर माझ्या लायसन्स वर एक पोईंट आला असता कारण हे सर्व शाळेजवळ झाले होते. अशा ठिकाणी रहदारीचा नियम मोडल्याची जास्त शिक्षा होते. असा पोईंट तुमच्या लायसन्स वर आला की तुम्हाला इन्सुरन्स, बाकि लोन्स ई. याला पुढे जास्ती पैसे भरावे लागू शकतात. असे जर ३ पोईट जमले तर तुमचे लायसन्स पण रद्द होउ शकते !
एकदा माझ्या मनात आले की कुठे हा सर्व ऊपद्व्याप करा .. जाउ दे आला तर आला पोईंट अन् जातील तीनशे डॉलर .. पण मग परत वाटले की जर आपण खरेच जर काहि नियम तोडला नाहिये तर मग का म्हणून हे सहन करा !
शेवटी पैसे भरले अन त्या सोबत अपील करण्याचा अर्ज ही भरला. म्ह्टले .. काहिच नाहि तर मनाचे समाधान तरी की आपण बिना लढता शेपूट नाहि घातले !
त्यानंतर वाचायला सुरवात केली की नक्की काय प्रोसीजर आहे अन काय काय तयारी लागेल.
जितका अभ्यास केला, जितक्या लोकांचे अनुभव वाचले त्यातून एक गोष्ट नक्की कळली की फक्त माझ्या बोलण्याने काहि होणे शक्य नाहि. कारण माझ्या शब्दासमोर एका पोलिस अधिकार्याचा शब्द असणार आहे, आणी तिथे माझ्या शब्दाला काहि किंमत रहाणार नाही.
काही होण्यासारखे असेल तर ते तांत्रीक बाबींमधेच !
मग मी अशा रहदारीच्या नियमांचा सपाटून अभ्यास सुरु केला. काहि नियम अतीशय रोचक होते..
जसे की , जेव्हा अशी मानव-नियंत्रीत रहदारी सिग्नल असतो तेव्हा ती जागा यांत्रीक रहदारी सिग्नल पासून कमीत कमी २५० फुट दूर असावा, अन्यथा यांत्रीक सिग्नल बंद असावा ! मग मी टेप घेउन आमच्या रस्त्यावरच्या सिग्नल पासून तो बाल-नियंत्रक जिथे ऊभा होता ते अंतर मोजले .. उफ्फ .. २७० फुट !
वेग-वेगळ्या वेळी जाउन फोटो काढले की ही मुलांची रहदारी यंत्रणा नक्की कशी चालते .. त्याबाबतचे नियम काय आहेत ..
कीती मुले असावीत अशा प्रकारच्या रहदारी नियंत्रणामधे .. ई.ई,
त्यात परत शहराच्या मुन्सिपालिटी चे नियम, राज्याच्या रहदारीचे नियम, काऊंटी म्हणजे आपल्या जिल्ह्यासारखे , त्याचे नियम .. अशा सर्व नियमपुस्तकांचे एक चांगलेसे बाड जमा झाले. वर बर्याच प्रकारचे फोटो, गूगल मॅपचे सर्व ठिकाणचे नकशाचे प्रिंट वगै. सर्व तयारी झाली.
होता करता माझी प्रत्यक्श कोर्टात जाउन जज समोर माझी बाजू मांडण्याचा दिवस आला.
क्रमशः
प्रतिक्रिया
17 Jun 2020 - 11:24 am | रातराणी
भारीच!! पुभालटा!
17 Jun 2020 - 12:57 pm | राजाभाउ
+१
असेच म्हणतो
17 Jun 2020 - 1:28 pm | तुषार काळभोर
लैच रोचक ष्टोरी... एक्दम हामेरिकेत जाऊन तिथल्या न्यायव्यवस्थेला आव्हान!
17 Jun 2020 - 1:39 pm | बाप्पू
मस्तच.. पुढील भागात काय होतय ते वाचायला उत्सुक आहे.
17 Jun 2020 - 2:10 pm | कानडाऊ योगेशु
भारी आहे. असे अनुभव वाचायला मजा येते.
17 Jun 2020 - 4:31 pm | योगी९००
भारी अनुभव... पुढचा भाग लवकर टाका...
