माया सारख्या कमीत कमी नव्वद टक्के लोकांचा, वर्क फ्रॉम होम म्हजे घरून ऑफिसच काम अन घरच काम अस नवीन कार्येक्रम सुरु झाला हाय.
तोसंपून, किंवा त्यातून थोडा का होईना, चोरटा वेळ काढून, जर म्या वॉट्सअँप मेसेजेस वाचला नाय, त मंग माया दिवस कामी कसा लागण भाऊ? हेच त एक सोशल मीडिया, म्या सध्या पकळून ठेवल हाय. अलग अलग ग्रुप मध्ये ही पोस्ट अलाऊड नाही, ती पोस्ट अलाऊड नाही असे म्यासेज वाचले, की कितीही होबासक्या करून, ग्रुप अडमिन (गट प्रमुख) झालेला मी मला, कायची तरी भीती वाटण ना बे! मग काय पाठवू, काय नाय पाठवू, काय वाचू, काय नाय वाचू नुस्ती मनात भीती!
अशातच आमच्या काही ओळखीच्या आणि आदरणीय दोस्तांच्या कधी काही पोस्ट आल्या. म्या म्हणलं, कायचिबीन मस्त लिहिते बे हे लोक, काई कलाकार आहे लेका, यायले सार कस मस्त मस्त सुचते बे? देवांन आपल्या संगती पार्शलीटी केली की काय बे? आपल्यासाठी नुस्ती कामाचं हाय काय? ऑफिसची काम, माया वाट्याला आलेली घरची अर्धा डझन काम, होममिनिस्टरला खुश ठेवण्यासाठी म्हण, की दोन येळच जेवण गुपचाप भेटायला लफडा नको म्हण, हसरा थोबाड करून करायच होत, ते काम म्हण. त्यात पोरीच्या शाळेला सुट्ट्या लागल्या , आमची एकुलती एक लाडाची लेक, "बाबा हॉटेल बंद हाय ना? मग आज हे करून बघू का? बाबा आज ते?, बाबा तुम्ही काय बनवता बाबा, लयच मस्त! तुम्ही तर नोकरी सोडून तुमच हॉटेलचं टाका ना!” अशा तिच्या गोष्टी. म्हणजे या इतक्याश्या वयात तिले जमाले लागलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि त्यात जाणूनबुजून अडकणारा आणि तिचे लाड पुरविणारा म्हणजे मी, माझी चांगलीच हजामत चालू आहे.
आधीच लय लोड असलेला माया छोटा का असुदे पण एक मेंदू, त्याले आता हे माया दोस्तांना जमणार मस्त मस्त लिहीलेल्या पोस्ट बघून, अबे आपल्याले जमेल का बे अस? की आधीच आयुष्याचे बारा वाजले असतांना, नवीन उचापत्या, कोण बे सांगितल्या कराला?
काय बे, त्याच शुद्ध मराठीतल ते लिहिण, इथे मी तर मुळाचा , म्हणजे जर आमी लोकानी, वाक्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी वापरल नाही त आमच वाक्य पूर्ण तरी होत काय बे? अन समजा झाल, तरी त्या वाक्याले अमरावतीकराच्या वाक्याचे वेटेज तरी कुठे रायते का बे? झाल डोक्याले नाई ते काम लागल. म्हणते ना. ”मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर.”
ठरलं! काय होईन? लोक हासन , म्हणण "ऊठसूट, जो देखो बटे, रायटर बन रहा." पण आता उपाय नाय. लोक काय म्हणते, या चिंतेन मेल्यापेक्षा, थोडे चिंतन केल त? तुकाराम महाराज न म्हणतात ना “काळ सारावा चिंतने”. आपण पण काय तरी लिहू. आपल्याले कोणता मोठा लेखक बनाच. पण लॉकडाऊन मदे , हे पण पाहू का करून? जेव्हढे हाय गाठीशी, तीच शिदोरी बघू का उघडून?, आपल्याले देवान कमी देल किंवा पार्शलिटी केली, अश्या विचारान कुजत बसण्यापेक्षा, जे देल , त्याचा वापर,बघू का करून?
