भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता तेही सैनिकांच्या पहाऱ्यात.
"महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला."
"दंश केल्यावर शुद्धीत आला?"
"हो, महाराज."
"याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते."
"नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला.
'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?"
"मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र."
"कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?"
"हो."
नागमहाराजांनी भीमाला जवळ घेतलं. "आजोळी स्वागत आहे तुझं."
"आजोळ?"
"हो. मी तुझा मातामह आहे. जसे भीष्माचार्य तुझे पितामह आहेत ! तुझी माता कुंती नात आहे माझी."
भीमने नागमहाराजांना नमस्कार केला.
"कुणी दिली होती तुला खीर?"
"दुर्योधनने..... माझा भ्राता आहे. काकाश्रींचा जेष्ठ पुत्र."
'आपल्या पौत्राच्या जीवावर त्याचेच बंधु उठलेत? इतक्या लहान वयात स्वतःच्याच बंधुचा जीव घेण्याचा प्रयत्न? इतका द्वेष?' नागमहाराज मनातून चिंतित झाले.
"भीम, या पुढे त्याने दिलेले काहीही खाऊ नकोस."
"पण का? खूप स्वादिष्ट होती खीर."
महाराज हसले. 'किती हा निरगसपणा! ह्याला कसे समजावणार कपट काय असते?'
एका मोठ्या सुरई सारख्या दिसणाऱ्या पात्रातून त्यांनी प्याल्यात एक द्रव्य ओतले. भीमाच्या हातात दिले. भीमने क्षणाचाही विलंब न करता ते संपवून टाकले.
"खूप चविष्ट आहे."
"अजून घेशील?"
भीमला या बाबतीत आग्रह करण्याचे कष्ट तो अजिबात कोणाला पडू देत नसे. महाराजांनी भीमचे पोट भरे पर्यंत सुधारस प्यायला दिला.
"कोणता पदार्थ होता हा मातामहं? मी सगळ्यांसाठी बनवायला सांगेन."
"सगळ्यांसाठी?"
"हो. आणि भ्राता दुर्योधनने माझ्या साठी खास खीर बनवून घेतली होती ना. मग मी ही हा मधूर पदार्थ बनवून घेईन. आणि त्यालाही देईन."
"मला सांग, दुर्योधनाने तुला आधी कधी काही असं खास बनवून दिलं होतं ग्रहण करण्याकरता?"
"नाही."
"भीम, त्याने किंवा इतर कोणी ती खीर प्राशन केली?"
"नाही." भीम विचारात गुरफटला, "म्हणजे मातामह...."
"हो भीम."
भीमच्या चेहऱ्यावर संताप उमटला.
"भीम, तुला हे सैनिक सोडून येतील. कुंती चिंतेत असेल ना. तिला तू सापडत नाहीयेस इतकंच माहिती असेल असे दिसते." भीमने महाराजांना नमस्कार केला. त्यांनी हात भीमच्या डोक्यावर ठेवला, "आयुष्यमान भव! आता जा आणि कुंतीला सांग, तुझ्या अंगात शंभर हत्तींचे बळ आहे. काळजी घे."
------
"मी सांगितले ना माताश्री..... मला माहित नाही."
"दुर्योधन, खरं बोल. हे बघ, तो तुझा भ्राता आहे. कुठे आहे तो?"
"मला माहित नाही."
"गांधारी, हे तू माझ्या भाच्याला का विचारते आहेस?"
"भ्राताश्री, भीम अचानक गायब झालाय."
"माताश्री, मी काहीही केलेले नाहीये."
"भीम कुठयं ते अर्जुनाला विचारले नाहीस तू.... युयुत्सुला नाही विचारलेस. मग दुर्योधनाला का?"
"भ्राताश्री, आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोण कसे आहे ते."
"गांधारी.... भीम गायब झाला त्यात माझ्या मुलाचा काय दोष?" गांधारी काही बोलणार तितक्यात धृतराष्ट्राने तिला थांबवले, "नाही गांधारी. सतत त्याच्यावर संशय घेऊ नकोस. भीमची काळजी मलाही आहे. पण म्हणून दुर्योधनाला सगळ्याच बाबतीत जवाबदार धरणे योग्य नाही."
"गांधारी, त्याच्या चेहरा बघ किती पडलाय भीम नाहीये इथे म्हणून. आणि त्याच्यावर आरोप लावते आहेस तू?"
गांधारी शांत बसली. डोळ्यावर पट्टी बांधलेली असली तरी दुर्योधनाचा वाढत जाणारा पांडवांबद्दलचा द्वेष तिला स्पष्ट दिसत होता.
तितक्यात भीमाच्या नावाने जयजयकार सुरू झाला. कुंतीचं रडणं थांबलं आणि गांधारीचा जीव भांड्यात पडला. दुर्योधन मात्र पेचात पडला. आश्चर्याने त्याने दु:शासनाला विचारलं, "काय रे, हे कसं झालं?"
"माहित नाही, भ्राताश्री. खीर तर त्याने प्यायली होती."
"हो ना, आणि विष पण जहाल होतं."
©मधुरा
प्रतिक्रिया
15 Aug 2019 - 10:42 pm | जॉनविक्क
छान. धन्यवाद.