छोटंसं टुमदार गाव ! अगदी खेडं नाही आणि शहर नाही. वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. गावातून जाणारा एकमेव मध्यवर्ती डांबरी रस्ता. लहान मुले शाळेतून पाठी दप्तर टाकून, उड्या मारत किलबिलत घरी जात आहेत. वर आकाशात कावळ्यांचीदेखील शाळा सुटली आहे.त्यांची विजेच्या तारेवर कावकाव चालली आहे. बगळ्यांच्या माळा शांतपणे उडत आहेत. रस्त्याच्या कडेने छोट्या झुडुपांवर चिमण्यांची चिवचिव सुरू आहे. एका कडेने शिस्तीत गायवासरे लगबगीने शेतातून घरी जात आहेत. त्यांच्या गळ्यांतील घंटा वाजत आहेत. त्याचवेळी दूरवर देवळात घंटानाद होत आहे. कुठेतरी एखाद्या दुकानात रेडिओवर गाणे वाजत आहे, 'सांज ये गोकुळी.....'
वय वर्षे दहा :
आपण शहरात मामाच्या घरी रहायला जायचे का? कित्ती कित्ती मज्जा येईल! मी रोज मामाबरोबर गाडीवर बसून बाजारपेठेत फिरायला जाईन. मोठ्ठ्या ईमारती, मोठी दुकाने पाहीन. खेळणी घेईन. खूप धमाल येईल!
वय वर्षे तेरा :
आपले वडिल व्यवसायाऐवजी नोकरी करत असते तर ! त्यांच्या मागे लागून शहरात बदली करायला लावली असती. मग एखादे मोठे घर, मोठी शाळा आणि नविन मैत्रिणी! वा! खरेच असे झाले तर?
वय वर्षे सोळा :
काय पण पुस्तकात अगदी छान वर्णन करतात गावाचे! वास्तव जीवनाचा अन त्याचा काही संबंध आहे का? ना कसल्या सुखसोयी ना संधी. कसली आली आहे डोंबलाची शांतता अन कसले समाधान !
वय वर्षे वीस :
जीव गुदमरतोय ईथे! एकदा डिग्री मिळाली की शहरातच नोकरी करायची. मग घरी सांगता येईल, 'शहरातलाच बघा म्हणून!' मग छान फॅशनेबल कपडे, चपला, मेकअप आणि नविन संसार! नविन जीवन!
वय वर्षे चोवीस :
आता कुठे जरा मोकळा श्वास घ्यायला मिळाला! बरे झाले, डिग्री मिळाल्याबरोबर शहरात येऊन, प्रसंगी पार्टटाईम जाॅब करत नविन, चांगला फुलटाईम जाॅब शोधला. आणि घरी स्पष्टच सांगितले, 'शहरातलाच हवा'.
खरेच, किती छान झाले. आता काय, छान माॅडर्न राहणीमान आणि नविन संसार! नविन जीवन!
वय वर्षे अठ्ठावीस :
काय पण पेपरमध्ये वर्णन करतात अगदी शहराचे ! वास्तव जीवनाचा अन त्याचा काही संबंध आहे का? ना कसली शांतता ना समाधान. कसल्या आल्या आहेत डोंबलाच्या सुखसोयी अन कसल्या संधी!
वय वर्षे बत्तीस :
आपला नवरा नोकरीऐवजी एखादा व्यवसाय करत असता तर! त्याच्या मागे लागून त्याला आपल्या गावीच व्यवसाय थाटायला लावला असता. मग एखादे छोटेसे घर, पुढे छोटीशी बाग आणि आपल्या सर्व जुन्या मैत्रिणी! वा! खरेच असे झाले तर?
वय वर्षे अडतीस :
एक मोठे शहर! एक मोठी ईमारत! वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. त्या ईमारतीच्या पेन्टहाऊसच्या प्रशस्त बाल्कनीत ती काॅफीचे घुटके घेत उभी आहे. खाली रस्त्यावर वाहनांची वर्दळ, हाॅर्नचे आवाज, कामावरून घाईघाईत घरी चाललेल्या दुचाकीस्वारांची गडबड!
अचानक तिच्या कमरेला दोन छोट्या हातांची मिठी पडते. ती दचकते तसा तो खिदळतो. तिचा मुलगा. वय वर्षे दहा! तिला लाडाने बिलगतो, "मम्मी.....आपण मामाच्या घरी रहायला जायचे का? कित्ती कित्ती मज्जा येईल ! मी रोज मामाबरोबर गाडीवर बसून शेतात फिरायला जाईन. मोठ्ठा डोंगर,मोठे शेत पाहीन. फुलपाखरांना पकडेन. खूप धमाल येईल!" ती पाहतच राहते! मग लगेच सावरून म्हणते, "चल, वेडा कुठला!" अन ती त्याला घेऊन घरात जाते. आत रेडिओवर गाण्याचे सूर ऐकू येतात, 'सांज ये गोकुळी .....'
प्रतिक्रिया
20 Jan 2020 - 6:11 pm | इरामयी
छान आहे!
20 Jan 2020 - 11:53 pm | सौन्दर्य
जीवन हे असेच आहे, दुरून सर्वच छान दिसते. पण जवळून पाहिल्यावर 'घी देखा मगर बडगा नही देखा' म्हणण्याची पाळी येते.
24 Jan 2020 - 2:49 am | तुर्रमखान
शहरात येणार्या लोकांची संख्या बघितली की हे लक्षात येतं. शहरात बसून गावाकडचं शेत, गाई-म्हशी, शुद्ध हवा, ताज्या भाज्या वगैरेंचे उमाळे काढायला ठिक आहे. अगदी गावाकडच्या मुलींनादेखील गावाकडचा नवरा नकोच असतो हल्ली.
21 Jan 2020 - 12:22 am | एस
भारीच दैवदुर्विलास!
21 Jan 2020 - 9:58 am | Cuty
ईरामयी, सौन्दर्य,एस धन्यवाद. कधीकधी आपणाला नेमके काय हवे आहे हेच लवकर लक्षात येत नाही. ते लक्षात आले, तर कधी कोणत्या बाबतीत तडजोड करावी लागेल याची आधीच मानसिक तयारी होते.
22 Jan 2020 - 2:49 am | सोन्या बागलाणकर
सर्कल ऑफ लाईफ...म्हणतात ना सुख हे मानण्यात असतं
23 Jan 2020 - 4:06 pm | Cuty
धन्यवाद.
8 Feb 2020 - 4:16 pm | चौथा कोनाडा
वाह, सुंदर, निरागस !
मुलीच्या स्वप्नाचा प्रवास आनि तिच्याही मुलीच्या स्वप्नाचा जन्म !
दुरुन डोंगर साजरे. नेहमी इतरांचेच चांगले वाटते !