युगांतर-आरंभ अंताचा! भाग १२

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
27 Jul 2019 - 3:45 pm

भीष्मांनी रथ नदीकाठी थांबवला. मनातली घालमेल त्यांना महालात बसू देत नव्हती. नदीकाठी बसून गंगामातेशी बोलून त्यांना मन शांत करावेसे वाटू लागले. त्यांनी नमन करून गंगेला आवाहन केले. एकदा.... दोनदा.... तिनदा.... पण गंगामाता कुठेच दिसेनात. भीष्म अस्वस्थ झाले.
"माते.... आपण प्रकट का होत नाही?"
भीष्म नदीतटावर वाकून हातात जल घेण्याचा प्रयत्न केला, परंतू जल त्यांच्या हातात येईच ना.
" त्या रुष्ट झाल्या आहेत वसूदेव...."
भीष्मांनी वळून पाहिले. एक सुंदर स्त्री उभी होती. तिचे सौंदर्य दैवी भासत होते.
"आपण कोण देवी?"
"जिच्या इच्छापूर्ती करता तुम्ही गाय पळवून आणलीत, आर्य! हाही विचार न करता की ती गाय वाशिष्ठ ऋषींची आहे. वसूदेवाची पत्नी!"
"आर्य? तुमचा गैरसमज झालेला दिसतो, देवी! मी ब्रह्मचारी आहे. हस्तिनापुरसारख्या समृद्ध नगरीत राहतो. वशिष्ठ ऋषींची गोमाता मी का पळवेन?"
वसूला मनुष्य जन्मात आपल्या मुळ रुपाबद्दल काही आठवत नाही, हे समजल्यावर ती खजिल झाली.
"पण त्या तीन कन्यांचे हरण तुम्हीच केलेत, हे मान्य आहे ना?"
भीष्मांनी मान खाली घातली. चेहऱ्यावर दु:खी भाव पसरले. घडलेल्या घटनेचा जाब सगळे आपल्याला विचारणार याची कल्पना त्यांना होती. आज त्यांची माता तर त्यांना दर्शन द्यायलाही तयार नव्हती.
"माझी प्रतिज्ञा एका बाजूला आणि धर्म-न्याय-नियम दुसऱ्या! प्रतिज्ञेचे पारडे नेहमी जड जाणवते मला, देवी."
"प्रतिज्ञेमसाठी तुम्हाला अधर्म करण्याचा अधिकार कोणी दिला, आर्य? तुम्ही काहीही विचारविनिमय न करता, दिलेली आज्ञा पाळणार आहात, आर्य?"
"विचार केला होता, देवी. दासांनी माहिती दिली की या स्वयंवरात कुठलाही पण नव्हता. वरास पसंत करून भाग्ययोगानुसार वराची निवड होणार. विचित्रवीर्यची अवस्था आली नजरेसमोर! सोबत चित्रांगद वीरगतीला प्राप्त झाला, तेव्हापासून बेवारस राहिलेली राजगादी आली नजरेसमोर! स्वयंवरात दुसऱ्या कोणाचे प्रतिनिधी म्हणून जाणे धर्मसंगत नाही, हेही ज्ञात होते. पण राजमातेची इच्छा पूर्ण करणे हे कर्तव्य होते आणि राजगादी सुरक्षित ठेवण्याची प्रतिज्ञाही होती! काय करणार होतो मी, देवी?"
'पत्नीच्या इच्छेसाठी गाय पळवलित आर्य, पित्याच्या इच्छेकरता प्रतिज्ञा घेतलीत आणि आता राजमातेच्या इच्छेकरिता राजकन्याहरण?' ती विचार करत व्यथितमुद्रेने भीष्माकडे पाहत राहिली.
"देवी, मी माझ्या कर्तव्यांचे पालन करत राजकन्यांना मी हस्तिनापूरास घेऊन आलो तरी त्या कन्यांच्या मनाविरुद्ध त्यांचा विवाह मी होऊ दिला नसता. त्यांच्यावर अन्याय करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता."
" हो आर्य? जरी राजमातांची आज्ञा असती तरीही?"
भीष्म निरुत्तर झाले. राजमातांची आज्ञा. राजाज्ञा! हा एकच शब्द. त्यांच्या प्रतिज्ञेने त्यांना इच्छामृत्यूचा वापर करायला लावला असता तर भीष्म देह सोडायलाही तयार झाले असते. त्या शांततेचा अर्थ तिला समजला असावा.
"तुम्ही ज्या वाटेने कुच केली आहे आर्य, ती अत्यंत प्रखर उन्हातून काटेरी महालात नेऊन पोचवते. कृपा करा आर्य, परंतु या पुढे कोणाचीही इच्छापूर्ती करायला जाऊ नका. अंगावर शाप घेऊन जगणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या व्यथा ऐकायलाही कोणी उरत नाही." बोलता बोलता ती अंतर्धान पावली.
भीष्मांना आश्चर्य वाटले. 'कोणी दैवी शक्ती आपल्याशी बोलत होती?' ते विचारात मग्न झाले. समोरच्या वाहत्या नदीकडे पाहून त्यांनी नमन करत विचारले, "माते, खरचं इतके मोठ्ठे पाप झाले आहे का माझ्या कडून? तसे असेल तर सर्वांना पापातून मुक्ती देणाऱ्या माता गंगादेवी आज आपल्या पुत्राला शुद्ध करण्या ऐवजी हा दुरावा का म्हणून देत आहेत? माते? दर्शन द्या....! नदी पात्र भरून प्रवाह वाहत होता. प्रवाहाचा वेग अनियंत्रित भासत होता. तिच्या वेगाने नदी पात्रातले खडक सुद्धा ठिकऱ्या-ठिकऱ्या होत प्रवाहावर विखरून जात होते.
गंगामातेचे उग्र रुप त्यांचा आव्हानाला स्पष्ट नकार देत होते. भीष्मांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले, "वचन देतो माते, आयुष्यात एकदा तरी आज्ञा तोडून स्वतः न्याय करेन. तेव्हाच तुमच्याकडे दर्शनाची याचना करेन!" रथावर चढून त्यांनी दावे हातात धरले. रथ भीष्मांना हस्तिनापुर महालाच्या दिशेने जाऊ लागला.

©मधुरा

कथालेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 4:19 pm | जॉनविक्क

युगांतर-आरंभ वाचकांच्या अंताचा! ;) कृपया हलके घ्या _/\_

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 5:50 pm | जॉनविक्क

तुम्ही थेनॉस पुराण लिहा त्यालाही शिवाप्रमाणे पृथ्वीवर प्रलय आणायचा होता पण त्याला व्हिलन बनवले गेले. अन्याय केला गेला. यावर आपण उत्तम कथा लिहू शकाल तुम्हाला काय लिहायचे हा प्रॉब्लेम नाहीये तर प्रॉब्लेम लिहायचे काय हे जाणंन्यात आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2019 - 7:05 pm | मुक्त विहारि

वाचत आहे. ...

पद्मावति's picture

27 Jul 2019 - 10:08 pm | पद्मावति

वाचतेय.

स्वलिखित's picture

27 Jul 2019 - 11:05 pm | स्वलिखित

वाचतोय