सनकी भाग २

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 9:11 am

काया जयसिंग हे एक गूढ व्यक्तिमत्त्व. गव्हाळ तरी सावळेपणाची झाक असलेला रंग, गोल चेहरा, पिंगट रंगाचे टपोरे गहिरे डोळे, नाक चाफेकळी , खांद्यापर्यंत रूळणारा स्टेप कट, सडपातळ व सुडौल बांधा, एकूण दिसायला आकर्षक अशी काया. सनकी म्हणून कुप्रसिद्ध असलेली.एका नावाजलेल्या फॅशन हाऊसची मालकीण पण हे नाव ,प्रसिद्धी व यश तिला असच मिळाले नव्हते किंवा ती कोणत्या मोठ्या बापाची मुलगी ही नव्हती तर ती इथपर्यंत तिच्या मेहनतीने पोहोचली होती.

काया एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी पण तिला कपड्याचे लहानपणा पासून आकर्षण होते. म्हणून ती बारावी नंतर फॅशन डिझायनिंगकडे वळली. तिला मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मेरिटवर सहज प्रवेश मिळाला.

तिने कोर्स पूर्ण केला पण ती मधली बरीच वर्षे गायब होती. मुंबईत परत आल्यावर तिने तिच्या वडिलांच्या मदतीने एक छोटंसं कपडे शिलाईचे दुकान उघडले. मदतीला म्हणून सुधीरला कामाला ठेवले. त्या छोट्याशा दुकानापासून ती आज एका नामांकित फॅशन हाऊसची मालकीण बनली होती. इथंपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती.

सुधीर एक होतकरू तरुण होता. शिक्षण फक्त बारावी. काळ-सावळा मध्यम बांधायचा मुलगा. त्याला शिवणकाम व कपड्यातले काही कळत नव्हते. पण कायाने त्याला सगळे शिकवले.त्याच्यासाठी काया त्याची गुरू व मोठी बहीण होती. आज तो काया फॅशन हाऊसचा पंचवीस टक्के पार्टनर होता. फक्त कायामुळे! त्याने कायाचा संघर्ष पहिला नव्हता; तर तो काया बरोबर सुरवातीचा संघर्ष जगला होता.

भले काया सनकी होती.एक्कल- कोंडी होती; पण ती एक चांगली व आपल्या स्टाफची काळजी घेणारी बॉस होती. कर्मचार्‍यांच्या अडचणी ती समजून घेऊन त्यांना सर्वोतपरी मदत करत असे. त्यामुळे स्टाफच्या मनात तिच्या बद्दल आदरयुक्त दरारा होता.

●●●●●

काया मलबार हिलमधीलच प्रियांका हाईट्स या अपार्टमेंटमधील पेंट हाऊसमध्ये राहत होती. तिला उंचीचे आकर्षण होते म्हणूनच कदाचित तिचे ऑफिस व घर ही इमारतीच्या सर्वात वरच्या टोकाला होते. तिचे पेंट हाऊस म्हणजे थ्री. बी.एच.के प्रशस्त फ्लॅट होता समोर छोटेसे स्विमिंग पूल होते. फ्लॅट सर्व सोईंनी युक्त व साऊंड प्रूफ होता. पण एवढ्या मोठया पेंट हाऊस मध्ये ती एकटीच राहत होती. तिच्या या घरात तिचे आई-वडील, सुधीर व एक मोलकरीण सोडली तर कोणालाही प्रवेश नव्हता.

आज सुधीर नेहमी प्रमाणे सकाळी दहा वाजता कायाकडे आजचे दिवसभराचे स्केडूल सांगायला,तिने काढलेले डिजाईन कलेक्ट करून त्यावर काम सुरू करावे का हे विचारायला व आज तिला ऑफिसमध्ये यावं लागेल कारण खूप महत्त्वाची मिटिंग असून तिच्या शिवाय मिटिंग होऊ शकणार नाही हे सांगायला आला होता. तो लिफ्टने वर गेला व त्याने बेल वाजली पण खूपदा बेल वाजवून ही दार उघडले नाही म्हणून सुधीरने त्याच्या जवळ असलेल्या एक्स्ट्रा कीने दार उघडले आणि त्याला धक्काच बसला.

कारण हॉल सगळा अस्ताव्यस्त होता. सोप्यावरील कव्हर दारात पडले होते.काचेचा टीपॉय फुटून काचा पसरलेल्या, फ्लॉवर पॉट ,फ्लॉवर पॉट मधील फुले, भिंतीवरील लावलेल्या पेंटिंग्ज, सर्वत्र काचा व पसारा पसरलेल्या होत्या. समोर असलेला टीव्ही ही फुटलेला. या सर्वातून वाट काढत सुधीर हॉल मध्ये गेला. तो कायाला हाक मारत होता तर काया त्याला हॉलच्या एका कोपऱ्यात कसलासा पेपर हातात घेऊन रडत बसलेली दिसली. तिच्या हाताला जखम होऊन त्यातून रक्त येत होते त्याचे ही कायाला भान नव्हते. हे पाहून सुधीर पळतच किचनमध्ये गेला तिथून त्याने फास्टएड बॉक्स व पाणी आणले. कायाला पाणी पाजले व तिचा जखमी हात त्याने हातात घेतला. काया अजून ही दुसर्‍या हातात तो पेपर घेऊन रडत होती.

सुधीर, “ हा काय वेडेपणा आहे दि? किती लागलय तुला.” तो कापसाने जखम साफ करत व त्यावर फुंकर घालत बोलला.

काया, “ सुधीर तो एंगेजमेंट करतोय. तो अस कसं करू शकतो माझ्या बरोबर?” रडतच तिने तो पेपर त्याला दाखवला तो पेपर म्हणजे न्यूज पेपर होता व त्याच्या पहिल्याच पानावर शिवीन ठाकुरच्या एंगेजमेंटची न्यूज त्याच्या फोटो सहित छापलेली होती.

हा शिवीन ठाकूर कोण होता? त्याचा कायाशी काय संबंध होता? काया त्याच्या एंगेजमेंट न्युजने इतकी का सैरभैर झाली होती?

कथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया