बुचाचे झाड

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
15 Apr 2020 - 6:15 pm

माझ्या घराच्या दाराशी एक बुचाचे झाड आहे.हे झाड मी माझ्या लहानपणापासून बघत आहे. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी अंगणात त्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा पडलेला असे. आम्ही मुले ती फुले गोळा करून त्यांचा हार किंवा वेणी बनवत असू.
पण काही दिवसापूर्वी एक गंमतच झाली. मी सकाळी उठून खिडकीबाहेर बघतो तर काय. बुचाच्या फुलांचे ते झाड गायब! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. वाटले मी झोपेत तर नाहीना. असे कसे होऊ शकते .एवढे मोठे भर भक्कम झाड एवढासाही मागमूस न ठेवता नाहीसे होते म्हणजे काय ?
मी स्वतः एक प्रथितयश लेखक आहे. तो देखील रहस्यकथांचा! पण हे रहस्य काय आहे हे मला पण समजेना. आज खरं तर मी माझ्या नवीन कथेच्या लेखनाला सुरवात करणार होतो. पण----
मला वाटले अजून माझ्या डोळ्यावर झोप आहे. एक कडक चहा पिणे हाच यावर इलाज. मग नजर चांगली स्वच्छ होईल चांगली जाग येईल मग लिहायला सुरुवात करू.
चहाचा कप घेऊन खिडकीपाशी आलो बघतो तर काय बुचाच्या फुलांचे झाड डौलाने आपल्या जागी उभे होते. मला स्वतःचेच हसू आले. ह्यालाच म्हणतात दृष्टीभ्रम. होते कधी तरी असं.

+++++++++++++++=+++++=+++=++++++++++++++++=+++++++++++=+++++++
आज माझे बुचाच्या झाडाकडे लक्ष नव्हते. त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता ,इच्छा सुद्धा नव्हती.एक रहस्यकथा लिहून हातावेगळी करण्याची घाई होती. संपादकाचा वारंवार आठवण करून देणारा फोन येत होता.मनांत कथानक रंगरूप घेत होते. कथा आकार घेत होती.
रहस्यकथा लिहिणे म्हटले तर अवघड नि म्हटले तर सोप्पे आहे. एका व्यक्तीचे कॅरॅक्टर उभे करा.म्हणजे मूर्तिकार मूर्ती बनवतात तसेच.त्याचा सवयी, लकबी त्याचे वीक पॉइंट ह्याचे वर्णन करा तसेच त्याचे समाजातील स्थान ठरवा. म्हणजे ती व्यक्ति श्रीमंत वा गरीब अथवा मध्यमवर्गीय आहे ते ठरवा.त्याच्या नातेवाईकांचे वर्णन पण यायला पाहिजे. जितके ज्यास्त नातेवाईक तितके बरे. तेवढेच जास्त संशयित. मोर द मेरीअर.
मग त्या व्यक्तीचा खून करा. आता बसा सोडवत तिढा.अरे हो, मी बोलता बोलता तुम्हाला आमचे ट्रेड सिक्रेट सांगून टाकले.
आता अवघड भाग. कथेतल्या निरनिराळ्या व्यक्तींची नावे काय ठेवायची? इथे येऊन गाडी थांबते.नावे अशी पाहिजेत की कुण्या वाचकाला तक्रार करायला वाव नसावा. विशेषता खलनायकाची नावे.. माझ्या एका कथेत खलनायाकाचे नाव होते काशीनाथ. पण ती माझी मोठीच चूक ठरली. कारण कथा प्रसिद्ध म्हणजे छापून आल्यावर एका वाचकाने मला खरमरीत पत्र लिहिले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काशीनाथ नावाची माणसे गरीब बिच्चारी असतात. ती कुणाच्या अध्यांत मध्यांत नसतात. सरळ नाकासमोर बघून चालणारे हे लोक. काशीनाथ कुणाचा खून कशासाठी करतील हो? मी अश्याप्रकारे खलनायकाचे नाव काशीनाथ ठेऊन जगातल्या सर्व काशिनाथांवर घोर अन्याय केला आहे. ह्या पत्रलेखक काशीनाथाचे आयुष्य खूप कठीण झाले होते. सगळे लोक त्याच्याकडे आता संशयी नजरेने बघायला लागले होते. इत्यादी इत्यादी. खाली सही होती काशीनाथ चिकटे. अश्या लोकांना शांत करण्यासाठी मग मला खुबीदार भाषेत पत्राची उत्तरे लिहावी लागतात. एकदा माझ्या एका कथेच्या नायिकेचे नाव मी ठेवले होते प्रमिला. तिचा एवढाच दोष होता की तिने नायकावर प्रेम तर केले पण लग्न मात्र कुणा दुसऱ्याशी केले. ह्यावर मला सहा किंवा सात प्रमिलाताईंची तक्रार करणारी पत्रे आली. आता मात्र मी कानाला खडा लावला आणि अशी नावे शोधायला सुरवात केली जी कुणाचे आई बाप आपल्या अपत्याची ठेवणारच नाहीत. आता ही नावे पहा. विकी हातोडा, किकी सुमरा, जानू महेरापी, बोगा खजांची, सुनम कोमल, इत्यादी इत्यादी.अशी नावे जगांत कोणाचीही नसणार मग कोणाची तक्रार येण्याची शक्यताच नाही.
माझ्या ह्या नव्या कथेत देखील मी अशीच काहीबाही नावे वापरणार होतो. पण का कुणास ठाऊक माझ्या कथेचे पहिले प्रकरण संपले तेव्हा माझ्या लक्षांत आले की पात्रांची नावे योगायोगाने पारंपरिकच होती.हे असे का झाले हे माझे मलाच समजले नाही.सोडून द्या ते . शेवटी कुणीतरी म्हटले आहेच की नावांत काय आहे? कथा महत्वाची.
कथा लिहिण्यास सुरवात केली आणि माझ्या लेखणीतून नाव आपसूकच लिहिले गेले. भगवंतराव अधटराव मुसळे. भगवंतराव हे शहरांतील एक बडे प्रस्थ होते.शहरांत त्यांचे तीन कापड कारखाने होते.तुम्ही एच एस ब्लू हा पुरुषांच्या तयार कपड्यांच्या ब्रँडचे नाव ऐकले असणारच. कदाचित त्यांचे कपडे वापरले पण असतील, हा ब्रँड ह्या भगवंतरावांचाच होता. ह्या ब्रँडचे कपडे सगळ्या देशांत प्रसिद्ध होते.कापड बनवणे व तयार कपडे करणे हे दोनी धंदे एकमेकांना पूरक असल्याने त्यांना मोठा फायदा होत होता. हा ब्रँड आता मध्यपूर्वेत मार्केट करण्याचा त्यांचा इरादा होता. दुबई पासून सुरवात करायची होती. आपण ह्या त्यांच्या साहसांत त्यांना अपार यश मिळो अशी प्रार्थना करून त्यांना आपल्या शुभेच्छा देऊया.
