युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३७

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
23 Aug 2019 - 8:18 pm

कोणाला साधी कल्पनाही नव्हती की गोकुळातले सारे चैतन्य असे एका क्षणात निघून जाईल. त्या निलवर्णी गिरिधराच्या बासरीचे सुमधुर, भावस्पर्शी सूर हवेच्या लहरींसोबत घुमले नाहीत. कानांना तृप्ती दिली नाही, गोपिकांना वेड लावले नाही आणि त्या स्वरांवर धुंद होऊन नाचणाऱ्या राधेच्या पायातील पैंजणांची मंजुळ छुमछुम सुद्धा कोणाला ऐकू आली नाही.
तो दिवस! कंसाच्या सैनिकाने आणलेला निरोप. कृष्णाला बोलावून घेतले हे कळाल्यावर यशोदेचा जीव नुसता घाबराघुबरा झाला होता. कृष्णाने जायचे ठरवले तेव्हा त्याच्याकडे असलेली असामान्य ताकद, चातुर्य, शक्ती, त्याने केलेल्या भयानक दैत्यांचा संहार हे काही तिच्या काळजीला थांबवू शकत नव्हते. एकुलता एक पुत्र क्रूरकर्मा ख्याती असलेल्या कंसाकडे पाठवायचा? तिने थांबवण्याचा केलेला प्रत्येक प्रयत्न मोडीत निघाला. तेव्हापासून संपूर्ण गोकुळ निष्प्राण झाल्यासारखे वाटतं होते.
यशोदेचं घर तिला खायला उठायचे. ती शांतता सहन करण्यापलिकडची होती. लोणी चोरले म्हणून तक्रार करायलाही कोणी नाही आणि आनंद देणारी कृष्णाची किलबिलही नाही. समोर झाडाची बेचकी निर्जीव पडली होती. त्याच बेचकीला लहानपणी बांधून ठेवलेला कृष्ण आठवला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आला. पुतना, कालिया, इंद्रकोप..... सगळ्यांना हरवणारा यशोदेने बांधलेल्या दोऱ्यांच्या बंधनाला मात्र झुगारू शकला नव्हता.
ती रात्र तिला आठवली.
गर्जुन विजांचा लखलखाट झाला तेव्हा सर्वांच्या मनात धडकी भरली. पावसाने अक्षरशः कहर केला होता. ढग धागे उसवल्यासारखे बरसत राहिले. काहींची घरे मोडून पडली, काहींच्या घरची छपरे उडून गेली...... पावसाच्या थेंबांचा मारा आसूरीपणे होतं होता. गोकुळनिवासी सैरभैर झाले. धावत नंदाघरी पोचले. कृष्णाने त्यांना पर्वतावर का नेले हे आधी कोणाला कळलेच नाही. पण कृष्णाने जेव्हा सरळ गोवर्धन पर्वत जमिनीपासून उखडण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा सगळ्यांना हा नेहमी प्रमाणे मस्करी करतो आहे असेच वाटले.
"कृष्णा, ही गंमत करायची वेळ नाहीये."
"हे बघ कृष्णा, पावसाने आधीच खूप सतावले आहे. आता तू नको त्याला हातभार लाऊ."
कृष्णाने सरळ सगळ्यांना आवाहन दिले. "हा गोवर्धनच वाचवेल आपल्याला पावसाच्या माऱ्यापासून. या मदतीला. सगळे मिळून उचलू शकतो आपण!"
"पर्वत उचलायचा? कसं शक्य आहे?"
"हे असं...." म्हणता म्हणता त्याने त्या पर्वताच्या एका बाजूने अख्खा गोवर्धन तिरपा करत अर्धवट उचलला. डोळे फाडून सगळे त्याची शक्ती बघत होते..... की चमत्कार? सगळ्यांनी 'आ' वासला. आश्चर्य ! भारावल्या सारखे ते बघत राहिले त्या असामान्य घटनेकडे. उचलला गेलेला भार एका हातावर तोलत त्याने दुसरा हात आतल्या भागाला लाऊन पर्वत अजून वर उचलला. उचलत उचलत कृष्ण मध्यभागाखाली पोचला आणि एका विशिष्ठ ठिकाणी त्याने पाय रोवून संपूर्ण पर्वत दोन्ही हातांवर पेलला. सगळे गावकरी आश्चर्याने बघत पर्वताखाली कृष्णा जवळ आसऱ्याला आले. हातातल्या काठ्या आधार म्हणून त्यांनी पर्वताखाली टेकू सारख्या लावल्या. अख्खा गोवर्धन पर्वत गावकऱ्यांसाठी छतच बनला होता जणू.
"हे कसं काय केलसं तू कृष्णा?"
"वाचवलंस रे आज!"
"देवाचा आशिष आहे तुझ्यावर!"
बलराम त्यावर हलकेच हसला. "पाहिलेस कृष्णा? इंद्रदेवाला तिकडे राग आलाय आणि हे म्हणताहेत की देवाचा आशिष आहे तुझ्यावर." कृष्णाने हलके स्मित केले.
