"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...."
"बोल."
"महामहीम, वनातून संदेश आला आहे."
काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दसा कडे पाहू लागले.
"पंडुंचे देहावसान झाले."
"पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली.
'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा...... राजगादीवरचा अधिकार निस्वार्थीपणे सोडणारा.....एका नकळत घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला वनात, काट्याकुट्यात राहणारा पंडु! आता अस्तित्वातच नाही?'
भीष्माचार्य हळहळले.
कुंती रडत होती. युधिष्ठिर सर्व भावांना शांत करत आधार देत होता. पंडुचे शव समोर पडले होते. माद्री निर्जीव नजरेने त्या चितेकडे बघत होती. अखेरचे त्याचे शब्द.....असह्य यातनांनी जड झालेला त्याचा आवाज तिच्या कानी घुमत होता! तो उष्ण स्पर्श अजूनही पाठीवर जाणवत होता. मृत्यूसाठी व्याकूळ झालेला तो आणि दिलेल्या शापाला सत्यात उतरवायला कारणीभूत ठरलेली ती. 'आयुष्य इतकं भयंकर वाटू शकतं, आर्य, की क्षणाचाही विचार न करता तुम्ही मृत्यूला मिठी मारावी?'
"माद्री.... माद्री...." इतका वेळ काहीही न बोलता, न रडता बसलेल्या माद्रीला कुंतीने गदा गदा हालवले.
"मला जगायची इच्छा नाही, ताईश्री."
"असं बोलू नकोस माद्री."
"हे सगळं माझ्या मुळे झालेले आहे."
"माद्री.... ऋषींनी दिलेले शाप खरे ठरतात. तुझी चूक नाही त्यात."
"ताईश्री, आर्य मला बोलवतायत."
"काय विचार करते आहेस तू माद्री?" कुंतीने घाबरून विचारलं.
"ही माद्री ह्या दोषाचा भार घेऊन नाही जगू शकत. आणि त्यांना एकटे नाही सोडु शकत, ताईश्री."
"माद्री..... जर त्यांना सोबत करायची असेल तर मी करेन."
"आपल्या पुत्रांना गरज आहे तुमची."
"मग तुझ्या लहान पुत्रांनाही तुझी गरज आहे तुझी. नाही, माद्री! तू हा विचार सोड."
"तुम्ही काळजी घ्यालं माझ्या पुत्रांची, मला खात्री आहे."
तिचा निस्तेज आणि भावनाहिन चेहऱ्यावरून ती एक चालतं-बोलतं शव भासत होती. कुंतीला काय करावे समजेना!
चिता प्रज्वलित झाली. माद्री चालत जाऊ लागली. "माद्री.... माद्री...." कुंतीकडे दुर्लक्ष करत माद्रीने आपला कोमल सुंदर देह..... त्या भयंकर ज्वालांच्या हवाली केला. आणि एक मोठ्ठ्या आगीच्या ज्वाळेने तिला गिळंकृत केले. माद्रीच्या किंकाळ्यांचा भयावह आवाज कितीतरी वेळ हवेवर ज्वाळांपासून उत्पन्न झालेल्या धूम्र वलयांसोबत परिसरात भरून राहिला. आणि एक सुन्नता.... एक दाहक सत्य! आता पंडु आणि माद्री दोघेही कुंतीला पुत्रांसमवेत सोडून गेले होते.... कधीही परत न येण्यासाठी!
-----
युयुत्सु वर असलेला दुर्योधन आणि त्याच्या अनुजांचा राग स्वाभाविक होता. मातेच्या सामान्य परिचारिकेचा पुत्र आपला अनुज आहे? एका राजकुमाराचा बंधु, एक दासी पुत्र??? पितामह भीष्माचार्य आणि विदुर काकाश्री त्याला आपल्या इतकेच प्रेम देतात, हे पाहून दुर्योधनाचा तिळपापड व्हायचा. युयुत्सूला त्रास द्यायची एकही संधी दुर्योधन आणि त्याचे बंधु सोडत नसत. युयुत्सु आणि विदूर दोघे दासी पुत्र असल्याने विदुरला युयुत्सुबद्दल जास्त स्नेह आहे असं राहून राहून दुर्योधनाला वाटायचे. त्याच्या मनात सर्वांबद्दल विषाचा संचय होतो कसा हेच गांधारीला समजत नव्हते.
विकर्ण मात्र दुर्योधनचा बंधु शोभत नसे. विदुराचा त्याच्यावर वाईट प्रभाव आहे असे ठाम मत होते दुर्योधनाचे. विकर्ण दुर्योधनच्या खोड्यांमध्ये मोडता घालण्याचं काम नित्यनेमाने करायचा. 'युयुत्सुला चिडवायचं नाही, त्रास द्यायचा नाही आणि वर त्याला खेळातही घ्यायचं' अश्या अवास्तव मागण्या होत्या विकर्णच्या दुर्योधनाकडून.
भीष्माचार्यांसोबत कुंती आणि पंडु पुत्र महालात आले.वार्ता कळल्यावर गांधारीची डोळ्यांवरची पट्टी अश्रूंनी भिजली. तिने कुंतीला घट्ट मिठी मारली. दोघी कितीतरी वेळ रडत होत्या. कुंतीला धीर देत एकमेकींचे डोळे पुसत त्या शांत झाल्या. त्यांना कुठे माहित होते हे अश्रू त्यांची पाठ न सोडण्याची जिद्द घेऊन आलेले आहेत!
भीष्मांनी त्यांच्या पांडव पौत्रांना प्रथमच पाहिले होते. या हस्तिनापुराचे खरे अधिपती! या पाच दिव्य मुलांकडे पाहून कुणी राजगादीसाठी अयोग्य म्हणेल त्यांना म्हणेल तर तो धृतराष्ट्रचं!
पांडवांनी तो महाल काहीच दिवसात अगदी आपलासा करून घेतला.
"पितामह..."
"अरे, अर्जुन....ये."
अर्जुन चढून भीष्माचार्यांच्या मांडीवर बसला आणि पोटाला हातांचा विळखा घातला.
"पितामहं, भ्राता भीमपासून मला वाचवा."
"भीम पासून? का बरं?"
"कारण ते गदा घेऊन मला शोधतायत."
"अरे बापरे.... असं काय केलसं तू?"
"हा मला कुंभकर्ण म्हणाला." भीमाने कक्षात प्रवेश करत खांद्यावर टेकवलेली गदा कडेला ठेवून भीष्मांकडे तक्रार केली.
"का रे अर्जुन?"
"कारण यांनी माझं भोजन ग्रहण केलं." अर्जुनाने भित भित सांगितले.
"भीम?"
"पितामहं, मला भूक लागली होती." भलमोठ्ठ पोटं दाखवत भीम म्हणाला.
भीष्म हसायला लागले.
"चिंता करू नकोस भीम. आपण तुझ्यासाठी मुबलक मिष्टान्न बनवून घेऊ."
"आणि माझ्यासाठी पितामह?" अर्जुन लाडात येत म्हणाला.
"हो तुझ्यासाठीही."
भीष्माचार्यांच्या मांडीवर बसलेल्या अर्जुनाला पाहून दुर्योधनाला वाईट वाटलं.
शकुनीचे शब्द पुन्हा त्याच्या कानात घोळले...."हे पंडुपुत्र तुझी जागा आणि अधिकार काढून घेणार, दुर्योधन!"
--------
"पिताश्री, हे पाच जण कधी जाणारेत परत?"
'हे ग्रहण कायमचं लागलं आहे, दुर्योधन!' शकुनी त्याच्याच विचारांत होता.
"दुर्योधन, तुला काही त्रास दिला का त्यांनी?" धृतराष्ट्राने विचारले.
