टीप : मला दीर्घ लिखाणाचा कोणताही अनुभव नाहीये.
पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुकल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतील हि अपेक्षा.
मे 2016
गावातील एक प्रितिष्ठित घर, ज्या घरी पैसा , संपत्ती सामाजिक मान सन्मान या सर्वांची कोणतीही कमतरता नव्हती असे हे घर. या घराने खूप उन्हाळे पावसाळे पहिले होती. कमालीची दरिद्री. शेती असून देखील ती करायला येत नाही कारण सर्व जमिनींवर दावे आणि कोर्टकचेऱ्या, घरी सदैव सासू सुना आणि जावा यांची भांडणे आणि त्यात सतत कोणाचे ना कोणाचे तरी आजारपण. घरात एकूण नऊ भावंडे. पण कोणाचाच कोणाला मेळ नाही. लोकं गंमतीने त्या घराला कुत्र्याचे खळं, अडाण्यांचा बाजार अश्या नावाने हाक मारायचे. दिवस रात्र घरात फक्त भांडणे आणि फक्त भांडणेच.
पण आज तेच घर गावात एक नंबर ला आले. सर्व शेतजमिनी कोर्ट कचेर्यांच्या फेऱ्यातून बाहेर आल्या. घरातील सर्व बहिणींची लग्न होऊन त्या दिल्या घरी व्यवस्थित नांदत होत्या. भांडणे पूर्णपणे थांबली होती. शहरामध्ये स्वतःची दुकानें आणि जम बसलेला व्यवसाय होता. आई आणि वडील दोघांनीही समाधानाने डोळे मिटले होते.
पण हे सर्व काही जादूने झाले नव्हते, हे सर्व साध्य करणारा अवलिया होता तो या घरातला सगळ्यात लहान मुलगा - माऊली.
ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांना लोकं माऊली या नावाने ओळखतात, संत ज्ञानेश्वर हे सर्वात लहान असून देखील सर्वात ज्ञानी होते त्याप्रमाणेच तो देखील होता. घराच्या अत्यंत बिकट परिस्थतीतून वाट काढत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. इतक्या भावंडांमध्ये तो एकटाच शिकला, आणि फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जगाचे ज्ञान देखील त्याने अत्यंत कमी वयात आत्मसात केले. कठोर मेहनतीने त्याने आपले घर आज गावातील प्रतिष्ठित घर बनवले. शिक्षण, राजकारण, व्यवसाय, शेती, वकिली आणि त्याचबरोबर एक सरकारी अधिकारी अश्या सगळ्या ठिकाणी त्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. फक्त स्वतःचा आणि बायको पोरांचा विचार न करता घरातील प्रत्येक सदस्याचा विचार केला. आपल्या घराचा विचार केला. घराची परिस्थिती पालटवण्याचा निश्चय केला. आणि मोठ्या हिंमतीने त्याने त्यात यश देखील मिळवले. ज्या घरात खायला अन्नाचा दाणा मिळत नव्हता तिथे आज पैसा, संपत्ती, धान्य, मोटारगाडी, मान प्रतिष्ठा हे सर्व निर्माण केल होत.
घरी सर्व अडाणी लोकांची फौज असताना देखील सर्व नवीन पिढीला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे सुशिक्षित केले. मग त्यात मुलगा- मुलगी, माझे आणि भावाचे असा भेदभाव पण ठेवला नाही. घरातील प्रत्येक मुलीचे आणि मुलाचे लग्न त्या त्या वेळच्या परिस्थिती प्रमाणे अगदी थाटामाटात लावून दिले. प्रसंगी भावांच्या मुलांच्या लग्नात आपल्या स्वतःच्या बायकोचे दागिने देखील मोडले. स्वतःची शहरातील सरकारी नोकरी सांभाळून देखील गावात कधी आपला वचक कमी होऊ दिला नाही. तो जरी सगळ्यात लहान असला तरी त्या घरातला कर्ता माणूस होता. त्याला आणि त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच घरात घरपण आणि समाधान मिळाले होते.
पण म्हणतात ना.. ! Nothing is permanant.
