मर्लिन मन्रो....

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Aug 2019 - 12:27 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही... :-)

परमेश्वरा !
या जिवाला येथे मर्लिन मन्रो म्हणून ओळखले जाते..
तिचे तेथे प्रेमाने स्वागत कर.
तिचे खरे नाव ते नव्हते,
पण त्याने तुला काही फरक पडत नाही.
कारण तुला तिचे नाव चांगलेच माहीत आहे.
हो ! तिच ती, जिच्यावर सहाव्या वर्षी बलात्कार झाला,
आणि जिने सोळाव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला.
ती आज रंगरंगोटी शिवाय तुझ्यासमोर उभी आहे
तिच्या बरोबर तिचे बातमीदारही नसतील,
छायाचित्रकार नसतील आणि सह्या मागणाऱ्यांच्या झुंडी ही नसतील.
ती बिचारी त्या अंधार्‍या पोकळीला एकटीच सामोरी जात असेल.
तिला म्हणे ती चर्चमधे नागडी गेली असे स्वप्न पडले होते.
गर्दीची मस्तके चुकवत ती चोरपावलांनी चालत होती.
अर्थात तुला स्वप्नांचे अर्थ कोणापेक्षाही चांगले समजतात म्हणा !
चर्च काय, घर काय, आणि गुहा काय, गर्भाशयाएवढेच सुरक्षित असतात...
पण गर्भाशयात अजून वेगळे काहीतरी असतेच..
खाली लोटांगण घालणारे तिचे चाहते होते हे निश्चित.
अंधारात चाललेली प्रार्थना...
पण हे चर्च २० सेन्ट्युरी फॉक्सचा स्टुडिओ नाही..
हे संगमरवरी आणि सोन्याने मढव लेले मंदीर
तिचे शरीर आहे.
ज्याच्यात तुझा पुत्र हातात आसूड घेऊन उभा असतो
आणि स्टुडिओच्या मालकांना हाकलतो.
हाच तो,
जो तुझ्या प्रार्थना मंदिराला चोरांचा अड्डा बनवतो.

परमेश्र्वरा !
पापाने आणि किरणोत्सराने बरबटलेल्या या जगात,
दोष या मुलीचा आहे असे तू खचितच म्हणणार नाहीस.
तिचा दोष असेल तर इतकाच,
दुकानात काम करणार्‍या सामान्य मुलींसारखे
तिलाही सिनेतारका व्हायचे होते.
तिची स्वप्ने सत्यात उतरली पण इस्टमन कलरमधे .
आम्ही तिला जी संहिता दिली त्याप्रमाणे तिने भूमिका केल्या.
आमच्याच आयुष्याचा कथा त्या. सगळ्याच विचित्र.
या ‘२० सेंचुरी’ मधे आमच्या अचाट नाटकासाठी,
परमेश्वरा !
तिला क्षमा कर आणि आम्हालाही क्षमा कर.
तिला बिचारीला प्रेमाची भूक लागली होती
आणि आम्ही तिला झोपेच्या गोळ्या देत होतो.
आम्ही काही संत नाही,
तिच्या मनस्वी दुःखासाठी तिला मानसोपचारतज्ञाकडे आम्ही पाठवले.
तिला कॅमेऱ्याची भिती वाटू लागली आणि
रंगरंगोटीचा द्वेष. - प्रत्येक एंट्रीला ती नवीन रंगरंगोटी करु लागली.
तिच्या मनात आग धुमसत होती आणि
तिला स्टुडिओत रोजच उशीर होऊ लागला.
चित्रीकरणातही ती प्रणय दृष्यात डोळे मिटायची
डोळे उघडल्यावर तिला कळायचे ती प्रखर प्रकाशात उभी आहे.
ते प्रखर दिवे बंद केल्यावर ते तिचे घर पाडायचे.
अर्थात ते त्या सेटवरचे असायचे.
एखाद्या बोटीसारखे ती सिंगापूरला एक चुंबन घ्यायची, तर रिओमधे नाचायची
ड्युकच्या प्रासादांत मेजवानीसाठी हजेरी लावायची.
बिचारीच्या छोट्या घरातून हे सगळे तिला दिसायचे.
तिच्या अखेरचा चित्रपट शेवटच्या चुंबनाशिवायच संपला.
तिच्या बिछान्यावर ती मेलेली आढळली.
तिच्या हातात दूरध्वनी लोंबकळत होता.
ती कुणाला फोन करणार होती हे जगाला कधीच कळले नाही.
एखाद्याने जवळच्या मित्राला फोन करावा आणि ऐकू यावे
‘राँग नं’’ तसेच !
किंवा गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेला
जसा नेमका बंद पडलेल्या फोनपाशी पोहोचतो तसे !

परमेश्वरा !
ज्याला तिला फोन करायचा होता
त्याला ती फोन करु शकली नाही. कदाचित तो कोणीच नसेल,
किंवा तो क्रमांक डिरेक्टरीत नसेल, काय माहीत!
पण तो फोन तू घ्यावास
एवढीच प्रार्थना आहे.....

कवि: अर्नेस्तो कार्देनाल
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.

अनुवादकविता

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

5 Aug 2019 - 1:48 pm | जॉनविक्क

पीडिता म्हणून एक सॉफ्टकॉर्नरही आहे, पण... टाळी एका हाताने वाजलेली अजून ऐकली नसल्याने

श्वेता२४'s picture

5 Aug 2019 - 2:55 pm | श्वेता२४

उत्तम आहे. कविता तरल आहे. मर्लिन माझी फेवरीट आहे दिसण्याच्या बाबतीत.

राघव's picture

6 Aug 2019 - 1:20 am | राघव

छान अनुवाद!

तुषार काळभोर's picture

6 Aug 2019 - 7:56 am | तुषार काळभोर

मनोरंजन विश्वातील सेलेब्रिटींविषयी सहानुभूती वाटते, थोडीशी.

पण , ते विश्व , त्यातील चांगल्या वाईट गोष्टींसह, त्यांनी स्वतः निवडलेलं असतं.
ते न निवडून सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आणि चॉईसही त्यांच्याकडे असतो.

मर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत "अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" अशीच होती.

पद्मावति's picture

6 Aug 2019 - 8:39 pm | पद्मावति

अनुवाद आवडला.

मर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत "अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" अशीच होती.

खरंय अगदी.
मधुबाला, माधुरी दीक्षित, केट विन्सलेट या तिघींमधे थोडा भास होतो मर्लिन मनरोचा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Aug 2019 - 12:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

जकु काका आणि कविता? असे वाटून कुतुहलाने धागा उघडला.
आणि काकांनी अजिबात निराश केले नाही.
पैजारबुवा,