भगवंतराव –म्हणजे त्यांचे घराणे- तसे गर्भश्रीमंत. सुरसुंडी हे त्यांचे गाव. इथे त्यांच्या घराण्याची मोठी शेतीवाडी होती. भलभक्कम चौसोपी वाडा होता. गाई गुरे होती. एक जुन्या काळाची फोर्ड गाडी पण होती. लपूनछपून थोडी सावकारी पण चालत होती. मुसळे म्हणजे सुरसुंडीचे जहागीरदार. म्हणूनच ते आपले नाव सुरसुंडीकर मुसळे असे लावत असत. भगवंतरावांचे शाळेचे शिक्षण सुरसुंडीलाच झाले.(ती शाळा सुद्धा त्यांच्या आजोबांनीच स्थापन केलेली होती.) पण ह्या सुखी शांत जीवनांत मीठाचा खडा पडला. भगवंतरावांचे आणि त्यांच्या तीर्थरूपांचे एके दिवशी कडाक्याचे भांडण झाले.डोक्यांत राख घालून तरुण भगवंता घराबाहेर पडला.
एवढ्या मोठ्या घरादाराचा त्याग करून भगवंतराव शहरांत आले नशीब अजमायला. आईच्या मायेखाली आणि वडिलांच्या धाकाखाली वाढलेल्या भगवंताला बाहेरच्या जीवनाला प्रथमच एकट्याने सामोरे जावे लागले. भगवंतराव टक्केटोणपे खात खात बरेंच काही शिकले. जीवनाची शाळा ही सगळ्यांत मोठी शाळा. त्याच्यांत जो पास झाला जीवनांत यशस्वी होणारच होणार. भगवंतराव नुसतेच नाही तर फर्स्टक्लास मध्ये पास झाले.घरांतून निघाले तेव्हां त्यांचे वय अवघे वीस होती. त्यांची इच्छा होती अमेरिकेंत जाऊन उच्च शिक्षण घ्यायची.पण वडिलांना ते अजिबात मान्य नव्हते. अमेरिकेंत जाऊन पोरगा वाया जाईल कोणा गोऱ्या मडमेच्या
मोहपाशांत फसेल आणि आपल्याला कायमचा दुरावेल. एवढ्या मोठ्या इस्टेटीचे मग करायचे काय ही भीती त्यांच्या मनांत ठाण मांडुन बसली. कदाचित त्यामुळेच अधटरावांचे आणि भगवंताचे कडाक्याचे भांडण झाले असावे. आपल्याला खरे कारण समजणे शक्य नाही,
भगवंतरावांनी घर सोडताना पुढे काय होईल त्याचा विचारच केला नव्हता. अंगात तारुण्याचा जोष होता, रग होती. आपण काय वाटेल ते करू शकतो असा दांडगा आत्मविश्वास होता. हीच त्यांची शिदोरी होती. अमेरिकेंत जायचे स्वप्न विरून गेले होते. जे काय करायचे ते इथेच करायचे होते. आयुष्याचा हा काळ मोठा कसोटीचा होता. पण तरुण भगवंताने धीर सोडला नाही. ( हो, भगवंतच. भगवंताचे भगवंतराव नंतर होणार होते.) घर सोडताना नाही म्हणायाला जवळ सोन्याची अंगठी आणि गळ्यांत एक चेन हे एवढेच मौल्यवान आयटेम होते. हे दोन्ही ऐवज सोनाराकडे गहाण टाकून काही हजार रुपये त्याने उभे केले आणि आयुष्याच्या नव्या वाटेवर वाटचाल सुरु केली.
एक सायकल घेऊन त्याने ‘ वितरणाच्या ' धंद्याला सुरवात केली. तयार कपड्यांच्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन तो छोट्या मोठ्या द्कानादारांंपर्यंत पोहोचवायचा व मधले कमिशन ठेवायचे ह्यावर त्याने धंद्याला सुरुवात केली. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या छोटया छोटया वस्तींतून किंवा गावांतून सायकल हाणत तो तयार कपडे विकू लागला. हळू हळू त्याला लोकांच्या आवडीनिवडी समजू लागल्या. गावातल्या सरळ साध्या लोकांना लाल ,हिरवा, निळा, पिवळा हे रंग आवडतात हे त्याने हेरले. थोडे फँसी कपडे त्यांना लुभावतात हे त्याला समजल्यावर तो त्याप्रमाणे कपडे आणू लागला. मार्केटिंगचे पहिले धडे त्याने इथेच घेतले. बाजारासारखा गुरु दुसरा कोणीही नाही ह्याची जाण त्याला आली. हे तो आयुष्यात कधीही विसरणार नव्हता. गावातल्या आठवडे बाजारांंत, मधून मधून होणाऱ्या जत्रांतून आणि उरुसांतून स्वतःची पथारी पसरून त्याने स्वतःचा माल विकायला सुरवात केली. जत्रेला, उरुसाला येणारे लोक घराच्या लहान-थोरांसाठी हौसेने कपडे खरेदी करतात. त्यांना भगवंताचे रंगीबेरंगी नवीन फॅशनचे कपडे पसंद पडत. फायदा चांगला होत होता. पण भगवंता इथेच थांबणार नव्हता. त्याने आता स्वतःचाच नवीन ब्रँड काढला. धंदा वाढत चालला होता. बघता बघता तो शहरांतल्या दोन तीन स्टोर्सचा मालक झाला. भगवंताचा भगवंतराव झाला.
तेथपासून ते कारखान्याचे मालक कसे झाले,त्यांचे लग्न कसे झाले, त्यांची एकुलतीएक मुलगी लतिका किती हुश्शार नि दिसायला कित्ती सुंंदर होती हे सर्व सविस्तर लिहायला हे काही भगवंतरावांनी स्पॉन्सर केलेले स्वतःचे आत्मचरित्र नाही. खर तर आता त्यांचा खून कसा करायचा ह्याचे विचार माझ्या मनांत चालले होते. पण त्याआधी आपल्याला अजून एका व्यक्तीची ओळख करून घ्यायला पाहिजे.
ती व्यक्ति म्हणजे सतीश. सतीश हा गरिबीतून वर आलेला एक हुशार तरुण होता. त्याला स्वतःच्या बुद्धिमत्ते बद्दल प्रचंड अभिमान होता. आणि का नसावा? आपल्या त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्याने व्यवस्थापनाच्या सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवला होता.तेथून पास झाल्यावर त्याने भगवंतरावांच्या तयार कपड्यांच्या बिझीनेस मध्ये मॅनेजर म्हणून नोकरी पटकावली होती. भगवंतरावांनी एच् एस् ब्लू ब्रॅंडची सर्व जबाबदारी त्याच्यावर टाकली. ह्या परीक्षेत सुद्धा तो चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण झाला. भगवंतरावांच्या एच् एस् ब्लू ब्रॅंडला त्याने देशांत एक मानाचे स्थान मिळवून दिले. मध्यपूर्वेंत एच् एस् ब्लू ब्रॅंडचा विस्तार करण्याची कल्पना त्याचीच. भगवंतराव सतीशच्या हुशारीवर आणि कर्तबगारीवर खुश होते.
माझ्या कथेची ही सुरवात होती. सर्व मुख्य पात्रांची ओळख करून झाली होती. हे मी ह्या इथे थोडक्यांत लिहिले आहे.माझ्या कथेंत म्हणजे --छापील पुस्तकांत—ह्या नमनावरच कमीतकमी वीस पंचवीस पाने जाणार होती.किती पाने कुठे वाढवायची किंवा कमी करायची हे आमचे कौशल्य!
