श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे सर्वसामान्यपणे सत्पुरूषांमधे असते तसेच आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते.
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले. तेथे निर्मनुष्य असलेल्या तळघरासारख्या जागेत असलेल्या 'पाताळलिंगम' या ठिकाणी महर्षींना याची देही याचि डोळा आपलाच मृत्यु होत असल्याचा अनुभव आला, तसाच पुढे निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली. देहभान हरपलेल्या अवस्थेत त्या गुफेत महर्षी किती दिवस ध्यानस्थ होते हे सांगता येणे अवघड आहे. शेषाद्री स्वामींना दृष्टांत होत असत. एके दिवशी कोवळ्या वयातल्या एका सुकुमार योग्याचा अस्थिपंजर झालेला देह स्वामींना स्वप्नात दिसला आणि "या मुलाचे रक्षण कर" असा आदेशच अरूणाचलेश्वराने दिला. आपल्याला घडलेले दृष्टांत फोल नसतात हे पक्के माहित असलेल्या स्वामींनी त्या बालयोग्याचा शोध आरंभला. अरूणाचलाचा कानाकोपरा धुंडाळून देखील तो बालयोगी काही सापडेना. तेव्हा अरूणाचलेश्वरासमोर बैठक मारत स्वामींनी संकल्प सोडला की आता जोवर त्या बालयोग्याचा शोध लागत नाही तोवर अन्न किंवा पाण्याचे देखील सेवन करणार नाही. त्याला हुडकण्यासाठी आकाशपाताळ एक करेन. मनाच्या त्या उद्विग्न अवस्थेत अचानक स्वामींच्या लक्षात आले की आपण पाताळलिंगम या निर्जन स्थानी तर शोध घेतलेलाच नाही.
ते तडक पाताळलिंगम गुफेत येऊन पोचले. तिथे पाहतात तर काय आश्चर्य! अस्थिपंजर झालेला एक कोव़ळ्या वयातला मुलगा तिथे समाधिस्थ बसलेला त्यांना दिसला. देहाचे भान नसल्याने त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी क्षते पडलेली होती, पिसवांसारख्या परजीवी कीटकांनी केलेल्या जखमा चिघळलेल्या होत्या. स्वामींच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. त्या अस्थिपंजर देहाला कडेवर घेत त्याचा पुत्रवत सांभाळ करायचे त्यांनी मनोमन ठरवले. रमण महर्षींच्या जीवनात शेषाद्रींचा प्रवेश झाला तो असा.
तिरूवन्नमलै गावाच्या पंचक्रोशीत शेषाद्री स्वामींची ख्याती एक विक्षिप्त अवलिया अशा स्वरूपाची होती. शेषाद्री स्वामींना संताप आला तर त्यांच्या पुढ्यात असलेल्या माणसाची खैर नसे. त्यांनी उच्चारलेले शब्द हमखास खरे होत असत. त्यामुळे गावात त्यांच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. अध्यात्मात रूचि असलेल्या कित्येकांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता, तर काहींच्या लेखी ते फक्त एक विक्षिप्त व्यक्ती होते. शेषाद्रींचे कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत. वानगीदाखल सांगायचे तर शेषाद्री स्वामी गावातून जात असताना समोरून एक गावकरी आणि एक रेडा येत होता. स्वामींनी त्या माणसाला विचारले, हे काय आहे? तो माणूस बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, "महाराज, हा तर रेडा आहे". यावर स्वामी म्हणाले, "अरे रेड्या, ते ब्रह्म आहे!" स्वामींचे कोड्यात टाकणारे बोलणे लोकांना अगम्य वाटत असे.
गावकर्यांचा लेखी अडाणी आणि विक्षिप्त असलेल्या शेषाद्री स्वामींना आयुर्वेदाचे तसेच वनौषधींचे सखोल ज्ञान होते. याच ज्ञानाच्या जोरावर अस्थिपंजर झालेल्या बाल रमण महर्षींवर उपचार करायला त्यांनी सुरूवात केली. स्वतःचे शून्य उत्पन्न असलेल्या आणि भिक्षेवर निर्वाह करत असलेल्या स्वामींवर परस्वाधीन असलेल्या बालयोग्याची जबाबदारी आलेली होती. त्याचे पालन पोषण कसे करायचे हा प्रश्नच होता. समाधीस्थ असलेला तो कुमार जिवंत आहे का हे पाहण्यासाठी गावातली टवाळ मुले त्याला त्रास देत असत. क्वचित प्रसंगी दगड किंवा वीट देखील फेकून मारत असत. शेषाद्रींनी आपला रूद्रावतार दाखवल्यावरच हा प्रकार बंद झाला. शेषाद्रींनी त्या कालखंडात तळहातावरच्या फोडाप्रमाणे महर्षींची काळजी घेतली.
समाधीस्थ असलेल्या देहाच्या अन्नपाण्याच्या गरजा अत्यंत मर्यादित असतात. शेषाद्रींना हे माहित होते. अरूणाचलाला रोज पंचामृताचा अभिषेक होत असे. महादेवाच्या पिंडीच्या मागच्या बाजूस असलेल्या एका पन्हाळीतून हे पंचामृत खाली पडत असे. हे पंचामृतच आपण तयार केलेल्या द्रोणात गोळा करून दिवसातून दोन तीन वेळा तेच समाधीस्थ असलेल्या बालकाला ते भरवत असत. देहधारणेसाठी ते पुरेसे ठरत असे. स्वामींनी केलेले उपचार आणि दैवी कृपा यांच्या जोरावर महर्षी या अवस्थेतून कालांतराने बाहेर आले. निर्विकल्प समाधीच्या पलीकडे असलेल्या 'सहज समाधी' अवस्थेत त्यांचे ईश्वरी कार्यही सुरू झाले.
महर्षींच्या अध्यात्मिक अधिकाराची जाणीव असल्याने शेषाद्री स्वामींनी कधीही त्यांचे गुरूपद घेण्याचा प्रयत्न केला नाही. वयाने मोठे असल्याने ते महर्षींचा उल्लेख माझा लहान भाऊ असाच करत असत. रमणाश्रमात आलेल्या यात्रेकरूंनी, खास करून मद्रास सारख्या शहरी भागातून आलेल्या उच्चशिक्षीत लोकांनी ध्यानधारणा करणे किंवा महर्षींकडून शंकानिरसन करून घेणे सोडून आश्रमाचे व्यवस्थापन किंवा सामाजीक, राजकीय विषयावर टीकाटिप्पणी सुरू केली की शेषाद्री स्वामी अस्वस्थ होत असत. स्पष्टवक्ते असल्याने ते अशा लोकांची कानउघाडणी करत असत. एका उच्च्पदस्थ आणि गर्भश्रीमंत व्यक्तीला ते म्हणाले होते, 'हे पहा, हा माझा भाऊ रमण. याला हजार रूपये पगार आहे. मला शंभर रूपये पगार आहे. इतक्या दूरवर आला आहात तर भलत्याच गोष्टीत लक्ष न घालता एक रूपयाची तरी कमाई कराल, की जसे आलात तसेच खंक अवस्थेत परत जाणार आहात?"
रमण महर्षींची आई उतार वयात अरूणाचलाच्या आश्रयाला आल्यानंतर "मी शेषाद्री स्वामी. मी संन्यासी आहे. या आश्रमात मात्र रमण नावाचा एक प्रापंचिक राहतो" अशी रमण महर्षींची फिरकी घ्यायला ते कमी करत नसत. महर्षींबरोबर सलगीच्या नात्याने आणि अनौपचारिकपणे बोलण्याइतका अधिकार विरळ्याच व्यक्तींचा होता. शेषाद्री स्वामी त्यापैकीच एक होते. महर्षीही नेहेमी स्मितहास्य करून स्वामींच्या हजरजबाबीपणाला आणि विनोदबुद्धीला दात देत असत. रमणाश्रमाला लागूनच शेषाद्री स्वामींचा मठ आणि त्यांची समाधी आहे. रमणाश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली, तर शेषाद्री स्वामींच्या समाधीचे दर्शन न चुकता घ्या असे नम्रपणे सुचवून लेखाची सांगता करतो.
तळटीपः
१. लेख ललित साहित्यात मोडतो. हा वैचारिक लेख नाही.
२. दृष्टांत, निर्विकल्प समाधी या सारख्या गोष्टींचा उल्लेख दोन अलौकिक व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या अपवादात्मक गोष्टी या स्वरूपात आलेला आहे. त्यावर विश्वास ठेवा असा धागाकर्त्याचा आग्रह नाही.
३. समाधी, दृष्टांत, आत्मज्ञान इ. गोष्टींचे तसेच या लेखाचे व्यावहारिक उपयुक्ततावादाच्या दृष्टीने पाहता शून्य मूल्य आहे.
४. महाराष्ट्रात फारसे ज्ञात नसलेल्या शेषाद्री स्वामींची थोडक्यात ओळख करून देणे हा या लेखाचा एकमेव उद्देश आहे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
7 Jun 2020 - 11:53 pm | राघव
ओळख आवडली. :-)
8 Jun 2020 - 1:03 am | कानडाऊ योगेशु
लेख आवडला.
प्रथम अरूणाचल म्हणजे अरूणाचलप्रदेश वाटला.पण हे माझे अज्ञान.
समाधी अवस्थेत गेलेले महर्षी जागृतावस्थेत कधी व कसे आले त्याचा खुलासा लेखात झालेला नाही.
8 Jun 2020 - 10:54 am | मूकवाचक
रमण महर्षी 'निर्विकल्प समाधी' या परस्वाधीन अवस्थेतून बाहेर पडून व्यावहारिक दृष्ट्या आपण ज्यांना नित्य, नैमित्तीक कर्मे म्हणतो ती सक्षमपणे करायला लागले (या अवस्थेचे वर्णन महर्षींनी 'सहजस्थिती' असे केलेले दिसते) त्या मधे किती कालखंड लोटला हे सांगणे अवघड आहे. The "Lost Years" of Ramana Maharshi असा एक लेख आंतरजालावर आहे, पण त्यात लेखकाने निव्वळ अनुमानाने काढलेले निष्कर्ष मोठ्या प्रमाणावर आहेत (mere speculations). हे लक्षात घेता या कालखंडातला काही भाग आजही पूर्णपणे अज्ञात आहे असेच म्हणावे लागेल.
8 Jun 2020 - 8:55 am | सतिश गावडे
रमण महर्षींचे चरीत्र आणि त्यांचे कार्य आपल्याकडे विशेष ज्ञात नाही, त्यामुळे आपण यावर जे लेखन करता ते स्तुत्य आहे.
जिज्ञासूंसाठी: Teachings of Ramana Maharshi
8 Jun 2020 - 10:42 am | शाम भागवत
रमण महर्षींनी कोणालाच शिष्य करून घेतले नाही. त्यामुळे परंपरा निर्माण होऊ शकली नाही. त्यात परत निखळ तत्वज्ञानाचे वाचक कमीच असतात. शिवाय मूळ लेखन इंग्रजीमधे आहे. या सगळ्यांमुळे महाराष्ट्रात त्यांच्या विचारांचा फारसा प्रसार झाला नसावा असे वाटते.
8 Jun 2020 - 11:48 am | सतिश गावडे
होय, मात्र सगुण भक्तीच्या पुढच्या पायरीवर असणार्या साधकासाठी हे तत्वज्ञान म्हणजे अमृताचा कुंभ आहे.
महर्षींची शिकवण त्यांच्या आश्रमातील Arthur Osborne या पाश्चिमात्य साधकाने लिहून काढली असल्याने ती इंग्रजीत आहे. हे तत्वज्ञान माझ्या बाबांनी वाचावे अशी माझी खुप ईच्छा आहे म्हणून मी यावर मराठी पुस्तक शोधत होतो. मूकवाचक यांनी एक पुस्तक सुचवले आहे. टाळेबंदी उठली की आणेन हे पुस्तक बाजारात मिळाले तर.
>> श्री रमण महर्षि - चरित्र आणि तत्वज्ञान हे डॉ. हरिहर गंगाधर मोघे यांनी अनुवाद केलेले पुस्तक चांगले आहे
8 Jun 2020 - 11:59 am | शाम भागवत
होय, मात्र सगुण भक्तीच्या पुढच्या पायरीवर असणार्या साधकासाठी हे तत्वज्ञान म्हणजे अमृताचा कुंभ आहे.
खरंय.
_/\_
8 Jun 2020 - 10:43 am | शाम भागवत
लेख आवडला.
_/\_
8 Jun 2020 - 11:01 am | विटेकर
खूप छान .. आवडले ..
तिरुवन्नामलाई ला जाऊन आलो आहे , ती प्रदक्षिणा देखील केली आहे .. पण हे माहीती नव्हते ,
धन्यु
8 Jun 2020 - 12:26 pm | चौथा कोनाडा
एका नविन अध्यात्मिक विभूतींचा परिचय झाला !
त्यांना आदरपुर्वक वंदन _/\_
आकाशात पतितं तोयं | यथागच्छति सागरं |
सर्वदेवनमस्कारं | केशवं प्रतिगच्छति ||