सुंदर हे जग!

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Jun 2020 - 2:45 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

‘मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येतात, की वाटतं, आता आहे त्यापेक्षा हे जग कितीतरी पटीनं नक्कीच सुंदर असू शकेल!’ हे अवतरण माझ्या ‘पंख गळून गेले तरी’ या आत्मकथनातील आहे. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, प्रांतभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणं, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी, कोणाच्या व्यंगांकडे पाहण्याचा दुषीत दृष्टीकोन आदी गोष्टींतून आपण बाहेर कधी पडायचं?
दृष्टीकोन बदलला तर, जग नक्कीच सुंदर होईल. आपण दुसर्‍याचा आदर करायला शिकलोत तर? शाब्दिक हिंसा होत राहील तोपर्यंत पाशवी हिंसाही होईल. ‘बळी तो कान पिळी’ ही म्हण ज्या दिवशी नामशेष होईल व विचारांना प्रतिष्ठा मिळेल तो दिवस माणुसकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.
उदाहरणार्थ, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे माहीत असूनही आपल्याला आपला खाजगी महामानव हवा असतो. महान होताना त्या विशिष्ट व्यक्‍तीने काय हलाहल पचवले त्याचा अभ्यास नको. ऐतिहासिक कालखंडाच्या पटलावर ज्या ठळक ऐतिहासिक महान व्यक्‍ती आढळतात, त्या सहजपणे संधी मिळून पुढे गेलेल्या नाहीत. त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी अपमान वाट्याला आलेला असतो. काही वेळा स्वाभिमान बाजूला ठेऊन परिस्थितीशी जुळवून घेत पुढं जाणं स्वत:च्या आणि ‍अखिल मानवाच्या दृष्टीने हिताचं असतं. काही तडजोडी करूनच आयुष्यात ध्येय गाठता येतं.
पण हीच व्यक्‍ती पुढे ऐतिहासिक श्रध्दास्थान बनली, की त्या व्यक्‍तीचं वस्तुनिष्ठ समीक्षण आपल्याला रूचत नाही. ती व्यक्‍ती जन्मताच महान कशी होती, अशा पुराणाच्या आवरणाखाली आख्यायिका तयार होतात. इतिहासापेक्षा दंतकथा मनुष्य प्राण्याला जास्त प्रिय असतात. अशा काल्पनिक दंतकथा रूजवण्याच्या मानसिकतेमुळे वस्तुनिष्ठ चरित्र ऐकताच लोकांच्या भावना दुखावतात. आणि परस्पर असहिष्णुता वाढत राहते.
सांगायचा मुद्दा असा, आज आपण जे थोर लोक पूजतो, ते ऐतिहासिक पुरूष असोत की देवत्व बहाल झालेले थोर महात्मे. त्यांनी अखिल मानव जातीसाठी अनेक हालअपेष्टा, अपमान सहन केलेले असतात. खस्ता खात आजच्या आदर्शवत व्यक्‍तीमत्वापर्यंत पोहचलेले असतात. नामुष्कींचा सामना करत वाटेतले काटे फुले समजून ते यशस्वी होतात. निंदा पचवत स्थितप्रज्ञतेने त्यांनी आत्मीक उन्नती केलेली असते. पण आपण त्यांचे ग्रंथ कधी उघडून वाचून पहात नाही. फक्‍त त्यांचे उत्सव साजरे करतो.
अशा पार्श्वभूमीवर आजचं चिंतन: जो कळप करून रहात नाही, जो वरिष्ठांची मर्जी सांभाळत नाही, आपण भलं आणि आपलं (जगासाठी) काम भलं; अशा आपल्याच तंद्रीत राहणार्‍या माणसाचं हे जग अजूनही नाही. अशा माणसाला माणूसघाना ठरवलं जातं. त्याच्या मदतीला कोणी धाऊन जात नाही. असा माणूस समाजात एकटा पडतो. वाईट माणूस मात्र सर्वत्र तोडांवर का होईना नावाजला जातो. आपण मनाला आगळ घालतो, जो चांगला माणूस आहे त्याच्या वाट्याला कोणी जात नाही! पण हे चुकीचं गृहीतक ठरतं. उलट चांगल्या माणसालाच सर्वत्र वेगवेगळ्या अन्यायांना तोंड देत सामोरं जावं लागतं. प्रतिकार नसतो तिथं कोणीही दगड मारतो. जशासतसं वागून पाशवी अंग दाखवर्‍याच्या वाट्याला कोणी जात नाही. अशांना कोणी त्रास देत नाही. ही वस्तुस्थिती आपण बदलू शकतो. सारांश, आताचं जग सुंदर आहेच पण यापेक्षाही हे जग आपल्याला नक्कीच सुंदर बनवता येईल!
माणसाच्या चांगुलपणामुळंच जग सुरळीत चाललंय. माणूस वाईट नाही. माणसाचे विचार वाईट असू शकतात. माणसांच्या वाईट विचारांकडे कानाडोळा करत आपण पुढं चालू या.
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 6–5–2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

समाजलेख

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

1 Jun 2020 - 2:59 pm | शाम भागवत

आपण भलं आणि आपलं (जगासाठी) काम भलं; अशा आपल्याच तंद्रीत राहणार्‍या माणसाचं हे जग अजूनही नाही. अशा माणसाला माणूसघाना ठरवलं जातं. त्याच्या मदतीला कोणी धाऊन जात नाही. असा माणूस समाजात एकटा पडतो.

जर अशा माणसाला त्याच्या कर्माचा अभिमान असेल तर असंच होत जाणार. पण जर त्या माणसाला त्याच्या कर्माचा अभिमान नसेल, तर बरोबर याच्या उलटे अनुभव येतात.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jun 2020 - 10:53 am | डॉ. सुधीर राजार...

सुंदर समीक्षा. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2020 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माणूस वाईट नाही. माणसाचे विचार वाईट असू शकतात. माणसांच्या वाईट विचारांकडे कानाडोळा करत आपण पुढं चालू या.

ओके डन.

-दिलीप बिरुटे

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jun 2020 - 10:53 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद सर. प्रतिक्रियेबद्दल.