बाकी ज्या मुलांनी तुम्हाला जाण्याचा व नंतर थांबण्याचा सिग्नल दिला त्यांनी काही मदत नाही केली का?
17 Jun 2020 - 4:39 pm | शा वि कु
पुभाप्र
17 Jun 2020 - 6:17 pm | विजुभाऊ
वाचतोय
17 Jun 2020 - 7:13 pm | मराठी_माणूस
दिसले नाही तर मग तुम्हाला कसे कळले की त्या मुलाने परत "स्टॉप" साईन दाखवले आणि ते तुमच्याच साठी होते कदाचीत तुमच्या नंतर येणार्या वाहना साठी असेल.
दुसरे , पोलिस अधिकार्याने तिकिट देताना त्या मुलाशी शहानिशा केलि नाही का ? त्या मुलाने कदाचीत कबुल केले असते की , त्यांच्यात काही गोंधळ झाला त्या मुळे आधी जाण्यासाठी दिशादर्शक दाखवला आणि लगेच परत "स्टॉप" दाखवला त्यामुळे तुम्ही दोषी ठरत नाहीत.
17 Jun 2020 - 10:19 pm | पहाटवारा
दाखवले असावे असा माझा कयास आहे .. कारण मला फक्त शिट्टीचा आवाज आला. लिहिण्यात थोडी गड्बड झाली.
पोलिस अधिकार्याने स्वतः पाहिले असल्याने तशी मुलांसोबत शहानिशा केली नसावी. तसेहि पोलिस अशा प्रकारच्या गोश्टिंमधे लहान मुलांना सहभागी करुन घेत नाहित.
जोवर माझा मुलगा गाडिपासून दूर गेला नव्हता, तोवर मला तिकिट देण्यापूर्वी पोलिस अधीकारी तोपर्यंत थांबून राहिली. हेहि बहुदा मुलाला या गड्बडिपासून दूर ठेवण्यासाठी असावे.
18 Jun 2020 - 2:13 am | संजय क्षीरसागर
> असा माझा कयास आहे .. कारण मला फक्त शिट्टीचा आवाज आला ?
मग खटल्याला काय अर्थ राहीला ?
तुम्ही बघूनही स्टॉप सिग्नल तोडला असा अर्थ होत नाही.
तुमच्या नोटीसमधे नक्की काय आरोप होता ?
18 Jun 2020 - 2:55 am | पहाटवारा
दाखवले असावे असे मला वाटण्याचे कारण पोलिसाने दिलेले तिकिट !
उगाच माझ्याशी दुश्मनी असण्याचे तिला काहि कारण नसावे पण जेव्हा तिने पाहिले तेव्हा बहुदा तो सिग्नल मुलाने परत दाखवत असावा अन त्याच वेळी माझी गाडी त्याच्या काहिच फूट पुढे चालत असल्याने तिचा असा समज झाला असणे शक्य होते. म्हणजे खरं पाहिले तर चूक ना माझी होती ना तिची होती .. त्या छोट्या मुलांच्या आपसातल्या विसंवादाने असे काहि चित्र निर्माण झाले की मी नियम मोडला. आणी नोटीशीतही मी असा सिग्नल मोडल्याबद्दलच्या कायद्याचा रेफरन्स होता.
17 Jun 2020 - 11:29 pm | सौंदाळा
मस्तच
पुभाप्र
17 Jun 2020 - 11:57 pm | गणेशा
वा मस्त..
लगेच आलेल्या क्रमशा ने मूड घालवला..
18 Jun 2020 - 1:31 am | वीणा३
रोचक, पु भा प्र
18 Jun 2020 - 5:35 am | सुमो
पु भा प्र
18 Jun 2020 - 8:02 am | जेम्स वांड
काय एक एक अनुभव माणसाला समृद्ध करून जातील काही नेम नाही.
एक छोटीशी विनंती, कृपया संस्करण करून लिहा, प्रकाशित करायची घाई करू नका, थोडंssssss व्याकरण सांभाळलंत तर चार चांद लागतील तुमच्या लेखनाला
पुढील भाग लवकर टाका, केसचं पुढं काय झालं ते वाचायला उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.
20 Jun 2020 - 11:35 am | जेडी
रोचक, चिकाटी आवडली