"मला तो युधिष्ठिर सारखं 'अनूज' म्हणतो पिताश्री....! भीमासोबत नीट वागं म्हणतो. भीमाला मात्र काहीच बोलत नाही."
"पाहिलतं महाराज." शकुनीने मुद्दा अधोरेखीत केला.
"आधीच भीम दुप्पट जेवण ग्रहण करतो. त्यात पितामहंनी माझ्या साठी बनवलेले लाडू पण त्याला दिले."
"भीष्माचार्य.... ते तर नेहमी पंडुच्याच पक्षात होते." शकुनी चिडून म्हणाला.
"शकुनी, काय बोलतो आहेस?"
"काय असत्य वदलो मी महाराज?" शकुनी लंगडत धृतराष्ट्राजवळ गेला, "हा राजमुकुट तुमच्या माथी टेकवताना काय सांगितले होते भीष्माचार्यांनी आठवा, महाराज.... 'हा मुकुट जरी तुझ्या मस्तकी विराजमान होणार असला तरी हे केवळ प्रतिनिधित्व आहे. विसरू नकोस, की हे हस्तिनापुर आणि त्याच्या विस्तारलेल्या सीमारेषा आपल्या पुर्वजांची आणि पंडुची देणगी आहे.' ते शब्द माझ्या हृदयाचे लचके तोडत होते, महाराज. आता पंडु नाही तर पंडु पुत्रांच्या पक्षात..... "
"भ्राताश्री." गांधारीने आत प्रवेश करत शकुनीचे वाक्य तोडले. "भीष्माचार्य ना महाराजांच्या पक्षात आहेत, ना त्यांच्या विरूध्द. ते जे काही करतात ते केवळ हस्तिनापुराकरता करतात."
"गांधारीचे म्हणणे सत्य आहे शकुनी..... भीष्माचार्यांच्या निष्टेबद्दल चुकूनही संशय घेऊ नकोस." गांधारी आणि धृतराष्ट्राचं ऐकत शकुनी दाढी कुरवाळत नुसताच उभा राहिला.
"दुर्योधन, तुला हवे तितके मिष्टान्न मिळेल. आणि मी स्वतःच्या हाताने भरवीन तुला."
"पण माताश्री लाडु माझ्या करता बनवले होते."
"तू दु:शासनाला तर मागच्या वेळी सगळे लाडू दिले होतेस... मग यावेळी भीमला एक दिला तर काय बिघडते?"
"म्हणजे काय? दु:शासनाला मी माझे लाडू दिले पण म्हणून माझे लाडू पितामहंनी भीमला का द्यावेत?"
"दुर्योधन, भीम तुझा बंधु आहे."
"मला नकोत असे बंधु." दुर्योधन चिडून निघून गेला.
गांधारीला दुर्योधनाची काळजी वाटू लागली. इतक्या लहानवयात मनात भरलेला राग, द्वेष.... त्याला मोठेपणी त्रासदायक ठरेल अशी कुणकुण तिला लागून राहिली.
©मधुरा
प्रतिक्रिया
14 Aug 2019 - 12:24 pm | नया है वह
आत्ता पर्यंतचे सर्व भाग वाचले, छान लिहित आहात.
पुढील लेखनास शुभेच्छा!
14 Aug 2019 - 2:32 pm | मृणालिनी
धन्यवाद!
14 Aug 2019 - 2:23 pm | अभ्या..
रटाळ आणि कंटाळवाणे लिखाण,
शुभेच्छा
14 Aug 2019 - 2:24 pm | उगा काहितरीच
वरवर चाळले हे लेख. चांगले वाटत आहेत. शांतपणे वाचायला हवं असं वाटतंय. अजून किती भाग आहेत ? पूर्ण भाग प्रकाशित झाले कि एकदाच वाचायला आवडेल.
14 Aug 2019 - 2:32 pm | मृणालिनी
रोज लिहिते आहे. :)
14 Aug 2019 - 2:30 pm | जॉनविक्क
ताईश्री पहिल्यांदा पहिला