भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :-

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
30 Dec 2019 - 12:08 pm

भाग २

नाकर्त्याचे कर्तेपण -पेशव्याची युद्धपूर्व तयारी :-

रावबाजी हा नाकर्ता , करंटा,पळपुटा म्हणून कुप्रसिद्धच आहे . तर अशा या पेशव्याने युद्धाची तयारी तरी काय केली होती तेही जरा पाहू .

१. नागपूरचा इंग्रजी एजंट जेनकिन्स याने गव्हर्नर जनरल यास लिहिलेल्या पत्रात ( फेब्रुवारी १८१४) पेशवे आणि भोसले यांच्यात इंग्रजांविरुद्ध सुरु असणाऱ्या खलबतांचा उल्लेख केलाय . यात पेशव्याच्या नेतृत्वाखाली संभाव्य इंग्रजविरोधी युतीचा उल्लेख आहे .
२. फेब्रुवारी १८१५ मध्ये रणजित सिंग यांच्या दरबारात संपूर्ण भारतात इंग्रज विरोधी युती करण्याच्या संबंधी बोलणी करण्यासाठी रावबाजीचा माणूस असल्याचा उल्लेख आहे .
३. सप्टेंबर १८१५ मध्ये नागपूरच्या इंग्रजी रेसिडंट ला बातमी मिळाली की नागपूरकर भोसले यांनी एक गुप्तहेर हैद्राबादेस काही खास कामगिरीवर पाठवला आहे . याशिवाय त्रिंबकजी डेंगळे याने भोसल्यास पत्र लिहून "बोलावताच शिंदे होळकर यांच्या बरोबर इंग्रजविरोधी युतीत सामील व्हावे " असे कळवले आहे असे हा एजंट म्हणतो .
४. असेच एक पत्र शिंदे याचा आप्त हिंदुराव घाटगे यास पाठवले गेले .
५. बाळोजी कुंजिर हा पेशव्याचा माणूस वेगवेगळ्या राज्यांना भेटी देत असल्याचा उल्लेख एलपीस्टनने केलाय . एलपीस्तन ने शंका घेतलीये की याच्या मागे प्रति इंग्रज आघाडी चे राजकारण शिजतंय.
६. १८१६च्या शेवटी रावबाजीने अप्पासाहेब भोसले याना योग्य वेळ आली की सैनिकी साहाय्य करण्यासाठी निरोप दिलाय अशी बातमी नागपूरच्या इंग्रजी एजंटास मिळाली असा उल्लेख आहे .
७. जुलै १८१६ मधे आप्पासाहेब भोसले , शिंदे आणि पुणे येथील वकील यांची गुप्त बैठक झाल्याचे नागपूचा एजंट जेनकिन्स म्हणतो .
८. अशीच बैठक शिंदे , पेंढारी प्रमुख आमिरखान आणि होळकर यांच्यात झाली असल्याचा उल्लेख आहे .
९. सप्टेंबर १८१६ मध्ये गुलाब आणि परमानंद या दोन इसमांना शिंदे यांनी नेपाळला लिहिलेली गुप्त पत्रे घेऊन जाताना पकडले .
१०. रावबाजीने होळकरांचे साहाय्य मिळवण्यासाठी गणेशपंत पिटके आणि धोंडोपंत तात्या नावाचे वकील होळकरांकडे पाठवले होते. शिंदे , होळकर , आमिरखान आणि जालीमसिंग कोटेकर अशी इंग्रज विरोधी आघाडी उघडण्याचा त्याचा बेत होता. (हा जालीमसिंग कोटेकर म्हणजे कोण ते मला कळले नाही ).
११.ग. ज . हेस्टिंग्स च्या ६ सप्टेंबर च्या रोजनिशीतील उताऱ्यात रावबाजीने ब्रम्हदेशाच्या बादशाहाशीही इंग्रजांविरुद्ध संधान बांधले असल्याचा उल्लेख आहे.

हे सर्व आपल्यास माहित असलेले उल्लेख आहेत . इतिहासाच्या उदरात आपणास माहित नसलेले कितीतरी उल्लेख गडप झाले असतील . यावरून रावबाजी , ज्यास कोणतेही राजनैतिक, लष्करी शिक्षण मिळाले नाही आणि ज्याच्या नशिबी इतिहासाने केवळ नाकर्तेपणाचा शिक्का मारलाय त्याने या युद्धाची केलेली तयारी पाहून अचंबित व्हायला होते . तो अपेशी ठरला हे त्याचे दुर्दैव ! तो रघुनाथ रावांचा मुलगा म्हणून जन्माला आला हे त्याहून मोठे दुर्दैव ! आणि " भट" या आडनावाने जन्माला हे तर सर्वात मोठे दुर्दैव ! असो .

