माझा कृष्णा मामा
कांही कांही माणसाना परमेश्वर फार सुंदर रूप देतो. माझ्या कृष्णामामाला पाहीले कि मला हॉलीवूडच्या चित्रपटातील धिप्पाड हिरोची आठवण यायची. स्वच्छ पांढरे धोतर ,त्यावर तीन बटणाचा पांढरा हाफ शर्ट, अंगाबाद्याने धिपाड,भक्कम मजबूत शरीरयष्टी ,उंचापुरा,कुरळे केस ,रंगाने गोरापान ,पायात जाडजूड कोल्हापुरी चप्पल ,कपाळावर कायम अष्ट्गंघ .कदाचित धोतर नेसणारी हि त्याची शेवटचीच पिढी असावी .सकाळ असो कि रात्र असो त्याच्या चेहऱ्यावरील हस्य मात्र कधिच ओसरत नसे. मामा चालू लागला,कि एखादा कसदार पंजाबी पैलवान रस्तावरून चालला आहे, असे बघणाऱ्याला नेहमी वाटे .
तो पूर्वी कामानिमित्य परगावी राहत असे .तो ज्या वेळी कोल्हापुरात येत असे,ती वेळ म्हणजे आमच्यासाठी दिवाळी असायची .आम्ही शाळेतून घरी आलो कि ज्या ज्या वेळी आई आम्हाला" मुलांनो मामा आला आहे बघा " असे सांगत असे, त्या त्या वेळी हातातील दप्तर फेकून देत व मामाच्या दरबारात हजर होत .त्याच्या घरात आमचे आंबे ,करवंदे,जांभुळे, आनेक खाद्य पदार्थानी आमचे स्वागत होत असे अन ती पण करंड्याच्या करंड्या भरून आणलेली असायचे. मामाचा आग्रहही फार मोठा असे ,तो प्रेमाने सर्वाना भरपूर खाऊ घाले, एखादा चांगला पिकलेला आंबा आम्हाला हुडकून देत असे . लहान मुलांचे तर तो खूप लाड करत असे रस्त्यात कधी तो भेटला कि त्याच्या समोर जाऊन उभारणे एवढेच आमचे काम असे ,मग तो हळूच शर्ट वर करून बंडीतून कधी चॉकलेट तर कधी चार आण्याचे नाण्ये काढून हातावर ठेवत असे. मामा जरी आमच्यापेक्षा वयानी मोठा असला तरी तो आम्हाला मित्रा सारखा वाटायचा .त्याच्या प्रेमाने आम्ही भारावून जात असत, आजीने याचे नाव कृष्ण ठेवण्य पेशा बाळ -कृष्ण असे का ठेवले नाही कुणास ठाऊक?
तो दुपारी झोपल्यावर त्याच्या ढेर पोटावर आम्ही दोन दोन तीन तीन मुले बसत असू व" मामा आगगाडी कर कि" म्हणून सांगत असे . मग काय तो आगगाडीचा आवाज करत आम्हाला हेलकावे देत असे व हळूच सर्व गाडी उलटी करत असे तर कधी जोरात पळवत असे. आमच्या मात्र हसून हसून मुरकुंड्या वळल्या असायच्या .त्याच्या आयुष्याची गाडी मात्र कायम स्थीर असायची .पैसा आणि स्वतःच्या प्रपंच्या मागे लागून बरीच मंडळी आपली गाडी सुसाट सोडतात पण याची मात्र गाडी स्थिर ,समाधानी ,आनंददाई असायची .
त्याचे आयुष्य अगदी परीट घडी प्रमाणे सुबक होते असे नाही ,त्याच्या आयुष्यातहि अनेक प्रकारच्या अनेक अडचणी होत्या पण तो त्या गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादीत ठेवत असे व त्याचा सामना स्वतः करत असे . दुसरी गोष्ट मी मामात काय पहिले म्हणाल तर समोरच्या बरोबर जुळवून घेणे.(mouldable neture) मग ती व्यक्ती कोणीही असो ,तो कधीही अहंकाराने किंव्हा मी म्हणजे कोण किंव्हा ,छोट्या छोट्या गोष्टी साठी वितंड वाद घालणे ,असे कधी माझ्या पहाण्यात आले नाही क़दचित हेच त्याच्या आनंदी जीवनाचे रहस्य असावे .त्याचे जीवन तत्त्वज्ञान हे अगदी साधे ,सरळ ,सोपे, सुटसुटीत असे होते. जसा त्याचा चेहरा अतिशय निरागस होता ,तसाच त्याचा स्वभाव हि निरागस होता. एखाद्या गोष्टीला मामाची दाद देखील त्याच्या शरीरयष्टीला शोभणारीच असायची . म्हणून कि काय तो आम्हाला जवळचा मित्र वाटायचा .
