हॅलो

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
17 May 2020 - 11:37 am

[या कथेला ग्रंथाली वाचक दिन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होता.]

"अरे आईंचा फोन आला होता." आकाश घरी येताच आकृतीने निरोप दिला. तसे आकाश आणि आकृती एकाच कंपनीत कामाला होते पण मुलगा घरी एकटा असतो म्हणून आकृती नेहमी लवकर घरी येते. आकाशला उशीर होतो.

"उशीर झाला आज"

"ट्रॅफिक. एकदा चंद्रावर मनुष्यवस्ती होईल पण बंगलोरचे ट्रॅफिक सुधारणार नाही. आई काही बोलली का?"

"नाही, सहजच. आल्यावर फोन कर. येवढच."

"बाळूमामासाठी असेल."

"कोण बाळूमामा?"

"जाऊ दे ग. आई आणि तिचे नातेवाईक न संपणार प्रकरण आहे. तिकडे बुऱ्हानपुरला असतात. आजारी आहेत. वय झालेले आहे. मी आईला बोललो होतो मागे बाबा पडले तर मी अजून भेटलोच नाही तेंव्हा मी जळगावला यायचा विचार करतोय. तेंव्हा बुऱ्हानपुरला जाउन येईल.”

"मला बोलला नाहीस कधी?”

"काही ठरले नाही, आई उगाच पिच्छा पुरवते. बंगलोरवरुन जळगावला जाण सोप आहे का? इथनं जळगावला जायला ना सरळ फ्लाइट आहे ना ट्रेन. आता बाबा मुंबईला असते तर आतापर्यंत मी केंव्हाच भेटून आलो असतो. त्यांना बंगलोर आवडत नाही आणि मुंबईत राहायचे नाही. भारतात असो वा बाहेर परिस्थिती सारखीच.”

जळगावला जायचा विषय निघाला की हा संवाद काही नवीन नव्हता. यावर काही उत्तर नाही म्हणून आकृती गप्प होती. थोड्या वेळाने आकाश फ्रेश व्हायला बाथरुममधे गेला. आकृती तिथेच कपड्यांच्या घड्या करीत होती. घडी करताना तिला अथर्वचे न धुतलेले शाळेचे कपडे दिसले. ते बघताच तिचा पारा चढला.

"अथर्व, अथर्व" तो धावत आला.

"काय आहे हे?" तो गप्प.

"तुला काय बोलले होते मी?”

"कपडे वाशिंग मशीन मधे टाक.”

"मग का नाही टाकले?”

"विसरलो"

"असे कसे विसरता तुम्ही. आईने सांगितले तेवढे विसरता बाकी सार लक्षात राहत. उद्या शाळेत काय घालणार आहेस?”

अथर्वकडे काही उत्तर नव्हते. तो फक्त उभा होता. आकृती बोलायची थांबली तसा तो परत टिव्हीवर कार्टून बघायला पळाला. आकाशने सारे ऐकले होते. खर म्हणजे तोही काहीतरी विसरला होता पण घरातील तापलेले वातावरण बघता त्याला चूक कबूल करायची हिंमत झाली नाही. सुरक्षिततेचा उपाय म्हणून तो आफिसचा लॅपटॉप उघडून बसला. त्यालाही फार काळ सुरक्षित झोनमधे राहता आले नाही. आकृतीने विचारलेच

"तू भाजी खाल्ली नाही?”

"अग तो कोल्हापुरचा पाटल्या नाही का, त्याची आई आली आहे. त्याची आई आली कि तो मटण घेउन येतो. घरगुती गावरान अस्सल कोल्हापुरी मटण असल्यावर मेथीची भाजी कोण खाणार?”

"तू काल बोलला नाहीस?”

"सॉरी विसरलो"

"असे कसे रे विसरता तुम्ही. तुझ्यासारखाच तुझा पोरगा आहे.” असे म्हणत आकृती परत किचनकडे वळली जाता जाता तिने आकाशला आठवण करुन दिली. "आईंना फोन कर नाहीतर तेही विसरशील.”

"करतो गं.” असे म्हणत आकाशने सोफ्यावर पाय पसरवून ताणून दिली. अथर्वच्या कार्टूनच्या ढणढणात सुद्धा त्याचा डोळा लागला. दहा मिनिटाने फोन वाजला. आईचाच फोन असेल म्हणून त्याने फोन बघितला तर त्याचा मित्र आपटेचा फोन होता.

"बोला आपटेसाहेब कधी आलात सियाटेलवरुन?”

"मागेच. आम्ही तुमच्यासारखे महिन्याभरासाठी जात नाही.”

"हो तुम्ही प्रॉडक्टवाले घोड्यावर जाता आणि घोड्यावर येता. आमच्यासारखे नाही बोलावले की जायचे आणि समोरच्याने सोडले तरच परत यायचे.”

