माम्मा  मिया

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
13 Apr 2020 - 1:05 am

चिकोडी तालुक्यातल्या एकसंब्याचा पहिलवान श्रीपती खंचनाळे जेव्हा "हिंद केसरी"ची लढत दिल्लीत जिंकला तेव्हा सगळ्या चिकोडी तालुक्याला आणि कोल्हापूर-बेळगांव परिसरातल्या कुस्ती शौकिनांना  ही कुस्ती बघण्यासाठी आपण दिल्लीला हजर नसल्याची चुटपूट लागलेली होती. जर तीच कुस्ती कोल्हापुरात झाली असती तर हेच सगळे कुस्ती शौकीन, गावागावांतून वर्गणी काढून, कसेही करून आपापल्या गावातून ६०-७० मैलांचा प्रवास करून खासबागेत घुसून "त्यांच्या" पहिलवानाची ही ऐतिहासिक कुस्ती प्रत्यक्ष बघण्याकरता हजर राहिले असते. एव्हढेच नव्हे तर कुस्तीनंतर श्रीपती खंचनाळेला त्याच्या मानाच्यागदेसह पाहतानाच्या उन्मादांत त्याला गदेसह आळीपाळीने खांद्यावर उचलत, पटके आणि गुलाल उडवत, पूर्ण कोल्हापूरभर लेझीम, ढोल इत्यादींच्या गजरात मिरवण्यातही सामिल होऊन मगच हे सगळे कुस्ती शौकीनआपापल्या गांवी परतले असते.  

अगदी तशाच उन्मादांत उत्तर इटालीतल्या बर्गामो तालुक्यातले लोक फेब्रुवारी २०२० मध्ये होते कारण  "त्यांची" अटलांटा टीम युरोपिअन चॅम्पियनशिपच्या "अ " वर्गातल्या उपांत्य पूर्व फेरी पात्र ठरली होती. अटलांटा टीमच्या आजवरच्या अनेक दशकांच्या इतिहासातला आता उच्चतम काळ आलेला होता आणि प्रत्येक बर्गामोवासियाला "आपल्या" टीमला प्रोत्साहन देण्याकरता या सामन्यांत हजर राहायचेच होते. बर्गामोमधल्या मैदानांत "फक्त" २१,३०० प्रेक्षक बसू शकत असल्याने आणि या फेरीत अटलांटा टीमचा सामना व्हॅलेंशीया या स्पेनमधल्या संघाबरोबर होणार असल्यामुळे  Union of European Football Associations (UEFA) ने या सामन्याकरता मिलानमधल्या सान सिरो या आणखीनच अवाढव्य स्टेडियमची निवड केली होती.  हा सामना मिलानला हलवल्याने इटालीत बाहेरच्या देशातून आणि देशाच्या इतर भागातून येणाऱ्या प्रेक्षकांच्या येण्याजाण्याची  जास्त चांगली सोय होणार होती. 

 १९ फेब्रुवारी २०२० ला झालेल्या या सामन्याकरता  बर्गामो  आणि आजूबाजूच्या भागातले ४०,००० तरी लोक स्वतःची चारचाकी, सार्वजनिक बस, रेल्वे अशा जमेल त्या  मार्गांनी ६०-७० किलोमीटरवर असलेल्या मिलानला पोचले. त्याचप्रमाणे स्पेनमधूनदेखील सुमारे २,५०० प्रेक्षकही मुख्यतः विमानाने हा सामना पहाण्यासाठी (सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून) मिलानमध्ये हजर झाले. अर्थात मिलानमधल्या फुटबॉल शौकिनांना ही पर्वणी घर बसल्याच साधता आली होती.   

जे प्रेक्षक "जिवाचे मिलान" करण्याकरता सामन्याच्या आदल्या दिवशीच मिलानमध्ये होते त्यातले बरेचसे मिलानच्या वेगवेगळ्या बार आणि खाद्यगृहांत "उद्याच्या सामन्याची चर्चा" करण्याकरता भेटत होते. सामन्याच्या आणि त्याआधीच्या दिवसाचे मिलानमधले एकूणच वातावरण याचे वर्णन करत असलेल्या एका बर्गामोच्या रहिवाश्याच्या मताप्रमाणे " रस्त्यात, स्टेडिअमच्या चौफेर आणि एकूणच सगळीकडेच तुफान गर्दी होती. जणू काही आमचे सगळे गांवच  (लोकसंख्या सुमारे १,२०,०००) मिलानला येऊन पोचले होते."  

सामना सुरु होतांना सान सिरो स्टेडियम खचाखच भरलेले होते. सामना सुरू असतांना बर्गामोतल्या  ४०,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी "त्यांची" अटलांटा टीम ४-१ अशी विजयी होताना आणि झाल्यावर अनेक वेळा जल्लोष केला, एकमेकांच्या गळ्यात गळे घातले, एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या, इटालियन संस्कृतीला अनुसरून एकमेकांना मिठ्या मारल्या आणि  गालांची चुंबनेही घेतली.  याच इटालियन प्रेक्षकांनी सामन्यानंतरविजयाच्या उन्मादांत थव्याथव्यांनी मिलानमधले  बार, गल्ल्या, चौक आणि जमेल तेथे लहान मोठ्या घोळक्यांत  एकत्र होऊन "त्यांच्या" अटलांटा टीमचा विजय साजरा केला आणि मगच मिलानचा निरोप घेतला. मिलानमधून बर्गामो आणि आजूबाजूच्या भागात परतणारे ४०,००० पेक्षा जास्त लोक स्वतःची चारचाकी, सार्वजनिक बस, रेल्वे अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपापल्या जथ्याबरोबरच ६०-७० किलोमीटर परत गेले. स्पेनमधून आलेले व्हॅलेंशीयाचे सुमारे २,५०० समर्थक देखील मिलानहून परतताना कदाचित त्यांचे दुःख हलके होण्याकरता थोडेबहुत मिलानमधल्या  बारमध्ये रेंगाळून, "त्यांच्या" टीमच्या पराभवाची चर्चा करून, मगच परत निघाले असावेत.    