हळूहळू सगळे नगरवासी गोवर्धनाच्या खाली आश्रयाला आले. अगदी गोमाता सुद्धा!
रात्रभर पाऊस कोसळत राहिला. पावसाला तिव्र धार चढली होती. विजांचा गडगडाट सुरु होता. नगरवासी दमून निद्रावश झाले होते. कृष्ण मात्र शांतपणे जागा होता गोवर्धन सांभाळत...... त्याच्या एका करंगळीवर!
तो गेल्यावर त्याच्या वार्ता ऐकल्या होत्या तिने केवळ. 'मथुरेला कंसाने कृष्णाला दिलेले द्वंद्वयुद्धाचे आव्हान आणि त्यात कृष्णाने त्या भयानक कंसाचा केलेला वध! ते पाहून कृष्ण देवकी आणि वसूदेवाचा आठवा पुत्र आहे असं म्हणत होते म्हणे सर्व मथुरेला. वाटलं जाऊन विचारावं....खरचं का रे? तू त्यांचा पुत्र आहेस? हे म्हणतात तसं माझं जन्मलेलं मूल.... कंसाने निर्घृणपणे दगडावर आपटलं? देवकीच्या त्या मुलांसारखं?'
कवटी फुटण्याचा आवाज तिच्या कानात घुमला.... डोळ्यांसमोर रक्तात माखलेले मासाचे निर्जीव लिबलिबीत गोळे दिसू लागले. आणि क्षणभर तिची हृदयाची धडधड वाढली. पुढच्याच क्षणी तोल सावरत ती हृदय हेलावणाऱ्या कल्पनेतून बाहेर आली.
'नाही. मी विचारणारही नाही आणि तूहि उत्तर देऊ नकोस. खरं काहीही असलं तरी तू माझाचं पुत्र आहेस!'
जाताना तो तिला म्हणाला होता..... "बाकीचे काहीही सहन करेल हा कृष्ण. पणं मला मातेच्या डोळ्यांतले अश्रू सहन नाही होतं."
"मग का जातो आहेस कृष्णा?"
"यशोदा, देवकी पण एक माता आहे ना." नंद सारख्या प्रेमळ पित्यानेही कृष्णाला त्या नराधमाकडे जायला होकार द्यावा? नंदाला त्याच्या मित्राच्या परिवाराची काळजी वाटते.... ठिक आहे.... पण कृष्णा पेक्षा जास्त? तिने अविश्वासाने नंदाकडे पाहिले, "तिने ही अमाप अश्रू गाळलेत."
"ते पुसायला कोणीतरी जायला हवे ना, माते?" कृष्णाने यशोदेच्या गालावरून ओघळणारे अश्रू टिपले.
"लवकर परत येशील ना?" तिने विचारले तेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असलेला कृष्ण काही क्षण निशब्द झाला.
"मी तुझ्यापासून लांब जाऊच कसा शकतो माते?" मिठी मारत त्याने म्हणले.
कृष्णाच्या आठवणींनी तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. वाऱ्याची मंद झुकूळ आली आणि यशोदेने हातातले दही शिंकाळ्यावर टांगले.
_________
"दाऊ? असे चिंतेत का तुम्ही?" हात पाठीमागे बांधून फेऱ्या घालणाऱ्या बलरामाला कृष्णाने विचारले.
"अनुज, जरासंधाने आता अति केले आहे, असे नाही वाटत तुला?"
"त्यात न वाटण्यासारखे काय आहे दाऊ?"
"मग तू असा आरामात बसून फळं काय खातो आहेस?"
'फेऱ्या मारण्याने तरी काय वेगळे होणार आहे?' कृष्ण हसला.
"कान्हा.... तू माझा अनूज आहेस. मला सगळं सांगायला हवंस."
"हो दाऊ. पण मी कुठे काय लपवतो आहे तुमच्यापासून?"
"हे बघ. हे असं गोल गोल बोलत जाऊ नकोस. मला सांग तू त्याचा वध का करत नाहीस?"
"कारण माझ्या आवाक्याबाहेरचे आहे ते."
"कान्हा, मी पुरता ओळखून आहे तुला ही अशी उत्तरे माझ्या तोंडावर फेकू नकोस. तो जरासंध कितीतरी वेळा चालून आला आपल्यावर. त्याच्यामुळे मथुरानगरी सोडावी लागली, आपली द्वारका पुन्हा स्थापित करावी लागली. आणि तू? तुला माहिती आहे सगळे तुला काय म्हणतात?"
"रणछोड!" कृष्ण शांतपणे फळं संपवत म्हणला.
"आणि तुला त्याच काहीच वाटतं नाही?"
"काय वाटायला हवं दाऊ? खरं तेच म्हणत आहेत."
"पण मी विचारतो का? का सोडतोस तू त्याला? तो जरासंध विकृत आहे, माहिती आहे ना तुला? जिंकलेल्या राज्यांच्या राजांना तो बंदी करतो आणि बळी देतो त्यांचे मुंडके छाटून..... अगदी शरणागती आलेल्या राजांचे सुद्धा! छे! ह्या अश्या अधर्मी मनुष्याला जगण्याचा अधिकारच नाही. मी म्हणतो, तुझे सुदर्शनचक्र चालवत का नाहीस त्याच्या मानेवरून एकदाचे?"
