खासियत खेळियाची - पुल इट लाईक पंटर !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
15 May 2020 - 7:34 pm

पुल हा खरंतर क्रिकेटमधला सर्वात उर्मट फटका. खेळाची कुठलीही स्टेज असो, बोलर कोणीही असो, पिच कसंही असो - बॅट्समननी जर कडकडीत पुलचा चौकार किंवा षटकार मारला तर बोलर खांदे पाडून मास्तरांनी मुस्कटात मारलेल्या विद्यार्थ्यासारखा आपल्या जागी परत जातो. कारण पुलच्या अदाकारीतच एक उद्दामपणा आहे. तो उर्मटपणा नसानसात भिनलेला आपला खेळिया म्हणजे आपलं "punter" (जुगारी) हे नामाभिधान सार्थ ठरवणारा रिकी पाँटिंग!

Pull

प्रत्येक बॅट्समनचा एक लाडका शॉट असतो. आणि तो शॉट जर अडी-अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला धावून येत असेल तर क्या कहने! पुल हा तर पाँटिंगचा खास दोस्त होता. बोलर नको इतका डोईजड होतोय किंवा रन्स होत नसतील तर पुल त्याच्या मदतीला सच्च्या मित्रासारखा धावून जायचा. जखडला गेल्यावर साखळ्या तोडायला पाँटिंग हमखास पुल वापरायचा.

कल्पना करा, इंग्लंड किंवा न्युझीलंड मधल्या हिरव्यागार पिचवर दर्जेदार फास्ट बोलर्सनी पाँटिंगला जेरीस आणलं आहे. आउटस्विंगर बॅटची कड घेता घेता राहातोय. आत येणारा चेंडू पाँटिंग कसाबसा खेळून काढतोय. बोलर्सचं स्लेजिंग चालू आहे. पाँटिंग वैतागलेला स्पष्ट दिसतोय. Something's gotta give. इतक्यात बॉल किंचित शॉर्ट पडतो - पंटर आपल्या "पुल मोड" मध्ये जातो. किंचित खाली वाकून उजवा पाय थोडा मागे घेतो. वर येता येताच डोकं मागे घेऊन तो आपला तोल मागच्या पायावर "शिफ्ट"करतो. डावा पाय बॅलन्स सांभाळायला वर जातो आणि हात कोपरात न वाकवता एखाद्या लढवयाने दांडपट्टा फिरवावा तश्या चपळाईने चेंडू सणसणीत हाणतो. हा पुल म्हणजे हीरोनी ज्युनियर व्हिलनला कानफटात मारावी तसा असतो. त्यामध्ये तसूभरही बचाव नसतो. परिपूर्ण आक्रमकता! खेळाचं सगळं समीकरणच बदलून जातं. बॅट्समनचं पारडं जड झालेलं बोलरच्याही देहबोलीतून जाणवतं. तो एक शॉट पाँटिंगला आणि पर्यायाने ऑस्ट्रेलियाला पुन्हा आत्मविश्वास देऊन जातो.

Ponting Pull Compilation

आणि एकदा का आत्मविश्वास परत मिळाला की तर पाँटिंगला पुल मारण्यासाठी बॉल शॉर्ट पडायची देखील गरज नसते. तो अगदी लेंग्थ बॉलवर सुद्धा उभ्या उभ्या मिडऑन ते फाईनलेग पट्ट्यात त्याला हव्या त्या ठिकाणी पुल मारतो. मग समोर अ‍ॅम्ब्रोस असो वा डोनाल्ड असो वा शोएब! त्या द्वंद्वाचा विजेता तिथेच ठरून जातो.

Pull by Ponting

क्रिकेटमध्ये बोलरला पुल "मारला" जात नाही बोलर पुल "खातो". इथे नाजुकपणाला थारा नाही. आणि त्याला कारणही तसंच आहे. चांगले फास्ट बोलर्स तुम्हाला पाय मागे टाकून अंग बॉलच्या लाइनीत आणून बॉलच्या वर जाऊन वगैरे पुल मारण्याइतका वेळच मुळात देत नाहीत. फास्ट बोलरला पुल मारायचा तर बॅट्समनचा बॅलन्स, आत्मविश्वास, त्याचं hand eye coordination आणि चपळता सर्वोच्च प्रतीचं असावं लागतं. पुल म्हणजे हात वाकवुन अंगावरचं झुरळ झटकल्याप्रमाणे बॉल मारण्याचं कामच नाही. अस्सल बॅट्समन हात न वाकवता बॉल मन मानेल त्या दिशेला मारतो. पुन्हा काही चुकलंच तर तो तोफगोळा आपल्या छातीवर झेलण्याची तयारी लागते. म्हणून पुल हा कलाकाराचा नाही तर योद्ध्याचा शॉट आहे. आणि रिकी पाँटिंग हा अव्वल दर्जाचा योद्धा होता.

