अंधार छाया
सहा
बेबी
गुरूजींनी जे सांगितलं त्याच्यावर माझा विश्वासच बसेना! काय मला कोणी झपाटलय? कस शक्य आहे? मी तर माझी मीच आहे. खातेय पितेय, आणखी कोण असणार माझ्या शरीरात?
गुरूजी म्हणाले, ‘हिचा पत्रिका जरा विचित्र आहे. अनिष्ट ग्रहयोग मान आहे. शिवाय सध्या साडेसातीही चालू आहे. तिच्या राशीला. तेंव्हा त्रास हा होणारच.’ ते ठीकच होत. माझी तब्बेत ही अशी लुकडी सुकडी. शिक्षणाचे असे तीन तेरा वाजलेले. तेंव्हा कुंडलीच्या भविष्यावर माझा विश्वास बसला. पण पुढे लागिराबद्दल म्हणताना मला काही खरंच वाटेना. अक्का म्हणाली त्यांना, ‘गुरूजी आम्हाला नक्की काय ते सांगा बरी होण्यासारखी आहे का तुमच्या उपायांनी? का नाहीतर आम्ही तिला परत पाठवू पुण्याला? आईवडील पाहून घेऊ देत काय ते.’
गुरूजींनी मग बऱ्याच जणांचे दाखले दिले. म्हणाले, ‘काही चिंता करून नका, ही बरी होईल. तुमच्याकडेच राहू दे तिला. घरी आईवडिलांना नका कळवू आत्ताच. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी देतो तो मंत्र म्हणत चला.’ आणि आम्ही ॐ नमःशिवाय मंत्र घेऊन भस्माच्या पुड्या घेऊन आलो बाहेर.
मंगला
बस मधून उतरले शिवाजी मंडईपाशी. झपाझप पावलं टाकत पोचले गुरुजींच्या वाड्यात. बेबीला वाटेत मागेमागेच ठेवलं. तिच्या पोलक्याकडे पहायची छातीच होईना माझी! केंव्हा केलन हे गधडीनं? आपण काय करत होतो हे ही करे पर्यंत? असे विचार सारखे येत होते मनात, बसमधे बसल्या बसल्या.
गुरूजी बसले होते जपमाळ घेऊन खुर्चीत. मी माझी व बेबीची ओळख करून दिली. हिच्या रात्रीच्या हकीकती सांगून टाकल्या सविस्तर. बेबीलाही त्यांच्या बरोबरच कळत होते. निदान तसे ती दाखवत होती. शेवटी पाठ करून दाखव म्हणून सांगितलं. गुरूजींना काळ्या फुल्या दाखवल्या!
एकंदरीत तिची कुंडली व हकीकत ऐकून ते म्हणाले, ‘हिला बाधा आहे. कितपत कडक आहे आत्ताच नाही सांगता येणार. पण एकंदरीत काम कठीण वाटतय. या तऱ्हेच्या केसेस मी हाताळतो. पण यासाठी दोन गोष्टी हव्यात. मंत्र म्हणण्याची चिकाटी व काहीही संकटांवर मात करायचे धैर्य हवे. सर्वात मुख्य म्हणजे माझ्यावर विश्वास हवा. मला खात्री आहे की मी हिला बरी करेन.’
गुरुजींचे बोलणे, त्यांचे व्यक्तिमत्व यानी मी प्रभावित झालेली होतेच. मी लगेच तयार झाले. मला फुल्यांबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागून राहिली होती. ‘गुरूजी, या फुल्या का व कशा पडल्या? ही रात्री जाते कोणाच्या बोलावण्यावरून? हे काय गौड बंगाल आहे?
गुरूजी म्हणाले, ‘आलो हं जरा भस्माच्या पुड्यासाठी रद्दीचा कागद आणतो आणि सांगतो.’ कागदाचे सारखे भाग करत गुरूजी म्हणाले, ‘त्याचं असं आहे. हिच्यातल्याला ती इथे, तुमच्याकडे आलेलं आवडलं नसावं. म्हणून काहीना काही कारणांनी तिला तुमच्या घरातून घालवायचे प्रयत्न आहेत. रात्री असे केले की कदाचित घाबरून तिला आईकडे पाठवेल असतेत.’
‘हो बाई तुम्ही भेटला नसतात तर एव्हाना तिला आम्ही घरीच पाठवली असती.’
त्याला तुम्ही बधला नाहीत. शिवाय माझ्याकडे आणायच ठरवलत. म्हणून तुम्हाला आणखी भिववायला त्या फुल्या पडल्या पोलक्यावर.’
‘पण मग बेबीला इथे येणार आहोत, तुम्हाला दाखवायला, हे माहितही नव्हते! अगदी निघायच्या अर्ध्या तासापर्यंत!
‘तुम्हाला काय वाटतं बेबीचं हे जाणं, तिच्या पोलक्यावर फुल्या पडणं, तिच्या हातून होतय? तिला याची माहितीही नाही! विचारा तिला गुरूजी म्हणाले.
