मे महिन्याचे दिवस होते. सकाळचीच वेळ होती. हगणदारी मुक्त योजनेखाली गावात प्रातर्विधी केंद्रांची बांधणी झाल्याने सकाळी सकाळी हातात बादल्या घेऊन "रोपे लावण्यासाठी" बाहेर पडणाऱयांची संख्या बरीच कमी झाली होती ! वाड्यावरील शाळेतल्या पोराट्यांना अर्थातच उन्हाळ्याची सुटी होती. पण सकाळी सकाळीच भक्तिरूप दिगंबर काका भूपाळ्या, भजने म्हणत गळा काढत असल्याने पोरांच्या उशिरा उठण्याच्या बेताला रोज वाळवी लागलेली असे. असो, तर अश्याच दर सकाळी सावरगावच्या बहुतेक बायका सकाळी सकाळी गावच्या रस्त्यावर चालायला जात असल्याची बातमी मिळाल्यापासून काका कामत आणि गुरव गुरुजींनीहि चालायला जाण्याचा दिनक्रम सुरु केला होता. दोघांनीही चालून येऊन टीव्हीवर योग गुरु वामदेव बाबांचा योग शिबीर कार्यक्रम बघण्यास व बरोबर आपणही तंतोतंत बाबा सांगतात तसे योगाभ्यास करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी त्यांनी उशिरा टीव्ही लावल्याने फक्त हास्यासन करून घरातल्यांना उठवून घातले व स्वतः शवासन केले. दुसऱ्या दिवशी बाबा प्राणायाम दाखवत होते. कामतांनी टीव्हीसमोरच पद्मासन घातले होते. बाबा प्राणायाम दाखवता दाखवता बाजूच्या माईकवर "योगसाधनेचे महत्व आणि प्रत्येकाने आपापल्या परिसरात योग शिबिरे आयोजित करण्याची गरज" ह्यावर बोलत होते. बोलता बोलता प्राणायाम करीत असल्याने त्यांनी जोरात सोडलेला श्वास माईकवर "फुत्कार"च ऐकू येई !
"आता एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीतून श्वास घ्या" - बाबांनी आज्ञा दिली. कामतांनी आज्ञेचे पालन केले मात्र आणि लाइट गेली ! अर्थातच टीव्ही बंद झाला. आता श्वास रोखून धरायचा कि कुठून सोडायचा ते काय बाबांनी न सांगितल्याने कामतांनी श्वास रोखूनच धरला होता; लाईट येऊन बाबा सांगतील तो पर्यंत श्वास रोखून धरणे काही त्यांना शक्य झाले नाही; व शेवटी दोन्ही नाकपुड्यांतून श्वास सोडत त्यांनी शवासन केले. काही सेकंद शांततेत गेले मात्र आणि दिगंबर काकांच्या "उठा उठा हो" ने त्यांच्यी तपश्चर्या भंग केली. बाकी सगळ्या आयांनी "बालनिद्राकल्याणास्तव" केलेल्या सामूहिक विनंतीनंतर दिगंबर काकांनी आज एक तास उशिरा "उठा उठा हो" सुरु केले होते. काकांनी उठल्या उठून पांघरून वैगेरे गुटलावले.बाकी टीव्हीवर दाखवल्याप्रमाणे चिमुलवाड्यावरही योगाचा प्रचार प्रसार होण्यासाठी योग शिबीर वैगेरे असे काही आयोजित करावे असा एक विचार कामतांच्या मनात चमकून गेला. वेळ सरला आणि संध्याकाळचा चहा घेताच त्यांनी गुरव गुरुजींच्या घरी जाण्यास चप्पल चढवले. गुरव गुरुजींनीहि इथे बाबांच्या "नादी" लागून "नस्य" नावाची नसती रासलीला चालवली होती. ह्या क्रियेत "औषधी तेलाचे काही थेम्ब नाकात घालतात" एवढेच बाबांनी संगितले होते. इथे त्यातला "औषधी" हा शब्द गुरवांच्या मेंदूने दुर्लक्ष करीत नाकारला आणि त्यांनी नाकात खोबरेल घातले ! त्यातच, त्यांनी "नस्य" क्रिया केली मात्र आणि गुरव काकूंनी त्याच तेलात परवा पापड तळल्याचे "रहस्य" त्यांना स्मित "हास्य" करीत सांगितले आणि गुरवांना ठसका लागला ! हा सगळा प्रकार कामत गुरवांच्या उंबऱ्यावर राहून पाहात होते; पण गुरव पाठमोरे असल्याने त्यांनी काही "कामत" पाहिला नाही. गुरव थोडे सावरले ते पहाताच कामत आत शिरले. त्यांच्या एकूण हावभावावरून त्यांना "शब्दांवाचून कळले सारे" असेच गुरवांनी ताडले आणि तेलाची डबी जाग्यावर पटापट पोचवली. कामतांनी खांद्यावरील पंचाने टक्कल पुसत पंखा वाढवला आणि सरळ मुद्द्यालाच हात घालत ते म्हणाले
"बरं का गुरवानू, आम्ही दोघे ह्या वाड्यावर एकमात्र योगी लोक आहोत आणि बाबा वामदेवांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या ह्या योगी होण्याचा वाड्यावरच्या पुरुष बायकांना काही तरी उपयोग व्हावा अशी एक इच्छा आहे !"