इंग्रजी तयारी :
दुर्दैवाने इंग्रजास या सर्व प्रयत्नांची माहिती होती. पुण्यात एलपीस्टनने ही आपले गुप्तहेर जाळे विणले होते. यात बाळाजीपंत नातू हे नाव अग्रणी घ्यावे लागते . पेशव्याच्या प्रत्येक हालचालींची बित्तम-बातमी तो एलपीस्टन ला देत असे. रावबाजीने त्याची आणि एलपीस्टनची मैत्री चांगलीच ओळखली होती . रावबाजीने नातूंस वाळवून घेण्यासाठी प्रति मास ५०० रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण एलपीस्टनने तितकीच रक्कम देऊ केली आणि नातूंनी इंग्रजांची बाजु घेतली . या बाळाजीपंत नातूंनी ३००० रुपयात पेशव्याच्या कारकुनांना फितवून अनेक महत्वाची माहिती इंग्रजांना उपलब्ध करून दिली .मराठा साम्र्याज्याची तिरडी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवली त्यात या बालाजी नातूंचे नाव प्रामुख्याने घेता येईल .अर्थात नातू हे एकाच नाव नाहीये . गणेशपंत नामक कोणी एक व्यक्तीला गद्दारीसाठी इंग्रजांकडून ५०० रुपये बक्षिसी मिळाल्याचे उल्लेख आहेत . या गणेशपंतांचा मासिक पगार ५० रुपये होता . बापू भट हा आंगऱ्यांचा दिवाण आणि साताऱ्यातील चिटणीस, प्रभाकर बल्लाळ हा अमृतराव पेशव्याचा वकील अशी ही आपल्यास माहित असलेली मराठेशाहीच्या गद्दारांची यादी आहे.
मराठ्यांचे राज्य बुडवल्याचा ठपका रावबाजीवर ठेवताना या अश्या दगाबाज लोकांचा किंवा " जे इंग्रजांच्या बाजूने लढले" त्यांचा आणि आतून इंग्रजांस सामील झाले त्या लोकांचा न्याय निवाडा कोणत्या तराजूत आणि कसा करणार ? अशा अवघड जागी दुखणे दुखणे असलेल्या गोष्टी ब्राह्मण ब्राह्मणेतर या तराजूत तोलल्या की मग स्वतास पाहिजे तसे सोयीस्कर नित्कर्ष काढता येतात . तर ते असो .

पुणे करार झाल्यावर रावबाजी पंढरपूर आणि मग माहुलीस गेला . माहुलीतील मुक्कामात इंग्रजांशी बिघाड करण्याची मसलत आकार घेऊ लागली . बापू गोखले यांस प्रमुख सेनापती नेमण्यात आले आणि युद्ध तयारी साठी एक करोड रुपये देण्यात आले. बापूने फौजेत जोरदार भरती चालू केली . कुस्त्यांच्या दंगली घडवून त्यातून माणसे निवडून त्यांना फौजेत भरती करण्यात आले .(अर्थात वरवर ही फौज पेंढाऱ्यांशी लढण्या करीता जमवली जात होती ) .बापूला पेशव्याचा चंचल स्वभाव चांगलाच ठाऊक होता. त्याच्यामुळे "तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही सल्ला मी ऐकणार नाही , तुमच्याच सांगणी प्रमाणे मी वागेन " असा स्वदस्तुरचा लेख बापू गोखल्याने रावबाजी कडून लिहून घेतला . किल्ल्यांची डागडुजी केली गेली . धुळपांना आरमार सज्ज करण्यास सांगितले गेले (त्याचा काहीही उपयौग झाला नाही ). गोविंद राव काळे , अन्याबा मेहेंदळे , दादा गद्रे, रघुपंत थत्ते यांच्या सारख्या जुन्या सरदारांचे मन वळवून घेतले गेले . मिरखान कडे यांच्याशी गुप्तहेर पाठवून बोलणी झाली . नागपूरकर भोसले याना "मानाची वस्त्रे" पाठवण्यात आली. सातारकर छत्रपतींना या सर्व मसलतीची माहिती देण्यात आली.( दैवदुर्विलास असा की या सातारकर छत्रपतींनीच इंग्रजांशी आतून संधान बांधले आणि नंतर गोपाळ अष्टीच्या लढाईनंतर ते स्वतः इंग्रजांस सामील झाले. यात रावबाजीच्या पूर्वकर्माचाही दोष आहे पण ती चर्चा पुन्हा कधीतरी !). युद्ध काळात सातारकर छत्रपतींस वासोटा या दुर्गम किल्ल्यावर पाठवण्यात आले . नाना श्रौती , यशवंतराव घोरपडे यांच्यावर इंग्रजी फौजेत फितूर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली .या यशवंतरास रुपये ५०,००० पेशव्याने दिले . आणि बदल्यात यशवंतरावाने पेशव्याच्या सर्व बेताची माहिती एलपीष्टणास कळवली ! मागे (बहुदा १८१२ मध्ये ) पेशव्याने प्रसंगी उपयोगास पदवी म्हणून कॅप्टन फोर्ड यास नोकरीस ठेऊन एक कवायती पलटण उभी केली होती . ही पळटण बनवण्याचे कारण काय आणि किती संख्येची होती ते मला कळले नाहीये पण बहुदा १००० सैनिक या पलटणीत असावेत . या फोर्डचा आणि पेशव्याचे कारभारी मोरोपंत दीक्षित यांचा खूप स्नेह होता . मोरो दीक्षित हा फोर्डला बातम्या पुरवे अशीही वदंता होती .