ह्यापुढचा भाग महत्वाचा होता, तो म्हणजे भगवंतरावांचा खून. खून पिस्तुलाच्या गोळीने करायचा हे देखील निश्चित केले होते. गळा दाबून अथवा सुऱ्याने भोसकून खून करण्याची कल्पना मला कशीचीच वाटली. हे भगवंतरावांच्या स्टेटसला शोभणारे नव्हते.
बिच्चारे भगवंतराव! इथे एक माणूस त्यांचा खून कसा करावा ह्याबद्दल विचार करतो आहे.खून आज रात्रींच करायचा हे पण मी नक्की केले होते. भगवंतरावांना थोडी जरी कल्पना असती की आज रात्री आपला खून होणार आहे तर त्यांनी काय केले असते? भगवंतरावांचे सोडून द्या. कुणाही सर्वसामान्य माणसाची काय प्रतिक्रिया झाली असती? ( ही कल्पना छान आहे . एक कथा लिहातला पाहिजे. नोट करून ठेवायाला पाहिजे.) त्याने कदाचित स्वतःला एका बंद खोलीत डांबून घेतले असते. एका डॉक्टर पण तयार ठेवले असते. हृदयविकाराचा झटाका आला तर. एखाद्या दारुड्याची प्रतिक्रिया गमतीची झाली असती.एखाद्या प्रेमी युगलाने शेवटचे तास एकमेकांच्या मिठीत ----
पण दैवात जे काही लिहिले असेल ते काही टळत नाही. ती परिक्षित राजाची गोष्ट आठवा. माहित नसेल तर जाऊद्या.
रात्रीचे जेवण आटोपून भगवंतराव टीवीवरचा कुठलातरी कार्यक्रम पहात बसले होते. इतक्यांत त्यांना सतीशचा फोन आला. सतीश भेटायला येणार होता. सतीशला तशी परवानगीची जरुरी नव्हती. सतीश आला तेव्हा तो काय काम काढून आला असावा याची भगवंतरावांना अजिबात कल्पना नव्हती.
“ अरे , सतीश ह्यावेळी? काय खास प्रॉब्लेम ? दुबईतून फोन बिन आला आहे काय?,” भगवंतरावांनी काळजीच्या स्वरांत विचारले.
“ नाही ,तस काही नाही,” सतीश बोलताना थोडा अडखळला. बोलावे की नाही, बोलावे तर कसे बोलावे अश्या व्दिधा मनस्थितीत असावा.
“ बोल, सतीश काही संकोच करू नकोस.काही पैशाची गरज असेल तरी बिन दिक्कत सांग. कुठे मोठा फ्लॅट बुक करतो आहेस का? खुशाल कर. पैशाची काळजी न करता. अरे मी आहे न.”
भगवंतरावांच्या ह्या बोलण्याने त्याला थोडा उत्साह आला, “ तसे काही नाही आहे. आपल्याला कसे सांगू?” सतीश क्षणभर बोलायचे थांबला. मग सारे धैर्य एकवटून तो भडभडा बोलत गेला.
“ माझे लतिकेवर प्रेम आहे आणि तिचेही माझ्यावर. आम्ही दोघांनी विवाहबद्ध होण्याचे हरवले आहे. त्यासाठी आपली परवानगी मागायला आलो आहे.” सतीशने आपले मन मोकळे करून सांगितले.
भगवंतरावांच्या स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. ज्या चिमुरडीला मी इतक्या प्रेमाने लहानाचे मोठे केले, सर्व लाड कौतुकाने पुरवले, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ती लतिका अशी निघाली? तिने असा विश्वासघात केला? त्यांना सतीशचाही भयानक राग आला. माझ्या ऑफिस मधल्या एका दीड दमडीच्या मॅनेजरने मझ्या मुलीवर प्रेम करण्याचे धाडस करावे? माझी मुलगी काय रस्त्यावरच्या झाडावरचे फळ आहे की कुणाही वाटसरुने यावे, दगड मारावा,आणि पाडून खावे. तिच्यासाठी कित्येक मोठ्या घराण्यातल्या तरुणांची प्रपोजल आली होती. त्यांना डावलून मी ह्या भणंगाच्या हाती लतिकेचा हात द्यावा?
एखाद्या ज्वालामुखीचा स्फोट व्हावा तसे भगवंतराव गर्जून उठले, " सतीश मी तुझा अपमान करायच्या आधीच तू येथून चालता हो. तू खाल्ल्या घराचे वासे मोजणारा माणूस! ज्याला आपला वकूब, आपली लेवल समजत नाही असा मॅनेजर काय कामाचा. माझ्या संपत्तीवर नजर ठेऊन प्रेमाच्या जाळ्यांत फसवणारा नीच माणूस. म्हणतो काय की माझे तिच्यावर प्रेम आहे. वा रे आला मोठा प्रेम करणारा. तू आत्ताच्या आत्ता , ह्या क्षणी इथून चालता हो. खबरदार पुन्हा लतिकेशी बोलायचा जरी प्रयत्न केलास तर,”
सतीशने बोलण्यासाठी तोंड उघडायचा प्रयत्न केला. त्या आधीच भगवंतराव कडाडले, “तू जर ह्या क्षणी इथून गेला नाहीस तर मी नोकरांना बोलावून तुला धक्के मारून बाहेर काढेन. गेट लॉस्ट . नाऊ.”
सतीशचे हृदय क्रोधाच्या, अपमानाच्या आणि निराशेच्या भावनेने भरून गेले.पण झाली तेव्हढी शोभा पुरे असा विचार करून तो बाहेर पडला.
त्याच रात्री भगवंतरावांचा गोळी मारून खून करण्यात आला होता. यथावकाश पोलिसांनी सतीशला संशयावरून ताब्यांत घेतले होते. सर्व पुरावे सकृतदर्शनी त्याच्याकडे बोट दाखवत होते.
इथपर्यंत माझी कथा लिहून झाली होती. संध्याकाळ झाली होती. लिहून लिहून माझे हात दुखायला लागले होते. डोके जाम झाले होते. त्यामुळे तो खून कोणी केला असावा या बद्दल माझाही गोंधळ सुऊ झाला. आता पुढचा भाग उद्याच लिहावा असा विचार करून मी बाहेर फिरायला गेलो.
दुसऱ्या सकाळी उठलो तेव्हा मला ताजेतवाने वाटत होते. रात्री झोपही चांगली झाली होती. सकाळी चहा प्याल्यावर डोक्यांत पुन्हा विचारचक्र सुरु झाले. खून कोणी केला होता ? सतीशने केला होता की अजून कोणी? सतीशला गुन्हेगार ठरवताना मलाच प्रशस्त वाटत नव्हते.(कदाचित माझ्या मध्यमवर्गीय मनांत सतीश विषयी सहानुभूतीची वा आपलेपणाची भावना असेल.) दुसरा मार्ग म्हणजे कुणातरी नोकराला गुंतवायचे.पण नोकर तरी उगाच का म्हणून असे अघोरी कर्म करतील? हा, कुणा नोकराशी भगवंतराव नीट वागले नसतील किंवा कुणाच्या एखाद्या क्षुल्लक चुकेवरून रागावून जाऊन कामावरून हाकलून दिले असेल. अश्या नोकराच्या मनात सूडाची भावना त्याला रात्रंदिवस जाळत असेल. हे सर्व व्यवस्थित विचार करून लिहायला पाहिजे होते. ह्या असल्या विचारांतच सर्व दिवस गेला.