असले धंदे कराले आपल्याले वेळ भेटते का बे , हे आपले नेहमीचे बहाणे. अरे भाऊ वेळ भेटत नसते, वेळ काढायची असते, अस कोण्या महात्म्याचे शब्द कानात पडल्यासारखे झाल. अमरावतीकरच्या भाषेत सांगायच झाल् त "बेटे बारिश भलेही लोगोने जादा देखी होगी, लेकिन भिगा तो तू भी किसी से कम नही." त मंग कोणाच्या थम्स अप किंवा थम्स डाउन चा लोड न घेता, अन आमच्या आदरणीय, ज्यांच्यामुळे ह्या उचापत्या सुचल्या, त्यांची माफी मागुन (तसा मी वयाने लहान, त्यामुळे त्यांनी मला मोठ होऊन आधीच माफ केल हाय ), आणि त्यांचा आदर्श डोया पुढे ठेऊन, चला अमरावती स्टाईल मदे , देऊ काही गमतीदार आठवणींना उजाळा.
|| नम्र निवदेन ||
मले कोणत्या व्यक्ती, भाषा किंवा प्रदेशाचे माया आठवणीतून मजाक उडवायचा नाही . कुणावर टिका कारण्याएव्हढी मायी लायकी पण नाही. तरी काही चुकलं असं वाटत असलं त ही एक पोट्टामशाही गोष्ट समजून माफ करा बावा.
प्रतिक्रिया
17 May 2020 - 11:30 am | प्राची अश्विनी
वा!
19 May 2020 - 9:41 am | श्रीकांतहरणे
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा.
मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ.
दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क. मंग काय बाबा खूष, पोटयले बटे डॉक्टरत करतोच, आईपण, माया सोन्याला काय खाऊ घालू, अन काय नाई, आईचात लाळ लईच वेगळा असतो ना रे बा. मी पण तोपर्यंत, काय मार्क मिळाले म्हणून, चण्याच्या झाडावरच नाही, तर पार ढगात जाऊन पोहोचलो होतो. अकरावीले काय अभ्यास करतात काबे? आता डायरेक्ट बारावीच मोडून काढतो लेकले. आजूबाजूला असलेलेल्या सगळ्यांकडे पाहत, “हूं.. हा काय बे हुशार, आपल्याले तर डिस्टिन्शन हाय.” अस मनातच बोलाच. बारावीले होतो तरी ढगांतुन उतराचं नाव नाई. त्यात आपल्या बाबाले आत्मविश्वास लै, पोट्याले जनरल सायन्स दिले म्हणजे कस, डॉक्टर नाय तर इंजिनिअर तर हायच.
बर ह्यात अजून एक भर म्हणजे, दहावी नंतर कोवळ्या ओठांवर मिश्या फुटाले लागल्या होत्या, मंग काय, या वयात पिच्चरचा शौक लागणार नाही, त मी तरुण कसला? नेमका त्या टायमाले एक्दम नवीन हिरो शाहरुखखान, या हिरोचा, "डर" सिनेमा, थिएटर मध्ये धूम करून रायला होता. तसा माया आवडीचा हिरो बिग बी अन चॉकेलेटी हिरो आमिरखान (द परफेक्शनिस्ट). तरी “आपला दिल आधीपासून लय मोठा.” त्यात अजून एक हिरो मावणार नाई अस कधी शक्य होत का रे भाऊ? शाहरुखखान “बाजीगर” पिक्चर पासूनच, सुपरस्टार बनाच्या मार्गावर लागला होता, पण मले, अन मायासारख्या कित्येकाले, प्रेयसीचे नाव घेतांना अटकणारा ”क् क् क् क् क् क् ....... किरण." या त्याच्या सॉलिड डायलॉगने लय म्याट करून टाकलं होत. दिवसातून शंभरदा तरी, हे असं “क् क् ....... किरण” नामजप, मायासारखे भक्त कराले लागले होते.. अंगात काळा रेनकोट, रेनकोटची उभी कॉलर, डोळ्यावर प्रभात थिएटरच्या, रस्त्यासोमोरील