त्रिपात्री आणि एक अंकी नाटक....?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Dec 2019 - 10:42 pm

खालील नाटक हे तद्दन काल्पनिक आहे. केवळ टाइमपास म्हणून लिहिले आहे. ह्या नाटकात कुठल्याही प्रकारचे विचारमंथन नाही. त्यामुळे, खूप विचार करणार्यांनी पुढील नाटक वाचले नाही तर फारच उत्तम.

ज्यांनी वाचले आहे, त्यांच्यासाठी....ह्या नाटकाला योग्य ते शीर्षक द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. ...

...........

रोहिणी : तुम्ही पेपरात बातमी वाचली असेलच ना? की एक मुलगी लग्न झाल्यावर तिसऱ्याच दिवशी प्रियकराला घेऊन पळून गेली. खूप चर्चा ही केली असेल ना. मला शिव्या पण देऊन झाल्या असतील. कदाचित ...कदाचित कशाला? नक्कीच... माझ्या घराण्याचा पण उद्धार केला असणार. मुलीला संस्कार कसे नाहीत? किंवा आईवडिलांचे लक्षच नव्हते का?इत्यादी इत्यादी. ..ती जी पळून गेलेली मुलगी आहे ना, ती मीच. मी रोहिणी. आडनाव सांगायची काही गरज नाही. पण काही गोष्टी मात्र नक्कीच सांगायच्या आहेत. निदान आपल्या सारख्या सुज्ञ लोकांना तर नक्कीच.

खरं तर लग्न ठरले त्या दिवशी मी खूपच आनंदात होते. मुलगा पण तसा गावातलाच होता. त्याचेही घराणे आमच्या सारखेच तालेवार. तिथून मागणी आली आणि वडीलांनी लगेच स्वीकारली. खोड काढण्याचा काही प्रश्नच नव्हता. आई तर हुरळूनच गेली....आणि आईच कशाला? मी पण आनंदी झाले होतेच ना. मुलगा शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत शिकायला गेलेला. अजून काय हवं?

मुलाला सुट्टी नसल्याने आदल्या दिवशी साखरपुडा आणि दुसर्‍या दिवशी लग्न, असेच ठरले.साखरपुडा आणि लग्न, दोन्ही गोष्टी सुरळीत पार पडल्या. लग्नानंतरची पहिली रात्र ही माझ्या दृष्टीने तरी खूपच वेगळी होती. मनांत खूपच कवी कल्पना होत्या. पण तसे काहीच घडले नाही.

दुसऱ्या दिवशी आम्ही देवळात दर्शनासाठी गेलो होतो. देवाला नमस्कार केला आणि मग आम्ही शांत पणे गप्पा मारायला म्हणून, देवळाला लागूनच असलेल्या तळ्याकाठी बसलो. गप्पा हळूहळू रंगात आल्या आणि त्याने त्याचे मन उघड केले. त्याने सांगितले की, नवरा म्हणून तो मला सर्वतोपरी सहकार्य करू शकतो पण तो पुरूष म्हणून परिपूर्ण नाही.

त्याच्या बरोबर बोलतांना एक जाणवत होते की, एक व्यक्ती म्हणून तो नक्कीच समंजस आहे. त्यामुळे मी पण हळूहळू त्याला बोलता करत करत, त्याची मानसिकता समजून घेतली. खरं तर चूक त्याची न्हवतीच. निसर्गा पुढे कुणाचे काय चालणार? पण माझ्या मात्र आयुष्याची धूळधाणच होणार होती.

माझे काय? हा प्रश्न मनांत आला आणि मग एक मार्ग पण सुचला. आम्ही दोघेही सरळ वकीलांकडे गेलो.

वकील : रोहिणी जेंव्हा तिच्या नवर्‍याला घेऊन माझ्याकडे आली, तेंव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नवपरिणीत जोडपे दुसर्‍याच दिवशी वकीलाकडे कशाला येईल? पण दोघांनीही मनमोकळे पणे त्यांची समस्या सांगितली. मार्ग तर मिळाला. पण एका जबाबदार व्यक्तीला हे सगळे सांगणे भागच होते. मी मग रावसाहेब यांना बोलावून घेतले.

रावसाहेब : रोहिणी सून होणार म्हणून मी खूपच खुषीत होतो. चांगली शिकलेली सवरलेली सून कुणाला नको असते? मुलगा पण एकुलता एकच आणि रोहिणी पण एकुलती एकच. तिचे वडील आणि मी एकाच बैठकीतले. त्यामुळे व्याही म्हणूनही कुठलीच खोड काढण्यात अर्थ नव्हता. आमची प्राथमिक बोलणी झाली आणि मुलाला फोन केला. मुलगा नाही म्हणायचा, काही प्रश्नच नव्हता. मुलगा 100% ऐकणार ह्याची खात्री होतीच.

लग्नाला 7-8 दिवस बाकी असतांनाच मुलगा आला. आला तेंव्हा पासूनच त्याला माझ्या बरोबर बोलावेसे वाटत असावे. त्या सुमारास त्याची देहबोली, हेच सांगत होती. पण त्यावेळी आकलन झाले नाही.

लग्न झाल्यावर दुसर्‍याच दिवशी वकीलांचा फोन आला. फोन अपेक्षित होताच. काही कार्यालयीन कामे शिल्लक होतीच. शिवाय लग्नाची नोंदणी पण करायची होती.

मी गेलो तेव्हा सुदैवाने मुलगा आणि रोहिणी तिथेच होती. कार्यालयीन कामे पूर्ण झाली आणि मी लग्नाच्या नोंदणीचा विषय काढला. विशेष काढल्या बरोबर मुलगा आणि रोहिणी बाहेर बसले. वकील साहेबांनी हळूहळू मला विश्वासात घेतले. सगळेच कायदे रोहिणीच्या बाजूला आहेत, हे लक्षात आले. मी भलताच पेचात पडलो होतो. पण रोहिणीने मन मोठे केले. तिची कुठलीच अपेक्षा नव्हती. केवळ आमच्या घराण्याला बट्टा लागू नये, ह्या साठी ती सगळा दोष आपल्या अंगावर घ्यायला तयार झाली.

वकीलांच्या सल्ल्याने आम्हीच तिच्या पलायनाचा कार्यक्रम आखला आणि लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी, रोहिणी आमच्याच घरातून पळून गेली. माझ्याच मित्राच्या मुलाच्या मोटरसायकल वर बसून आणि मी कुणालाही न सांगता माझी अर्धी इस्टेट तिच्या नावावर केली, आणि तेही तिने न मागता.

नाट्यप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

7 Dec 2019 - 5:21 am | कुमार१

छान आहे एकांकिका.

विजुभाऊ's picture

7 Dec 2019 - 5:42 am | विजुभाऊ

निसर्गच नही राजी तो कैसा करेगा पिताजी………..
हे शीर्षक कसे वाटतय मुवि?

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 9:50 am | जॉनविक्क

हया प्रतिसादात कुठल्याही प्रकारचे विचारमंथन नाही. कोणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही त्यामुळे, प्रतिसाद वैयक्तिक घेणार्यांनी पुढील पुढील वाक्ये वाचले नाही तर फारच उत्तम.

- योग्य विरामचिन्हे आणी कलिग्रफी असती तर अकु कथा म्हणून सत्कार अवश्य करण्यात आला असतां.