संध्याकाळी प्रभाकर आला. प्रभाकर म्हणजे माझा मित्र. एका स्थानिक वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम करत होता.त्याची स्पेशॅलिटी म्हणजे क्राईम रिपोर्टिंग. शहरांत कुठेही खून, जबरी चोरी, बलात्कार, खंडणी वसुली, किडनॅपिंग, अथवा तत्सम घटना घडल्या की हा तिथे हजर ! हे सर्व प्रकार कसे केले जातात. का होतात, कोण करतो, ह्या बद्दल तो चालता बोलता एन्सायक्लोपिडिया होता.त्याच्या मैत्रीमुळे मला माझ्या काही कथांसाठी बीज मिळाले होते.
“ ऐकलस का तू,” म्हणून त्याने सुरवात केली, “ काल रात्री शहरातल पसिद्ध कापडव्यापारी सुरसुंडीकर मुसळे , त्याचा गोळी मारून खून करण्यात आला.”
मला एकदम हाय व्होल्टेज शॉक बसला. हे कसंं खरे असेल? प्रभाकर माझी गंमत तर करत नव्हता? माझी कथा तर ह्याने वाचली नाही ना ?
“ प्रभाकर, यु आर पुलिंग माय लेग्स. खरंं सांग.” मी त्याच्याकडे रोखून बघत बोललो.
आता आश्चर्यचकित व्हायची प्रभाकरची पाळी होती. “ तुझा चेहरा असा भूत पाहिल्यासारखा का झाला आहे ? अरे असे खून दर दोनदिवसाआड होत असतात. त्यांत एवढे धक्का बसण्यासारखे काय आहे ? तुझ्या ओळखीचा होता हा मुसळे ?”
“नाही तस काही नाही,” मी आवंढा गिळून आणि स्वतःला सावरून म्हटले,” नाही तश्यातला भाग नाही. पण नाव कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय. त्यांचे नाव भगवंतराव होते ना? ” मी प्रार्थना करत होतो की नाव काहीतरी दुसरे असेल. पण नाही.
“ बरोबर. अगदी बरोबर, तुला तर माझ्याहीपेक्षा जास्त माहिती आहे. मग सांग, का आणि कोणी केला असेल खून?” त्याने मला कोड्यांत टाकले,
मी नकारार्थी मान हलवली.
“ एवढ्या रहस्यकथा लिहून तुला ह्या साध्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही? खून हे साधारणपणे पैशा वरून नाहीतर प्रेमप्रकरणातून होतात. इथे प्रेमाची भानगड आहे. त्याच्या मॅनेजरचे आणि त्याच्या लतिका नावाच्या मुलीचे लफडे होते. प्रभुदेसाई, जर का दारूबंदी सारखी प्रेमबंदी केली तर किमान अर्धे खून कमी होतील. इफ स्मोकिंग कॅन किल देन लव आल्सो कॅन! ” तो हसत हसत बोलला. आता जो माणूस प्रेमाला ‘ लफडे ‘ म्हणतो त्याच्याकडून तुमची अजून काय अपेक्षा असणार.
मी याच्या ‘ विनोदा ‘ कडे दुर्लक्ष करून विचारले “ मग पुढे काय झाले? पोलिसांचा कुणावर संशय आहे का ?” अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर देखील मला माहीत होते पण काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले.
“ पोलिसांनी पकडले असे नाही पण त्याचा मॅनेजर सतीश आहे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.” प्रभाकरने माहिती पुरवली.
हे काहीतरी भलतच प्रकरण आहे. माझ्या एका साघ्या कथेने किती लोकांच्या जीवनात हाहाःकार माजवला. का हा काही भुताटकीचा प्रकार आहे काय?. माझ्या अंगातून भीतीची लहर निघून गेली.
मनावरचे दडपण दूर करण्यासाठी बाहेर पडून थोडे फिरून यावे असा विचार करून मी प्रभाकरला म्हटले,” चल बाहेर जाऊन चहा घेऊ. “
हा निव्वळ योगायोग असावा अशी मनाची समजूत घालून मी रात्र कशीतरी तळमळत काढली, भगवंतराव, सतीश, लतिका ह्याच व्यक्ति आलटून पालटून डोळ्यासमोर येत होत्या.पहाटे कसाबसा डोळा लागला.सकाळी उठलो तेव्हा मन थोडं शांत झाले होते. विचार केला ह्या सर्व प्रकाराचा छडा लावण्याचा एक मार्ग होता – कथेचा पुढचा भाग लिहून बघूया काय होते ते. मनाचा निश्चय केला आणि कथेचा पुढचा भाग लिहिण्यासाठी बसणार तेवढ्यांत दारावरची घंटी वाजली. लिहायचा जरा चांगला मूड आला होता तेवढ्यांत कोणीतरी हजर. दार उघडून कोण आला असेल त्याला वाटेला लावावे असा विचार करून मी दरवाजा उघडला.
समोर एक नीटनेटका पोशाख केलेला एक तरुण उभा होता. मी काही बोलायच्या आताच त्याने सुरवात केली.
“ मी राजीव देशपांडे.मी आत येऊ शकतो काय? मला आपल्याशी काही बोलायाहे आहे – अर्थात आपली परवानगी असेल तर.” तद्दन नाटकीपणाने तो बोलला.
त्याची बोलण्याची पद्धत बघून मला मजा वाटली. मी माझे हसू दाबून त्याच्याच स्टाइलमध्ये त्याला उत्तर दिले, “राजीव देशपांडे, माझी परवानगी आहे. बोला काय बोलायाचे आहे ते. त्याआधी थोडे बसा.”
राजीव देशपांडे कोचावर बसला. कशी सुरवात करायची ह्याचा विचार करत असावा,
“ तुम्ही ही सतीशच्या केसबद्दल वाचले असणारच असे मी धरून चालतो. बरोबर ?”
म्हणजे हे माझ्या कथेतील नवीन पात्र दिसते आहे !
“ बर मग त्याचे काय ? त्याची खमंग गोष्ट सांगायाला तुम्ही आला आहात काय ? हे पहा मला गप्पा झोडायला -आणि ते देखील कोणा अनोळखी व्यक्ति बरोबर – वेळ नाही.” मी त्याला कटवायच्या उद्देशाने बोललो.
“ एक सेकंद, मला थोड बोलू तर द्या.अजून मी सुरवात देखील केलेली नाही.” तो अजीजीने बोलला. भल्या माणसा, सुरवात कर आणि शेवट पण कर. असे मी -पण मनातल्या मनात- बोललो.
“ सतीश माझा मित्र आणि माझा अशील पण आहे. पोलिसांचा सतीश वर भगवंतरावांचा खून केल्याचा संशय आहे.सतीशच्या दुर्दैवाने सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध आहेत. फक्त एक दोन कच्चे दुवे आहेत.”
अर्थात हे सर्व मला माहीत होते. कच्चा दुवा कुठला तोही मला माहीत होता. ज्या पिस्तुलाने भगवंतरावांचा खून करण्यात आला होता ते अजून पोलिसांना सापडले नव्हते. सतीशच्या केसचे नक्की काय करायचे हे मी अजून ठरवले नव्हते त्यामुळे हा दुवा मी मुद्दामच सोडला होता. उद्या सतीशला वाचावयाचे ठरवले तर ती गोष्ट उपयोगी ठरणार होती. ठीक आहे . हा काय म्हणतो आहे ते ऐकूया तरी. मग पुढे बघू काय करायचे ते.