नंतरचा काळात तो राहायला कोल्हापुरात आला. मग त्याचे घर म्हणजे आमचा गप्पाचा अड्डा असे. त्याच्या प्रपंचाला मामीचीही खूप चांगली साथ होती . मामी खुपच गरीब ,सुस्वभावी ,व थोड्या अबोल होत्या. मामानी केलेल्या कोणत्याही विनोदाला त्यांची चांगलीच दाद असायची .त्याचे शिक्षण हैद्राबाद मधील चांगल्या शाळेत झाले होते . वडील मोठे गांधीवादी चळवळीचे पुरस्कर्ते होते. लग्नानंतर मामीने बऱ्याच हिंदी विषयाच्या परीक्षा दिल्या होत्या व त्यात त्यांनी चांगले यश हि मिळवले होते ,त्या चांगल्या शिक्षीकाही झाल्या असत्या मात्र त्याचे आयुष्य ग्रहिणी इतकेच मर्यादित राहिले. .
मामा कधी कधी सांयकाळी विरंगुळा म्हणून रोड वरील मित्राच्या चिरमुर्याच्या दुकानात बसत असे,मामावर विश्वास असल्यनें मित्र दुकानाची सर्व जबाबदारी त्याचेवर टाकून ते बाहेर जात असत. हि संधी साधून आम्ही त्याला मुद्दाम भेटायला जात ,आम्हाला पाहिल्यवर त्याला खूप आनंद होत असे व तो प्रेमाने मुठभर चिरमुरे ,शेंगदाणे आम्हाला देत असे . मात्र त्या दुकानदाराचा स्वामीभक्त भला मोठा कुत्रा अमचावर जोर जोरात भूकंत असे ."घरातील लोकांचेवर कधी कोण भुकतो काय, म्हणून मामा त्याला गप्प बसवत असे .
तो चिवडा फारच छान करत असे, लग्नात अथवा दिवाळीत चिवडा करणेचे विशेष काम नातेवाइक त्याचेवर सोपवत, त्या नुसार त्याची वेशभूषा हि असे . अशा वेळी त्याच्या भावमुद्रा ,हालचाली आम्ही फार कुतूहल्तेने पाहत असे ,मला तर तो भल्या मोठ्या ट्पात चिवडा करीत असताना कुरुक्षेत्रात व्दंद युद्ध करणारा भीम वाटत असे .
मामाला भरपूर संस्कृत सुभाषिते, वैदिक मंत्र तोड पाठ होते . पंचांग ,फलजोतिष याची त्याला चांगली जाण होती .त्याला भेटायला येणाऱ्या व्यक्ती सुद्धा मोठ्या असामी असायच्या . त्याच्या मार्मिक टिपण्या अशा असत कि बराच वेळेस समोरच्याला हसावे कि रडावे हे देखील कळत नसे . नंतर नंतर त्याला रक्दाबाचा त्रास होऊ लागला. वयानुसार विस्मरण हि होऊ लागले ,मात्र एवढे असून देखील त्याच्या चेहर्यावरील हास्य मात्र कधिच कमी झाले नाही ,बहिणीच्या सांगणे वरून आमच्या घरातील गणपती बसवणे व उठवणे हा विधी तो करीत असे .त्यात गणपती विसर्जनचे वेळी शेवटी "आता गणपतीच्या पोटाला बोट लावून मूर्ती हलवा व गणपती विसर्जन करा असे सांगत "आम्हाला देखील हा प्रकार फार गमंतशीर वाटे . मात्र नंतर नंतर विस्मरणा मुळे हि गोष्ट तो दोन दोन तीन तीन वेळेस सांगू लागला मग मात्र "मामा आता गणपती ढकलून ढकलून तो पाटाच्या कडेला आला आहे ,जागा शील्लक नाही ,असे परत सांगू नकोस असे सांगावे लागे. तो पर्यंत दुसऱ्या बहिणीकडे जायचे आहे असे त्याला आठवत व तो आणखीन चल बिचल होई .
अखेरच्या काळात त्याचे वास्त्यव्य मुलीकडे नागपुरात होते. एक दिवस त्याच्या मुलीचा फोन आला "मामा गेले "क्षणभर मी स्तब्धच झालो .त्याच्या स्मृती माझ्या मनपटलावर फिरू लागल्या. ज़्याच्या विनोदाने मृतशयेवर झोपलेला माणूस देखील उठून हसेल ,त्याच हसवणाऱ्या माणसाने या मृतशयेवर चीर निद्रा घेतली होती. ती पण न उठण्यासाठी . मामा तू जिथे असशील तिथे माझा तुला साष्टांग नमस्कार .