गावातल्या काही व्यक्ती आणि घरातल्याच काही घरभेदींनी भावाभावात वितुष्ट आणले होते आणि आता मोठ्या भावाला वाटणी हवी होती. घरातल्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रॉपर्टीत आणि अगदी त्याच्या नोकरीच्या प्रॉव्हिडंट फंडात सुद्धा.. पण तो डगमगला नव्हता. किंवा चिडला नव्हता. वाटणी ला कधीच त्याचा विरोध नव्हता पण त्याचे इच्छा होती कि वाटणी होताना देखील घरात सर्वांनी पुरणपोळी खायची. अगदी आनंदाने. वाटणी होताना इतर लोकं भांडतात, मारामारी होते पण माझ्या घरात असे कधी असे होऊ नये असे वातावरण तो निर्माण करू इच्छित होता. वाटणी नंतर देखील सर्वांनी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने राहावे कि जगाला हेवा वाटेल. आणि ते साध्य करण्यासाठी त्याने आजवर प्रामाणिक प्रयत्न केला होता.
परंतु आज त्याचाच मोठा भाऊ इतक्या टोकाला गेला होता कि सगळं मलाच पाहिजे. आज असलेली सर्व संपत्ती आणि प्रतिष्ठा हि फक्त माझ्यामुळेच आली, मी गावी राहून शेतीत काबाडकष्ट केले म्हणूनच सगळं साध्य झाले असा त्याचा समज झाला होता, नव्हे तो घरभेदींनी करवून दिला होता. आपल्याच लहान भावाबद्दल असेलली ईर्ष्या इतकी पराकोटीला गेली होती कि त्यापुढे तो हे देखील विसरला कि स्वतः मरणशय्येवर असताना देखील 3 दिवस अन्न पाण्याविना राहून माझ्यासाठी धावपळ करून मला माझ्या लहान भावानेच वाचवले होते.
ज्या लहान भावासाठी त्याने जगाशी दोन हात करायला पाहिजे त्याच भावाला तो शिव्या शाप देऊ लागला. त्याची मुले नपुंसक राहतील असे भाष्य करू लागला. इतक्या टोकाची घृणा आणि भावाबद्दल असणारी ईर्ष्या निर्माण झाली होती.
आज वाटणीचा दिवस. माऊली हताश होता, हतबल होता पण तरीही शांत होता. भांडुन भांडुन कोणाशी भांडणार, ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले त्या भावाशी?? कि ज्यांना ज्यांना लहानाचे मोठे केले त्या पुतण्यांशी???
सर्व गोष्टींची वाटणी होता होता शेवटी घरातला घरगडी रामदास हा इथून पुढे कोणाकडे काम करेल हे देखील ठरवले जाणार होते. मोठ्या भावाला शेती जास्त मिळाल्यामुळे तसेच स्वतः पूर्वीपासून तो शेतीकाम च करत असल्याने रामदास त्याला स्वतःकडे हवा होता. तसेच त्याला भावाकडे न पाठवून त्याला आपल्याच लहान भावाची जिरवायची होती.
सर्वात शेवटी रामदास ला विचारण्यात आले, कि बाबा तुला कुठे जायचेय? तुकारामाकडे कि माऊली कडे ? त्याने दोघांकडे पहिले, एक व्यक्ती ती होती ज्याच्यामुळे त्याने ते गाव पहिले, त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळाली, आणि एक व्यक्ती ती होती ज्यांच्यासोबत त्याने शेतात काम केले होते. तो विचारात पडला. आजवर त्याला देखील कधी वाटले नव्हते कि मला दोन भावांपैकी एकाला निवडण्याची वेळ येईल. तो स्तब्ध झाला. दोघा भांवाकडे पाहताना त्याला त्याच्या आयुष्याचा पूर्ण प्रवास आठवायला लागला.