“ आज सकाळी मी सतीशची पोलीस चौकीत भेट घेतली. तेव्हा त्याने मला हा तुमचा पत्ता दिला.त्याच्या म्हणण्याप्रमाणे फक्त तुम्हीच त्याला वाचवू शकाल. त्याला तुमच्याशी बोलायचे आहे. प्लीज तुम्ही माझ्याबरोबर चला आणि सतीशची भेट घ्या. नाही म्हणू नका.”
“ हे पहा राजीव, तुम्ही उगीचच मला ह्यात गुंतवत आहात.” मी काहीश्या नाराजगीच्या सुरांत बोललो. मी माझ्याच कथेत गुंतत चाललो होतो, मी माझ्याच कथेतील एक पात्र बनत चाललो होतो. ही परिस्थिती कशी हाताळावी ह्याबद्दल माझ्या मनात दुविधा निर्माण झाली होती. लेखकाने आपल्या निर्मितीत किती गुंतावे? हा एक विचार करण्याजोगा विषय आहे.
राजीव देशपांडे अस्वस्थ झाला होता. त्याचा चेहरा पडला होता. कदाचित माझ्याकडून त्याला अशी अपेक्षा नसावी. मी त्याला सरळ सरळ धुत्कारून लावेन अस त्याला वाटले नसावे.
“ ठीक आहे तर मग. तुमची एकंदरीत ह्या प्रकरणात पडायची इच्छा नाहीये तर. सतीशला मात्र खूप धक्का बसेल. तो माझ्याशी इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता की तुम्ही निश्चित यालच. त्याची ही
एकच आशा होती. नव्हे त्याची खात्रीच होती, पण जगात सर्वच काही आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही. दैवाचे फासे कधी उलटे, कधी सुलटे पडतात. त्याला आपण तरी काय करणार? मिस्टर प्रभुदेसाई, एक उमलते जीवन वाचवण्याची संधी आपल्याला मिळाली होती. ती आपण वाया घालवली का तर तुम्हाला ह्यापासून नामानिराळे रहावयाचे आहे. आपल्या आरामखुर्चीवर पहुडलेल्या आयुष्याला थोडी देखील आंच लावून घ्यायची आपली इच्छा नाही. पाण्यात बुडणाऱ्या माणसाला कोरड्या काठावर उभे राहून, कपड्यांची इस्त्री न बिघडण्याची खबरदारी घेऊन पोहण्याचे तंत्र वाचून दाखवणारे लोक तुम्ही. कदाचित सतीशची अवस्था पाहून आपल्याला मनांतल्या मनांत आनंद पण होत असेल. काही सांगता येत नाही. माणसांचा काही नेम नाही, पण एक लक्षात ठेवा. सर आय पिटी यू.”
त्याच्या या वाक्ताडणाने म्हणा वा मझ्या मनांतील विचाराने मला एक अपराधीपणाची भावना आली. खर तर सतीशच्या ह्या दयनीय अवस्थेला मीच कारणीभूत होतो. आणि फक्त आणि फक्त मीच त्याला वाचवू शकणार होतो.
“ ठीक आहे राजीव. मी यायला तयार आहे. केव्हा जाऊया आपण ?” मी मनाची तयारी केली.
“ केव्हा नाही. आत्ता लगेचच! मी सर्व तयारी करून ठेवली आहे, पोलीसांची खास परवानगी पण आधीच घेऊन ठेवली आहे.आता उशीर नको.”
“घरांतून बाहेर पडलो तेव्हा बुचाचे झाड जागेवर नव्हते हे माझ्या लक्षांत देखील आले नाही.
+++++++++++++++++++++++++=++++++=++=+++++==+=+++=+++==++++++=++++=++++=+=+
पोलीस चौकीत पोहोचलो तेव्हा पाहिले तर तिथे बाकड्यावर एक तरुणी मान खाली घालून विचारांत मग्न अशी बसलेली होती. ती लतिका होती हे मला सांगायची गरजच नव्हती. तरीदेखील राजीवने तिला हाक मारून तिची आणि माझी ओळख करून दिली. लतिका जशी मी कल्पना केली होती तशीच होती.
“ बरं झाले तुम्ही आलात ते. सतीश तुमच्या भेटीसाठी तळमळत आहे. तुम्हाला पाहून त्याला खूप खूप बरे वाटेल.” लतिका दोन तीन दिवस नीट झोपली नसावी, ते तिच्या चेहऱ्यावरुनच दिसत होते. डोळे लाल केस विस्कटलेले आणि कपडे चुरगळले ! एकीकडे वडिलांचे आकस्मिक निधन आणि दुसरीकडे प्रियकराचा एक पाय तुरुंगात एक पाय बाहेर.पण मुलगी मोठी धीराची असणार. तिची किती घालमेल होत असेल ते तिलाच माहीत, तरीही ती अजून उभी होती. धीराने परिस्थितीला सामोरे जात होती. मी आल्यामुळे तिला थोडा धीर आणि उत्साह आला.
राजीव पुढे येऊन लतीकेशी काहीतरी हलक्या आवाजांत बोलला. मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला ,” आपल्याला अगदी थोडकाच वेळ मिळणार आहे.”
मला खरं तर सतीशशी बोलायचीही गरज नव्हती. माझा निर्णय झाला होता. आज रात्रींच कथेचा पुढचा भाग लिहून सतीशला सबळ पुराव्याअभावी पोलीस सोडून देतात असे मला दाखवावयाचे होते. हे अर्थात तर्कशुध्द होते कारण ज्या पिस्तुलाने भगवंतरावांचा खून करण्यात आला होता त्याचा ठावठिकाणा लागणार नव्हता. मी पोलिसांना दुसरी लाईन पकडायला लावणार होतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या कोणा नोकराने ते दुष्कर्म केले असावे. काहीही असो, कुणी खून केला ते अजून ठरवले नव्हते. इतक्यांत पोलिसांनी सतीशला बाहेर आणले. मला समोर पाहून सतीशच्या थकलेल्या चेहेऱ्यावर थोडा तजेला आला. मी काही बोलायच्या आधीच तो हळुवार स्वराने पुटपुटला, “ थॅंक्स , वेळ काढून आल्याबद्दल.”
सतीश खुर्चीवर बसला. लतिका, मी आणि राजीव आम्ही त्याच्या समोर बाकावार बसलो. मध्ये एक लांब रुंद टेबल होते.थोड्या दूरवर एक पोलीस इन्स्पेक्टर आमच्यावर नजर ठेऊन होता.
“ सतीश, मला भेटायची प्रेरणा कुठून झाली ? मी तुला ओळखत नाही, अन् तू मला ओळखत नाहीस. तुला माझा पत्ता कोणी दिला ?” हे माझे सर्व अनुत्तरीत प्रश्न—त्यांची उत्तरे मी त्याच्याकडून अपेक्षित करत होतो.
“ कमाल करता, तुम्ही पण सर ,” सतीशच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.” संकटांत सापडलेला मी आणखी कोणाकडे जाणार? सर, तुम्हाला सर्व गोष्टींचे पूर्ण ज्ञान आहे, तुम्हाला माहीत आहे की मी निरपराध आहे. मला संकटांत टाकून तुम्ही माझी परीक्षा घेत आहात काय?”
