केशरी लाट

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
13 Jun 2020 - 10:37 am

एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस असतात.
सुट्यांची चाहूल लागलेली असते आणि अंगाच्या काहिलीचीही.
`तो` आग ओकायला लागलेला असतो.
अशात एक थंड झुळूक पिवळसर मंद गोड सुगंध घेऊन येते. गावातला कुणी काका/मामा हातात एक मळक्या रंगाची पिशवी घेऊन आलेला असतो.
असा नातेवाईक नशीबात नसला, तर आपणच बाजारात काहीतरी घेऊन येताना एखाद्या कोपऱ्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्याची एखादी म्हातारी समोर भरलेली टोपली घेऊन आपल्याकडेच आशेने बघत बसलेली दिसते. काही क्षण नजर स्थिरावताच आपल्याला मायेने बोलावते.
``आंबे घेऊन जावा`` म्हणून आग्रह करते.
हातात पिशवी नसली, तरी रूमाल काढून, कसंतरी adjust करून अर्धा डझन सोनं घरी घेऊन येतो.
दुपारच्या जेवणाला उजव्या कोपऱ्यातल्या त्या केशरी वाटीने वेगळाच दिमाख येतो.
`आत्ता चवीपुरते आणलेत,` असं आपण म्हणतो, तरीही एकदा घरात आलेला हा पाहुणा पुढचा दीड महिना आपल्या डोक्यावर नाचणार आहे, याची आपल्याला कल्पना असते. महत्त्वाचं म्हणजे त्याचा हा मुक्काम अतिशय आनंददायी असणार, याची आपल्यालाही कल्पना असते.
सकाळ, दुपार, संध्याकाळ तो डोळ्यासमोर दिसू लागतो. कधी रस, तर कधी नुसताच चवीला म्हणून त्याचा आस्वाद घेण्याचा कार्यक्रम सुरू होतो. भाज्या, आमट्या, चटण्या, कोशिंबिरी, कढ्या, सगळ्या त्याच्यावर जळफळू लागतात. त्याचा दुस्वास करतात. ह्या पाहुण्यापुढे त्यांना कुणी विचारेनासं होतं. बिचाऱ्या गप फ्रीजमध्ये किंवा अगदीच ताटातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून राहतात. कधीतरी नशीब उजाडलं, तर पोटात जातात.
हा पाहुणा तिन्ही त्रिकाळ आपलं मन तृप्त करत राहतो. रात्रीही त्याचीच स्वप्नं पडतात. सकाळी उठल्यावर चहाही प्यायच्या आधी त्याच्यावर नजर जाते. रात्री लावलेल्या अढीतल्या आणखी काही आंब्यांचा बदललेला रंग आपल्याला खुणावत असतो. आज त्याचा फडशा पाडायचे बेत होतात.
रखरखीत उन्हाळा ह्या केशरी लाटेमुळे सुसह्य होतो.
...आणि मग तो दिवस येतो.
त्याला निरोप देण्याचा.
बाजारात ठिकठिकाणी लागलेले त्याचे स्टॉल दृष्टीला पडणं कमी होतं आणि धोक्याची चाहूल लागते.
आवडत्या हिरोचा सिनेमा वाईट आहे हे मानायला जसं मन तयार नसतं ना, तसं होऊन जातं. `अजून काही दिवस आहेत,` असं आपण मनाला समजावत राहतो, पण ती वेळ आलेली असते.
आनंदाच्या शेवटच्या काही घटका राहिल्या आहेत, याची कल्पना येते आणि मग ते क्षण कायमचे जपून ठेवण्याचा आटापिटा सुरू होतो. ताटात रसाची वाटी बंद होते आणि एका आंब्याला तीन-चार वाटेकरी निर्माण होतात. कोय आणखी पांढरी होऊ लागते.
शेवटच्या पाहुण्याला आपण भरल्या पोटाने अलविदा करतो, तेव्हा डोळेही भरून येतात, पण मन नाही.
शेवटी आपणच आपली समजूत काढतो...
``असू दे! तोतापुरी येतील आता बाजारात. खाऊया हं आपण ते!``

मुक्तकशाकाहारीआस्वाद

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Jun 2020 - 12:12 pm | विजुभाऊ

झकास