"खेचता का राव आमची. तू विशाल राणेला ओळखतो का? जळगावचाच आहे म्हणून विचारल.”

"जळगावात टोपल्याने राणे आहेत.”

"तुझ्याच बॅचचा आहे"

“आठवत नाही, काय काम होत?”

"माझ्या ग्रुपमधल्या एका पोस्टसाठी त्याचा इंटरव्यू झाला. फायनल करायच्या आधी बॅकग्राउंड चेक करावे म्हणून तुला विचारले.”

"माहिती मिळून जाईल."

"थँक्स. बाकी काय. काका काकू काय म्हणतात”

"बाबा मागे पडले होते त्यामुळे त्यांना चालायला त्रास होतो. शुगर वगैरे चालूच असते. आई ठणठणीत आहे म्हणून बरं आहे. तुझा फोन आला तेंव्हा तिलाच फोन लावत होतो.”

त्यानंतर पुढे कितीतरी वेळ आकाश फोनवर बोलत होता. आकृतीने एक दोन वेळेला खुणेनेच जेवायला ये असे सांगितले पण आकाशचा फोन थांबला नाही. आकृती आणि अथर्व दोघांनीच जेवायला सुरवात केली. अथर्वचे जेवण संपले तेंव्हा कुठे आकाशचा फोन संपला.

"अग आपट्याचा फोन होता म्हणे विशाल राणेला ओळखतो का? तुझ्या बॅचचा आहे? उद्देष काय तर मी आता तुझ्या बॅचची पोरं रिक्रूट करतो.”

"सहज चौकशी केली असेल.”

"मोठा माणूस झाला तो. व्हाइटफिल्डमधे व्हिला घेतला. इथे दोघांचे पगार असूनही फ्लॅटचा इमाय भरता भरता धाप लागते.”

"तू तुलना का करतो सतत?”

"सोबत जॉइन झालो होतो आम्ही. वैताग आला आहे. परवा टिमला घेउन लंचला गेलो होतो. बारा जण होतो. फक्त हजार रुपयानी बिल जास्त झाले तर चार टकल्यांपुढे जाऊन मला एक्सप्लनेशन द्यावे लागले. येवढाही अधिकार नाही.”

"नियम तुला आधीच माहिती होता ना.”

"तू मलाच दोष दे. फसल आहे माणूस ना इकडे जाऊ शकत ना तिकडे. कोणी समजून घ्यायलाही तयार नाही.”

"का चिडतोस इतका?”

"सार सोडून जळगावात जाऊन शेती करतो म्हणजे समजेल तुम्हा लोकांना.”

"परत तेच. तुला आपटेचा फोन आला. त्याचा अर्थ तू आपल्या मनाने काय तो लावला. सारा राग घरात का काढतोस? त्या बिचाऱ्या आपटेला पण काही कमी त्रास झाला नाही. एचवन स्टँप झाला होता, टिकिट झाले होते, आपल्यासोबत तोही येणार होता. चार दिवस आधी त्याच्या आईला पॅरालिसिसचा अॅटॅक आला आणि त्याला सर्व कँसल करावे लागले होते.”

"त्यात त्याचा फायदाच झाला. इथेच राहायचे म्हटल्यावर त्याने कंपनी बदलली."

"तुला कुणी थांबविले होते कंपनी बदलायला. आज बारा वर्षे झाले बिचाऱ्याची आई बेडरिडन आहे. त्याच्याच जवळ असते.”

"तू त्याचीच बाजू घे.”

"मी कशाला त्याची बाजू घेऊ. जेवण झाले की तू आईंना फोन कर बास.”

"फोन नंतर आता हा विशाला राणे कोण आहे हे समजल्याशिवाय झोप येणार नाही.”

"कठीण आहे तुझे.”

दोघेही सामंजस्याने भांडण संपवत आहेत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात राग कुणाचाच गेला नव्हता. बिचारा अथर्व फसला. आधी आकाशने दम भरला.

"अथर्व ते कार्टून बंद कर आणि मॅच लाव.” थोड्यावेळाने आकृती सुद्धा

"अथर्व शाळेची बॅग भरली का? जा आधी बॅग भर.” अथर्वने बॅग आधीच भरली होती. तो लगेच झोपी गेला. उद्या मुलगा शाळेत कसा जाईल या भितीने आकृतीने अथर्वचा गणवेष धुत होती आणि आकाश विशाल राणेचा शोध घेत होता. आधी त्याने दोनतीन व्हाटस अॅप ग्रुपवर विचारले. मग फेसबुकवर विशाल राणे नावाचा कुणी ओळखीचा चेहरा दिसतो का ते शोधले. लिंक्डइनवर जाऊन विशाल राणे नावाचे सारे पोफाइल चेक केले. अंदाज येत होता पण नक्की कोण याची खातरी होत नव्हती. अशात आकाशच्या एका मित्राने फोन करुन आपटेला हव्या असलेल्या विशाल राणेची सविस्तर माहिती दिली. मघापासून डोक्यात पेटलेली आग आता शांत झाली. आकृती तर गणवेष धुवुन केंव्हाच झोपली होती. तेवढ्या वेळात टिव्हीवर विराटने बंगलोरला मॅच जिंकून दिली होती. आकाशने टिव्ही बंद केला. विशाल राणेबद्दल कधी आकृतीला सांगतो असे त्याला झाले होते पण आकृती आता झोपली होती. तिला कसे उठवायचे.

"चार्जर कुठे आहे.” तो मनाशीच पण थोडा जोरात बोलला

"त्या तिथेच आहे टेबलवर" तिने अर्धवट झोपेतच उत्तर दिले.

"अग तो विशाल राणे सापडला. आपट्या काहिपण बोलतो. तो विशाल राणे माझ्या बॅचचा नव्हताच. माझ्यापेक्षा तीन वर्षे ज्युनियर होता. आमच्याच क़ॉलेजला होता. या आपट्याच्या कॉलेजातली तीन वर्षे ज्युनियर पोर तर मी ट्रक भरुन उचलतो.”

"झाल समाधान. तू आईंना फोन केला का?”

"ओह शिट विसरलो. उद्या करतो. आता रात्र झाली.”

"असा कसा विसरतो तू. उगाच त्या विशाल राणेच्या मागे लागला.”

"तुला नाही समजायचे. तू झोप. मी सकाळी फोन करतो. एका रात्रीने काही नुकसान होणार नाही.”

विशाल राणे सापडल्यामुळे आकाशला लगेच झोप लागली. तो घोरायला सु्द्धा लागला. अर्धवट झोपेतून उठल्यामुळे आकृती मात्र अस्वस्थ झाली. तिला उशीरापर्यंत झोप लागली नाही. पहाटे पाच वाजता आकाशचा फोन वाजला. दोघेही गाढ झोपते होते. दोनतीन वेळा फोन वाजला पण कुणी उचलला नाही. सहा वाजता परत आकाशचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने आकृती जागी झाली. तिने आकाशला आवाज दिला.

"आकाश तुझा फोन वाजतोय.” आकाश नाराजीतच उठला.

"सकाळी कोण आहे. मंदार आणि आता.”

"बोल मंदार"

"आकाश दादा मंदार बोलतोय. काकूंना पहाटे सिव्हियर हार्ट अॅटॅक आला दवाखान्यात अॅडमिट केले. काकांनी तुला फोन केला होता पण तू उचलला नाही. डॉक्टर बोलले सर्वांना बोलावून घ्या लवकर.”

मंदार पुढेही बोलत होता आकाश मात्र पुरता हादरला होता. फोन तसाच धरुन शून्यात बघत उभा होता. अपराध तर झाला होता पण त्याची माफी मागायची संधी आता कधीच मिळणार नव्हती. हे शल्य मनात ठेऊनच आयुष्य काढायचे होते. अचानक आकाशच्या डोळ्यांसमोर साऱ्या ध्वनी लहरींचे, तरंगांचे जाळे निर्माण झाले होते. तो त्यांना वेड्यासारखे हॅलो म्हणत होता. पण त्याला उत्तर म्हणून हव्या असणाऱ्या 'हॅलो'च्या ध्वनीलहरी आता कधीच सापडणार नव्हत्या.

मित्रहो

https://mitraho.wordpress.com/

कथालेख

प्रतिक्रिया

अतिशय ओघवते लिखान.. खुप खुप आवडले..
रोजच्या चित्रणाने त्यात मस्त रंग भरले गेले..

खुप छान कथा.. लिहित रहा..वाचत आहे...

जव्हेरगंज's picture

17 May 2020 - 12:30 pm | जव्हेरगंज

जबरदस्त रंगवली आहे. खूप आवडली. शेवट बहुधा तुम्ही ठरवून केला असावा. तो तितकासा आवडला नाही. एवढी भारदस्त कथा रंगवून शेवट उगाचच टिपीकल झाल्यासारखा वाटला.

मित्रहो's picture

17 May 2020 - 6:30 pm | मित्रहो

धन्यवाद गणेशा, धन्यवाज जव्हेरगंज
जव्हेरगंज आधी शेवट ठरवून मग कथा लिहिली हे तुमच्या सारख्या उत्तम कथाकाराने लगेच ओळखले. ते खरे आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीत इतके अडकत जातो की हातातून काहीतरी मोठे निसटत आहे याची साधी कल्पना सुद्धा नसते. हा विचार ठेवूनच कथा लिहिली होती.