गॉगलच्या हातगाडीवरून, चाळीस रुपयात घेतलेला काळाकुट्ट (एक्दम मोतीबिंदू झाल्यावर डॉक्टर देतात तसा) गॉगल घालून, हातात क्रिकेटची बॅट, नाय त मंग आईन, ताईच लक्ष नसतांना झाडू घेऊन, जशी काय ही आपली गिटार, असा आपला हुलीया करत "जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन” नाई त मंग, “तू मेरे सामने, मै तेरे सामने” अस गाण म्हणण्यात टाइम कसा जायचा समजतच नसे. "राहुल नाम तो सुना ही होगा" हा त्याचा अजून एक डायलॉग. मंग आरशापुढे जाऊन आपण पण “श्रीकांत, नाम तो सुना ही होगा” अस म्याटावाणी बोलाच (पायलत गल्लीच्या कोण्या काळ्या कुत्र्यान पण हे नाव कदी आईकल नोत. ...जाऊद्या.) शाहरुखचे सगळे केस, असे कशे समोर येते बे? मग आपण पण, तशी केसांची स्टाईल करू लागलो, फक्त मले सोडल तर, बाकीच्या सगळ्याले मी शाहरुख त नाई पण जॉनी लीव्हर नक्की वाटत असन. बाबा त मले कितीदा “अबे झिपऱ्या वाण्याच्या” म्हणून आवाज द्याचे. जनमल्यापासून माये केस कुरळे, बरोबर माया बाबासारखे, वादळ जरी आलं तरी, हू का चू न करणारे, ते कशे शाहरुखखानच्या केसासारखे सॉफ्ट आणि समोर येईल? अन तेव्हा केसांची स्ट्रेटनींगचा पण शोध कोणी लावला नोता .अशा या शाहरुखखानच्या जलव्याने, मी बारावीत हाय, हे पण मी भुललो होतो.
अस करत, कधी बारवी आली आणि कधी गेली, मले समजलंच नाही. ते म्हणते ना "जा जा रे पेपर, मास्तर के पास, आयेगी दया तो करेगा पास" अशी आपली स्टेज आली होती. कोणी विचारल, “क्या रे, कैसा गया पेपर?” “कुछ नही यार, ये दरवाजे से आया, अन वो दरवाजे से गया." शॉर्टकट मध्ये सांगू त, या कुलदिपकान चांगलेच दिवे लावले, हे आतापर्यंत कम अकल्येच्या लोकाले पण समजल होत. बाबांच्या स्वप्नातला डॉक्टर, कंपाऊंडर बननेके भी लायक नाही था. लायक नही, नालायक है ये, अस स्वप्नं मोडल्यान बाबाले वाटलं असणं काय? काय माहीत!! बाबाचा, आईचा, राग त्याचा जागी बरोबरच होता अन तुमच्या प्रश्नाच उत्तर हेच "म्हणून मी, इंजिनिरिंग ऍडमिशनला एकटा उभा होतो.”
बर मी माये लय गुणगान केले, पण, इतके पण कमी मार्क नव्हते रे भाऊ, त बारावीले फर्स्ट क्लास होता. मग नक्की किती टक्के पडले असणं? हे त कट्टपाने बाहुबली को क्यो मारा? या प्रश्नापेक्षाही पडलेला डेंजर प्रश्न, आता तुमच्यासाठी हाय. त फर्स्ट क्लासच्या दोन्ही बॉर्डरच्या अधात, मधात मी कोठेतरी बुचकळ्या खात होतो हे नक्की. मग त्याचा अंदाज किती अन काय लावायचा तो तुमचा तुम्ही लावा रे बावा.
|| सूचना ||
माया छोट्या दोस्तानो, तुम्ही जर चुकूनमाकून ही गोष्ट ऐकून रायले असान, तर कृपा करून माया अनुभवाले तुमचा बनवू नका. याले लॉकडाऊन काळातली एक गंमत जंमत गोष्ट समजा. तुम्ही लय हुशार, अन शहाणे. तसेच राहा, माय अनुकरण करू नका.
धन्यवाद.
23 May 2020 - 8:27 am | श्रीकांतहरणे
ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो.
अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल. कशीतरी आपली ओळखी काढत.
"कारे तू इकडं कसा?" म्या डेरिंग करून विचारल.
"अरे पहिल्या राऊंड मध्ये, सीट भेटली ना, पण आवडीची नाही, म्हणून बदलते का पाहाले आलो."
“असं का, बर बर” म्हणत थोबाड लपवत, मी तिथून कल्टी मारून, आपल्या जागेवर गुपचाप आलो.
डावीकडे पायतो, त अजून एक ओळखीच लंबु, बारक, गोर, केस स्पाईक कट केल्यासारखे उभे, आपल्या बाबासोबत आलेल. या टायमाले, अजून कितीदा आपल्या तिसऱ्या राऊंडच्या, गोष्टीचा फुगा करून आपल्याच इज्जतीचा भाजीपाला कराचा? म्हणून म्या, दुरूनच त्याले स्माईल दिली. त्यान पण ओळख दाखवली.
तितक्यांत, समोरच्या क्लर्कच्या टेबलावरून, माया नाव अन नंबरचा पुकारा झाला. मी गीतांजली एक्सप्रेस सारखा जोरात पळतच सुटलो, ते डायरेक्ट समोरच्या क्लर्कच्या टेबलापर्यंत. त्यान एक, एक सर्टिफिकेट् चेक कराचे, अन मी, चेहेरापाडून शरमेन, ते दाखवाच. “मार्कशिट” म्हणताच “काय लेका? एकदा झेरॉक्स लावली तरी, अजून अजून, काऊन मागून रायाला बे?“ म्या मनातच म्हटल, अन सुमडीत ठेवलेली माई, हीच ती दिवे लावलेली बारावीची मार्कशीट हळूच, पुढं पुढं सरकवाले लागलो.
"अबे दे न बे, काय टाईमपास चालू आहे बे , दिसून नाय रायल का किती गर्दी हाय? दे लवकर, अन चल होय पुढ्च्या टेबलावर" त्यांचा त्या बोलण्यानं, माया चांगलाच सत्कार केला होता. बारावीच्या निकालानंतर, आता दिवसातून, तीनचारदा तरी माये अशे सत्कार व्हतच होते. पण मी काय आजच्या जमण्याचा? की जरा कोणी अपमान केला, की लगेच डिप्रेशन मदे जाईन? आता त, अशे खोचट बोलण्याचे बाण पचविण्यासाठी, म्या कर्णाच्या कवचासारखा कवचच, अंगावर घालून घेतलं होता. पुढच्या टेबलावर मायासमोर, अजून एक पोट्ट होत. मले लांबूनच, एका लई मोठ्या कागदावर, कॉलेजची नाव आणि त्याच्या समोर ब्रॅन्चचा कॉलम, अस अंधुक अंधुक चित्र दिसायले लागल होत. लय कॉलम आधीच क्रॉस मारले होते. तेच्यात बडनेरा कॉलेज मधील, सिविल इंजिनीरिंग ब्रॅन्चचा कॉलम खाली दिसला. बस रे भाऊ आता मले, माई मंजिल लय दूर नोती. मनात अचानक आनंदचे ढोल , ताशे वाजाले लागले होते. हीच, हाव हीच ब्रॅन्च मागायची बे. मनात, हेच पक्क पकडून ठेवलं होतं. आला, अन माया नंबर आला.
"बोल रे, कुठची ब्रॅन्च?" तो रागीट, अन कामान परेशान असलेला आवाज माया कानावर पडला, अन दोन मिनिटाआधीच्या स्वप्नांतून, मले जाग आली.
"सर, बडनेरा इंजिनीरिंग, सिव्हिल ब्रँच" एका मिनिटाचा विचार न करता, म्या बंदूकीतील सगळ्या गोळ्या झाडाव्या तशा जोशातच उत्तर देल.
"ती शीट गेली ना बे, दिसत नाय काय क्रॉस झाली.”
झाल, माया पायाखालची जमीन सरकली, पण तोल न जाऊ देता, लगेच मी,
"अहो सर, आत्ता मी पायली ना?” मले एवढ्या लवकर हाराच नॊत.