लतिकेने पण त्याच्या बोलण्याला साथ दिली. “ प्रभुदेसाई सर, सतीश म्हणतोय ते खरच आहे. पुरे करा आता ही आमची सत्वपरीक्षा. गेल्या तीन चार दिवसांत आम्ही दोघांनी खूप सोसले आहे.सतीश बिच्रारा पोलिसांच्या प्रश्नांच्या भडिमाराखाली पुरता खचला आहे. त्याला ह्यातून सोडवले नाही तर तो काही दिवसांनी ठार वेडा होईल. हो माझ्या वडिलांचा खून झालेला आहे पण माझी पूर्ण खात्री आहे की त्यामध्ये सतीशचा काडीचाही संबंध नाही. ह्या उपर आपली मर्जी. आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो.”
“मनापासून केलेल्या प्रार्थनेत महान शक्ति असते.” मी लतिकेला उद्देशून म्हणालो. त्याक्षणी माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. परीक्षाच घ्यायची झाली तर लतिकेचीच का घेऊ नये?
मी लातिकेला खुण केली. “ जरा बाहेर चल. मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.”
आम्ही दोघे बाहेर आलो. “ चहा पिणार ? चहा घेतलास की थोडे बरे वाटेल.’
“ नाही, चहा प्यायचा मूड नाही, आपल्याला पाहिजे असेल तर आपण घ्या.”
मला अर्थातच पाहिजे होता.
चहाचा कप हातांत घेऊन मी आणि लतिका थोडे बाजूला जाऊन उभे राहिलो.
“ लतिके एक विचारतो, राग मानू नकोस, तुझे सतीशवर प्रेम आहे ना ? मग त्याच्यासाठी तू काय त्याग करू शकतेस? “
“ अगदी काहीही. तुम्ही मागाल ती आहुती मी देईन.”
“ समज, फक्त एक शक्यता धरून मी बोलतो आहे. समज सतीश ह्याच्यात अडकला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तर तू त्याच्याशी लग्न करशील?”
हा खूप कठोर प्रश्न होता.
लातिकेचे डोळे आसवांनी भरून आले. बिचारी. तिने डोळे पुसावयाचे पण कष्ट घेतले नाहीत. भावनांचा आवेग आवरून तिने आपले मन घट्ट केले असावे.तिच्या चेहेऱ्यावर एक नवीनच चमक आली.
“ तुमची हीच इच्छा असेल तर मग प्रश्न विचारू नका – गो अहेड अँड डू व्हाटेवर यू वॉट टू डू. आणि मग माझे उत्तर आपल्याला मिळेलच.” ती एकदम चूप झाली.
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. “ तुम्हा दोघांची जी इच्छा आहे तसेच होईल. तथास्तु.”
आम्ही दोघेही आत घेलो. बाहेर आम्ही दोघांनी काय चर्चा केली ती जाणून घ्यायची सतीशची व राजीवची इच्छा असणार. “ सतीश मी आता जातो. ही लतिका तुला सगळे सांगेलच. पण एक महत्वाची गोष्ट आठव. तुझा मोबाईल फोन कुठे गेला ? आणि आठवेल तेव्हा पोलिसांना सांग तो शोधायला. सर्व कोडे तेथेच सुटेल. होप फॉर द बेस्ट.” मी गूढपणे हसून त्याचा निरोप घेतला.
घरी येऊन कथा पुढे लिहायला सुरवात केली.पोलिसांनी सतीशला संशयावरून ताब्यांत घेऊन चौकशीला सुरवात केली होती तिथपर्यंत कथा लिहून झाली होती.
निराश होऊन भगवंतरावांच्या घरांतून सतीश बाहेर पडला. आपण खानदानी श्रीमंत नाही आहोत याची त्याला तीव्रतेने जाणीव झाली. लग्नांत असल्या बाबींचा विचार केला जातो हे त्याला आज उमजले. त्याला स्वतःलाच आपण लतिकेच्या लायकीचे नाही ह्याची त्याला लाज वाटली. ह्या समाजांत हुशारीला ,कर्तृत्वाला कोणी विचारत नाही.पैश्यापुढे सर्व फुका आहे.
यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डित स श्रुतवान् गुणज्ञः ।
स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते ||
हे कडू सत्य त्याला भगवंतरावांनी उघड करून दाखवले. आपण दीड दमडीचे, भगवंतरावांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे! असा मी लतिकेवर प्रेम करत सुटलो ! कडवट भावनांनी त्याचे मन सैरभैर झाले. अति आनंदात काय किंवा अति दुखात माणसाचा तोल सुटतो, त्याचे भान हरपते. आपण काय करतो आहोत त्याची त्याला जाणीव रहात नाही. सतीशचे तेच झाले. स्वतःचा अपमान, त्याची वाटणारी लाज त्यातून आलेला न्यूनगंड ह्याची त्याला किळस वाटली. आजूबाजूचा सर्व परिसर त्याला अनोळखी वाटू लागला.आपण एक भयानक मोठी चूक केली आहे अशी तीव्र टोचणी त्याला लागली.आपल्या आयुष्याची आहुती देऊनच त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे अघोरी विचार त्याच्या मनात धुमाकूळ घालू लागले.पाय जिकडे नेतील तिकडे जात तो त्या शहरातल्या गल्लीबोळातून त्या भयाण रात्री भटकू लागला.
आणि त्यचे पाय अपोआप दारूच्या गुत्त्याकडे वळले. ( त्याला दारूच्या गुत्त्याकडे वळवताना मला काही बरे वाटले नाही पण कथा पुढे नेण्यासाठी ते आवश्यक होते.----मी ) आयुष्यात प्रथमच तो ह्या मार्गाकडे वळला होता. तिथले वातावरण बघून त्याला एरवी तिटकारा आला असता पण आज त्याला त्याची आपुलकी वाटली.तिथे बसून पिणारे अनोळखी लोकच त्याला आपले मित्र आणि नातेवाईक वाटू लागले.त्या सर्वांशी एकत्र बसून गप्पा हाणत मोठ्या आनंदाने इथेच पीत पीत रात्र मजेत घालवावी असे त्याला वाटू लागले. असे जिगरी दोस्त कित्येक वर्षांनी भेटल्यावर मग गाणी तर गायला पाहिजेतच. हिदी फिल्ममधल्या कित्येक गाण्यांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली. दारू न पिताच त्याला चढली होती.
(त्यानंतर सतीशने तेथे काय धमाल केली आणि गोंधळ घातला. नि त्याला तिथल्या वेटरने कसे धक्के मारून व त्याचे पाकीट आणि मोबाईल काढून घेऊन त्याला बाहेर फेकले ह्या सर्वांचे वर्णन करायची गरज नाही. माझ्या कथेत ते सर्व येईलच. ह्या गोष्टीत ते महत्वाचे नाही. हां, पण एक बाब तरीही लक्षांत ठेवायला पाहिजे ती म्हणजे तो मोबाईल ! )
सतीशला त्याच्या मोबाईलची आठवण करून देऊन मी चौकीच्या बाहेर पडलो. मग त्याच्या डोक्यांत एकदम प्रकाश पडला. त्याने पोलिसांना हजार वेळां सागितले होते कि भगवंतरावांशी भांडण झाल्यावर तो कसा वेड्यासारखा शहरांतून भटकत होता. पण दारूच्या गुत्त्यातला गोंधळ आणि त्याला वेटरने केलेली मारहाण सांगायचे धैर्य त्याला होता नव्हते. किती अपमानास्पद होती ती गोष्ट! मी त्याला सूचना केल्यावर त्याचे महत्त्व त्याला कळले पोलिसांनी मोबाइलचा, त्या गुत्त्याचा, आणि त्याचा मोबईल हिसकावून घेण्याऱ्या वेटरचा छडा लावला तर तो खुनाच्या वेळी भगवंतरावांच्या बंगल्यापासून कितीतरी दूर त्या गुत्त्यात भसाड्या आवाजांत गाणी गाऊन दंगा करत होता असे शपथेवर सांगणारे कितीतरी साक्षीदार मिळणार होते.