बेबीन मानेनच नाही म्हणून सांगितलं.
गुरूजींनी मग ॐ नमःशिवाय मंत्र आम्हाला दिला. भस्माच्या पुड्या दिल्या व बेबीला बाहेर जायला सांगितले.
गुरूजी खालच्या स्वरात म्हणाले, ‘हिची पत्रिका फारच वाईट आहे. शनिमंगळ युती, स्वस्थानातील राहू, केतूची वाईट दृष्टी तिच्या लग्न स्थानावर आहे. नीचेचे सर्व योग गर्दी करून आहेत. धन स्थानातील गुरू त्यातल्या त्यात बरा आहे. तेंव्हा एकंदरीतच हिचे आयुष्य त्रासाचे आणि हाल अपेष्टांचे जाणार आहे. पुढील काळात लग्नानंतर पतीसुख कमी मिळेल. एका अपत्याचा अपमृत्यू, संतती पासून मानसिक ताप व शारीरिक कष्ट उद्भवतील. सट्टा-जुगार यापाय़ी पतीच्या पैशाचा व्यय होईल. वारंवार जीव देण्याचे प्रसंग. वडीलधाऱ्यांकडून मारपीट संभवते. असो.’
‘सध्या तिच्या राशीला साडेसाती चालू आहे. म्हणून तिला ही बाधा, शिक्षणात खंड, शारीरिक दुर्बलता वगैरे आहेत. घाबरू नका. अमक्या ग्रहाची शांती करतो, मृत्युंजय मंत्राचा जप ब्राह्मणांकडून करवून घेतो, इतके ब्राह्मण जेवायला घालतो वगैरे करून पैसै उकळणाऱ्यांपैकी मी नव्हे. माझे चरितार्थाचे साधन वेगळे आहे. हे सर्व मी काहीही पैसा न घेता करतो. याच्यासाठी माझ्याजवळ एकच साधन आहे, ते म्हणजे हा मंत्र. मंत्राच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल.’
‘हो आणि एक लक्षात ठेवा. पुढे आणखी बरेच वाईट अनुभव यायची शक्यता आहे. पण घाबरू नका. धीर सोडू नका. प्रथम प्रथम एकशे आठ माळा करता आल्या नाहीत तर तिचा हात धरून तुम्ही म्हणालात तरी चालेल. आधी नक्कीच खळखळ करेल ती जपाला.’
बाईंनी चहा आणला, आम्ही आलोय हे पाहून. त्यांचा माल हातोहात विकला गेला होता. बऱ्याच ऑर्डरी मिळाल्या त्यांना. मलाही बरं वाटलं ऐकून.
बेबी
‘कोन ह्यो गुर्जी हाय? त्याच्याकड जायाच म्हनताना म्या अदूगर काजळाची डबी धुंडाळली. अन हिची भन गेली परसदाराला बघितलं अन मास्तरड्याला बोलिवलं बिगी बिगी. त्यो दोड बसला व्हता पवाराच्या चाळीच्या लिंबावर. मास्तरड पाट्या रंगवायचं आधी. म्हनलं, ‘भाड्या, चांगल्या निगाल्या पायजेत फुल्या. आन काढ झरारा.’ ते हळू हळू करत बसलं ब्लौजाला फुल्या, मागावून तिनं घातलान ब्लौज.
गुर्जीला पाह्यलं आन घाबारलोच मी. हे काय ऱ्हावू देतीलस वाटत न्हाई. पर म्या काय अशी सोडू व्हय हिला. कुटून कुटून मारीन पन सोडनार न्हाई.
प्रतिक्रिया
20 Jan 2020 - 11:15 am | आंबट गोड
अगदी रसाळ वर्णन आहे! जुन्या कादंबरीचा अनुभव नक्कीच आहे.
सगळे संदर्भ, गोष्टी जुन्या.......!
फक्त फारच घाइघाईत सांगितल्या सारखं वाटतं...तुम्ही जरा एडिट करुन , योग्य विराम चिन्हं व परिच्छेद टाकून संपादित कराल का?
20 Jan 2020 - 10:18 pm | ट्रम्प
का कोणास ठाऊक पण माझा देवावर विश्वास नाही पण भुतावर आहे !
त्यामुळे मी भुता खेतांच्या कथा , सिनेमे टाळतो .........
असल्या कथा वाचल्या किंवा सिनेमा पाहिला की रात्री भुताची स्वप्ने पडतात , रात्री माझ्या उशाला कोणीतरी बसले असल्याचा भास होतो आणि मी दचकून जागा होतो ........
पूर्वी मी रात्री एक वाजे पर्यंत tv वरचे सिनेमे बघायचो पण व्हायचं काय की रात्री 12 च्या आसपास सोफ्याचा अचानक खटाक !! असा आवाज यायचा किंवा प्लास्टिक ची खुर्चीचा सुद्धा खटाक !!!! आवाज यायचा .....
तेंव्हा पासून उशिरा पर्यंत जागणे बंद केले ....