मी लहान होते तेव्हाची गोष्ट. पाचसहा वर्षांची असेन. आम्ही एका ओळखीच्या काकूकडे गेलो होतो. आई सांगत होती, "आमची दिदी किनई खूप शहाणी आहे. कुठेही गेलो तरी आईजवळ एकाच जागी गप्प मांडी घालून बसते. कसला गडबडगोंधळ नाही." मी वर पाहिले, आई माझ्याकडे एकटक पाहत होती. मी कसंनुसं हसले आणि मांडी सावरून बसले. बाहेर हाॅलमध्ये दादू काकूच्या मुलांसोबत नुसता धुडगूस घालत होता. त्यांची खेळणी कशीही फेकत होता. मी त्याला बोलणार होते नीट खेळायला, पण आई रागावली असती, म्हणून गप्प बसले. आई हसत म्हणाली, "फारच द्वाड झालाय! मला तर बाई आवरतच नाही." आता काकू कसंनुसं हसल्या. जाताना काकूंनी मला चाॅकलेट दिलं, ते दादूनं लगेच हिसकावून घेतलं. "हे बघा असं आहे! पण दिदीला ना चाॅकलेट आवडतच नाही." आई पुन्हा माझ्याकडे मघासारखीच पाहत होती. मी समजल्यासारखी हसले अन गप्प बसले. कारण मला माहित होते, दादू छोटा आहे त्यामुळे त्याला अजून कळत नाही. मी दादूची मोठी बहिण आहे आणि खूप शहाणी आहे असे आईबाबा नेहमी म्हणत.
मग नेहमीच असे व्हायला लागले. माझ्या सर्व वस्तू, खेळणी, खाऊ तोच घेई. पण मी काही बोलत नसे. कारण दादू लहान होता. मलाही खूप आवडायचा. आईबाबाही म्हणत, " दिदीचा भारीच जीव आहे हं दादूवर!"
काही दिवसांनी दादूही शाळेत जाऊ लागला. मग काय ! माझी पुस्तके सोडली तर इतर सर्व साहित्य , कंपासपेटी,पट्टी, पेन, रंगीत खडू, रबर, सॅक इ. हे त्याचेच असे. आणि त्याचे जुने मला मिळे. मी कधी काही बोलले तर बाबा मलाच रागावत, "वेड्यासारखे करू नको. त्याने नविन घेतले म्हणून तुला दुसरे आणायचे.मग जुने काय फेकून द्यायचे? " पण माझी नविन वस्तू मला परत कधीच मिळत नसे. खरेतर बाबा नेहमीच सर्व वस्तूंचा एकच नविन सेट आणत जो दादू घेई . पण मी गप्प बसत असे.
आता मी आठवीत होते. मला पहिल्या सत्रात सत्त्याऐंशी टक्के गुण मिळून वर्गात पहिला नंबर आला होता. दादूचे मात्र अभ्यासात लक्ष नव्हते. त्याला पंचावन्न टक्के मिळून इंग्रजीत तो काठावर पास झाला होता. आईबाबा त्याला शिकवणी लावणार होते. एक दिवस बाबांचे मित्र घरी आले होते. त्यांनी मला बोलविले, "काय बाळ ! कसा चाललाय अभ्यास?" मी खूश होऊन त्याना मार्क्स सांगणार इतक्यात, बाबा झटक्याने बोलले, "आधी पोहे घेऊन ये आत जाऊन लवकर!" माझा चेहरा खर्रकन उतरला. मी आत गेले, तसे बाबांचे बोलणे कानावर पडले, "दिदी होय ! ती होणार की बॅरिस्टर आता !" पाठोपाठ दोघांचे जोरजोरात हसणे. भयंकर अपमानित वाटले मला. हेच का आपले बाबा? त्यानंतर तासभर बाबा दादूचा अभ्यास,शिकवणी ,त्याने पुढे कोणता कोर्स करायचा इ. बाबत बोलत होते. पण माझे कशातच लक्ष नव्हते. दिवसभर मला काहीच सुचत नव्हते. काहीतरी चुकतेय, पण काय हे समजत नव्हते.
आता मी दहावीत होते आणि दादू आठवीत. दादूला अजूनही शिकवणी सुरू होती पण त्याची प्रगती यथातथाच होती. मला पहिल्यापासूनच कधी शिकवणी लावली नव्हती. मी कधी 'गाईड' ही वापरले नव्हते. कधीकधी अवघड प्रश्न समोर आले की मला 'अपेक्षित' किंवा' गाईड' हाताशी असेल तर बरे होईल,त्याने वेळ वाचेल, असे वाटे. पण "तुला आयत्या उत्तराची सवय होईल. त्यापेक्षा शिक्षकांना जाऊन विचार.वेळ गेला तरी चालेल." बाबा म्हणाले.
मला दहावीत अठ्ठ्याऐंशी टक्के मिळाले. निकालाच्या दिवशी शाळेत सर्व शिक्षकांनी बाबांचे अभिनंदन केले. "कन्या हुशार आहे. आता अकरावीला कोणती साईड घेणार, मॅथ्स कि बायो?" बाबा यावर स्पष्ट न बोलता, " हा:हा: बघू " किंवा " नंतर विचार करू " असे मोघम उत्तर द्यायला लागले. अन इकडे माझ्या डोक्यात लख्खकन बल्ब पेटला ! आजपर्यंत घरात कुणीही, आपण पुढे काय करायचे ,याबद्दल बोललेच नाही ! आजही मी गप्प बसले.
अॅडमिशनचा दिवस उजाडला ! मी बाबांबरोबर काॅलेजच्या ऑफिसमध्ये गेले.फाॅर्म घेताना बाबांना तिथल्या मॅडमनी विचारले, "हं कोणत्या साईडला हवय अॅडमिशन?" बाबा हसून बोलले, "आर्ट्सला ! हो ना गं दिदी ?" मी वर पाहिलं, बाबा एकटक माझ्याकडे पाहत होते. लहानपणी आई पहायची अगदी तस्सेच ! मी झटक्यात मॅडमकडे पाहत म्हणाले, "नाही मॅडम ! मला डाॅक्टर व्हायचंय. मला सायन्सलाच अॅडमिशन हवंय !" मॅडमनी एकदम चमकून माझ्याकडे पाहिलं अन गोड हसल्या. त्यांनी दिलेला फाॅर्म घेऊन मी परत बाबांकडे पाहिलं, बाबा कसंनुसं हसत होते. काहीतरी गमावल्यासारखं. अन मला आठवत होते, ते सारे क्षण जे मी आजपर्यंत माझ्या 'शहाणपणाने' गमावले होते ! आज मी माझ्या 'द्वाडपणावर' खूश होते. एका गोष्टीची जाणीव ठेऊन, ' पुढची लढाई सोपी नाही ! '
=========================================
डिस्क्लेमर :- 'जब I met मी ' लिहिताना लक्षात आले, या विषयाची व्याप्ती मोठी आहे. लोकांना परिस्थिती अनुकूल नसताना जो संघर्ष करावा लागतो, तो सर्वांना सहज कळतो. त्यामुळे कधीकधी समाजाची किंवा ईतर लोकांची मदतही मिळते. मात्र सर्व परिस्थिती अनुकूल असताना आपल्याच लोकांनी केलेले स्वार्थी कटकारस्थान किंवा डावपेच किंवा छुपा दबाव या गोष्टी सहज बाहेरील लोकांना दिसूनही येत नाहीत. मग मदत मिळणे दूरंच. अशावेळी आपणच धडाडीने यावर मात करावी लागते. अशा वेगवेगळ्या वयोगटातील, सामाजीक,आर्थिक परिस्थितीतील स्त्रिया यांच्या समस्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ही कथामालिका सुरू करीत आहे. मला जमले तर पुरूषांच्याही संघर्षकथा माझ्या आकलनशक्तीप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करेन. यापूर्वीचा भाग 'जब I met मी' या नावाने प्रकाशित केला आहे याची नोंद घ्यावी.
प्रतिक्रिया
30 Mar 2020 - 3:39 pm | विजुभाऊ
सुंदर कथा आहे.
याचे पुस्तक नक्की काढा
30 Mar 2020 - 4:04 pm | Cuty
खूप धन्यवाद विजूभाऊ.
मी नुकतीच कुठे लिखाणाला सुरूवात केली आहे. आजूबाजूला समाजात जे दिसतं, जे अनुभव येतात ते लिहीण्याचा प्रयत्न करते.सध्यातरी आटोपशीर छोट्या कथाच लिहीण्याचा प्रयत्न करते आहे. या कथांचे पुस्तक काढण्याचा विचार कधी डोक्यात आलाच नव्हता. पण चांगले प्रतिसाद पाहून लिहायला हुरूप येतो हे खरं.
30 Mar 2020 - 10:18 pm | वीणा३
खूपच छान कथा. फार फार लोक स्वतःचे हाल करून घेतात भिडस्तपणामुळे. आणि बरेचदा घरचेच लोक त्याचा फायदा घेतात :(. भिडस्तपणामुळे खूप नुकसान झालेली, घरच्यांनीच गैरफायदा घेतलेली लोकं बघितली आहेत, वाईट वाटतं, पण स्वभावाला औषध नाही. तो गिरीश कर्नाड आणि शबाना आझमी चा कुठलातरी सिनेमा आहे. गिरीश कर्नाड मोठा भाऊ आणि एकटा कमावता असूनही फक्त भिडस्त असल्यामुळे घरातले नीट वागवत नाहीत.