आन्हिकं आटोपून उत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरु व्हायची.
सर्वात प्रथम मंजन. मारुती मंदिराशेजारील नळावरून पिण्याचं पाणी आणलं जायचं. एकट्याला उचलणं अवघड, अशी देवांच्या मूर्ती ठेवलेली परात गाभाऱ्यातून मठात आणली जायची. लिंबू आणि रांगोळीच्या मिश्रणाने घासून-पुसून सर्व मूर्ती उजळून निघायच्या.
वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ असलेली गणपतीची मूर्ती शेंदुराच्या लेपात अजूनच तेजस्वी दिसायची.
श्रीकृष्णाची मूर्ती अगदी सुबक, सर्वात ऊंच आणि स्वच्छ करायला अगदी सोपी. बालाजीची मूर्ती त्यापेक्षा थोडी अवघड. नृसिंहाची मूर्ती मात्र सर्वात कठीण आणि जडही. तुलनेने लहान मूर्तींची संख्या खूप. नंतर क्रम असायचा शाळीग्राम शिळांचा (शाळीग्रामची पूजा विष्णूचं प्रतीक म्हणून केली जाते, याबद्दलची अनभिज्ञता आजपर्यंत टिकून राहिली) सर्वात शेवटी नक्षीदार तांब्या आणि ताम्हण यांची खास बडदास्त ठेवली जायची, पितांबरी पावडरीने. गोडतेलाने दिवसेंदिवस माखून गेलेल्या समईला तर अग्निदिव्यातून जायला लागायचे. समईतलं तेल एवढं ओघळतच कसं, अशी बालशंका बऱ्याच वेळा मनात यायची. या सगळ्या गडबडीत गोडतेलाच्या किटलीवर कधी कधी अन्याय व्हायचा, तिच्याकडे कुणाचंच लक्ष नसायचं. प्रत्येक मूर्ती आणि फोटो जिथल्या तिथे ठेवल्यानंतर गाभाऱ्याला विलक्षण झळाळी प्राप्त व्हायची.
कोवळं ऊन तोपर्यंत घरभर पसरलेलं असायचं. हळू हळू नातेवाईक, आप्तेष्ट जमायला सुरुवात झालेली असायची. तयारीच्या वेगाचा गुणाकार झालेला असायचा. देवनाळं दरवाजासमोरील पारावर हजर झालेली असायची. फुलं, पूजा साहित्य, हार इत्यादी लगबग जमणाऱ्या माणसांसोबत वाढत जायची.
चहा झाला का? हार अजून किती लागतील, देवांसाठी नवी वस्रे आणली ती सापडेनात, देवांच्या फोटोंना अजून पुसून घेतले नाही का? पाळणा धुवून घ्यायचा राहिलाय अजून, भजनी मंडळ कुठपर्यंत आलंय, नैवेद्यासाठी गोडधोड आणायला कोण जातंय? अशी संवादाची गर्दी व्हायची.
भजनी मंडळ संगीत साहित्यासहित दाखल व्हायचं. सतरंज्या अंथरल्या जायच्या. चहा-पाणी, राम-राम, इत्यादींच्या प्राथमिक चर्चेनंतर भजनाला सुरुवात व्हायची. इतर वेळी फक्त गद्यात ऐकलेली आपली माणसं पद्यात गाताना विशेष वाटायचं, आणि गातानाचा आवाज एवढा वेगळा कसा याचं कुतूहलही. भजनाच्या शेवटच्या कडव्यांमध्ये सूर, ताल यांची कसोटी लागायची. एखादं ओळखीचं भजन विशेष लक्ष देऊन ऐकलं जायचं.
एव्हाना मठ भरून गेलेला असायचा. सोवळं नेसलं जायचं, गाभाऱ्यामध्ये पाळणा बांधला जायचा. उत्सवमूर्ती त्यात विराजमान व्हायचे. आरतीची लगबग सुरु व्हायची. भजन अंतिम टप्प्यात आलेलं असायचं. दरवाजात उभं राहून घंटानाद सुरु झालेला असायचा. शंखाच्या प्रेरक ध्वनींनी वातावरण एका वेगळ्याच उंचीवर पोहोचायचं. भजन संपून एका पाठोपाठ एक आरत्या सुरु व्हायच्या. थोड्या वेळाकरता का असेना पण सर्व जण स्वत्व विसरून रामनामात तल्लीन व्हायचे. आरती संपताच "जय श्रीराम" घोषणेत परिसर दुमदुमून जायचा.
दर्शन, पंचामृत, पंजेरी आणि कलिंगडाचा प्रसाद, नैवेद्य, पंगत, भेटीगाठी, खुशाली, गप्पा, असं सर्वकाही संपून मठ हळू हळू रिकामा व्हायचा.
अशी ही आठवणीतली रामनवमी, आज न भूतो न भविष्यती परिस्थितीत सुद्धा उत्साहात साजरी झाली, देवळात जरी नसली तरी मनामनांत.
जय श्रीराम!
प्रतिक्रिया
3 Apr 2020 - 10:45 pm | शाम भागवत
हा कोरोना लोकांना मानसपूजा शिकवून जाणार असं दिसतंय. :)