२०-२० च्या जमान्याच्या कितीतरी आधी पाँटिंगने फलंदाजांना दिलेली देणगी म्हणजे त्याचा पुल. १५० किमी वेगाच्या बॉलवर आडव्या बॅटने हल्ला चढवण्याचं कसब पहिल्यांदा दाखवलं ते पाँटिंगने. अगदी ऑस्ट्रेलियन संघही अडचणीत सापडल्यावर आपल्या कर्णधाराच्या पुल सारख्याच तडफेने कोपर्‍यात अडकलेल्या वाघासारखा चवताळून counter attack करायचा. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ज्या निर्दय बेदरकारपणाने ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं - त्याचं साक्षात द्योतक म्हणजे त्याचा पुल. म्हणूनच तर म्हणतात -पुल इट लाइक पंटर!

मौजमजाप्रकटनआस्वादलेख

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

15 May 2020 - 11:38 pm | कानडाऊ योगेशु

पॉंटींग कधी आवडला नाही पण लेख आवडला. पुल म्हटले कि मला सचिनचा कॅडिकला मारलेला अफलातुन पुलच आठवतो.
https://www.youtube.com/watch?v=mZ9E81QkbLs

फारएन्ड's picture

16 May 2020 - 1:35 am | फारएन्ड

भन्नाट! पाहिल्या क्लिप्स. पंटरचे २००३ च्या फायनल मधले पुल्स आठवतात. बहुधा ५०-६० रन्स त्याने यातूनच केले. आपलेही पब्लिक त्याला मस्तपैकी शॉर्ट बॉल्स देत राहिले.

राघव's picture

16 May 2020 - 5:17 am | राघव

पाँटींग त्याच्या खडूस अन् मुजोरपणामुळे कधी आवडला नाही. पण तो खेळत अप्रतीमच असे.

पण लेख फार थोडक्यात आटोपला असं वाटलं! :-)

तुषार काळभोर's picture

28 May 2020 - 6:35 am | तुषार काळभोर

पहिल्या तीन प्रतिसादाशी सहमत.
.
लेख वाचता वाचता २००३ची फायनल आठवली. त्या एका सामन्यामुळे पाँटिंग कधीच आवडला नाही. (जसं १९९९ च्या एका सामन्यामध्ये ओलोंगा व्हिलन झाला).
आणि लेख लईच आवरता घेतला. रिकी पाँटिंग याच्या चारपट मोठ्या लेखाची अपेक्षा होती. कदाचित पाँटिंग च्या पुल पुरता मर्यादित ठेवल्याने छोटा वाटत असावा.

ता. क. क्लिप पाहिली. भन्नाट पुल शॉट्स आहेत. एकदाही पाँटिंगने विशेष प्रयत्न केल्याचे जाणवत नाही, इतक्या सहज मारलेत! एकदम दिमाखदार, रुबाबदार, शॉट्स!!

मूकवाचक's picture

26 May 2020 - 4:46 pm | मूकवाचक

'कर्नल' दिलीप वेंगसरकरचे पुल अफलातून होते. त्याचा फलंदाजीचा पवित्रा ('स्टान्स') बेजोड होता. (या स्टान्स चा पूर्णाकृती पुतळा लॉर्डसवर आहे. तो बघून डोळ्यांचे पारणे फिटते).

या ध्वनिचित्रफितीत १:४५ नंतर कर्नलचा एक अप्रतिम पुल बघता येईलः

गणेशा's picture

26 May 2020 - 8:01 pm | गणेशा

मस्त...
क्लिप्स /फोटो दिसले नाहीत म्हणून निराशा झाली..
पण लेखन मस्तच..

माझ्यामते सर्वात अप्रतिम पुल म्हणज २००३ मध्ये वर्ल्डकप भारत विरुद्ध इंग्लंड, सचिन ना caddic ला मारलेला पुल... अहाहा किती वेळा बघितला तरी परत बघावासा वाटतो

https://youtu.be/mZ9E81QkbLs

अर्र, लिंक योगेशुंनी already दिली आहे...

अप्रतिम फॉर्म मध्ये होता सचिन 2००३ मध्ये.. वर्ल्डकप jinkayla हवा होता

बेकार तरुण's picture

1 Jun 2020 - 5:07 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणेच लेख आवडला (जरी पाँटिंग कधीच आवडला नाही तरी)

आपल्या रोहित शर्माचा पुल पाँटंगपेक्षा भारी वाटतो (कदाचित पंटर अजिबात आवडत नसल्यानेही असेल). पण फ्रंट फुट पुल शर्मा मस्त मारतो, चिकार वेळ आहे त्याच्याकडे असे नेहमी वाटते.

पण सचिनच्या भात्यात "डायव्हर्सीटी" एकंदरीत भरपूर असल्यामुळे पूल वगैरे बद्दल त्याचं अप्रूप वाटत नाही म्हणजे बघा सचिननं कॅडिकला उत्तम पूल केलं म्हणे पर्यंत हा गडी कोणाला तरी धरून दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे उत्तम ड्राईव्ह मारून मोकळा झाला असेल, सचिनच्या व्यक्तिमत्त्वाशी एक शॉट जोडता येत नाही, पंटरच्या केसमध्ये पूल जोडता येतो

पंटर मुजोर अन् हलकट होता ह्यावर अर्थात दुमत नाही पण ह्याचे हेच शॉट्स अन् खेळ २००३ फायनलमध्ये पाहून "पाँटिंग च्या फळीत स्प्रिंग असल्याचे" प्रवाद प्रसिद्ध झाले होते.