सप्टेंबरच्या अखेरीस रावबाजी माहुलीवरून पुण्यास आला . १४ ऑक्टोबर १८१७ रोजी त्याची आणि एलपीस्टनची भेट झाली . त्यात रावबाजीने दसर्यानंतर आपली फौज पेंढाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांच्या मदतीस जाईल असे आश्वासन एलपीष्टणास दिले . ही त्याची एलपीस्टन बरोबरची शेवटची भेट होय. एलपीस्टनला पेशव्याच्या वरती असलेला संशय वाढतच होता . जमलेली फौज ही पेंढाऱ्यांशी लढण्यासाठी नसून पेशवे इंग्रजांशी बिघाड करणार ही त्याची मनोमन खात्री पटली असणार. ऑक्टोबरच्या अखेरीस पेशव्याच्या युद्धाच्या तयारीस आकार येऊ लागला . ठीक ठिकाणून फौजा पुण्यात जमा होऊ लागल्या . १९ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात दसऱ्याच्या निमित्त सैन्य संचलने झाली . सलामी घेताना नारोपंत आपटे यांच्या स्वारांची इंग्रजी सैनिकांशी काहीतरी खरखर झाली . आणि पेशवे इंग्रजी सलामी न घेताच परतले . इथूनच वातावरण चिघळण्यास सुरुवात झाली .
पुण्यातील पेशवे यांच्या फौजेची वास्तव्य ठिकाणे खालील प्रमाणे होत.

१.गारपीर (सध्याचे ससून रुग्णालय आणि परिसर ) . याच गारपिरवर इंग्रजी कर्नल बर्र याची छोटीशी पळटन १८०३ पासून होती .यात नेटिव्ह इन्फन्ट्रीचे १२०० सैनिक आणि २ तोफा होत्या . मराठा फौज या पलटणीस अगदी खेटून जमली होती .
२. नागा गोसावी सैन्य - वानवडी
३. विंचूरकर यांची फौज - भांबुर्डे (सध्याचा सेनापती बापट रोड चा भाग , बहुदा आज जिथे जे डब्लू मॅरियट हॉटेल आहे तो परिसर )

पेशव्याची फौज :-
ग्रँड डफ च्या नुसार
१. घोडदळ -१८०००
२. पायदळ - ८०००
३. तोफा - १४
४. नागा गोसावी सैन्य - ३०००

कर्नल बर्र च्या नुसार -

१. घोडदळ - १५०००
२. पायदळ आणि तोफा - माहिती उपलब्ध नाही

ब्लॅकर च्या म्ह्णाणन्यानुसार -

१. घोडदळ - २८०००
२. पायदळ - १३६००
३. तोफा - ३७

रियासतीतील माहिती : -
१. बापू गोखले - १५००० (बहुदा घोडदळ )
२. आबा पुरंदरे - ३००० (?)
३. विंचूरकर - १०००० (?)
४. नारोपंत आपटे - २००० (?)
५. मिरजकर - २००० (?)
६. पटवर्धन , रास्ते , थोरात , जाधव - प्रत्येकी २००० (?)