"गेली ना रे भाऊ, तुया समोरच ते पोट्ट, ते पाय त्याले भेटली ती शीट, तू चल बोल बर लवकर काय पायजे त तुले, नाय त निंग इथनं, टाईमपास नको करू " तो अजून जोरान ओरडून मले बोलला.
"सर, अमरावतीत अजून काही? पाहणा सर, सर प्लीज." एक्दम भीक मांगणाऱ्या लोकांसारख माय बोलणं वाटू रायल होत.
"नाहीनाबे , तू पायत पट्कन दुसरी शीट, की बोलवू पुढचा नंबर?" आत त तो अजूनच भडकला होता.
"अकोला सिव्हील इंजिनीरिंग, अन चिखली सिव्हिल इंजिनीरिंग हाय, चल बोल लवकर." तो अजून मायावर खेकसला.
आताज मी याच्याशी, अजून लपाछपी खेळत बसलो, त तेलई जाईन, अन तूपई जाईल, अन हाती धुपाटण येईन. धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का असा माया कार्यक्रम होईन. आता इंजीनीरिंगचा पट्टा गळ्यात घालायचा च हाय, तर मग या घाटचा नाय, त त्या घाटचा, म्हणजे अकोल्याचा घालु.
अजून फुकट टाईम पास न करता “सर, अकोला सिव्हिल एनिजिनीरिंग.”
झाल, माया या वाक्याबरोबर शिक्कामोर्तब झाला, अन साहेबांन तो कॉलम माया नावान क्रॉस मारला.
ऍडमिशन हॉलच्याबाहेर पडतांना, मले त्या बारक्या, लंबू, गोऱ्यागोमट्या स्पाईक केस असलेल्या, पोट्ट्याचा बाबानं आवाज दिला. मी एक्दम खुशीत, त्याचा बाबाजवळ गेलो. त्याचे बाबा पण लय गोरे, लंबू अन चेहऱ्यावर एक्दम शांती. मले हळू आवाजात म्हणाले.
"का रे, भेटली का शीट?”
“हो काका” मग मी, पाचदहा मिनिटाआधी मायासोबत झालेला सगळा सीन काकांले सांगतला.
काकांनी "बर बर", म्हणत सगळ ऐकून घेतल. ख़ुशीतच माय लक्ष, त्या दुसऱ्या लंबू, सावळया पोराकडे पण गेल होत, पण भेटलेली शीट आवडली नाई म्हणून, बदलून घ्याले आलेला तो, अन माया रिकाम्या झोळीत, काय पळल ते घेऊन चालेला मी, मी त्याले दुरूनच स्माईल दिली. पण त्याचा चेहेरा अजून तसाच होता. मले काय भेटलं, काय नाय भेटल? हे समजायले, मले तेव्हा बहुतेक, तेव्हडी अक्कल आली नोती. पण काही पण असू दे, चिखलीले दोनशे किलोमीटर दूर गेल्यापेक्ष्या, अकोला नव्वद किलोमीटर, म्हणजे त्यातल्या त्यात जवळ समजून, मी इंजिनेरींगच्या रोडवर आपली गाडी सुरु करणार होतो.
|| सूचना ||
माया छोट्या दोस्तांनो, बघितल ना, माई काय हालत झाली ती? म्हूणन मजा करा, मस्ती करा, पण अभ्यास टाळू नका. मले लकीली किंवा अनलकीली ऍडमिशन भेटली. पण लक नेहमीच साथ देत नाई रे भाऊ. पण तुमची अभ्यासातली मेहनत, तुमाले, आयुष्याच्या कुठल्याही ऍडमिशनच्या पहिल्याच राऊंडमध्ये बक्षीस देईल, हे माय पक्क मत हाय.
धन्यवाद.
23 May 2020 - 8:40 am | गणेशा
चांगले लिहित आहात..
वाचतोय...
23 May 2020 - 9:08 am | श्रीकांतहरणे
सा सं ना विनंती,
चुकून प्रतिसादा मध्ये दोन भाग प्रकाशित झाले कृपया ते उडविता येईल का?
श्रीकांत हरणे