"तुम्हाला माहिती आहे दाऊ, तो कोण आहे?"
"माहिती आहे मला. कंसाच्या पत्नीचा पिता आहे. मगध नरेश आहे. खूप सैन्य आहे त्याच्याकडे. बलवान आणि ताकदवान आहे. आणि तुझ्यामागे कंसाचा प्रतिशोध घ्यायला लागला आहे. आणि महत्त्वाचे, तो अधर्मी आहे. मला वाटते हे एक कारण पुरेसे आहे त्याला मारण्याकरता."
"हो, पण युद्धात त्याला मारणे शक्य नाही."
"मग छळ करून मार किंवा कपट करून मार. तूच म्हणला होतास ना, की न्याय आणि धर्मस्थापना करण्याकरता काहीही करू शकतोस तू? मग करं."
"कारण दाऊ, तो कुणी सामान्य मनुष्य नाही."
"म्हणजे?"
"बिहद्रता महराजांनी काशीच्या जुळ्या कन्यांशी विवाह केला. चंदकौशिक ऋषींनी महाराजांना प्रसाद रुपी आंबा दिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद म्हणून. त्यांनी दोघींनी समान भाग वाटून दिले. त्या दोन राण्यांनी अर्धी शरीरे जन्माला घातली. ते ही मृत! सगळी कडे वार्ता पसरायला नको म्हणून महाराजांनी वनात ती दोन अर्धी शरीरे फेकून दिली. जरा नावाची राक्षसी अन्न पाहून खूश झाली. पण तिने जसे ते दोन तुकडे उचलून खायला एकमेकांच्या जवळ आणले, ते एकत्र सांधले गेले आणि तिच्या हातात अचानक एक रडणार जिवंत बाळं पाहून तिने राजा कडे धाव घेतली."
"याचा काय संबंध इथे कान्हा?"
"ते बाळं म्हणजेच जरासंध!"
"काय?"
"तेच सांगतो आहे, दाऊ."
"म्हणजे जरासंध तुझ्या भक्ताने दिलेला प्रसादाचे फळं आहे म्हणून तू त्याला मारतं नाहीयेस? केवळं आशीर्वादाचा आदर ठेवायचा म्हणून? हे चुकीचे आहे कान्हा!"
"दाऊ...."
"तू त्या शिशुपालाचेही १०० अपराध माफ करण्याचं वचन दिलंस आणि आता जरासंधालाही सोडतो आहेस? असंच करत राहिलास, तर सगळे काय म्हणतील तुला, तू कल्पना केली आहेस?"
"दाऊ, मी ही काल्पनिक जगात रमलो, तर कोणी ना कोणी काहीतरी म्हणेल म्हणून निष्क्रिय बनेन कायमचा."
बलराम कृष्णाकडे बघत होता. कृष्णाने स्मित केले.
"कान्हा, मला सरळं सरळं सांग, जरासंधाचा वध तू करणार आहेस की नाही?"
"यमराज कोणाच्या रुपात मनुष्याचे स्वागत करतील हे केवळं नियती ठरवते! मी कोण त्यात ढवळाढवळ करणारा?"
"अर्थात तू नाही मारणार त्याला."
"पण कारण बनू शकतो!"
"आता हे काय नवीन?"
"काय सांगावं दाऊ, कदाचित कुणाच्या तरी रुपात जरासंधाचे यमराज साक्षात आपल्या समोर येऊन उभे राहतील!"
कृष्णाने स्मित करत बलरामाच्या हातात फळं दिले. "तोवर आपण आपल्या उदराची काळजी घेऊ." बलरामानेही हसून मनावरचा भार हलका केला.

©मधुरा

धर्मलेख

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

25 Aug 2019 - 5:26 am | तमराज किल्विष

पद्म, कंपुगिरी आणि डुआयडी हे वेगवेगळे issues आहेत.
कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एकदा मिपावर फेरफटका मारून ये.
Well, I won't suggest that you should do it.
तिकडे अपमान पण करून मिळतो फुकट. त्यामानाने मायबोली वर अजून हे जास्त पसरलेलं नाहीये.

कंपुगिरी सहसा चांगल्या हेतूने होत नाही. Those who sums up only to show someone down, are part of this.

एखाद्याची योग्य कारणासाठी केलेली पाठराखण किंवा एखाद्याला आपल्या मर्जीने सहमती दाखवत मत मांडणे, त्याच्यावर झालेल्या टिकेला उत्तर देणे, एखादं लेखन आवडून त्याला भरभरून प्रतिसाद देणे याला कंपुगिरी म्हणत नाहीत.

गटबाजी, झुंडशाही असे याचे शाब्दिक अर्थ आहेत.

Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 August, 2019 - 06:13

जॉनविक्क's picture

25 Aug 2019 - 1:01 pm | जॉनविक्क

हा शब्द मराठी आहे ते माहित नहवते ताऊ