"उत्तम ! पण नक्की करायचे काय ते कळेल अश्या शब्दात सांगा !"- इति गुरव
"अहो म्हणजे शिबीर ! आपण आता बाबांकडून योगासने शिकतोच आहोत त्यातच भर म्हणून दामल्यांच्या "सीता राम बुक डेपो"तुन काही योग विषयक पुस्तके आणून आणखी काही आसने जमतात का ते पाहू आणि वाड्यावरच्या लोकांना ती शिकवू !"- कामत काकांनी योजना सांगितली. लागोलाग सरपंचांची संमती घेऊन अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासूनच दत्तमंदिराच्या आवारात योग शिबीर आयोजित करण्याचे ठरले. गुरवांनी वेळ न दवडता हि बातमी बाळ्याला सांगून प्रचार-प्रसाराची सोय करून घेतली. तिन्हीसांजा झाल्या होत्या. दामलेंनी दुकान बंद करायच्या आत त्यांना गाठू अश्या अनुशंघाने कामत गुरव जोडगोळीने 'सीता राम बुक डेपोत' धाव घेतली. दुकान तसे जुनेच होते.छप्परही अर्थातच जुनेच असल्याने ते दर पावसात गळत असे. बाकी त्यामुळे सगळ्यात वरच्या कप्प्यातील पुस्तकांवर पावसात अखंड अभिषेक होत असल्याने इतर पुस्तकांच्या तुलनेत त्यांनी जरा जास्तच "पावसाळे" पहिले असावेत ! असो. तर कामत गुरवांनी बराच वेळ काळोखात विजेरीच्या साहाय्याने शोधाशोध करून "करा योग;पळवा रोग" असे मुखपृष्ठ असलेले एकमेव बुक काढले. त्यातच दामल्याना उशीर होत असल्याने त्यांनी पटापट प्रत्येकी ६ असे १२ रुपये मोजून ते पुस्तक खरेदी करीत पिशवीत कोंबले आणि दोघेही गावकरांच्या घरी जमले. गावकरांच्या गच्चीत तासाभरात,उद्या शिबिरात शिकवण्यापुरती, काही योगासने शिकू असा त्यांचा मानस होता. गच्चीवर पोहोचताच काका कामतांनी आपल्या पिशवीतून खजिन्याची चावी काढावी तसे ते पुस्तक बाहेर काढले. एका हातात छत्री आणि दुसऱ्यात धोतराचा सोंगा असल्याने गुरव कुरुजींच्या काखेत विजेरी अडकवत त्यांनी पुस्तक उघडतात तोच मेंदू वडे, इडल्या, नसत्या प्रकारचे डोसे इत्यादींची चित्रे आणि पाककृती पाहून दोघांनाही शिळा घाम फुटला ! त्या "करा योग पळवा योग" मुखपृष्ठाचा त्याच्या जाड जूड पुठ्ठयामुळे फक्त उपयोग केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ! आता उद्याच्या शिबिरात हास्यासन, खोबरेल नस्य आणि शवासन शिकवले तर नसत्या उचापती केल्या म्हणून लोक आपल्याला बघून हास्यासन करतील असा विचार करीत मंडळींनी बाळ्याला तात्काळ बोलावून घेतले आणि शिबीर काही कारणास्तव रद्द झाल्याची बातमी प्रसारित करण्यास सांगितले. योग शिबिरास जाण्यासाठी लावलेले घड्याळाचे गजर रात्रीच बंद झाल्याने दुसऱ्या दिवशी वाड्यावरील सगळी मंडळी नेहमी सारखी दिगंबर काकांच्या "उठा उठा हो" नेच उठतील यात काही वावगे नव्हते ! चिमुलवाड्यावर फक्त एका रात्रीपुरते शांततेचे पांघरून ओढले गेले होते !
समाप्त
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 8:58 am | कंजूस
हा हाहा.हा.