श्रीकृष्णायनम:!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 9:36 am

श्रीकृष्णायनम:!

नमस्कार,

या वर्षाच्या सुरवातीपासून मी माझा ब्लॉग 'मनस्पंदन' सुरू केला आहे. दर शुक्रवारी मी त्यावर एक पोस्ट टाकते. मात्र कालचा पहिला शुक्रवार की मी माझ्या ब्लॉगवर काही पोस्ट केलं नाही. रात्री बारा वाजून गेले आणि माझ्या लक्षात आलं की आजची पोस्ट राहिलीच. खूप चिडले मी स्वतःवर. पण मग विचार केला; काही हरकत नाही. लेख तर तयार आहे... नृत्यांगना.... अहं... चा भाग 3. सकाळी लवकर पोस्ट करून टाकू. रात्री झोपायला तसा बराच उशीर झाला होता. श्रीगोपाळाच्या जन्मोत्सवाला गेले होते ना. घरी येताना त्याचेच विचार मनात घोळत होते. गंमत म्हणजे झोपेत देखील तोच मनात पावा वाजवत होता. सकाळी उठले आणि मनात आलं आज त्या सर्वस्व व्यापून असणाऱ्या गोपाळ... किसन.... कृष्ण... श्रीकृष्ण... भगवान.... आणि तरीही अपल्यातलाच एक बनून राहिलेल्या मनमोहनाबद्दल काहीतरी लिहावं.

तसं लहानपणापासून कृष्णाच्या कथा आपण सर्वांनीच ऐकलेल्या आहेत. त्याचा जन्म.... त्याचं लहानपण... गोपिकांबरोबरचा रास.... गाई चरायला नेणं.... कंस वध... द्वारका वसवणं.... अष्ट पत्नी मिळवणं.... हे त्याचं वयक्तिक आयुष्य.... आणि पांडवांसोबत किंवा असं म्हणावं का.... की पांडवांना पुढे करून महाभारत घडवणं... म्हणजे श्रीकृष्ण! 

श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार! देवत्व असूनही श्रीकृष्णाने अनेकदा त्याचं मानव असणं अधोरेखित केलं. त्याला रणाछोड... भागोडा म्हणतात, कारण जरासंध सतत आक्रमण करत होता. त्या आक्रमणांना प्रतिउत्तर देणं थांबवून कृष्ण तिथून निघून गेला आणि त्याने सर्व जनतेला घेऊन द्वारका वसवली. तो देव होता; तरीही त्याने द्युतक्रीडा होऊ दिली. ज्यावेळी धर्मराज पांचालीला द्यूतात हरला त्यावेळी त्याने तिला भर राजसभेमध्ये वस्त्र पुरवली. परत एकदा द्यूत खेळून धर्मराजाने बंधू आणि सपत्नीक बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारला. देवेश्वर श्रीकृष्ण हे सर्व थांबवू शकला नसता का? श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने बोलणी करण्यासाठी कौरवांकडे गेला. शब्दच्छल जाणणारा.... किंबहुना शब्दच्छल निर्माण करणारा तो निर्माता महाभारतीय युद्ध थांबवू शकला नसता का? 

मात्र त्याने असं काहीही केलं नाही. त्याने भागोडा.... पळपुटा.... म्हणवून घेणं स्वीकारलं; कारण त्यावेळी त्याच्या मनात युद्ध जिंकण्यापेक्षा देखील सर्वसामान्य जनताने सुरक्षित आणि सर्वसामान्य आयुष्य सुखाने जगले पाहिजे ही त्याची इच्छा होती. द्यूत होऊ दिलं.... पांचालीचा अपमान, वनवास, अज्ञातवास हे सर्व तो दुरून पाहात राहिला; त्याने माहाभारत घडू दिलं.... कारण त्याला माहीत होतं की पुढे येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये त्याच्या या सर्व वागण्याचा आदर्श ठेवला जाणार आहे.

तो अवतार होता. त्या युगामधील त्याचं कार्य करायला जसा तो आला होता; तसाच तो पुढे येणाऱ्या युगांसाठी आदर्श असणार होता. त्यामुळे 'आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच याच जन्मात भोगावी लागतात; त्यापासून सुटका नाही;' हेसार्वभौम तत्व प्रस्थापित करणं ही देखील त्याची जवाबदारी होती. 

कदाचित म्हणूनच त्याचं अवतार कार्य संपवताना त्याने एका व्याध्याच्या य:किंचित बाणाने घायाळ होऊन मृत्यू स्वीकारणं मान्य केलं! 

मी आदर्श निर्माण करताना अनेक अयोग्य... असत्य.... घटना घडू दिल्या. त्यामुळे मी देखील पापाचा धनी झालो... आणि म्हणूनच मानवी आयुष्य संपवताना कोणताही दैवी चमत्कार न करता माझा मृत्यू हा देखील आदर्श असावा या दृष्टीने मी एक दरवसामान्य मानवीय मृत्यू स्वीकारतो आहे;' हेच सांगायचं असेल का त्याला?

आपण खरंच हा विचार करून काही शिकू का त्या जगद्नियंत्याकडून?

(केवळ इथे ब्लॉगचा उल्लेख केला आहे म्हणून लिंक देते आहे. तसं मिसळपाववर लेख पोस्ट करणं जास्त आवडतं.
https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/)

प्रकटन

प्रतिक्रिया

त्याने काय सांगितले याचा डोळे उघड़े ठेवून अभ्यास करणारे बहुदा कमीच.

पण कथेतली व्यक्तिरेखा म्हणून मला कृष्ण फार आवडतो. मजा येते त्याच्या करामती, चातुर्य बघून. आणि बोलण्या तर तो ओशोला गरागरा उचलून आपटेल :) तो म्हणेल ते ब्रम्हवाक्य आय मीन कृष्ण वाक्य.

_/\_