दोसतार- ५१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Jun 2020 - 9:46 am

जाधव मामा म्हणजे एकदम आयडीयाबाज. आरसे पण असे बसवलेत की खुर्चीत बसलेल्या माणसाच्या समोर आणि मागेही आरसा लावलाय. समोरच्या आरशात मागचा आरसा दिसतो. बसलेल्या माणसाला पुर्वी त्याच्या डोक्याची मागची बा़जू दाखवायला हातात वेगळा आरसा धरून दाखवायला लागायचे. आता त्याला समोरच्या आरशात मागचा आरसा दिसातो. जाधव मामांनी मागच्या " दाढी कटींग चे पैसे रोख द्यावेत असे उल्ट्या अक्षरात लिहून घेतले आहे. . खुर्चीत बसलेल्या माणसाला ते सुलटे दिसते

मागील दुवा http://misalpav.com/node/47027

उलटा शब्द आरशात पहाताना वाचायला अवघड जाते पण जरा प्रयत्न केला तर जमायला लागते. "तवेद्या खरो सेपै चे गटिंक ढिदा" हे एकदा वाचता आले की झाले.
मामांच्या दुकानाच्या आतून वाचताना लिहिलेले " नकादु चेण्यापका सके" म्हणजे केस कापण्याचे दुकान हे एल्प्याला सजमल्यावर त्याने तर सगळ्याना त्या नावाने बोलवायचा सपाटाच लावला.
" टेलहॉ ट्म्रास " , क्बॅं रिकाहस तानज , रीकबे लयरीम्पीई , रअवे टफू वासेणरच , असे सम्राट हॉटेल , जनता सहकारी बँक , इम्पीरीयल बेकरी , चरणसेवा फूट वेअर दुकानांचे बोर्ड मोठ्याने वाचण्यात येणारी मजा वाचतानाच समजणार.
८२ ठपे रवाळगमं , किंवा ९१ ठपेवशिदास हा पत्ता कोणाला विचारला तर समोर असून समजणार नाही. एल्प्या मी आणि टंप्या बरोबर सांगू शकणार.
रस्त्याने जाताना ही नावे मोठ्याने घ्यायची ही गम्मत आपल्यातच ठेवायची. रस्त्यातून जाताना नवी पाटी दिसली की एल्प्या ते शब्द उलटेच वाचणार. रस्त्यात लागणार्‍या त्या नवनाथ रसवंती ग्रुह ची पाटी वाचायला तर उलटे शब्द करायची गरजच पडायची नाही. त्या रसवंती वाल्याने ती पाटी एका कापडी पडद्यावर लिहीली आहे आणि लाकडी बोर्ड ला अडकवली आहे. उलट्या बाजूने पाहिला तर बोर्डावर लिहिलेले "हगृतीवंसर थनावन " असे स्पष्ट वाचता येते. मोठ्याने वाचताना ते आपण कोणत्यातरी राजाच्या बिरुदासहीत आगमनाची दवंडी देत आहोत असेच वाटते. बोर्ड वाचताना एल्प्या म्हणणारही तसाच. म्हणजे " येत आहेत. अजीमोतरीम , जंगबहाद्दूर हग्रुतीवंसर थनावन. महाराज…….. " आणि त्या नंतर तुतारी वाजवली तर लोक रस्त्यातून बाजूला होऊन त्या महाराजांना जाण्यासाठी वाट पण सोडणार.
"हग्रुतीवंसर थनावन " हे म्हणताना आपण मोट्ठी पदवी लावलेल्या कोणतरी ऐतिहासीक व्यक्तीचे नाव घेतोय असेच वाटायचे.
या रसवंती ग्रुह वाल्यांचे काय ठरलेले आहे की काय कोण जाणे. पण मी पाहिलेल्या तीन चार रसवंती ग्रुहाची नावे नवनाथ अशीच होती. पाटणला कर्‍हाडला आणि सातारला सुद्धा.
एल्प्या आता त्याचे नाव ही उलटे सांगायला लागलाय. लटीपा तवंशय . ही समय मोडायला हवी नाहीतर तो परिक्षेतपण तसेच लिहायचा. आणि सर त्याला मार्क ही त्यामुळे उलटे द्यायचे. म्हणजे ६२ असतील तर २६ द्यायचे. अर्थात त्याने एल्प्याचा फायदाच झाला असता. २६ ऐवजी ६२ मिळाले असते.
पण शिक्षक दिनाच्या त्या तासा नंतर एल्प्या आता स्वतः होऊन अभ्यास करायला लागला होता. सहामाही परिक्षेचा निकाल मिळाला त्यात दिसत होते. एल्प्या तासाला शंकाही विचारायला लागलाय शिक्षकही आता त्याच्या शंकाना नीट उत्तरे देतात.
घटक चाचणी जवळ येत चालली. अभ्यास कसा करायचा ते समजल्यामुळे इंग्रजी गणीत हिंदी भौतीक शास्त्र याचे काही वाटत नाही. गणीत अगोदर नीट वाचायचे, भौतीक शास्त्राच्या प्रश्नात एकतर कसला तरी नियम सांगा किंवा कारणे द्या असणार जीव शास्त्रात आकृती काढून नावे द्या , रसायन शास्त्रात प्रक्रिया विचारणार हे ठरलेले. इंग्रजी व्याकरणात चेंद द व्हॉईस असणार. हे ठरलेले. हे सगळे न समजता पाठ केले तरी मार्क पडतात. पण घाटेसर म्हणायचे पाठ करण्यापेक्षा समजून घेणे महत्वाचे. पाठांतर नाही. पाठांतर विसरायला होते. पण समजलेले कधीच विसरायला होत नाही. आणि पाठांतर केले तर काय होईल याचे उदाहरण देताना घाटे सर अन्या दामले बसला समोरच्याच बाकावर बसला होता त्या बाकाकडे गेले आणि एकदम थेट गब्बर सिंगच्या श्टाईल मधे प्रश्न विचारला " अब तेरा क्या होगा कालीया
" सरांचा प्रश्न संपतोय न सम्पतोय तोच आख्ख्या वर्गाने उत्तर दिले " सरदार मैने आपका नमक खाया है" हे असे काही होईल हे सरांना माहीत असावे . कारण त्या नंतर पुढचा सगळा तास हसण्यात आणि हसू आवरण्यात गेला.
"तुम्ही हे पाठ केले नव्हते पण सर्वांना नीट समजले आहे" घाटे सरांनी समजावले ते आता कायम लक्षात रहाणार.
संस्कृतच्या अभ्यंकर बाई चा भर मात्र पाठांतरावर. सुभाषित माला , विभक्ती , शब्द रुपे , ते परस्मै पदी आत्मने पदी हे सगळे पाठ करायचे. शक्ल पच मुच रिच विच प्रच्छिता ही कारीका दरवेळी म्हणून घेणार. आणि वर्गात सगल्यांना संस्कृत नीट वाचता यायला हवे हे सांगणार. वर्गात पुस्तकातली सुभाषिते मोठ्याने वाचूनही घेणार.
"आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरात, सर्व देव नमस्कारं केशवम प्रति गच्छति". किंवा " नागुणी गुणीनं वेत्ती गुणी गुणीशु मत्सरी , गुणी च गुणरागी च विरलो सरलो जनः " दोन तीन अक्षरांचे आणि कमी जोडाक्षराचे शब्द उच्चारायला प्रत्येकाला जमतं तालात म्हणायलाही मजा येते.
आम्हाला सगळ्यांना बाईंनी गृहपाठ म्हणून एक एक संस्कृत श्लोक लिहून आणायला सांगीतलाय. मुख्य म्हणजे आणायचे म्हणून उगाच भग्वद्गीतेतला श्लोक नाही आणायचा .ती गोष्ट असायला हवी . एखादे गोष्टीचे संस्कृत पुस्तक वाचून आणायचा. आणि अर्थही सांगायचा.
घरी गेल्यावर संस्कृत गोष्टीचे पुस्तक शोधायचे त्यात गोष्ट असायला हवी. आज्जी कडे अशी पुस्तके असायची. त्यात तो ती एक नचिकेताची गोष्ट होती. स्वतःच्या बाबांनी त्याला यमाला देऊन टाकलेय हे ऐकल्यावर नचिकेत थेट यमलोकात गेला होता. आणि यमाशी बोलला होता.
सकाळाच्या संस्कृत बातम्या ऐकल्यातरी हे जमेल नाहीतरी बातम्या म्हणजे गोष्टीच असतात की. भूते राक्षस या ऐवजी चोर दरोडेखोर इतकाच काय तो फरक. तिकडे राक्षस राजकुमारीला पळवून नेतो इकडे कोणीतरी दरोडेखोर कोणाला तरी नेतो. इतकाच काय तो फरक.
घरी संस्कृत गोष्टींचे पुस्तक नव्हतेच. आज्जीची पुस्तके होती पण ती देवाची होती. त्यात गोष्टी नव्हत्या. हरिविजय , गोपिकाष्टकम , महाभारत रामकथासार अशी होती. आणि आज्जीला त्या गोष्टी माहीत होत्या आई ती पुस्तके वाचायची पण तीला त्यातील गोष्टी माहीत नव्हत्या. नाही म्हणायला संगीत मंदारमाला नावाचे एक नाटकाचे पुस्तक होते पण ते मराठीत . संस्कृत नाही. कुठेतरी सापडायलाच हवी संस्कृत गोष्ट.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

17 Jun 2020 - 10:10 am | सोत्रि

जोरदार चालू आहे मालिका!

ईबुक करून पीडीएफ फॉर्ममधे प्रकाशित करा किंडल वर पूर्ण झाली की.

- (दोस्त) सोकाजी

विजुभाऊ's picture

20 Jun 2020 - 9:32 am | विजुभाऊ

पुढचा भाग टाकलाय.
http://misalpav.com/node/47052

विजुभाऊ's picture

17 Jun 2020 - 6:15 pm | विजुभाऊ

येस सर
आपका हुकूम सर आखोपर

छान चाललीये मालिका
वाचतोय!!!