'पुढील स्थानक दादर' .लोकलमधल्या घोषणेमुळे मंदार भानावर आला. त्याच्यासाठीचा हा रोजचा प्रवास. समोरच्या माणसांना ढकलत तो दरवाज्यापाशी आला. नेहमीप्रमाणे त्याच्याच वयाचा एक मुलगा दरवाज्यापाशी आला होता. हाही दादरलाच उतरायचा. मंदारला बघून त्याने ओळखीचे हसू दिले. तशी काही फारशी ओळख नव्हती पण रोज पाहून चेहरे ओळखीचे झाले होते. अनोळखी असूनही
ओळखीचा होता तो! मंदार मात्र दरवाजातून बाहेर डोकावत होता. आज कोण जाणे काहीतरी बिनसले होते. उगाचच उदासीपणाचे मळभ दाटून आले होते. एवढ्यात दादर आले देखील.
मंदार गर्दीबरोबर उतरू लागला. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवताना मागून त्याला कुणाचा तरी धक्का लागला आणि तो तिथेच पडला. लगेचच कुणी तरी हात दिला आणि त्याला उभे केले. सावरल्यानंतर मंदारने वळून पाहिले तर त्याच अनोळखी मुलाने त्याला हात दिला होता. त्याला काही बोलणार इतक्यात गर्दीत तो दिसेनासा झाला. मंदारने बाहेर येऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला खरा पण तो काही दिसलाच नाही.
या प्रसंगामुळे मंदार जरा अजूनच नाराज झाला. बुटानी दगड उडवत तो घराकडे चालत निघाला. वाटेत कच-याचा एक मोठा ढिग टाकलेला बघितला. जणू त्याच्या निराशेला तो उचकावत होता. हळूहळू चालत एकदाचा तो घरासमोर येऊन पोहचला. बॅगेतून चावी काढली आणि दरवाजा आत लोटून तो घरात आला. पुढचे दोन तास तरी घरी कोणीच नसणार होते.
सोफ्यावर बसून त्याने मोबाईल वाय फायला कनेक्ट केला आणि तो गेम खेळू लागला. मोबाईलच्या एका कोप-यात जाहिराती चालू झाल्या. एक दोन जाहिरातीनंतर एका जाहिरातीने त्याचे लक्ष वेधून घेतले. ती जाहिरात होती रँडम चॅटची. उत्सुकतेने त्याने त्यावर क्लिक केले आणि तो वेबसाईटवर पोहोचला. एका नजरेत त्याने त्यावरची महिती वाचली.
ही वेबसाईट व्हाटसअॅपप्रमाणे चॅट करू देण्याची सुविधा देत होती. पण समोरची व्यक्ती कुठली आहे , किती वयाची आहे , पुरुष आहे , स्त्री आहे यापैकी तुम्हाला काहीही माहिती नसते. यात फोटो पाठवण्याची , व्हिडीओ कॉल करण्याचीही सोय होती.
म्हणजे ? अनोळख्या व्यक्तीशी बोलायचे ? पण बोलणार काय ? आणि मुळात ज्याची ओळख नाही त्याच्याशी बोलणार कशासाठी ? असे प्रश्न मंदारच्या डोक्यात धुमाकूळ घालत होते. तरीही त्याने नेमके काय होते हे बघण्यासाठी चॅट करायचे ठरवले
काही क्षणात तो एकाशी कनेक्ट झाला. " Hi M28 here , want to _______" हा पहिलाच अश्लिल मेसेज वाचून मंदार गडबडला. असले प्रकार इथे होत असतील अशी अपेक्षा त्याला नव्हती. त्यानी त्या माणसाला डिसकनेक्ट केले आणि दुस-या व्यक्तीला कनेक्ट केले. तिथेही तसेच मेसेजेस येऊ लागले.
एकूणच मंदार या गोष्टीला कंटाळला. साधे रोजचे बोलणे आपल्याला सवयीचे झालेले असते. पण लाजेने म्हणा वा समाजाच्या भितीने म्हणा 'तश्या' गोष्टीही कुणाशी तरी बोलाव्यात ही एक सुप्त इच्छा असेल का ? जिथे कोणताही पुर्वग्रह नसेल , समाजाचे , लाजेचे बंधन नसेल तिथे केवळ 'याच' प्रकारच्या गप्पा मारण्यामागे दुसरे कारण काय असणार म्हणा..
मंदार हा विचार करतोय तेवढ्यात एक मेसेज आला " हाय. कोण तू ? "
" मी मंदार, तू कोण , कुठे राहतोस ? "
"मी शर्वरी. उत्तर प्रदेशमद्धे राहते. तुला माहिती माझं पुढच्या महिन्यात लग्न ठरल आहे.पण मला तर शिकायचे आहे. घरी सांगून पाहिले पण ऐकतच नाहीत...."
मंदारला कोणीतरी अशी व्यक्ती मिळाली होती जिला फक्त साध्याच गोष्टी बोलायच्या होत्या. काही गोष्टी होत्या ज्या कदाचित ती कुणाशीही बोलू शकत नव्हती. तिला ही खात्री होती की मंदार यात काहीच करू शकत नव्हता ,पण तिला केवळ ऐकून घेणारा कान हवा होता.
मंदारने तिची सगळी गोष्ट मनापासून वाचत होता. यात आपले मळभ कधी दुर झाले हे त्याला कळलेच नाही. आपण कोणाच्या तरी खास गोष्टी ऐकतोय ही भावना त्याला सुखावत होती. पण...
अचानक नेट गेले आणि ती डिसकनेक्ट झाली. मंदारने पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट होऊन पाहिले पण पुन्हा पुन्हा " Hi M28 here , want to _______" सारखे मेसेज पाहून तो कंटाळला
कदाचित त्याचे स्टेशन आले होते. उतरण्याची वेळ आली होती.