जुलै 1980
कुडाळ एस टि स्टॅन्ड वर नेहमीप्रमाणे गोंगाट चालू होता. प्रवाश्यांची धावपळ, हमाल, वस्तु विक्री करणारे, ST च्या गाड्यांचा आवाज, कंडक्टर ड्राइवर यांची लगबग हे सर्व रामदास एका कोपऱ्यातून पाहत होता. शेजारी असलेल्या स्पिकर मधून वेगवेगळ्या गाड्या आणि मधल्या स्थानकांची नावे कानावर पडत होती. आजूबाजूला सर्व फास्ट मोशन घडत होते पण तो शांत होता. त्याच्या गंभीर नजरेत कुठेतरी उद्याची चिंता दिसत होती. पण तो उघडपणे दाखवू शकत नव्हता कारण त्याच्या भरवश्यावरच त्याची बायको आणि दोन लहान मुलं अवलंबून होते. सर्वांच्या डोळ्यात भूक स्पष्टपणे दिसत होती .. कदाचित बऱ्याच दिवसापासून त्या सगळ्यांनीच पोटभर असे काही खाल्ले नव्हते.
रामदास, जनाबाई, सुरेश आणि राणी असा चौघांचा त्याचा संसार. राहायचा कोणताही ठिकाणा नाही. जिकडे काम मिळेल तिकडे मुक्काम. रामदास आणि त्याची बायको शेती आणि इतर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. आज या गावी तर उद्या त्या गावी असे करत करत त्याचे आणि कुटुंबाचे जिवन चाललेलं होत.
कित्येक वेळेला बरेच फिरल्यावर देखील काम मिळत नसे, मग त्यावेळी मग उपाशी राहायला लागे, पण मजबुरी आहे म्हणून पैश्यासाठी त्याने कधीही चोरीमारी केली नाही. किंबहुना ते त्याच्या रक्तातच नव्हते. गेल्या 3-4 दिवसापासून काही काम भेटत नव्हते, साठवलेले थोडेफार पैसे पण संपत आल्याने तो चिंतीत होता.
एखाद्या दुसऱ्या गावी जाऊन तिकडे काहीतरी काम मिळते का हे बघण्यासाठी तो आज ST स्टॅन्ड वर आला होता.
पण नेमके कुठल्या दिशेला जावे हेच समजत नसल्याने, तो फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या पाट्या वाचून विचार करत होता. कधी वाटे मुंबई ला जाऊन बघू, इतकी लोकं तिकडे कामासाठी पळतात, आणि श्रीमंत होतात. आपणही जाऊन बघू. पण तिकडे तर शेती नाहीये, मग आपल्याला काम कोण देणार? असा सर्व विचार करेपर्यंत गाडी निघून जात असे. विचार करता करता आता संध्याकाळ होऊ लागली, पण निर्णय काही घेता येईना. जनाबाई आपल्या नवऱ्याकडे असहायपणे बघत होती. "आवं, जाऊदे आजचा दिस राहू हितच, उद्या बघू शेजारच्या गावात काय जमत का ते " अस म्हणून तिने सुरेश आणि राणी ला बोलवायला हाक मारली.
ते दोघे आपल्याच नादात खेळत होते, त्यांना आईबापाची परिस्थिती माहिती होती त्यामुळे कधी लाड, हट्ट, खेळणी, शाळा या सर्वाशी त्यांना घेणेदेणे नव्हते. फक्त पोटाला काही खायला मिळावे एवढीच त्यांची अपेक्षा. आईने हाक मारल्यावर दोन्ही पोर आईला जाऊन बिलगली. जनाबाई आणि रामदास ने 2 गाठोडी ज्याच्यात त्यांचा सगळा संसार मावत होता ती उचलली आणि गावाच्या मंदिराकडे चालू लागली. आज तिकडेच त्यांचा मुक्काम होता.
तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी हाक मारली ... ए थांब... !!!
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Feb 2020 - 11:30 pm | नेत्रेश
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
28 Feb 2020 - 12:05 am | शा वि कु
सुरुवात मस्त. छोटासा क्लिफहँगर भारी. लेखनशैली पण छान वाटली. पुभाप्र.
28 Feb 2020 - 10:42 am | कुमार१
चांगली सुरवात.
28 Feb 2020 - 11:55 am | king_of_net
वाचतोय!!
लेखनशैली आवडली.