मराठा सर सेनापती - बापू गोखले
इतर मराठा सेनानी -
१. मोरोपंत दीक्षित
२. गणपतराव पानसे - (मराठा तोफखाना )
३. अक्कलकोटकर भोसले
४. नारोपंत आपटे
५. विचूरकर
६. सरदार कोकरे
७. आप्पा देसाई निपाणीकर
८. पटवर्धन
९. भोईटे
१०. पुरंदरे
११. फादर पिंटो च्या नेतृत्वाखाली ३००० अरब सैनिक

मराठा फौज मुख्यतः अरब , रोहिले , पठाण , गोसावी , सिद्दी , मुस्लिम यांनि भरलेली होती . (हल्ली "कोरेगाव भीमा च्या युद्धात २५००० पेशवा / ब्राह्मण कसा कापला" याची रसभरीत वर्णने करणार्यांनी ही माहिती जरूर लक्षात घ्यावी)
स्वतः पेशवे ५००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन पर्वतीवर राहणार होते . एकुणात सर्व साधारण अंदाज केला तर किमान १८००० घोडदळ , ८००० पायदळ आणि २० तोफा अशा मराठा सैन्याचा आकडा धरता येईल . यात ३००० गोसावी सैन्य गृहीत धरले आहे .

इंग्रजी फौज :-

१. कर्नल बर्र च्या नेतृत्वाखाली वर सांगितलेली १२०० सैनिकांची पलटण
२. एलपीस्टन ने युद्धाची कुणकुण लागल्यावर अहमद नगर आणि मुंबई येथील युरोपिअन पलटणी पुण्यास बोलवून घेतल्या . यांचा आकडा मला माहित नाही . मुंबईतील फौज ३० ऑक्टोबर ला पुण्यास आली.
३. कप्तान फोर्ड ची वर उल्लेखित पलटण - १००० सैनिक

एकूण इंग्रजी फौज २००० घोडदळ आणि १००० पायदळ आणि ८ तोफा यांपेक्षा जास्त नव्हती .
क्रमश:

इतिहासलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

30 Dec 2019 - 12:46 pm | उगा काहितरीच

येऊ द्यात पुढचे भाग लवकर लवकर.

आनन्दा's picture

31 Dec 2019 - 3:53 pm | आनन्दा

वाचत आहे.. रोचक.

धनावडे's picture

1 Jan 2020 - 12:51 pm | धनावडे

पुढचा भाग लवकर येउद्या.

श्रीनिवास टिळक's picture

1 Jan 2020 - 7:51 pm | श्रीनिवास टिळक

."..अशा अवघड जागी दुखणे असलेल्या गोष्टी ब्राह्मण ब्राह्मणेतर या तराजूत तोलल्या की मग स्वतास पाहिजे तसे सोयीस्कर नित्कर्ष काढता येतात..." हा विचार पटला. इतर अनेक दोष असले तरी रावबाजी संस्कृत आणि बुद्धिबळ प्रेमी होते. त्रिवेंगडा[टा]चार्य नावाच्या एका कानडी संस्कृत विद्वानाकडून त्यांनी "विलासमणिमंजरी" या शीर्षकाचे एक हस्तलिखित बुद्धिबळावर लिहून घेतले होते. त्याची मूळ प्रत राजवाडे संशोधन मंदिर धुळे येथे उपलब्ध आहे.

दैवदुर्विलास असा की या सातारकर छत्रपतींनीच इंग्रजांशी आतून संधान बांधले आणि नंतर गोपाळ अष्टीच्या लढाईनंतर ते स्वतः इंग्रजांस सामील झाले. यात रावबाजीच्या पूर्वकर्माचाही दोष आहे पण ती चर्चा पुन्हा कधीतरी !

हा इतिहास माहीत नव्ह्ता. यावर डीटेलवारी लिहाल का?

आत्तापर्यंतचे दोन्ही लेख माहीतीपुर्ण आणि उत्तम.
भीमा कोरेगावच्या लढाईवर पण वस्तूनिष्ठ लेख येऊ द्या. तिथे नक्की काय झाले? कुणी हरले, जिंकले की लढाई अनिर्णित झाली. नेटवर आहे पण इंग्रजी वाचायला वेळ लागतो :-)

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 2:25 pm | स्वोर्डफिश

डिटेलवार लेख लिहिण्याची स्टाईल आवडली.
परंतु लेखाचे शिर्षक/नाव,
"भारतीय उपखंडातील संस्थानाचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई "
असे जास्त सयुक्तिक वाटते.