हे सगळे मी माझ्या कथेत सविस्तर लिहिले आणि सतीशच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.
++=+++++++++=++++==+=+++++===++++=++=++++===+=+==

सकाळी उठलो आणि प्रथम ताजा पेपर बघितला. भगवंतरावांच्या केसची ताजी बातमी वाचायची होती. सतीशची जामिनावर सुटका व्हायला पाहिजे होती. तो सुटला की नाही ? माझ्या कथेप्रमाणे तो आता सुखाने घरी परतला असणार. पण माझी निराशा झाली. भगवंतरावांच्या केस बद्दल काहीही बातमी नव्हती. पेपरवाले पण असे संधिसाधू असतात. त्यांना दुसरा काहीतरी भडक विषय मिळाला असणार. तेव्हा ही केस ते साफ विसरून गेले असणार. माझी मात्र पूर्ण खात्री होती की सतीश घरी सुटकेचा निश्वास सोडून नाश्ता करत बसला असणार.
मी त्याला तसे वचनच दिले होते.
सतीश मला फोन करेलच ह्याची मला पूर्ण खात्री होती. दुपारचे अकरा वाजत आले होते. पण कुणीच मला फोन केलेला नव्हता. सतीशने तर नाहीच पण लतिका किवा सतीशचा तो वकील
ह्यापैकी कुणीही साधे आभारी आहे अस म्हणायलाही फोन केला नव्हता. कमाल आहे ह्या लोकांची. लोक एवढ्या लवकर विसरूनही जातात हं. इतके कृतघ्न असतात ? अरे, ह्यांना माहीत नाही की मनात आले तर मी एका तासात सतीशची वाट लावू शकेन. नाही पण काही करायच्या आधी आपणच सतीशला जाऊन भेटायला काय हरकत आहे ? बिचारे सतीश आणि लतिका दोघेही थोडे रिलॅक्स करत असतील . त्यामुळे झाला असेल त्यांंना उशीर. मला एवढे नाराज व्हायचे कारण काय.
आणि जर पर्वत मोहंमदाकडे जात नसेल तर मोहंमद पर्वताकडे जाईल!
मी सतीशच्या घरचाच फोन लावला. कुणीतरी उत्तर दिले की सतीश साहेब ऑफिस मध्ये आहेत.
घरांतून बाहेर पडायच्या आधी सहज नजर गेली. बुचाचे डौलदार झाड वाऱ्यावर झुलत होते.
सतीशच्या ऑफिसचा पत्ता घेऊन मी टॅक्सी पकडून सरळ त्याच्या ऑफिसमध्ये थडकलो.
एका मोठ्या डेस्कच्या मागे फिरत्या खुर्चीवर सतीश विराजमान होता. मला त्याचे कौतुक वाटले. एवढ्या मोठ्या संकटातून हा माणूस बाहेर पडला आणि लगेच कामाला सुरवात. काल ह्याची इतकी दयनीय अवस्था झाली होती . बिचारा रडकुंडीला आला होता. आणि आता रुबाबदारपणे इथे कामात गढून गेला आहे.
सतीशच्या ऑफिस मध्यें प्रथम त्याच्या सेक्रेटरीची मुलाखत झाली. हे असेच असते. शंकर महादेवाच्या देवळांत आधी नंदीचे दर्शन घ्यावे लागते.
“ मला सतीशला भेटायचे आहे.” मी सरळ सुरवात केली.सतीशच्या एकेरी उल्लेखाने तो काहीसा नाराज झाला असावा.
“ माझे नाव प्रभुदेसाई. त्याला सांगा की मी भेटायला आलो आहे.” मी त्याला जरा चढ्या आवाजात सांगितले.
त्याने माझ्याकडे पाहून प्रश्नार्थक चेहेरा केला. “ काम काय आहे ते .....”
मी त्याला मधेच थांबवले.” त्याला फक्त माझे नाव सांगा. त्यांना सर्व काही समजेल.” नाजूक गोष्टींचा त्याच्याबरोबर कशाला ऊहापोह करायचा.
त्याचे आणि सतीशचे फोनवर हलक्या आवाजांत बोलणे झाले.
“ जा तुम्ही आंत जा.साहेबांनी तुम्हाला आंत ओलावले आहे.”
मी दरवाजा ढकलून केबिनमध्ये प्रवेश केला. फिरत्या खुर्चीत बसून सतीश एका वयस्क आणि गरीब दिसणाऱ्या माणसाला काही समजाउन सांगत होता.माझ्याकडे त्याने पूर्ण दुर्लक्ष केले होते.
हुशार मॅनेजर ते एक लक्षण होते. मॅनेजमेंटच्या कोर्स मध्ये हे सर्व शिकवले जात असावे. समोरच्या माणसाचा वकूब एका नजरेत ओळखा आणि तो आपल्यापेक्षा कमी स्तराचा असेल तर त्याच्याकडे आधी दुर्लक्ष करा. मग त्याच्यावर उपकार करतो आहेत अशा थाटाने त्याच्याशी बोला. समोरचा जर आपल्यापेक्षा वरच्या दर्ज्याचा आहे असे वाटले तर सर्व कामे बाजूला टाकून त्याच्याशी अजीजीने बोला. पण सतीश असा नसावा. किमानपक्षी माझ्याशी तरी असा वागेल अशी अपेक्षा नव्हती.पण माझा अंदाज सपशेल चुकला.
तब्बल दहा मिनिटांनी सतीशने आपल्या असिस्टंटला बाहेर पाठवून मग सतीश माझ्याकडे वळला.
“ माफ करा, पण मी आपल्याला ओळखले नाही, आपण कधी भेटलो असं मला तरी आठवत नाही. पण कदाचित माझी काहीतरी चूक होत असेल तर मी खरोखरच दिलगीर आहे. आपल नाव काय बर म्हणालात ?”
“प्रभुदेसाई,” मी हसून म्हणालो.
“ ओ येस् , कुठेतरी ऐकाल्यासारखे सारखे वाटते आहे. थांबा एक मिनिट हं मला आठवू द्या. हा आठवले. ते राहस्यकथा लिहिणारे ......”
“हो ,तोंच तो मी. पण ते सोडून द्या. आपण दोन दिवसापूर्वीच पोलीस चौकीत भेटलो होतो.
मी तुला आणि लातिकेला वचन दिल्याप्रमाणे, तुला पोलीस चौकशीच्या कचाट्यातून सोडवले. लगेचच तुला काल पोलिसांनी सबळ पुराव्या अभावी मुक्त पण केले. अभिनंदन!” मी हसून म्हटले, “ ठरवा कुठे पार्टी करायची ते . मी तर काय मोकळाच आहे. म्हणाल तिथे यायची तयारी आहे आपली.”
सतीश पुरता गोंधळलेला दिसला. आता ह्याचा काय प्रॉब्लेम आहे? पोलिसांचे अजून काही
पूर्ण समाधान झाले नव्हते की काय? छे असे होणे शक्यच नव्हते. माझ्या कथेप्रमाणे मी त्याची पूर्ण सुटका केली होती.मग ह्याच्या चेहऱ्यावर असे भाव का आहेत?
“ मिस्टर, आपला काहीतरी गोंधळ होतो आहे. आपण म्हणता की आपण सर्वजण दोन दिवसापूर्वी पोलीस चौकीत भेटलो. एक तर मी तुम्हाला आज आत्ता प्रथमच भेटतो आहे. आणि परवा मी पूर्ण दिवस दुबईतून आलेल्या आमच्या एजेंट बरोबर बिझी होतो. आणि ही लतिका कोण?”
मी पण आता पूर्ण चक्रावलो. हा सतीश म्हणजे एकदम वाया गेलेली केस दिसते आहे. माणासावर अशी भयानक संकटे आली की त्याचा मेंदू बधीर होऊन जातो. त्यातलाच हा प्रकार असावा.
“ ही लतिका कोण? हे तू मला विचारतोस? तीच ती लतिका – तू जिच्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतोस, आणि त्यामुळे तुझे आणि भगवंतरावांचे त्या रात्री कडाक्याचे भांडण झाले. आणि त्याच रात्री भगवंतरावांचा निर्घृणपणे खून करण्यांत आला. पोलिसांचा तुझ्यावर संशय होता म्हणून त्यांनी तुला ताब्यांत घेऊन चौकशी चालू केली. आणि तू मला बोलावून घेऊन “ ह्यातून मला सोडवा “ अशी कळकळीची विनंती केलीस. लतिकाही तिथे होती. तुम्हा दोघांचे दिव्य प्रेम पाहून माझे हृदय परिवर्तन झाले आणि मी तुला ह्या संकटातून वाचवायचे ठरवले. म्हणून तू आज इथे रुबाब करतो आहेस आणि माझ्याशी ओळख पण दाखवत नाहीस. माणसे किती कृतघ्न असतात त्याची मला आज प्रचिती आली.” मी पण भडभडा बोलून टाकले.
“ तुम्ही हे काय बोलता आहात? माझे डोके चक्रावून गेले आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आज सकाळीच माझी भगवंतरावांशी मीटिंग झाली. रहता राहिली लतिका. ती गेली तीन वर्षे अमेरिकेत एम् बी ए चा अभ्यास करत आहे.तिथे तिचे लग्न पण ठरलं आहे.मी तिला दोनदा किवा तीनदा भेटलो असेन.” सतीश माझ्याकडे टक लावून पहात होता. “ मिस्टर प्रभुदेसाई मला वाटते कि आपली तब्येत ठीक नाहीये. माझ्या ओळखीचे एक चांगले डॉक्टर आहेत. मी त्यांना फोन करतो. तोवर तुम्ही माझी गाडी आणि ड्रायवर घेऊन जा. तो तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईल. मग घरी पण सोडेल. आता तुम्ही बाहेर बसा. मी तुमच्यासाठी चहाची व्यवस्था करतो.”
आता मात्र माझा राग अनावर झाला. “ सतीश, तू काय मला वेडा समजतोस काय? मी तुला ह्या प्रकरणातून सहीसलामत सोडवले त्याची ही अशी परतफेड करतोस काय ? पण एक गोष्ट लक्षांत ठेव.मी जस तुला आज वाचवले तसेंच पुन्हा ह्या प्रकरणांत गुंतवू शकतो. तेव्हा पुन्हा माझ्याकडे रडत भेकत येऊ नकोस. लक्षांत ठेव हे माझे शब्द. मला तुझ्या डॉक्टरची आणि ड्रायवरची गरज नाही.मी ठणठणीत बरा आहे. येतो आता मी.”
मी रागारागाने सतीशच्या केबिन मधून बाहेर पडलो.खाली येऊन नजदीकच्या ठेल्यावर एक कटिंग चहा प्याल्यावर मला थोडे बरे वाटले. सतीशला पुन्हा कसे लटकावयाचे त्याचा पूर्ण प्लॅनिंग करूनच मी घरी परतलो.
माझ्या लक्षांत एवढे देखील आले नाही की बुचाचे झाड नाहीसे झाले होते.
मी समोर कागद ओढले आणि लिहायला सुरवात करणार तोच दारावरची बेल वाजली. आता कोण आले त्रास द्यायला ? मी काहीश्या नाराजगीनेच दरवाजा उघडला तर लतिकाच समोर उभी!
मी काही बोलायच्या आधीच तिने बोलायला सुरवात केली.
“ माफ करा मला. सतीशने मला सर्व सांगितले, त्याचे बिचाऱ्याचे डोके ताळ्यावर नाही. त्यामुळे तो असा वेडेवाकडं बोलला. आधी तर त्याने तुम्हाला ओळखलेच नव्हते. तुम्ही गेल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. प्लीज त्याला माफ करा.तुम्ही त्याला क्षमा केल्याशिवाय मी येथून जाणार नाही.”
मी पण काय करणार. तिचा चेहरा पाहून माझे हृदय पुन्हा द्रवले.
“ लतिके तू निश्चिंत होऊन जा, मी प्रॉमिस करतो की सतीशला पुन्हा संकटांत टाकणार नाही. जा तू आता. “
ह्यावेळी लतीकेने माझ्या पायाला स्पर्श करून मला नमस्कार केला. एक शब्दही न बोलता ती बिचारी जशी आली तशी परत गेली.
मी माझ्या कथेचे सर्व कागद एकत्र केले आणि फाडून टाकून कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले.
संध्याकाळी नेहेमीप्रमाणे प्रभाकर आला. आम्ही गप्पा मारायला सुरवात केली. गप्पांच्या ओघांत माझ्या तोंडातून सहज निघून गेले, “ प्रभाकर, तुला ते भगवंतराव मुसळे माहीत आहेत का?”
“ हो, माहीत आहेत ना. तुला त्यांची आज कशी आठवण झाली. तुझे ब्लड प्रेशर वाढले की छातीत दुखायला लागले. बाकी डॉक्टर मोठा हुशार आहे. तुला अपाँटमेंट पाहिजे तर सांग. आपली तेथे ओळख आहे. नाहीतर त्याची अपाँटमेंट मिळणे खूप मुश्कील आहे बर का.” प्रभाकरने एका दमांत सगळे सांगून टाकले.
“ नाही. तसं काही नाही, माझे सर्व काही ठीक आहे. सहज म्हणून विचारले. चल , आपण चहा प्यायला जाऊ या.”
एक छोटीशी पावसाची सर आली आणि गेली. आता वातावरण एकदम स्वच्छ झाले होते. खिडकीतून बघितले तर दूरदूरचे डोंगर अगदी क्लिअर दिसायला लागले होते .
अंगणातले बुचाचे झाड हवेच्या झोक्यावर डौलदारपणे झुलत होते. आणि जणू काय माझ्याडे बघून मिस्श्कीलपणे हसत होते.

कथालेख