म्हणजेच या सामन्याच्या दिवशी  तसेच त्याच्या आधी आणि नंतर सुमारे  ५०,०००-६०,००० लोक बाहेरून (मुख्यतः बर्गामो आणि जवळपासच्या भागांतून) मिलानमध्ये  आले,  इकडे तिकडे गर्दीतून फिरले, सान सिरो स्टेडियममध्ये एकमेकांना खेटून बसले, स्टेडियममध्ये असताना आणि नंतरही "आपल्या" टीमचे कौतुक करतांना अनेक वेळा एकमेकांच्या गळ्यात पडले आणि आपल्या या तुफानी अस्तित्वाचे ठसे मिलानमध्ये सोडून देत इकडेतिकडे ५० किलोमीटर पासून १,३०० किलोमीटरपर्यंत पसरले. या काळांत किती वेळा किती लोक एकमेकांपासून जवळ असतांना शिंकले किंवा खोकले असतील? त्यामुळे काय काय तऱ्हेचे जंतू किती लोकांत पसरून त्यानंतर किती अंतरावर पोहोचवले गेले असतील?   

या सामन्यानंतर हा "सामना कसा न भूतो न भविष्यति" ठरला याची चर्चा जी सुरू झाली ती अजूनही थांबत नाही.  

फक्त त्या "संस्मरणीय" सामन्यानंतर दोनेक आठवडयांनी बर्गामो आणि आजूबाजूच्या प्रदेशातल्या या चर्चेचा सूर मात्र पूर्णपणे बदलला. 

१९ फेब्रुवारी २०२० च्या आधीपर्यंत इटालीतला "कोरोना व्हायरस"चा प्रभावउत्तर इटालीच्या थोड्याच भागापुरता मर्यादित  होता आणि त्यामुळे साधारण ५०,००० लोक राहत असलेला भाग "बंद" करण्यात आला होता.  १९ फेब्रुवारी २०२०च्या या  "संस्मरणीय" सामन्यानंतर दोनच आठवड्यात बर्गामो आणि त्याजवळच्या  भागांत "कोरोना व्हायरस"चा वणव्यासारखा प्रसार होऊन आजारी लोकांचे लोंढेच्या लोंढे इस्पितळांत येऊ लागले.  त्यानंतर लगेचच "कोरोना व्हायरस"चा प्रसार इतरत्र होऊ नये याकरता  उत्तर इटलीचा बराच मोठा भाग (सुमारे १. ५ कोटी लोक राहत असलेला) "बंद"  करावा लागला.    

त्यानंतर बोलतांना बर्गामोच्या अनेक उच्चपदस्थ (इटालियन) वैद्यकीय अधिकाऱ्यानी याच सामन्याचे  (आणि त्या अनुषंगाने झालेल्या लोकांच्या हालचालींचे) वर्णन "biological bomb"  आणि "रोगराईला आणखीनच भडकवणाऱ्या" असे केले आहे.      

या   "कांडा"बद्दल आणखी बरेच काही म्हणता येईल, पण कांही थोडक्यात  लक्षांत घेण्यासारखे :
- वेगवेगळ्या  पद्धतीने दाखवल्या जाणाऱ्या  जगभरातल्या "कोरोना व्हायरस"च्या प्रभावात इटाली आणि स्पेन आलटून पालटून (अमेरिकेनंतर) दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर दिसतात 
- इटाली आणि स्पेनमधले "कोरोनामुळे झालेले मृत्यू /लोकसंख्या" हे प्रमाण जगाच्या सरासरीच्या सुमारे २५ पट आहे. 

आजवर इटालियन लोकांनी जगाचा इतिहास आणि विज्ञान यांच्या अभ्यासांत बरेच मोठे योगदान दिले आहे. आता साथीचे रोग आणि त्यांचा प्रसार याबद्दल जेव्हा कुठलाही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ काहीही जगभरच्या विद्यार्थ्यांना शिकवेल तेव्हा त्यांत या "संस्मरणीय" सामन्याचा उल्लेख नक्कीच असेल, कारण भविष्यकाळात रोगप्रसाराच्या शास्त्राच्या जगभरांतल्या अभ्यासांत, या एका फुटबॉलच्या सामन्याचे आणि त्याअनुषंगाने रोगप्रसार होऊ नये यासाठी  "ज्या ज्या गोष्टी करू नयेत (आणि तरीही केल्या गेल्या)" याचा नक्कीच समावेश केला जाईल. 

तो तज्ञ काय काय सांगू शकेल, हे जरी अजून अभ्यासले जात असेल तरी तो सुरवातीला नक्कीच म्हणेल. . . . . "माम्मा  मिया" !!

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Apr 2020 - 8:37 am | कंजूस

हो.

कुमार१'s picture

13 Apr 2020 - 9:24 am | कुमार१

संस्मरणीय" सामन्याचा उल्लेख नक्कीच असेल >>> +१११

जालिम लोशन's picture

13 Apr 2020 - 11:47 pm | जालिम लोशन

बरोबर